सावध प्रकरण १२
दुसऱ्या दिवशी पाणिनी आपल्या ऑफिसमध्ये आला तेव्हा कनक ओजस त्याची वाट बघत थांबला होता.
“पाणिनी, तू मला जयद्रथ परब याची माहिती काढायला सांगितली होतीस.” कनक म्हणाला
“हो बरोबर आज सकाळचे वर्तमानपत्र मी बघितलं त्यानं मायरा कपाडिया च्या गॅरेजमध्ये आत्महत्या केल्याचं दिसतंय.”
“पेपरामध्ये तसं आलंय पाणिनी, प्रत्यक्षात बऱ्याच विचित्र घटना घडलेत पोलिसांना मायरा कपाडिया कडून माहिती मिळाली आहे ती एकदम सैरभैर झाली होती रात्री गाडी आत ठेवण्यासाठी त्यांनी गॅरेजचा दरवाजा उघडला आणि तिला आत मध्ये प्रेत पडलेले दिसले तिच्याबरोबर एक कोणतरी मैत्रीण होती. ती तिच्या घरी राहायला आली होती हे दृश्य बघितल्यावर त्यांनी गाडी तिथेच चालू ठेवली आणि घरात जाऊन पहिल्यांदा पोलिसांना फोन केला गॅरेज मध्ये किंवा आसपासच्या कुठल्याही वस्तूला त्यांनी हात लावला नाही”
“अच्छा” पाणिनी उद्गारला
“ परब चा पॉईंट अडतीस कॅलिबर च्या रिव्हॉल्हर ची गोळी लागून मृत्यू झालाय. रिव्हॉल्व्हर त्याच्या उजव्या हाताजवळच होती.”
“पोलिसांचं काय म्हणणं आहे? आत्महत्याच आहे ना? पेपरात आले त्याप्रमाणे?” पाणिनी ने विचारलं.
“पोलीस मला विश्वासात घेऊन काही सांगत नाहीयेत”
“पाणिनी मला तुला एक वेगळी माहिती द्यायची आहे.”
“कसली माहिती?”
“तू मला एका पॉईंट अडतीस कॅलिबर च्या रिव्हॉल्हर चा नंबर दिला होतास त्याची माहिती काढायला सांगितली होतीस”
“अरे हो खरच काढायला सांगितली होती माहिती काय झालं त्याचं कनक?” पाणिनी ने विचारलं.
“मी तुला सांगितल्याप्रमाणे उदक प्रपात कंपनीला ती शेवटची विकली गेली होती. हसमुख हा उदक प्रपात कंपनीचा मालक आहे त्यानंतर हे रिव्हॉल्हर एक महिन्यापूर्वी परितोष हिराळकर नावाच्या एका माणसाला विकलंय.”
“फारच इंटरेस्टिंग आहे हे सर्व” पाणिनी म्हणाला
“मी तुला आत्ताशी अर्धीच हकीगत सांगितलंय” कनक म्हणाला.
“आता उरलेलं अर्ध सांगून टाक ” पाणिनी म्हणाला
“माझा माणूस हसमुखला रिव्हॉल्व्हरची माहिती काढण्यासाठी भेटला. थोडा घाईतच, आणि ऑड वेळेला भेटला त्यामुळे त्याला आता संशय यायला लागलाय.”
“कशाचा संशय?” पाणिनी ने विचारलं.
“ज्या माणसाचा खून झालाय त्याच्या उजव्या हाताजवळ जे रिव्हॉल्हर पडलं होतं त्यावरचे सगळे नंबर म्हणजे रिव्हॉल्हर वरती ज्या ज्या ठिकाणी नंबर कोरलेले असतात ते सर्वच्या सर्व नंबर कोणीतरी कानस किंवा त्या प्रकारच्या कुठल्यातरी उपकरणे घासून नष्ट करून टाकले होते.”
पाणिनीच्या चेहऱ्यावर एकदम सुटकेचा भाव निर्माण झाला.
“कनक याचा अर्थ असा होतो ते त्या रिव्हॉल्हर च्या मालकापर्यंत पोहोचू शकत नाहीत”
“दुर्दैवाने ज्या माणसाने हे नंबर नष्ट करण्याचं काम केलं त्याला हे माहीत नाही की ते रिव्हॉल्हर ज्या कंपनीचं होतं ती कंपनी वरच्या लाकडी मोठी च्या आतल्या बाजूला सुद्धा रिव्हॉल्हर चा नंबर खोदत असते पोलिसांना ही गोष्ट माहिती होती त्यांनी लाकडी मूठ उघडून आतील नंबर पाहिला आणि तो त्याच रिव्हॉल्व्हरचा नंबर होता ज्याची माहिती तू मला काढायला सांगितली होतीस”
पाणिनीच्या चेहऱ्यावर आता चिंता पसरली
“अर्थात पोलिस त्या नंबर वरून हसमुखपर्यंत पोहोचले. त्याला यापूर्वी माझ्या माणसाने असंच झोपेतून ऑड वेळेला उठवलं होतं आणि दुसऱ्यांदा पोलिसांनी त्यामुळे तो चांगलाच वैतागला त्याला माझ्या माणसाचं नाव माहित नव्हतं पण त्याचं व्यवस्थित वर्णन त्याने पोलिसांना केलं पोलिसांना लगेचच लक्षात येईल की हा खाजगी गुप्तहेर आहे त्यामुळे ते त्याच्या पर्यंत पोहोचतील आणि त्याच्याकडून माझ्यापर्यंत आणि पाणिनी जेव्हा ते माझ्यापर्यंत पोहोचतील तेव्हा या सगळ्याचा खुलासा तुला तयार ठेवावा लागेल.”
पाणिनी डोळे मिटवून शांत बसला
“आणखीन दोन-तीन गोष्टी तुला माहीत असाव्यात म्हणून आधीच सांगतोय पाणिनी.” कनक म्हणाला.
“पोलिसांना आश्चर्य वाटलं की गोळीचा आवाज कोणीच कसा ऐकला नाही . कारण गोळी तर गॅरेज मध्येच मारली गेली होती हे नक्की. पोस्टमार्टम चा अहवाल दाखवतो की गोळी आत शिरता क्षणी मेंदूत रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झालाय. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की एक गाडी त्या गॅरेज जवळ पुढेमागे करत होती आणि त्याच्या धुरांड्यातून आवाज येत होता या आवाजाचा त्रास होऊन त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका माणसाने खिडकीतून बाहेर लोकांनी बघितले तेव्हा त्याला एक पुरुष आणि स्त्री २०८ नंबरच्या गॅरेज समोर उभे असलेले दिसले. त्याला दिसलेला हा माणूस उंच आणि देखणा असा होता त्याच्याबरोबरची स्त्री सुद्धा दिसायला छान होती. ते गॅरेज दार उघडत असलेलं त्याने पाहिलं ते दोघे एकमेकात काहीतरी कुजबूजल्याच त्याने ऐकलं नंतर त्यांनी गाडी बंद केली आणि ते बाहेर पडले पोलिसांचा असा कयास असा आहे की त्या गाडीच्या धुरांड़्यातून जेव्हा फटफट असा आवाज येत होता त्याच वेळेला रिव्हॉल्व्हरतून गोळी सुटली असावी आणि ते जर खरं असेल तर ही आत्महत्या नसून हा खून आहे अशा अंदाजाला पोलीस पोचले आहेत कारण हे दोन साक्षीदार हजर असताना तो माणूस आत्महत्या करेल असं होऊ शकत नाही आणि त्यांनी तसं केलं असेल तर या दोन साक्षीदारांनी पोलिसांना कळवलेलं नाहीये, ही पोलिसांच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.” कनक म्हणाला.
“ठीक आहे पुढे सांग” पाणिनी म्हणाला
“पोलीस ज्यावेळी मायरा कपाडियाला भेटले, तिने फोन केल्यानंतर, त्यावेळेला तिच्या अंगात जे कपडे होते, ते कपडे शेजारच्या इमारती मधून खिडकीतून डोकावून पाहणाऱ्या माणसाने वर्णन केलेलेच कपडे होते. आणि आता त्या माणसाने पोलिसांना खात्री दिली आहे की त्याने त्या रात्री पाहिलेली स्त्री म्हणजे दिवशी कपाडियाच होती अर्थात मायरा कपाडिया हे स्पष्टपणे नाकारते की ती त्या वेळेला त्या गॅरेजच्या आसपास होती म्हणून.”
"त्यावेळेला म्हणजे नेमकं कधी?"
"साधारण सहा च्या आसपास .अर्थात साक्षीदार वेळेच्या बाबतीत फारसा खात्री देत नाहीये."
"शेजारच्या माणसांने ज्या बाईला बघितलं ती बाई म्हणजे मायरा आहे याची त्याला खात्री आहे पण तिच्याबरोबर असलेल्या पुरुषाचं काय?"
"पुरुषाच्या बाबतीत त्यांच्याकडे एक सर्वसाधारण वर्णन उपलब्ध आहे. शेजारच्याने केलेलं .परंतु जेव्हा पोलिसांनी रिव्हॉल्व्हरवरचे ठसे घेतले तेव्हा त्या रिव्हॉल्व्हरच्या आतल्या बाजूला म्हणजे ज्या कोणी रिव्हॉल्व्हरवरचे नंबर खोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला रिव्हॉल्व्हरच्या आतल्या बाजूला उमटलेले ठसे त्यांना मिळाले आहेत आणि ते चांगले स्पष्ट ठसे आहेत. उजव्या हाताच्या तर्जनीचे आहेत."
"अच्छा !"पाणिनी म्हणाला
"पाणिनी, वर्तमानपत्राच्या वार्ताहरांशी लाडीगोडी लावून मी पोलिसांना मिळालेल्या ठशाची प्रत मिळवली आहे" कनक म्हणाला आणि त्याने आपल्या खिशातून ती परत बाहेर काढली आणि पाणिनी कडे दिली
"या व्यतिरिक्त रिव्हॉल्व्हरवर आणखीन काही ठसे आहेत कनक?"
"नाही .बाकी सर्व रिव्हॉल्व्हर चांगली घासून पुसून स्वच्छ केलेली आहे. पण तो माणूस रिव्हॉल्व्हरच्या आतल्या बाजूला असलेले ठसे पुसायला मात्र विसरला त्यामुळे ते पोलिसांना मिळाले. आणखीन एक सांगायचे तुला पण मला नक्की समजलं नाही ते काय आहे, पोलिसांना एकंदरीतच तिथल्या सर्व घटनेबद्दल संशय आहे. विशेषता ते मायरा कपाडियावर संशय आहे त्यांना. मायरा त्यावेळेला त्वरिता जामकर बरोबर होती
त्वरिताच्या जयद्रथ परब सुद्धा ओळखीचा आहे मायरा आपल्याबरोबर होती असं त्वरिता जामकर सांगते पण काही कारणास्तव हे ती काही फार आत्मविश्वासाने सांगत नाहीये त्यामुळे पोलिसांना अशी खात्री आहे की अजून तिला थोडं छेडलं तर ती थोडी डळमळीत होईल." कनक म्हणाला.
"एकंदरीत फारच गोंधळ झालेला आहे प्रेत सापडल्यापासून." पाणिनी म्हणाला
"त्यात एक अडचण आणखीन अशी निर्माण झाली आहे,की त्या प्रेताच्या कपड्याच्या खिशात पाच हजार रुपयाचे नोटाचे बंडल सापडले आहे. त्या नोटेच्या बंडलावर बँकेचा स्टिकर आहे. त्याच्यावर कॅशियरची सही आहे पोलिसांनी त्याचा छडा लावला, दुग्गल नावाच्या खातेदाराने काही दिवसापूर्वी ती रक्कम खात्यातून काढली होती."
"नोटेच्या बंडलावरून कॅशियरने नेमकं कसं सांगितलं की ते बंडल कुणाला दिलं होतं म्हणून? कारण दिवसभरात कॅशियर कित्येक लोकांना पैसे देत असतो." पाणिनी ने शंका काढली.
" मलाही हीच शंका आली म्हणून मी कॅशियरला तसं विचारलं तेव्हा तो म्हणाला मला हे बंडल चांगलंच लक्षात आहे कारण ते दुग्गल ला देताना, त्याच्या हातून ते सटकलं आणि पुन्हा कॅशियरच्या टेबलवर पडलं त्यावेळी टेबलावर ठेवलेल्या इंक पॅड वर ते पडलं आणि नोटेला गुंडाळलेल्या बँकेच्या स्टिकर ला शाई लागली. कॅशियरने ने ती शाई माझ्या माणसाला दाखवली त्यावरूनच त्याला हा सगळा प्रसंग आठवला.". कनक म्हणाला
" पोलिसांच्या दृष्टीने योगायोग. पण पोलीस नशीबवान ठरले" पाणिनी म्हणाला.
कनक म्हणाला, " हा दुग्गल हा कीर्तीकर चा व्यावसायिक सहकारी आहे आणि या कीर्तीकरनेच परबला आपला ड्रायव्हर आणि स्वयंपाक म्हणून नेमलं होतं तसंच तो परितोष हिराळकर चाही मित्र आहे आणि याच हिराळकर ने काही दिवसांपूर्वी रिव्हॉल्व्हर खरेदी केली होती आणि नंतर कोणालाही न सांगता कुठेतरी लांब ट्रीपला निघून गेलाय सकृत दर्शनी असं दिसतंय की दुग्गल आणि हिराळकर एकत्रच आहेत" कनक ओजस म्हणाला
पाणिनी ने आपल्या ओठातली सिगारेट चिडून दातात चावली
"हे सगळं ठीक आहे कनक मला त्या परितोष हिराळकर बद्दल काहीतरी माहिती आहे. आपल्या धंद्याच्या कामासाठीच तो बाहेरगावी गेलाय आणि तो आपल्या मित्रांशी कुठल्या ना कुठल्या मार्गाने संपर्कात राहीलच. त्याची जी मैत्रीण आहे तिच्याशी संपर्क ठेवेल आणि आपण कुठे आहोत ते तिला कळवेल."
"मला हिराळकर बद्दल काही माहिती मिळाली आहे" कनक ओजस म्हणाला " त्याचा घटस्फोट झालाय अजून कोर्टाची ऑर्डर मिळालेली नाही तो राहतो तिथे जेवण आणि नाष्टा करायला एक बाई येते सकाळी लवकर येते आणि चार साडेचारला परत जाते सोमवारी जेव्हा ती अशीच साडेचार वाजता गेली त्यावेळेला हिराळकर तिथे होता पण त्यानंतर सहाच्या सुमारास तो बाहेर जाणार होता त्यानंतर तिने त्याला पाहिलेलं नाही साधारण तो व्यवसायाच्या कामासाठी बाहेर गेला की दहा दिवस बाहेर असतो तिलाही माहित नसतं तो कुठे गेलाय. त्याच्या व्यवसायाचं स्वरूप जरा गूढच आहे" कनक म्हणाला
"आणि त्या हिराळकर बरोबर दुग्गल आहे?" पाणिनी ने विचारलं.
"हो ते दोघे एकत्र आहेत कीर्तीकर आणि हिराळकर हे भागीदार असल्यासारखेच आहेत त्यापैकी हिराळकर हा मोठा माणूस आहे म्हणजे तो मुख्य भागीदार असावा बाकीचे दोघे होयबा आहेत".
"आणि या सर्वाचा मायरा कपाडिया च्या घराशी काहीतरी संबंध आहे" पाणिनी म्हणाला.
कनक म्हणाला,"तर अशी ही सर्वसाधारण वस्तुस्थिती आहे त्या प्रेताच्या खिशात एवढी मोठी रोख रक्कम मिळणे साहजिकच पोलिसांच्या दृष्टीने आशयाची गोष्ट आहे दुग्गल आणि या जयद्रथ परब च्या मधील काहीतरी संबंध पोलीस शोधून काढतील" कनक म्हणाला
" पोलीस कीर्तीकरची चौकशी करताहेत?"
"अर्थात. त्यांनी कीर्तीकर ला सकाळी सकाळी अंथरुणातून उठवलं आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली कीर्तीकर न त्यांना सांगितलं की त्याच्या ड्रायव्हरला म्हणजे परबला शेवटचं बघितलं ते पाणिनी पटवर्धनांच्या ऑफिसच्या खाली त्याने गाडी लावली तेव्हा. नंतर त्याला कळलं की तू म्हणजे पाणिनी पटवर्धन ऑफिस मध्ये नाहीये आणि लवकर येण्याची शक्यता नाही तेव्हा त्यांना खाली जाऊन पुन्हा त्याच्या ड्रायव्हरला म्हणजे परबला गाडी घेऊन घरी जायला सांगितलं आणि गॅरेज मध्ये कार ठेवून द्यायला सांगितलं ते त्याने त्याला पाहिलेलं शेवटचं"
याचा अर्थ कनक त्यानंतर परबने गाडी गॅरेजला लावल्यानंतर सुट्टी घेऊन घरी जाणं अपेक्षित होतं?
" खरं म्हणजे परबने अगदी तसंच केलंय म्हणजे त्यांनी कीर्तीकरच्या घरी जाऊन गाडी त्याच्या गॅरेजमध्ये लावली असावी कारण सकाळी पोलीस जेव्हा त्याला चौकशीसाठी उठवायला आले तेव्हा कीर्तीकरला बघितलं तेव्हा गाडी गॅरेज मध्ये लावलेली होती. पोलिसांनी या सर्वाचा वेळापत्रकाचा जो अंदाज बांधलाय त्यानुसार पिटकीने गाडी गॅरेजला लावण्याची वेळ आणि कीर्तीकरच्या शेजारी राहणारे आणि गाडीच्या धुरांड्यातून मोठा आवाज झाला म्हणून सांगण्याची वेळ याबरोबर जुळतात. सकृत दर्शनी असं दिसतं आहे की गॅरेजमध्ये गेल्या गेल्याच त्याचा मृत्यू झाला असावा."
एवढे बोलून त्यांना खुर्चीतून उठला "तुला हवा असेल पाणिनी तर मी दिलेल्या ठशाचा फोटो तुझ्याकडेच ठेव पुढे काय काय प्रगती होते ते मी तुला कळवीनच."
“ठीक आहे थँक्यू कनक”
सौम्या आणि पाणिनी ला अच्छा करून कनक बाहेर पडला
तो बाहेर जाता पाणिनी सौम्याला म्हणाला “सौम्या मला जरा त्या ड्रॉवर मधलं इंक पॅड दे.”
सौम्याने इंक पॅड पाणिनी ला दिलं. पाणिनीने आपल्या उजव्या हाताची तर्जनी पॅड वर अलगद टेकली हाताला पुरेशी शाई लागल्याची खात्री झाल्यावर त्याचा ठसा एका कोऱ्या कागदावर उमटवला. कनक ओजसने पाणिनी कडे दिलेल्या ठशा बरोबर सौम्याने तुलना केली. “देवा रे!” ती उद्गारली अचानकपणे तिच्या हाताची बोट पाणिनी च्या दंडात घुसली
“शांतपणे घे सौम्या” पाणिनी तिला म्हणाला आणि उठून बेसिनपाशी जाऊन शाई लागलेला हात स्वच्छ केला. तोपर्यंत सौम्याने पाणिनीने ठसा उमटवलेला कागद जाळून टाकून नष्ट केला. “सर , या सर्वांमध्ये तुम्ही कितपत अडकाल?”
“अगदी तुरुंगात जाईपर्यंत” पाणिनी म्हणाला. “पण याचा अर्थ असा नाहीये सोम्या की मला तिथे फार काळ राहावं लागेल”
प्रकरण १२ समाप्त