वेड लावी जीवा - भाग १ - पहिली भेट?? Chinmayi Deshpande द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वेड लावी जीवा - भाग १ - पहिली भेट??

पात्रांचा परिचय:-
विरकर कुटुंब-
प्रताप विरकर (वडील) - भाग्यश्री विरकर (आई)
साईश (मोठा भाऊ)
गौरी (कथेची नायिका)

देसाई कुटुंब-
सुलभा देसाई (आजी)
अनंत देसाई (वडील) - स्वाती देसाई (आई)
कैवल्य (मोठा भाऊ) - मयुरी (वहिनी)
वरद (कथेचा नायक)
अनुष्का (लहान बहीण)
_____________________________________

"अहो ऐकताय का?"- प्रताप राव हॉल मधून आवाज देत बोलले.

"हो आलेच. काय झालं?"- भाग्यश्री ताई किचन मधून हात पुसत बाहेर आल्या.

"गौरी कधी येणारे?"- प्रतापराव

"येईल थोड्या वेळात. इंटरव्ह्यू द्यायला गेलीये"- भाग्यश्री ताई

"हम्म. आल्यावर बोलूया"- प्रतापराव

संध्याकाळी गौरी घरी येते. आल्या आल्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होते. आणि किचन मध्ये आईला स्वयंपाक करण्यात मदत करते. साईश आणि प्रतापराव टीव्ही बघत असतात. प्रतापराव गौरी आणि भाग्यश्री ताईंना हॉल मध्ये बोलवतात. सगळे हॉल मध्ये बसून प्रतापराव आता काय बोलणार ह्या कडे कान लावून बसतात.

"ताईचा फोन आला होता. गौरी साठी स्थळ आणलंय तिने. सगळी माहिती काढलीये तिने. चांगला मुलगा आहे. नुकताच जॉबला सुद्धा लागला आहे. घरचं पण सगळं चांगलं आहे, एकत्र कुटुंब आहे. "- प्रतापराव

"बाबा पण मी अजून जॉब शोधतेय. मी इतक्यात कसं लग्न करू?"- गौरी

"जॉब आणि लग्नाचा काही संबंध नाही. आणि त्यांच्या घरचं सगळं चांगलं आहे. तिथे लग्न झालं तर तुला जॉब करायची गरज लागणार नाही"- प्रतापराव

"अहो बाबा पण ती स्वतःच्या पायावर उभी असेल तर चांगलंच आहे ना"- साईश

"पण स्थळ बघायला काही हरकत नाही. उगाच चांगलं स्थळ हातातून जायला नको"- भाग्यश्री ताई

"माझ्या बहिणीने सुचवलंय म्हणजे चांगलंच असणार"- प्रतापराव

"अग आई घाई काय आहे पण? इतक्यात नाही लग्न करायचं मला"- गौरी

"तुझं बाहेर कुठे काही आहे का? असेल तर आधीच सांगतोय डोक्यातून विचार काढून टाक. आपल्याकडे असं काही चालणार नाही"- प्रतापराव

"असं काही नाहीये बाबा"- गौरी शांतपणे बोलली.

"ठीक आहे मग संपला विषय. उद्या मुलाकडचे येतील तयारीला लागा. आता मला या विषयावर आणखीन चर्चा नकोय"- प्रतापराव

सगळे आपापल्या कामाला लागतात. गौरी आईसोबत किचन मध्ये येते.

"ह्यांनी चर्चा करायला बोलवलं होतं की त्यांचा निर्णय सांगायला?"- गौरी

"गप्प बस आणि आवरून घे पटकन. उद्याची तयारी सुद्धा करायची आहे. साडी कोणती नेसणार आत्ताच बघून ठेव सकाळी घाई गडबड नकोय"- भाग्यश्रीताई

सकाळी विरकरांच्या घरात गडबड चालू असते. भाग्यश्री ताई किचन मध्ये पोहे बनवत असतात. प्रताप आणि साईश पाहुण्यांची वाट बघत बसले असतात. गौरी साडी नेसायचा प्रयत्न करत असते. भाग्यश्री ताई गौरी च्या रूम मध्ये येतात.

"काय ग हे गधडे अजून साडीच नेसतेस तू. हे काय असं नेसलीयेस. हा पदर एवढा मोठा? आणि एवढ्या वर कोण नेसतं साडी"- भाग्यश्री ताई गौरीला साडी नेसवत बोलल्या.

"मला नाही जमत ते जाऊदे. म्हणून मी ड्रेस घालणार होती. तूच मागे लागलीये माझ्या साडी नेस म्हणून"- गौरी

"बावळटपणा करू नकोस चल आता तयारी कर. केव्हा ही येतील ते"- भाग्यश्री

गौरीने केशरी रंगाची साडी नेसलेली असते.




फक्त डोळ्यात काजळ आणि ओठांवर हलकीशी लिपस्टिक, त्यात ती खूप खुलून दिसत असते. दिसायला जास्त गोरी नाही, पण नाजूक आणि बोलके डोळे, तिला बघूनच कोणीही प्रेमात पडेल अशी आपली गौरी. गौरी तयारी करून बसते. तिच्या मनात नक्की काय चाललंय हे तिला सुद्धा कळत न्हवत. दाराची बेल वाजते आणि तिच्या छातीत धडधडायला लागत. ती उगाच पदाराशी खेळ करत बसते. बाहेर पाहुणे येतात. प्रताप आणि साईश त्यांचं स्वागत करतात आणि गप्पा मारत बसतात. सुलभा आजी आणि अनुष्का सोडून बाकी सगळे आलेले असतात. वरद गप्प बसला होता. दिसायला देखणा, उंच आणि रुबाबदार असा आपला वरद😉. त्याने पिस्ता कलरचा शर्ट घातलेला असतो.







"घर शोधायला फार त्रास नाही झाला ना?"-प्रतापराव

"नाही मंदाताईंनी (गौरीची आत्या) पत्ता नीट सांगितला होता त्यामुळे त्रास नाही झाला. ट्रॅफिक लागलं फक्त येतांना थोडं म्हणून उशीर झाला यायला"- अनंतराव

"अच्छा"- प्रतापराव

"हे आमचे चिरंजीव वरद"- अनंतराव

"काय करता तुम्ही?"- प्रतापराव वरदला विचारतात.

"मी मार्केटिंग मॅनेजर आहे"- वरद

"मुलगी कुठेय?"- अनंतराव

"हो हो बोलवतो. अहो गौरीला बोलवा"- प्रतापराव भाग्यश्री ताईंना सांगतात.

इथे किचन मध्ये गौरी गांगरून गेलेली असते. प्रतापरावांची हाक ऐकताच ती अजून गोंधळते. भाग्यश्री ताई चहाचा ट्रे गौरीच्या हातात देतात.

"नीट धर आणि बाई जरा ती साडी नीट सांभाळ. जास्त दात काढून हसू नको बाहेर आणि हो त्यांनी काही विचारलं तर नीट उत्तर दे. आणि हो..."- भाग्यश्री ताई सूचना देत असतांना गौरी त्यांना थांबवते.

"बस कर ग आई काल पासून हेच सांगतेय तू मला. आता पाठ झालंय माझं हे सगळं. जाते मी नाहीतर बाबा रागावतील"- गौरी

"अग थांब थांब"- भाग्यश्रीताई

"आता काय ग आई??"- गौरी वैतागून बोलते.

"खूप सुंदर दिसतेयस. कोणाची नजर नको लागायला माझ्या बाळाला"- भाग्यश्री ताई त्यांच्या डोळ्यातील काजळ हळूच गौरीच्या कानामागे लावतात. गौरी गोड हसते आणि बाहेर जाते.

गौरी इतकी बावरलेली असते की ती समोर सुद्धा बघत नाही. खाली मान घालूनच सगळ्यांना चहा आणि कांदेपोहे देते. वरद मोबाईल मध्ये गुंग असतो. गौरी त्याच्या जवळ येते आणि त्याला चहा देतांना दोघांची नजरानजर होते आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात.

"मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा"- प्रतापराव

"अहो मुलीला काही नाही विचारायचं. मुलीबद्दल आम्ही तुम्हाला विचारूच की पण लग्न त्यांना करायचंय तर त्यांनी आपापसात बोलावं असं वाटतं मला"- स्वाती ताई

"हो हो आमची काही हरकत नाही. गौरी बाळा जा त्यांना मागच्या अंगणात घेऊन जा"- भाग्यश्रीताई. गौरी खुणेनेच नको असं सांगायचा प्रयत्न करत असते.

"लाजतेय वाटतं. अगं लाजू नकोस गम्मत असते जा जाऊन बोलून या"- मयुरी वहिनी

वरदला सुद्धा जायचं नसत पण नाईलाजाने दोघे तिथून उठतात आणि मागच्या अंगणात येतात. दोघेही गप्प असतात पण दोघांच्या मनात खूप काही विचार चालू असतात. आणि डोळ्यात दिसत असतो प्रचंड राग...

क्रमशः

©ChinmayiDeshpande