मल्ल- प्रेमयुद्ध.
तिघे ट्रेनच्या बाकड्यावर शांत बसले होते.
" दादा अशी कशी ट्रेन कॅन्सल व्हईल? आज दोघी निघालो नाही तर परवा तिथे पोहचणार कस आणि नाही पोहचलो तर ऍडमिशन कॅन्सल व्हईल. किती मुश्किलीने तिथे ऍडमिशन मिळाली होती. आमदार साहेबांमुळे फ्री मध्ये शिकणार होते मी आणि रत्ना." क्रांतीच्या चेहऱ्यावर चिंतेच जाळ पसरलं होत तसं रत्नाच्या सुद्धा.
" आपण फोन करूया तिथे त्यांना सांगू की ट्रेन पावसामुळे 2 दिवस रद्द झाल्या आहेत किंवा आमदार साहेबांकडून फोन गेला तर...?" रत्ना तिच्या डोक्यात येणाऱ्या आयडिया त्या दोघांना सांगत होती.
" हा तस व्हयल… बर आधी घरी चला. रत्ना तू चल आज आमच्या गावाला उद्या सोडतो तुला तस आईला फोन करून सांगू…" दोघीही संतोषच्या गाडीमध्ये बसल्या. दोघीही हिरमुसलेल्या होत्या.
सूरज आँख दिखा ले
आज कल तेरी आँख झुकनी है
तेरे अन्दर है जीतनी आग
यहाँ उससे भी दुगुनी है
सूरज आँख दिखा ले
आज कल तेरी आँख झुकनी है
तेरे अन्दर है जीतनी आग
यहाँ उससे भी दुगुनी है
तलवार हाथ में है
तेरे दे मार सोचना क्यूँ
जब ज़िंदगी है एक ही
दो बार सोचना क्यूँ
मैं परिंदा क्यूँ बनूँ
मुझे आसमाँ बनना है
मैं एक पन्ना क्यूँ रहूँ
मुझे दास्ताँ बनना है
मैं परिंदा क्यूँ बनूँ
मुझे आसमाँ बनना है|
नवीनच रिलीझ झालेल्या सायना पिक्चरमधले हे गाणं क्रांतीला खूप आवडत होते. ती हिरमुसली कि संतोष हे गाणं लावायचा.
दंगल पिक्चरची तर सेंचुरी झाली असेल एवढ्या वेळा बघितला होता. गाण्याचा आवाज जसा वाढला तश्या दोघी खुलल्या मोकळ्या मनाने "मैं परिंदा क्यूँ बनूँ, मुझे आसमाँ बनना है, मैं परिंदा क्यूँ बनूँ, मुझे आसमाँ बनना है" जोरात म्हणायला लागल्या.
संध्याकाळ झाली होती. विठुरायाच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम सुरु झाला होता. आज एकादशी असल्यामुळे उपवास सोडायच्या आतच लोकांनी कीर्तनाला हजेरी लावलेली होती. नेहमीच व्हायचे एकादशीला लवकर कीर्तनाचा कार्यक्रम सुरु व्हायचा. ह.भ.प अर्जुनदादा चौधरी म्हणजेच क्रांतीचे दादा होते. गळ्यात वीणा, टाळ डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर चंदन, अबीरचा टीका, शांत मुद्रेत तुकाराम महाराजच्या अभंग गात त्याचा अर्थ सांगत होते. कोणी त्यांना तबल्याची साथ देत होते तर कोणी पेटी वाजवत होते. ऐकणारे इतर सगळे टाळावर ताल धरत होते.
चित्ता मिळे त्याचा संग रूचिकर | क्षोभविता दूर तो चि भले ||१||
ऐसी परंपरा आलीसे चालत | भलत्याची नीत त्यागावरी ||२||
हो का पिता पुत्र बंधु कोणी तरि | विजाति संग्रही धरू नये ||३||
तुका म्हणे सत्य पाळावे वचन | अन्यथा आपण करू नये ||४||
तुकाराम महाराज सामाजिक व्यवहारांचं सूक्ष्म विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते.त्यामुळं ते एकाच विषयाचे अनेक पैलू ध्यानात घेत असत.प्रस्तुत अभंगात त्यांनी संगतीचा एक वेगळाच पैलू शब्दबद्ध केला आहे.ज्याचं मन आपल्या मनाशी जुळतं,त्याचीच संगत आपल्याला आवडते,आपल्याला आनंद देते आणि म्हणून अशा माणसाचीच संगत करावी.जो स्वत:च्या सहवासानं आपल्या मनात क्षोभ निर्माण करतो,आपलं मन अस्वस्थ करून टाकतो,त्याला दूर ठेवणं हेच चांगलं होय.परंपरा अशीच चालत आली आहे.ज्याची संगत भलती-सलती असेल,त्याच्या सहवासाचा त्याग करावा,हीच खरी नीती होय.मग अशी व्यक्ती पिता असो,पुत्र असो,बंधू असो,की आणखी कोणी असो.ज्याचं वर्तन आपल्या मूल्यांशी जुळत नाही,त्याचा सहवास करू नये.आपण सत्य वचनाचं,नातिकतेचं,माणूसकीचं पालन करावं,त्यापेक्षा वेगळं वागू नये. याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याला ज्याचा अडथळा होत असेल,त्यांच्यापासून दूर रहावं.
|| जय तुकोबाराय ||
विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल …
विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल … सगळे अभंग मन लावून ऐकत होते.
पाटीलवाड्यात सगळे शांततेत जेवत होते. कोणीच कोणासोबत बोलत नव्हते. तेजश्री सगळ्यांना डोक्यावर पदर घेऊन सगळ्यांना वाढत होती. संग्रामला तिने आमटी दिली.
"वता सगळं पातेल वतताय ताटात... तेजश्री घाबरली आणि मागं सरकली.
"त्यांच्यावर कशापाई चिडताय ?" सुलोचनाबाई म्हणाल्या.
"आई कधी अक्कल येणार ह्यांना... शिकल्या कश्या ह्या ग्रॅज्युएशन हेच समजत न्हाय." संग्रामने भाकरी आमटीत चुरली. सगळं राग त्या भाकरीवर काढला.
" दादा तुम्ही वहिनीला कशाला वरडता माझा राग त्यांच्यावर कशाला काढता. मी जो निर्णय घेतलाय तो इचार करून घेतलाय. आम्ही करू तर त्या पोरीशी लग्न करणार. काहीसुद्धा करा." सगळ्यांचे घास हातात राहिले.
" काहीसुद्धा करायची गरज न्हाय आम्ही मागणी घालायला गेल्यावर कोणाची टाप हाय आमच्या वीरला न्हाय म्हणायची." आबांनी डाव्या हाताने मिशीला पीळ दिला.
"आबा जी पोरगी मैदानात पोरासोबत कुस्ती करायला उतरती ती लग्नाला सहज न्हाय म्हणलं. ती कशाला बघल आपण कोण हाय." संग्राम म्हणाले.
" आम्ही लिहून देतो गरीब लोकांची पोरगी फुकट श्रीमंतांच्या घरी आना बघा कोण न्हाय म्हणतया." आबांनी ठेकर दिली.
"व्हय आना घरात पैलवान पुरगी... तेजश्री अन माझ्यासारखी डोक्यावर पदर घेऊन घरभर हिंडली मजी बर." सुलोचना बाईंनी डोक्यावरचा पदर सांभाळत म्हणाल्या."
"ते तुम्ही तुमचं बघा माझं काम झालं मंजी झालं पाहिजे." वीरन हात धुतला अन उठून निघून गेला.
"मंजी तुम्हाला म्हणायचं का कि तुमच्या बायकोपेक्षा हुशार बाई घरात आली न्हाय पाहिजे." आबा म्हणाले.
" तिच्यापेक्षा येडी पोरगी जन्माला आली असल असं वाटत तर न्हाय..." संग्रामने रागाने तेजश्रीकडे बघितलं. तेजश्री रडत वरती गेली.
"सम्राट कशापाई त्यास्नी सतत बोलता... लेकरू होत न्हाय हा काय त्यांचा दोष हाय का ?" सुलोचनाबाई म्हणाल्या.
"मग आमचा हाय व्हय...? पाटलाची औलाद हावूत..." संग्राम रागाने बोलले.
"संग्राम आईबरोबर बोलताय आवाज खाली करून बोलायचं." आबांनी आवाज टाकला तस संग्राम शांत होऊन वर गेले.
तेजश्री रडत बेडवर बसल्या व्हत्या. संग्राम आल्याची चाहूल लागताच त्यांनी डोळे पुसले आणि डोक्यावर पदर घेतला.
"रडा… आयुष्यभर रडत बसा… येत काय त्या शिवाय? आम्ही जाऊन येतो." संग्राम मागे वळले.
"त्या लताबाईंच्या कोठीवर ना ...? जा आम्हाला सगळ्या खबरी लागतात ." तेजश्रीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि संग्रामकडे डोळे वर करून पहिले. संग्राम तसाच मागे फिरला आणि तेजश्रीचे गाल जोरात धरले.
"लय बोलायचं न्हाय आमच्या समोर कळलं का? व्हय जातो आम्ही लताबाईच्या कोठीवर . . . आम्हाला आवडती ती. राहती तशी... तुम्ही स्वतःला आरश्यात बघा काय आवडण्यासारखं हाय तुमच्यात." धरलेल्या गालाची पकड अजून घट्ट होती. तेजश्री दुखतंय म्हणून विव्हळत होती, संग्रामचे हात झटकत होती,तरी त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याने रागाने तिचे गाल सोडले आणि तीला पलंगावर ढकलले. सगळा चेहरा लाल झाला होता. रागाने संग्राम निघून गेला.
लता बाई संग्रामची वाटच बघत होती. लावण्याची खान होत लताबाई... लाल जर्द नववारी, हलका मेकअप आणि लालबुंद लिपस्टिक लावलेली लता संग्रामची वाट बघत होती. पैशांचा खजिना व्हता तिचा संग्राम म्हणजे.
झाल्या तिनी सांजा
करुन सिणगार साजा
वाट पहाते मी ग
येणार साजन माझा
प्रीतीच्या दरबारीचं येणार सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या
गळ्यात घालीन हार
दिलाच्या देव्हार्यात बांधीन मी पूजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा
भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भार
तान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा
त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
धुंद व्हावी राणी, रंगून जावा राजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा
तेवढ्यात संग्राम पोहचला. तीच रूप पाहून त्याला रडलेल्या तेजश्रीचा विसर पडला. लताबाई संग्राम ला बिलगली. इकडे तेजश्रीने दरवाजा लावून घेतला. डोळे पुसले. अंगावरची साडी काढली. हळूहळू एकेक वस्त्र काढून बाजूला फेकले. आणि आरशासमोर उभी राहिली.
" काय कमी आहे माझ्यात...?" जोरात ओरडली.
इकडे संग्राम लताने दिलेला गजरा हातात घालत होता.
वाटतं सख्याचं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
घालू कशी मी साद होईल गाजावाजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा
इचारच पडला बिचार्या मना
लायेळ का ग व्हावा बाई सख्या सजनाला
बिलगुन बसावी शंभूला सारजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा
लताबाईने संग्रामला त्याच्या रूममध्ये नेले आणि दरवाजा लावून घेतला.
तेजश्रीच्या आवाजाने सुलोचनाबाई धावत वर आल्या आणि दरवाजा वाजवला.
"तेजु... ये तेजु काय झालं? दरवाजा उघड मी हाय आई." तेजु भानावर नव्हती. बराच वेळ झाला दरवाजा उघडेना म्हणून सुलोचनाने जोरात दरवाजा वाजवला तेंव्हा तेजश्री भानावर आली. बेडवरची चादर अंगावर घेतली आणि दरवाजा उघडला. तिची अवस्था बघून सुलोचनाने दरवाज्याला आतून कडी लावली. तेजश्रीकडे पाहिले तिच्या गालावर बोटांचे वळ पाहिले.
" बघू मारलं का तुमास्नी संग्रामने??? बघू दाखवा मला..." तेजश्रीने मानेने नाही म्हटले. सुलोचनाबाईंनी तिला जवळ घेतले.
"येऊद्या त्याला बघतच आज सोडणार न्हाय..." सुलोचनाबाई खूप चिडल्या तेजश्रीची अवस्था बघून त्या सुद्धा रडायला लागल्या.
"नाही ते नाही येणार ... रोजच नसतात. आई मी कमी पडती कुठेतरी... मलाच काहीतरी करायला पाहीजे तूम्ही नका। काळजी करू... मी बघेन..." तेजश्रीने डोळे पुसले.
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
(काल माझ्या गावची यात्रा झाली. करोना मुळे गेले दोन वर्षे यात्रा झाली नाही. खूप आठवण आली जुन्या दिवसांची. यात्रेच्या आधी गावचा रंग बदलून जायचा गाव कीर्तन, भजनाने न्हाऊन निघायचा. शिळ्या यात्रेला तमाशा आणि कुस्त्यांचे फड... कीर्तन भजनाच्या वातावरणात मोठी झाले. थुईथुई डान्स करत सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन बक्षीस जिंकली. थोडं गावच्या आठवणीने डोळे भरून आले. म्हणून सुंदर तुकोबारायांचा अभंग अर्थासह टाकला.
खूप सुरेख आयुष्य मातीतलं जगले नि लग्नानंतर शहर विद्येचे माहेरघर पुणे... अजून काय हवं आयुष्यात दोन्ही जगती आहे. पण गावाकडच्या आठवणी अजून तश्याच ताज्या आहेत. विहिरीवरून पाणी भरायचं , चिंच आवळा, बोर तोडायची, रानातल्या मातीत पावटा, भुईमूग शेंगा तोडायच्या. पावसात भिजायचं, तुटलेली चप्पल ओढत शाळेतून घरी यायचे. धमाल.....)
पाटील उद्या सकाळी जाणार आहेत दादा चौधरी यांच्याकडे क्रांतीला लग्नाची वीरसाठी मागणी घालायला. काय होईल??? तेजश्री काय निर्णय घेईल? क्रांती दिल्लीचे स्वप्न सोडून वीरसारख्या मग्रूर मुलासोबत लग्न करेल??? खूप प्रश्न नक्की वाचा पुढच्या भागात...