लव्ह ऍट फर्स्ट साईट Chinmayi Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लव्ह ऍट फर्स्ट साईट

एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा बघताच ती आपल्याला आवडायला लागते आपण आकर्षित होतो, लव्ह ऍट फर्स्ट साईट... असंच काही राहुलच्या बाबतीत झालं होतं. ती त्याला कॉलेज मध्ये भेटली. प्रिया बघताच कोणाच्याही नजरेत भरेल अशी मुलगी. १२वी नंतर दुसऱ्या कॉलेजला राहुलने प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झाल्यानंतर एक आठवड्याने तो कॉलेजला गेला. काही वेळाने ती आली आणि त्याच्या बाजूच्या बाकावर बसली. राहुलची नजर तिच्यावरून हटत न्हवती. सावळा रंग चेहरा निरागस, चेहऱ्यावर येणारे केस ती सारखे कानामागे टाकण्याचा प्रयत्न करत होती आणि राहुल तिच्याकडे एकटक बघत होता. तिचा आवाज त्याला ऐकतच राहावं असं वाटत होतं. वर्गात सर आल्याचेही त्याला भान राहिले नाही.
त्या दिवशी कॉलेज मधून घरी आल्यावर त्याला एक गोष्ट नक्की कळली होती की त्याला ती त्याच्या आयुष्यात हवी आहे कायम. पण त्याचा स्वतःच्या दिसण्यावर इतका विश्वास होता की तिला हा अजिबात आवडणार नाही. राहुल हा इतर मुलांसारखा मिस्टर परफेक्ट वैगेरे न्हवता. दिसायला सुद्धा अगदी साधा आणि त्याचा ड्रेसिंग सेन्स सुद्धा कोणाला भावेल असा न्हवता. पण त्याच्यात चिकाटी होती आणि दुसऱ्यांना हसवण्याची कला. त्याने ठरवलं उद्या काहीही करून तिच्याशी बोलायचं आणि किमान तिच्यासोबत मैत्री करायची.
ठरल्या प्रमाणे राहुल दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेला. थोडं हाय हॅलो ने सुरवात करून तीच नाव प्रिया आहे हे त्याला कळलं. वर्गात सर येई पर्यंत थोडंफार बोलणं झालं आणि राहुलचा विनोदी स्वभाव प्रियाला आवडला. आज घरी आल्यावर राहुल खुश होता कारण त्याने ठरवल्या प्रमाणे त्यांच्या मैत्रीला सुरवात झाली होती. असेच काही दिवस जाऊ लागले त्यांचं बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मग अभ्यासात एकमेकांना मदत करणं, कधी कधी लेक्चर बंक करून कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये बसून गप्पा मारणं सुरू झालं. फोन मेसेज वर बोलणं देखील चालू होतं. कॉलेजच्या परीक्षा झाल्या आणि सुट्ट्या लागल्या. राहुलला प्रियाला भेटल्या शिवाय करमत न्हवतं. शिवाय ती सतत मेसेजकरत नसे आणि सुट्ट्या सुरू झाल्यापासून तर कॉल वर बोलणं झालचं न्हवतं. एक दिवस राहुलने तिला कॉल केला आणि भेटायचं का असा विचारलं, शिवाय मुव्हीला जाऊ कॉफी वैगेरे पिऊ हे देखील सांगितलं. प्रियाला हे सगळं बरोबर नाही वाटलं आणि उगाच नंतर काही गैरसमज नको म्हणून तिने नाही असं सांगितलं आणि राहुलच्या मनातलं ओळखून तिने तिचं कोणावर तरी प्रेम आहे हे देखील स्पष्ट केलं. त्या नंतर राहुल आणि प्रिया मध्ये फार काही बोलणं झालं नाही. कॉलेज सुरू झालं. केवळ काम असेल तेव्हा किंवा लेक्चर नसेल तेव्हा थोडंफार बोलणं व्हायचं. लेक्चर बंक करणं कॅन्टीन मध्ये जाणं तर बंदच झालं होतं. असेच महिने जात राहिले आणि कॉलेजचं शेवटचं वर्ष संपायला आलं. प्रिया आणि राहुल आता बऱ्यापैकी नीट बोलत होते. डिग्री भेटल्यानंतर काय करायचं, जॉब कसा हवाय अशी अनेक स्वप्न रंगवून झाली होती. शेवटी कॉलेज संपल्यावर दोघांनी एकमेकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि दोघेही आपल्या मार्गाला लागले. अधून मधून मेसेज किंवा वर्षातून एकदा वाढदिवसाला कॉल वैगरे चालू होते. राहुलने एम बी ए केला आणि तो एका कंपनी मध्ये अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करत होता. प्रिया सुद्धा एका चांगल्या रेपुटेड कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत होती.
अचानक एक दिवस राहुलला प्रियाचा कॉल आला. तिचा साखरपुडा ठरला होता. लवकरचं तीचं अरेंज मॅरेज होणार होतं आणि त्या साठी तिने राहुलला आमंत्रण द्यायला कॉल केला होता. सोबतच त्याची लग्नात आणि सगळ्या कार्यक्रमात मदत लागेल हे सुद्धा सांगितलं. राहुल त्याची सहमती दर्शवतो आणि होईल तेवढी मदत करत असतो. राहुल दुःखी आणि उदास राहायचा. एकदा प्रियाने त्याला उदास राहण्याबद्दल विचारलं सुद्धा पण थकव्यामुळे असा बोलून त्याने विषय टाळला. हळू हळू साखर पुड्याचा दिवस जवळ आला. प्रिया तयार होऊन बसलेली. सगळे पाहुणे मंडळी आले. नवरदेव सुद्धा तयार होता. साखरपुड्याला सुरवात होणार इतक्यात तिथे पोलीस आले. अचानक आलेल्या पोलीसांना बघून सगळे गोंधळले. पोलिसांच्या म्हणण्या नुसार त्यांना एक निनावी पत्र आलं होता ज्याच्या नुसार नवरदेवाच्या गाडीत एक डेडबॉडी आहे त्यामुळे त्यांना ह्याची शहानिशा करायची होती. पोलिसांनी गाडी बघितली तर त्यात खरच डेडबॉडी होती. ती बॉडी प्रियाने ओळखली कारण ती तिच्या ऐक्स प्रियकराची बॉडी होती. त्याला गळ्याभोवती काहीतरी टोकदार गोष्टीने गुंडाळून हत्या केल्याचे दिसत होते. त्यांनी ती डेडबॉडी ताब्यात घेतली आणि पोस्टमार्टेमला पाठवली. नवरदेवाला सुद्धा ताब्यात घेतले. प्रियाचा साखरपुडा लांबणीवर गेला.
पोलीस ह्या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत होते. लग्नात उपस्थित असलेले लोक, शेजारचे, मित्रमंडळी सगळ्यांची चौकशी सुरू झाली. ह्या सर्वातून प्रियाच्या नवऱ्याचा स्वभाव आणि वागणं संशयास्पद आढळून आलं. ह्या तपासात त्याचे काही बेकायदेशीर कामं सुद्धा समोर आले. पोलीस पुरावे गोळा करत होते आणि जवळ जवळ सर्व पुरावे त्याच्या विरुद्ध होते. परंतु तो शेवट पर्यंत गुन्हा मान्य करत नाही. त्याला तिच्या आधीच्या प्रियकाराबद्दल राग असतो आणि त्याच रागात त्याने खून केला असे ग्राह्य धरून त्याला अटक केली जाते. प्रियाचे लग्न मोडते. ती पूर्ण बिखरून जाते आणि अश्या वेळेस तिला फक्त राहुलचा आधार असतो. तो तिला ह्या सगळ्यातून सावरायला मदत करतो. हळू हळू प्रिया नॉर्मल होते. राहुल पुन्हा एकदा तिला लग्नाची मागणी घालतो आणि ह्या वेळेला ती लग्नासाठी होकार देते. दोघेही खूप खुश असतात. चांगला मुहूर्त बघून त्यांचं लग्न होतं. ते फिरायला जाणार असतात. प्रिया रेडी होऊन बाहेर हॉल मध्ये राहुलची वाट बघत असते. राहुल बेडरूम मध्ये सगळं काही घेतला का हे चेक करतो आणि अचानक त्याला काहीतरी आठवतं. तो कपाट उघडतो आणि हळूच हसतो खूप खूप थँक्स असं बोलून कपाटातून त्याचा फेवरेट टोकदार डिझाईन असलेला बेल्ट काढतो आणि बॅगेत भरतो हा विचार करत की, काय माहित पुन्हा कधी गरज पडेल...


समाप्त:


©ChinmayiDeshpande