Everything is yours.. books and stories free download online pdf in Marathi

सर्वस्व तुजला वाहूनी..

#सर्वस्व तुजला वाहूनी..

गुहागरमध्ये दामलेंच पिढीजात कौलारु घर होतं. दहा एकर जमिनीत दोनशे हापूस आंब्यांची बाग होती. तीन एकर जमिनीत शेतीभाती शिवाय घराशेजारी अडीचशे माडापोफळीची झाडं होती. दामलेकाकाकाकूंना दोन मुलं होती. थोरला नितीन व त्याच्याहून सात वर्षांनी लहान निता. निता अंमळ उशिराच झालेली,आजीआजोबांची लाडकी,आईबाबांचा जीव व दादाची इटुकली पिटुकली ताई. निताची आजी शनिवारी रात्री घरच्या नारळाचं दूध काढून नितांच्या केसांना लावे. शिकेकाई, रिठा रात्री भिजत घालून ठेवी. सकाळी न्हाणीतल्या पाण्याने नातीला छान न्हाऊमाखू घाली व राजाराणीची वेणी घालून देई. निता मग झोपाळ्यावर दादासोबत झोके घेत बसे. कधी मैत्रिणींसोबत सूरपारंब्या खेळे. निताची आजी निताच्या केसाना तेल लावून चापून चोपून वेण्या बांधे. वरती लाल रिबिनीची फुलं व जोडीला सुगंधी गजरा कधी जाईचा कधी चमेलीचा तर कधी अबोलीचा.
निताला समुद्र खूप आवडायचा. रेशमी वाळूत पाय रोवून समुद्राच्या फेसाळत्या लाटा पहायला फार आवडायचं तिला. काळ पुढेपुढे सरकत होता. नितीनचं लग्न झालं. गोरीगोरीपान,फुलासारखी छान वल्लरी दामल्यांची सून म्हणून आली व दुधात साखर मिसळावी तशी दामल्यांच्या प्रेमळ कुटुंबात मिसळून गेली. निताची व वल्लरीची तर छान गट्टी जमली होती जणू त्यांची साताजन्माची मैत्री होती. नणंदभावजयीची एकी पाहून दामलेकाकूंनाही फार बरे वाटायचे.
एकेदिवशी जोशी गुरुजी नितासाठी पुण्याचं स्थळ घेऊन आले. नवऱ्यामुलाला निताचा फोटो आवडला होता. ती मंडळी निताला पहायला म्हणून आली. संकेत गोखले होतं मुलाचं नाव. त्यादिवशी नेमका उपवास होता. पाहुण्यांसाठी साबुदाण्याची खिचडी,घट्ट दही,उकडलेली कंदमुळं असा बेत होता,जोडीला जायफळ लावलेली कॉफी. संकेत व त्याचे आईबाबा बैठकीसाठी आले होते. निता संकेतला पहाताक्षणीच पसंत पडली. गोऱ्यापान घाऱ्या डोळ्यांचा,उंचापुरा, कुरळ्या केसांचा संकेतही निताच्या मनात भरला.
बघताबघता दोन महिन्यांत संकेत व निताचं लग्न झालं व पुर्वाश्रमीची निता दामले ही संजना गोखले झाली. संजना हे नाव आपलं कागदोपत्री. घरातली सगळी तिला निताच म्हणत. संकेत आयटी कंपनीत कामाला होता. गोखले काका पोस्टात होते. गोखलेकाकू घरातच गायनाचे क्लास घेत. निता एकटीच बसूनबसून कंटाळे. तिचा बालपणीचा मित्र..खळाळणारा सागर तिला इथे भेटत नव्हता. संकेत त्याच्या व्यापात पुरता बुडाला होता.
निताच्या सासूने तिची ही अवस्था जाणली व तिला चित्रकलेच्या क्लासला घातले. आत्ता निता रंगांमध्ये रमू लागली. निळ्या,जांभळ्या रंगांतून सागर तिला भेटू लागला. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली अन् त्यांच्या संसारवेलीवर एक फूल फुललं. निताला मुलगा झाला. निळसर डोळ्यांचा. तिनं आग्रहाने बाळाचं नाव रत्नेश ठेवलं. रत्नेशच्या बाललीलांनी त्या घराला घरपण आलं. चिऊकाऊची गाणी घरात वाजू लागली. रत्नेश हळूहळू मोठा होऊ लागला.
गोखले काकाकाकूंचही वय झालं. निता सासूसासऱ्यांच मायेने करत होती. निताच्या सासूला पक्षाघाताचा झटका आला. चार वर्षे बिचारी अंथरुणात पडून होती. सासूला स्पंजिंग करणे,तिची शीशू काढणे,वेळोवेळी चादर बदलणे,तिला नरम पदार्थ खाऊ घालणे हे सारं निता आईच्या मायेने करत होती. निता सासूची आईच झाली होती.
बिछान्यातून गोखलेकाकूंचे फक्त डोळेच दिसत होते. नुसती घरघर लागली होती. शेवटी निताच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांची प्राणज्योत मालवली. गोखले काकू गेल्यानंतर गोखलेकाकांना निताने खूप धीर दिला. विमनस्क अवस्थेत गेलेल्या गोखले काकांना तिनेच माणसात आणलं. दामले काकाकाकूंना आपल्या लेकीचं फार कौतुक वाटे.
या सगळ्या रामरगाड्यात निताचं माहेरी जाणं मात्र राहून गेलं होतं. मुलगा रत्नेश हॉस्टेलला राहू लागला होता. निताच्या आईवडलांचीही तब्येत नरमगरम असे. निता संकेतला सांगे,"जरा साताठ दिवस आईकडे जाऊन रहाते" पण संकेत हो नाही करुन तिचं म्हणणं टाळायचा. नितालाही घर टाकून जाणं जीवावर यायचं.
गोखले काकांनी तिला यावर उपाय सुचविला की महिनाभर तुझ्या आईवडिलांना इकडे रहायला बोलव. तुझ्या आईवडिलांचाही थोडा हवापालट होईल. निताला सासऱ्यांचे म्हणणे पटले. तिने तो विषय संकेतपुढे काढला पण संकेत म्हणू लागला,"तुझे आईबाबा इथे आले की मला नेहमीसारखं घरात वावरता येत नाही. शिवाय तुझे बाबा रात्रीचे खोकत रहातात. माझ्या झोपेचा बट्ट्याबोळ होईल व माझ्या कामावर त्याचा परिणाम होईल." संकेतचं हे उत्तर ऐकून निताला फार वाईट वाटलं.
निता स्वतःशीच विचार करु लागली, 'ज्या आईवडिलांनी मला जन्माला घातलं,त्यांच्याजवळ जाऊन रहाण्याचा,त्यांची सुखदुःख जाणून घेण्याचा अधिकार मला नाही. त्यांना थोडे दिवस मी माझ्या घरी बोलवू शकत नाही पण सून म्हणून मी माझं कर्तव्य नीट बजावायचं ही अपेक्षा. संकेतच्या आईवडिलांना मी माझे आईवडील म्हणून सांभाळायचं व मी सांभाळलही तसंच. मीही कधी दुजाभाव केला नाही व त्यांनीही मला लेकीचं प्रेम दिलं पण या संकेतचं जावई म्हणून काहीच कर्तव्य नाही का?' तिला ते गाणं आठवलं,सर्वस्व तुजला वाहूनी माझ्या घरी मी पाहुणी..तिच्या अवस्थेला ते गाणं अगदी चपखल बसत होतं.
संकेतच्या मनात स्वतःचा बिझनेस सुरु करायचा विचार आला. त्यासाठी तो भांडवल गोळा करु लागला. त्याचं लोंन पास होण्याच्या मार्गावर होतं तरी त्याला पन्नास लाख अधिक हवे होते. संकेतला त्याची सधन सासुरवाड आठवली.
संकेतने निताला वडिलांच्या मिळकतीतला तिचा निम्मा वाटा मागावयास सांगितलं. संकेतच्या सांगण्यानुसार निता माहेरी गेली. जाताना सासऱ्यांना सोबत घेऊन गेली. चांगली पंधराएक दिवस समुद्राच्या सानिध्यात निता व तिचे सासरे राहिले. निताने आईवडिलांची शुश्रूषा केली. तिची प्रेमळ वहिनी वल्लरी सगळं करत होतीच. आईवडिलांना निताने तिच्या हातची बासुंदी,नारळीपाक खाऊ घातले. भाचरांचे लाड केले.
निताचा भाऊ नितीन नाही म्हणत असतानाही त्याच्यासोबत तलाठी कार्यालयात जाऊन वडिलांच्या मिळकतीवर तिचा कोणताही अधिकार असणार नाही असं हक्कसोड पत्र निताने तलाठी साहेबांना लिहून दिलं.
आईवडिलांचा निरोप घेऊन निता सासरी आली. संकेत तिची वाटच पहातच होता. 'मग काय बोलणी झाली', असं विचारु लागला.

निताने संकेतच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्या नजरेला नजर भिडवत स्पष्ट सांगितले," या घरात तू कधी माझ्या आईवडिलांना आणू दिलं नाहीस. माझ्या आईवडिलांची सगळी सेवा माझा भाऊ व वहिनी करते त्यामुळे मी स्वेच्छेने माहेरच्या संपत्तीवर माझा काहीही अधिकार नाही असं हक्कसोडपत्र तलाठी साहेबांना देऊन आली आहे."
हे सर्व बोलताना निताच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं होतं. संकेत निताच्या त्या तेजस्वी,निर्भिड रुपाकडे गलितगात्र होऊन बघत राहिला. निताच्या सासऱ्यांनी मात्र कौतुकाने सुनेची पाठ थोपटली.

-------गीता गजानन गरुड


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED