रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 71 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 71

अध्याय 71

मूळकासुराला लंकेची प्राप्ती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

वज्रसारेकडून मूळकासुराचा धिःकार :

येरीकडे अनुसंधान । रम्य रामायण पावन ।
श्रवणें भवदोषखंडण । श्रवणमात्र केलिया ॥१॥
कैकेयीनें प्रबोधोनि कुंभकर्णपत्नीतें । आपण गेली अयोध्येतें ।
मागें वर्तलें तें सावचित्तें । श्रोतृजनीं अवधारिजे ॥२॥
वज्रसारानामें कुंभकर्णजाया । निखंदोनि बोले निजतनया ।
म्हणे पुत्रा तुझा जन्म वायां । भूमिभार झालासी ॥३॥
मूळीं लागोनि सर्व शांती । केली आपुल्या पित्याचे संपत्ती ।
अभाग्यें उरलासि क्षितीं । आम्हां दुःख दावावया ॥४॥
जरी जन्मलासी पाषाण । तरी सार्थक होतें जाण ।
तुज विवोनि वंध्यापण । माझें न चुके पापिष्ठा ॥५॥
जाय शिरीं घालीं पर्वत । नातरी करीं पर्वतपात ।
विष भक्षोनि प्राण निश्चित । सोडोनि देई पापिष्ठा ॥६॥
तुझिया पितृव्याची राज्यसंपत्ती । तुज जन्मतां गेली भस्मांतीं ।
ऐसा अधम वंशाप्रती । जन्मलासी पापिष्ठा ॥७॥
राज्य हिरोनि बिभीषणें । भोगी सुख स्वनंदमनें ।
तुझें जन्म उबगवाणें । झालें असे पापिष्ठा ॥८॥
मातेचें ऐकोनि वचन । पुत्र करिता झाला प्रश्न ।
म्हणे मातें पूर्वकथन । सांग संपूर्ण मजलागीं ॥९॥
वज्रसारा म्हणे मूळकासुरासी । पूर्वीं श्रीराम पंचवटिकेसीं ।
वनवासीं असतां कपटासी । शूर्पणखेनें मांडिलें ॥१०॥
पाप तिचें तीस फळलें । तिच्या कैवारें रावणें जानकीस हरिलें ।
रावणाचें राज्य बुडालें । श्रीरामाच्या कोपेंकरुन ॥११॥
रावणकुंभकर्ण निर्दाळिले । शक्रजितादि पुत्र मारिले ।
राज्यीं बिभीषणा स्थापिलें । घर घेतलें श्रीरामें ॥१२॥
बिभीषणें भेद सांगितला । राक्षसांसी संहार झाला ।
तुझ्या मूळें आट केला । लंकेचिया राज्यासी ॥१३॥
मूळाकासुरें ऐकोनि वचन । अत्यंत अनुताप झाला पूर्ण ।
पुढें माते उपाव कोण । कार्या कारण सांगावा ॥१४॥
माता म्हणे निजात्मजासी । तूं जाई रे वनांतरासी ।
प्रसन्न करोनि सदाशिवासी । राज्य मागें लंकेचें ॥१५॥
प्रसन्न करोनि चंद्रचूड । वर मागें सुदृढ ।
जेणें पुरे माझें कोड । महिमा वाढे तेणें तुझा ॥१६॥

मूळकासुर तपश्चर्येसाठी निघाला :

आज्ञा लाहोनि मातेची जाण । मूळकासुर निघाला तपालागून ।
जेवी विनताज्ञेनें सुपर्ण । अमृतहरणा निघाला ॥१७॥
तैसा तो कुंभकर्णकुमर । सेविता झाला अटव्य थोर ।
लंघोनि पर्वताचें शिखर । हिमाद्रीस पावला ॥१८॥
आश्रयोनि हिमवंतगिरी । तप करिता झाला जनकात्मजारी ।
तया अनुष्ठानाची थोर । सविस्तरीं अवधारा ॥१९॥
निरन्न निरुदक होऊन । भूमिशयन वस्त्रविहीन ।
तप करिता झाला दारुण । एक सहस्त्र वर्षेंवरी ॥२०॥
तदनंतर जातवेदासी । प्रज्वाळून घृतादि‍अवदानेंसीं ।
मग हविता झाला निजमासासी । कुंभकर्णाचा नंदन ॥२१॥

घोर तपानें देव भयभीत :

तप आचरोनि घोर । तृप्त केला वैश्वानर ।
तेणें करुन अंभर । दाटलेसें बहुसाल मांसगंधें ॥२२॥
खवट घाण उठिली गगनीं । तेणें तटस्थ झाले सुधापानी ।
धूम्रे व्यापिली अवनी । हाहाकार करिते झाले ॥२३॥
भयभीत झाला शचीपती । तेणें विघ्न केलें अति युक्तीं ।
उर्वशी पाठविली राक्षसाप्रती । छळणेनें छळावया ॥२४॥
उर्वशी येवोनि आपण । कटाक्ष दावोनि बोले वचन ।
म्हणे तापसिया तुजलागून । तप दुर्धर म्यां केलें ॥२५॥
तुज‍ऐसा पावावया पती । तप केले निजात्मकशक्ती ।
येरु म्हणे तुझे उदराप्रती । कूमर होवोनि जन्मावें ॥२६॥
ऐकोनि मूळकासुराचें वचन । उर्व्शी निघाली जेथें शचीरमण ।
वृत्तांत तया जाणवून । स्वस्थानीं ते राहिली ॥२७॥
छळण न चले राक्षसाप्रती । देवेंद्रें जाणोनि निगुतीं ।
तया‍उपरी कैलासपती । चतुराननेंसीं येता झाला ॥२८॥
जेथें तप करी दशग्रीवानुजकुमर । तेथें येवोनि गंगाधर ।
म्हणे झाले तुझें तप दुर्धर । देखोनियां तोषलों ॥२९॥

शंकर प्रसन्न, मूळकासुराचे मागणे, त्या प्रमाणे वरदान :

माग तुज झालों प्रसन्न । जें देवा दुर्धर न देववे जाण ।
तें मी कृपेनें देईन दान । संतोषें बाळका ॥३०॥
ऐसें वदला धूर्जटी । ऐकोनि मूळकें करसंपुटीं ।
विनविला म्हणे कृपादृष्टीं । मजकडे स्वामी पहावें ॥३१॥
मज अमर करावें । देवदैत्यांच्या हातें न मारावे ।
यक्षराक्षसगंधर्वे । तिहीं न वधावें मजलागीं ॥३२॥
पिशाच चारण असुर । मानवादि करोनि नर ।
आणि वनींची श्वापदें दुर्धर । तयाचेंनि मज मृत्यु न येवो ॥३३॥
ऐकोनि राक्षसाचें वचन । हांसोनियां त्रिनयन ।
म्हणता झाला मूळका जाण । जें बोलिलासी तें सत्य रे ॥३४॥
इतुकियांचेनि मृत्यु । तुज न होईल जाण निश्चित ।
हें ऐकोनि राक्षसुत । सानंदचित्त पैं झाला ॥३५॥
म्हणे स्वामी दुर्धर शक्ती । द्यावी मजला युद्धार्थी ।
वैरी सन्मुख मजप्रती । सहसा धीर न धरिती ॥३६॥
बाळकाची ऐकोनि वचनावळी । संतोषला चंद्रमौळी ।
पाशुपत देवोनि ते काळीं । कर मस्तकीं ठेविला ॥३७॥
ब्रह्मा म्हणे राजकुमरा । माझें ब्रह्मास्त्र घे युद्धीं चतुरा ।
निवटावें रिपुसंभारा । आतां निजनगरा जाय वेगीं ॥३८॥
जे योनिद्वारें जन्मती । तयांचेनि नव्हे मृत्युप्राप्ती ।
हें ऐकोन राक्षस चित्तीं । सुखप्राप्ती पावला ॥३९॥
वर देवोनि राक्षसपुत्रासी । ब्रह्मा महेश कैलासासी ।
निघाले मागें ब्रह्मऋषी । वीणा वाजवीत पैं आला ॥४०॥

मूळकासुराचा नारदांना मृत्युविषयी प्रश्न :

नारदाचें ऐकोनि गायन । राक्षसपुत्र करोनि नमन ।
म्हणता झाला माझें मरण । कोणाचेनि हातें होय मुने ॥४१॥
मुनि तुम्हां त्रैलोक्यीं गमन । जाणतां भूतभविष्यवर्तमान ।
सांगावें माझें कोणाचेनि मरण । विदित संपूर्ण करावें ॥४२॥
मूळकासुराचें ऐकोनि वचन । नारद हांसे खदखदोन ।
म्हणता झाला महेशें वर देवोन । अमर पूर्ण तुज केलें ॥४३॥
कैंचा मृत्यु राक्षस पुत्रा । तुज काळयत्रीं भय नाहीं सर्वथा ।
जन्मला प्राणी अमर हे वृथा । निजश्लाघ्यता भोगिती रे ॥४४॥
जननीजठरा जे आले । ते काळाचें खाजें झाले ।
प्रळयानळाचें तोंडीं पडिले । जाण वहिलें कुमरा ॥४५॥
हिरण्यकश्यपादि थोर थोर । रावणादि रजनीचर ।
तेहि अमरत्वाचा बडिवार । सत्य साचार मानित होते ॥४६॥
तेही गेले मरणमार्गे । काळसूत्रीं पडिले निजांगें ।
अमरत्व म्हणती हें वा‍उगें । पडाले प्रसंगें जाणवेल ॥४७॥
विबुधादिक सुधापानी । दैत्य अमर समस्त मिळोनी ।
बैसले अमृतभोजनीं । मरणें तेथोनी मारलें ॥४८॥
सुधापन करितां राहो । त्याचे मस्तकीं मृत्युचा घावो ।
प्रथम वाजिन्नला पहाहो । शरीर भागद्वय झालें ॥४९॥
ऐसी मृत्युची निजकथा । सत्य जाण घटश्रोत्रपुत्रा ।
तुझ्या पित्यानें पूर्वीं तत्वतां । तुजसारिखें पूसिलें ॥५०॥
तेंचि तूं जरी पुससी । तरी सत्य मानीं माझ्या वचनासी ।
जें सांगें ते भावार्थेसीं । निजमानसीं धरावें ॥५१॥
जो राज्य करोनि विदेही । देह असतां देहबुद्धि नाहीं ।
जया शुकादि वंदिती पाहीं । दृष्टांत कवी ज्यातें स्मरती ॥५२॥

सीतेच्या हातून मृत्यु येईल असे नारदांचे भाकीत :

तया विदेहनृपाचे घरीं । जन्मली अयोनिजा कुमारी ।
नामें जाण सीता सुंदरी । तुझ्या पित्रारीची निजभार्या ॥५३॥
तिचेनि हस्तें तुज मृत्यु । राक्षसपुत्रा जाण निश्चित ।
ऐसें नारदमुखें भाषित । सविस्तर वृत्तांत आयकिला ॥५४॥
आज्ञा घेवोनि ब्रह्मऋषी । जातां झाला कैलासासी ।
मागें मूळक निजमानसीं । विवंचना करिता पैं झाला ॥५५॥
म्हणे नारदें काय कथिलें । असंभाव्य श्रुत केलें ।
न घडे ते केंवी घडे वहिलें । मिथ्या येणें बोलें दिसताहे ॥५६॥
कमळमृणालाचेनि तंतें । केंवी बांधवेल मतंगातें ।
केंवी कटिभंग आळिकेचेनि सूत्रें । केंवी मेरु वेंघवेल ॥५७॥
धेनूचें वत्स निजशृंगेंकरीं । हिमालयाचें हृदय विदारी ।
मशक सागरा प्राशन करी । हें कैसेनि घडों शके ॥५८॥
महा‍अंधाचेनि निजपुत्रें । भेदिजे पिपीलिकेचीं नेत्रें ।
चरणविहिन पर्वत । मस्तकां केंवी वळंघेल ॥५९॥
हें अघटित घडे एखादें ठायीं । परी मज मारूं न शके वैदेही ।
जें नादर वदला तें सर्वही । मानसीं सत्य न वाटे ॥६०॥
शुक्तकेमाजील किडा । केंवी जिंकूं शकेल गरुडा ।
ऐसें जाणोनि नारद वेडा । मजसीं मिथ्या बोलिला ॥६१॥
सीतेचेनि हातें मज मृत्यु । हें काळयत्रीं नव्हे सत्य ।
जें वदला उमाकांत । ते कैसें मिथ्या होईल ॥६२॥
ऐसें मनीं भावोन । निजप्रतापें कुंभकर्णनंदन ।
निजनगराचें प्रांतीं येवोन । राक्षसां मात जाणविली ॥६३॥
राक्षसां म्हणे मूळकासुर । तुम्ही बिभीषणा जाणवा उत्तर ।
कुंभकर्णाचा निजकुमर । युद्धालागीं बोलावतो ॥६४॥
जरी सामर्थ्य असेल तुम्हांसी । तरी युद्ध करावें तयासीं ।
नाहीं तरी निजराज्यासी । सोडोनि वनासीं पैं जावें ॥६५॥
मार्गस्थ ऐकती त्याची वचनावळी । उपहास करोनि हांसिजे सकळीं ।
म्हणती हें पितयाच्या मूळीं । पूर्वी जन्म पावलें ॥६६॥
मूळींचेनि नक्षत्रें लंकेची होळी । झाली लंकानाथाची सकुळीं ।
आतां फिरोनि आपुलें मूळीं । नेणतां हें लागलें ॥६७॥
जेंवी वंशापासोनि संभूत । तो अग्नी वना दाहो करित ।
वंशदाहो नव्हे शांत । तेंवी हा पुत्र राक्षसमूळीं ॥६८॥
कोणी न मानिती तयाचें वचन । सर्वही करिती उपेक्षण ।
जेंवी मूर्खाचें वल्गन । ज्ञाता खंडी शब्देंच एकें ॥६९॥
नवलक्ष तारा जरी । उदेल्या रवि तेज हरी ।
तेंवी तयाच्या वचनाची उपेक्षा करी । मार्गी जो कां भेटत ॥७०॥

बिभीषणाशी वैर न करण्याचा त्याला सल्ला :

मार्गस्थ म्हणती राजकुमरा । नको प्रवर्तूं बिभीषणासीं वैरा ।
मंदबुद्धी सांडोनि चतुरा । आत्महिता विचारावें ॥७१॥
पुरुषें स्वहित विचारावें । बळाबळ शोधोनि पहावें ।
अविवेकातें सांडावें । जेणें संभवे आत्मघात ॥७२॥
ऐकोनि मार्गस्थांची वचनावळी । क्रोधें राजपुत्र खवळला बळी ।
म्हणे बिभीषणासहित पाताळीं । लंका पालथी करीन ॥७३॥
राक्षससेना निर्दाळीन । काळमुखीं सामावीन ।
सातही समुद्र लोटीन । आपुलेनि भुजबळें ॥७४॥
मेरुमांदार उलथीन । ब्रह्मगोळ पालथा करीन ।
देवदानवां संहारीन । ऐसा क्रोध धरियेला ॥७५॥
इतुकें भावोनि ते समयीं । जवळी होते त्यां निजघातें पाहीं ।
मारोनि लोळविले भुई । नव्हते ऐसे केले ते ॥७६॥
दुरोनि देखोनि कंदना । उर्वरित धांवोनि बिभीषणा ।
वार्ता जाणविती एके बाळालें रणा । मारोनि लोकां सांडिलें ॥७७॥
वयें तरी दिसे धाकुटा । परी प्राक्रम सुरेशापरीस मोठा ।
राक्षस मारोनि नगरींच्या वाटा । राजद्वारीं उभा असे ॥७८॥

बिभीषणाला आव्हान, प्रधानांचे व मूळकासुराचे युद्ध :

म्हणतसे राया जाणावा मात । मी कुंभकर्णाचा निजसुत ।
प्रसन्न करोनि विश्वनाथ । निजराज्य घ्यावया पैं आलों ॥७९॥
लंकाराज्य मज दीजे । नातरी मजसीं युद्ध कीजे ।
बहुत बोलतसे पैजे । पराक्रम आपुला ॥८०॥
नगरवासियांचें ऐकोनि वचन । कोपा चढला बिभीषण ।
म्हणे हें कालचें बालक लहान । केवढें विंदान येणें केलें ॥८१॥
आतां त्यासीं युद्ध करुं । हाचि निर्धारींचा विचारु ।
ऐसें बोलोनि प्रधान वीरू । सेना सन्नद्ध करिता झाला ॥८२॥
मंत्री पाचरोनि आणिला संपाती । जो का प्रतापें मही पालथी ।
करित असे तयाप्रती । निजहित सांगता झाला ॥८३॥
युद्धालागीं तुम्हीं जावें । कुंभकर्णपुत्रासी जीत धरावें ।
न मारोनि येथें आणावें । सभामंडपामाझारीं ॥८४॥
बिभीषणाचें ऐकोनि वचन । युद्धालगीं निघाले प्रधान ।
सन्नद्ध करोनियां सैन्य । घाव निशाणीं घातला ॥८५॥
लागली वाजंत्रांची ध्वनी । दिग्गजां टाळी बैसली कर्णी ।
आंगोळली भौ‍माची जननी । दशदिशा दाटल्या ।८६॥
कुंजर निघाले अगणित । जैसे चौं चरणांचे पर्वत ।
असिवार अपरिमित । सेनावेष्टित चालिले ॥८७॥
हरंवरांचेनि घडघडाटें । पृथ्वीचें हृदय फुटे ।
थरारिलें कूर्मपृष्ठ । शेषें माथा डोलविला ॥८८॥
पायदळाची गणना करितां । मोजूं न शके विधाता ।
विरंचिअंड पालथा । घालितील सुभटपणें ॥८९॥
पताका मंडिका रामनामेंकरीं । देखोनि शनीचा अग्रज पळें दुरी ।
शरणागताची सेना ऐसिये परी । पूर्वद्वारें निघाली ॥९०॥
रामनामे गर्जती वीर । जैसे वर्षाकाळींचे मयूर ।
मूळकें देखोनि वामनोद्गार । अग्निज्वाळा मुखीं सांडी ॥९१॥
नेत्र करोनि आरक्त । क्रोधें थरथरां कांपत ।
हॄदयीं भडका सुटत । दंतें वाचिते अधरोष्ठ ॥९२॥
देखोनि लंकेशयैन्यातें । गर्जना केली वज्रसारासुतें ।
म्हणे हीं वृथा मरणातें । कां बापुडीं येथें आलीं ॥९३॥
मृत्यु समीप तैं पिपीलिकाकुळा । पक्ष फुटती दाविती बळा ।
तैसे रजनीचर मजजवळा । युद्धा उतावेळ घालिती झडा ॥९४॥
आतां या सैन्या युद्धप्रसंगें । लावीन यमपुरीचें मार्गे ।
ऐसें बोलोनि शरयोगें । कार्मुक योजिता जाहला ॥९५॥
धनुष्य टणत्कारिलें ते वेळा । बाण घेतला तेजाळा ।
बीजाक्षरें जपोनि आदरिला । वरी टाकिला ते समयीं ॥९६॥
तया बाणाचेनि घोषें । भ्रमित झालीं दिग्गजांचीं मानसें ।
प्रळय सुटला रविशशी आकाशें । सांडोनि दशा लंघिती ॥९७॥
तो बाण आला अरिदळावरी । पडतेक्षणीं संपाती सांवरी ।
निजशरें तोडोनि वरचे वरी । सेनेपरता सांडिला ॥९८॥
अचतुराचें जैसें वचन । पंडित विवेकें करीं खंडन ।
तैसा मूळकासुराचा बाण । निजशरें छेदिला ॥९९॥
संपाती प्रधानांमाजी बळी । संधान आरंभिलें ते काळीं ।
शर सोडिला मंत्रावळी । जपोनि रामनामाच्या ॥१००॥
रामनामें मंडित शर । सुटले गर्जत घोषवित अंबर ।
देखोनि मूळकें सत्वर । शिवावरद बाण सोडिला ॥१॥
परस्परें बाणां पडली मिठी । जैसे व्याळ व्याळकंठीं ।
झगटोनि एकएकांची पोटीं । सामावोनि पैं गेले ॥२॥
उपरी मूळकें अधिक दाविलें । एके बाणें त्रैलोक्य व्यापिलें ।
शरमय गगन झालें । रवि कोपला ते काळीं ॥३॥
सायंकाळ प्रवर्तला । पक्षियांसि प्रळय झाला ।
पशु परतले दीप लागला । गृहीं गृहीं राक्षसांचे ॥४॥

प्रधानांचा पराभव :

माव केली मूळकें ते समयीं । प्रधानादिक राक्षस ठायींचे ठायीं ।
बांधोनि वस्त्राभरणें पाहीं । हिरोनि नग्न पैं केलें ॥५॥
तयावरी काय केलें । राक्षसां एकवट बांधिलें ।
मग बिभीषणाकडे पाठविलें । मार्गस्थांस ते काळीं ॥६॥
राया जाणविला वृत्तांत । कित्येक सैन्या केला अंत ।
प्रधानादि कित्येक जीवंत । धरोनियां राखिलें ॥७॥
वार्तिकें सांगती वार्ता । अहो जी ऐका लंकानाथा ।
मूळकासुरें प्रधानादि समस्तां । रणीं व्यथाभुत केले पैं ॥८॥
वार्तिकांची ऐकोनि वचनावळी । क्रोधें बिभीषण ते काळीं ।
किंचित उर्वरित राक्षसबळी । त्यांसमवेत युद्धा निघाला ॥९॥
मार्गीं झाले अपशकुन । डावें वायस करिती गमन ।
दक्षिणें भारद्वाज हरिण । चाष मयुरें पैं गेलीं ॥११०॥
पुढें घायाळ भेटले । तिहीं राया जाणविलें ।
सैनिक बांधोनि राखिले । नावानिगे प्रधान ॥११॥

युद्धासाठी बिभीषणाचे आगमन :

ऐकोनियां तयांची मात । बिभीषण श्रीरामनामे गर्जत ।
निर्भय होवोनि निजदळासहित । रणभूमीस पैं आले ॥१२॥
रामनामें करोनि भुभुःकार । नामें गर्जत चालिले वीर ।
मोहनी पळोनि सत्वर । नामासमोर न राहे ॥१३॥
एकच एक श्रीरामनाम । सकळ पातकां करी भस्म ।
नामें तुटे भवबंधश्रम । तैसे बांधिले वीर सुटले ॥१४॥
सोडवोनि निजप्रधानां । पुढें आरांभिलें रणा ।
बिभीषणें सोडोनि अमित बाणां । पृथ्वी गगना व्यापिलें ॥१५॥
मूळकासुरें देखोनि पितृव्यशर । तयांवरी सोडी काळदंडाहूनि कठोर ।
जो लागतां भेदी जिव्हार । हिमालय पर्वताचें ॥१६॥
तो शर येतां गगनीं । लंकेशबाणां झाली खंडणी ।
मग तो राक्षस गर्जोनी । बिभीषणासी बोलिला ॥१७॥
अगा ये बिभीषणा ख्याति थोर । राक्षसकुलीं केली अपार ।
झालासी श्रीरामाचा किंकर । मर्कटेसीं सख्य करोनि ॥१८॥
शाखांमृग जे पर्णभक्षक । ते रामाचे दळीं मुख्य नायक ।
तयांमाजी तूंही रंक । प्रधानत्व मिरविसी ॥१९॥
तुज आणि त्या रामातें । पाठवीन यमपुरीतें ।
तरीच वज्रसारेच्या हृदयातें । जन्मलों मी हें जाण पां ॥१२०॥
जरी पुत्र होईन कुंभकर्णाचा । तरी सूड घेईन पितृव्याचा ।
नाहीं तरी पाषाण मी साचा । तुजसारिखा जन्मलों ॥२१॥
ऐसें बोलोनि पंच बाण । सोडिले अति दिव्य दारुण ।
ते बिभीषणें वरचेंवरी खंडून । भूमीवरी पाडिले ॥२२॥
विवेकसंपन्न वैरागी । पंचविषयां दमवी निजांगीं ।
तैसे बिभीषणें शर मार्गी । कूट करोनि पाडिले ॥२३॥
बिभीषणाची संधानठेव । देखोनि मूळकें बाण नव ।
सोडिले ज्याचें भय अपूर्व । अवनी नवखंड होऊं पाहे ॥२४॥
नवबाण येतां लंकेशावरी । ते नव शर ते अवसरीं ।
खंडोनि पाडिले पृथ्वीवरी । नव गिरींचीं शिखरें जैसीं ॥२५॥
तदनंतरें कुंभकर्णसुतें । कार्मुकीं योजिलें एकादश बाणातें ।
पुंखापासोनि शर गगनातें । पक्षियांऐसे सूटले ॥२६॥
ते एकादश नव्हती शर । केवळ ईश्वराचे अवतार ।
पृथ्वी व्यापोनि अंबर । दशदिशा प्रकटले ॥२७॥
करीं त्रिशूळ डमर । पिंगट जटा भयंकर ।
रुंडमाळा भस्मधर । ऐसीं रुपें प्रकटलीं ॥२८॥
आश्चर्य देखोनि गदापाणी । भस्मासुर आव्हानिला बाणीं ।
देखोनि रुद्ररुपें तत्क्षणीं । नेणां कोणीकडे गेलीं ॥२९॥
रुद्रावेशें मूळकासुरें । कोपानियां अति गजरें ।
कार्मुक घेवोनियां ईश्वरें । दिधलें ते बाण सोडिले ॥१३०॥
ते येतां द्वादश शर । देखोनि स्वर्गी भयातुर ।
इंद्रदि देव म्हणती घोर । कर्म येणें आरंभिलें ॥३१॥
या द्वादश शरांच्या घायीं । द्वादश यूर्य पडती ठायीं ।
बापडें बिभीषण निवारील कायी । शिवाचे हे वरद बाण ॥३२॥
बिभीषण गदेनें खंडन करी । तंव अकस्मात पडिले वरी ।
सहा बाणीं रथा चकचुरीं । चारी आखां लागले ॥३३॥

बिभीषणाचा हृदयभेद :

उर्वरित दोनी शर । ते बिभीषणाचें जिव्हार ।
भेदोनि पलीकडे सत्वर । पाताळभुवनीं प्रवेशले ॥३४॥
बिभीषणाचें हृदय भेदोनि । निश्चेष्टित रणमेदिनीं ।
पडला पादप जैसा वायूंनी । उलंडला शाखेसहित ॥३५॥
घटिका द्वादशपर्यंत । रणीं बिभीषण मूर्च्छित ।
ऐसे देखोनि कुंभकर्णसुत । नगरामाजी प्रवेशला ॥३६॥
बोलावोनि सेना सैनिक । आपणासि केला पट्टाभिषेक ।
मस्तकीं छत्रशशांक । राज्य धरुं बैसला ॥३७॥
मूळकें मातेपासीं येऊन । साष्टांगेसीं केलें नमन ।
जोडिले हस्तीं संपूर्ण । सर्व वृत्तांत जाणविला ॥३८॥
एका जनार्दना शरण । झालें मूळकासुर कथन ।
पुढिलें प्रसंगीं बिभीषण । श्रीरामा शरण जाईल ॥३९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
बिभीषणपराभव मूळकासुर लंकाराज्यपटप्राप्तिर्नाम एकसप्ततितमोऽध्यायः ॥७१॥ ओंव्या ॥१३९॥