अंगडिया स्टोरी - भाग १ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंगडिया स्टोरी - भाग १

अंगडिया स्टोरी

भाग  १

मुकेश अंगडिया सकाळी साडे नवाच्या सुमारास ऑफिस मधे नुकतेच पोचले होते. इतक्यात त्यांच्या ऑफिस मधला फोन वाजला. मुकेशनी फोन उचलला. मुंबईहून लाइटनिंग कॉल होता.

किरीटभाई बोलत होते. “कलकत्याहून दिनेश निघाला आहे. आज अडीच वाजता हावरा मुंबई एक्सप्रेस नागपूरला पोचेल. ठरल्या प्रमाणे ठरलेली १० रुपयांची नोट घेऊन स्टेशन वर जा आणि किट बॅग ताब्यात घ्या. घरपोच डिलीव्हरी आहे. त्या प्रमाणे ती सरक्षित पणे पोचवा. आणि डिलीव्हरी ची पावती घ्या. आणि आम्हाला पाठवा.”

मुकेश भाईंनी होकार भरला. हे नेहमीचं नव्हतं पण कधी कधी अशी डिलीव्हरी करावी लागायची.

आज भारतात अनेक कोरियर सर्विसेस आहेत, आणि आपण त्यांचा जरुरीनुसार वापर पण करतो. परंतु साधारण १९९० च्या अगोदर इतक्या व्यापक प्रमाणावर कोरियर सर्विसेस उपलब्ध नव्हत्या. त्या काळात छोट्या छोट्या कोरियर सर्विसेस होत्या त्यांना अंगडिया म्हणायचे. या छोट्या कंपन्या मोठ्या अंगडिया कंपनीशी सहकार्य करायच्या. त्यामुळे कुठून कुठेही आपली वस्तु पाठवता यायची. आधार होता विश्वास. या कंपन्या फक्त आणि फक्त विश्वासावर चालायच्या. त्यामुळे लोकं त्यांच्या मार्फत हीरे, दाग दागिने, कॅश आणि अतिशय महत्वाचे कागदपत्र अगदी निर्धास्त पणे पाठवायचे. आणि हे सुद्धा अत्यंत नाम मात्र भाड्या मधे. किरीट भाईंची अशीच मोठी कंपनी होती आणि ती मुंबई, सूरत आणि कलकत्ता शहरांचा व्याप सांभाळायची. मुकेशभाईची अंगडिया कंपनी किरीट भाईच्या कंपनीशी संलग्न होती. त्यानुसारच आज किरीट भाईंनी मुकेश भाईवर एक महत्वाचं काम सोपवलं होतं. मुकेश भाईंनीच  सांगितलेल्या १० रुपयांच्या नोटे चा नंबर दिनेश जवळ एका चिठ्ठी वर लिहिलेला होता. तो नंबर ताडून आणि १० रुपयांची नोट घेऊन दिनेश, मुकेश भाईंना किट बॅग सपूर्त करणार होता. स्पष्टच होतं की किट बॅग मधे अतिशय महत्वाचं सामान होतं. आणि त्यामुळे खूपच सतर्कता बाळगावी लागणार होती.

मुकेश भाईंनी द्वारका ला बोलावून सर्व माहिती दिली आणि दोन वाजता स्टेशन वर जायला सांगितलं. द्वारका आणि दिनेश दोघंही एकमेकांना चांगले ओळखत होते

त्यामुळे काही घोटाळा  होण्याचा प्रश्न नव्हता. द्वारका हा मुकेश भाईंचा अत्यंत विश्वास पात्र माणूस होता, त्यामुळे मुकेश भाई आजच्या सारख्या महत्वाच्या कामावर नेहमीच द्वारकाला पाठवायचे.

द्वारका बरोबर दोन वाजता स्टेशन वर पोचला. आधी त्यांनी नेहमीच्या रिकशांपैकी कोणचा आहे ते शोधलं आणि त्याला थांबायला सांगितलं. त्या काळा मधे  नागपूरला सायकल रिक्शा जास्त चालायच्या. गाडी वेळेवर आली. दिनेशची भेट झाली. दिनेशला १० रूपयांची नोट देऊन झाली. त्याने नंबर चेक करून द्वारकाला किट बॅग दिली. आता स्टेशन वरचं काम झालं होतं. द्वारका जाण्या साठी मागे वळला. मागे उभ्या असलेल्या दोघा पोलिसांनी द्वारका ला १० रूपयांची नोट देताना पाहीलं होतं. ते समोर आले. “काय द्वारका शेट, आज वजनदार दिसते आहे तुमची बॅग, चला आम्ही येतो तुम्हाला रिक्शा पर्यन्त सोडायला.” यात काही विशेष नव्हतं. द्वारकाचे सर्वांशी छान संबंध होते. त्याला पण बऱच वाटलं. रिक्शा पाशी पोचल्यावर त्यानी पोलिसांना २० रुपये दिले. रिक्शा वाला नेहमीचाच होता, द्वारका चा पेहराव म्हणजे मळकट पांढरा शर्ट आणि पाइजामा, डोक्यावर पांढरी टोपी. संशय येण्या सारखं काहीच नव्हतं. बॅग रिक्शा मधे टाकून दोघं निघाले.

स्टेशन मधून बाहेर पडल्यावर, थोड्या अंतरावर दोन माणसं आडवे आले. आपला महापालिकेचा बिल्ला दाखवून, त्यांनी रिक्शा रस्त्याच्या बाजूला घ्यायला सांगीतली. “काय झालं साहेब?” द्वारकाने विचारलं.

“नाका भरल्याची पावती दाखवा. काय आहे बॅगे मधे?” – दोघांपैकी एक माणूस.

“काही नाही साहेब, लोकांची पत्र आहेत, आम्ही अंगडिया आहोत. याला नाका नाही भरावा लागत, आणि आम्ही नाक्या समोरूनच आलो.” – द्वारका.

“ते काही नाही, आम्हाला बघायचं आहे. बॅग उघडा.” – माणूस.

“तुम्ही कोण? आणि आम्हाला का त्रास देता आहात?” – द्वारका.

आम्ही भरारी पथकाची माणसं आहोत. नाका चोरी खूप होते आहे आज काल. ते जाऊ द्या बॅग उघडा.” – माणूस.

“साहेब, बॅगेला सील लागलं आहे ती ऑफिस मधेच उघडल्या जाते.” – द्वारका म्हणाला आणि रिक्षाच्या खाली उतरला. रिक्षावाला पण खाली उतरला, द्वारकाने २० रुपयांची नोट काढली आणि त्या माणसाला देऊ केली. तो माणूस हसला, म्हणाला “आता कसं. ठीक आहे. जा.” पण तेवढ्या वेळेत एक ऑटो रिक्शा जवळ आली, शेजारीच अजून एक माणूस उभा होता त्याने किटबॅग ऑटो रिक्शा मध्ये  टाकली आणि तो पण बसला. ऑटो रिक्शा अतिशय वेगाने तिथून निघून गेली. द्वारका आणि रिक्षावाला ओरडत त्या ऑटो रिक्शा च्या मागे धावले, पण तो पर्यन्त तो दिसेनासा झाला होता. ते वापस आले, पण तोपर्यन्त, भरारी पथकाची माणसं पण गायब झाली होती. हे सगळं केवळ ५ मिनिटांत झालं. अतिशय सफाईदार पणे पार्सल ची डिलीव्हरी झाली होती आणि रीसीप्ट पण मिळाली नव्हती.  ऑटो रिक्षाचा नंबर सुद्धा पाहता आला नव्हता. आता काय करायचं? द्वारकाच्या इतक्या वर्षांच्या प्रामाणिक कामावर आता काळा डाग  पडला होता. तो  रडायला लागला. रिक्शा वाला पण काय करावं हे न समजून तसाच उभा राहिला. थोडा वेळ तसाच गेला मग  द्वारकाची  थोडी समजूत काढून रिक्शा त्याने ऑफिस कडे वळवली.

द्वारका रिकाम्या हाताने आलेला पाहून, मुकेशच्या मनात शंकेची पाल चूक चुकली. द्वारकाने आत शिरता शिरता एकदम गळाच काढला. आता मात्र मुकेश हादरला. तरी पण शांत राहून त्याने प्रथम द्वारकाला शांत केलं आणि मग विचारलं.

“काय झालं? किट बॅग मिळाली नाही का? दिनेश भेटला नाही का?” -मुकेश भाई.

द्वारकाला बोलणं कठीण झालं होतं. आता पर्यन्त मुकेश भाईंना थोडा अंदाज आलाच होता की काही तरी गडबड झाली आहे म्हणून. तरी त्यांनी शांत पणे पुन्हा एकदा विचारलं. गेली आठ वर्ष द्वारका त्यांच्याकडे कामाला होता आणि कधी अशी अवस्था द्वारकाची झाली नव्हती.

“दिनेश भेटला आणि त्यांनी किटबॅग पण दिली. पण रस्त्यात दोघा जणांनी ती लंपास केली.” – द्वारका

“अरे! कशी काय? नीट सविस्तर सांग काय घडलं ते.” – मुकेश भाई.

मग द्वारकाने सगळी घटना मुकेश भाईंना सांगीतली.

“साहेब, पोलिसांना कळवायचं की नाही हे माहीत नव्हतं म्हणून तक्रार केली नाही. आता जाऊन तक्रार नोंदवू का?” – द्वारका.

“नको. थांब.” – मुकेश भाई. ते जरा विचार करत होते.

त्यांनी मुंबईला किरीटभाईंना लायटनिंग कॉल लावला. किरीटभाईंना सर्व घटना सविस्तर सांगितली. आणि आता काय अॅक्शन घ्यायची ते सांगा असं म्हंटलं.

“मुकेश भाई, हा एक मोठा लॉस आहे. पन्नास लाख ही काही थोडी थोडकी रक्कम नाहीये. कदाचित आपल्याला भरून द्यावी लागेल.” – किरीट भाई म्हणाले आणि हे ऐकल्यावर मुकेश भाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढा मोठा लॉस सहन करण्याची त्यांची ताकदच नव्हती.

“भाई, हे कसं शक्य आहे, मी एक फार छोटा माणूस आहे, मला, हे काम माझ्या शक्ति बाहेरचं आहे. पण किरीट भाई, आपण काम अंगावर घेतो तेंव्हा जबाबदारी आपली नसते तर पाठवणाऱ्याची असते न?” – मुकेश भाई.

“मुकेश भाई, आपली जबाबदारी अशी टाळता येत नाही. इतकी मोठी रक्कम येणार होती, तेंव्हा तुम्ही दोन-चार पैलवान गाडी बरोबर पाठवायला हवे होते. इतर वेळी ठीक आहे पण अश्या कामात सुरक्षा जास्त महत्वाची असते हे कसं तुमच्या लक्षात आलं नाही?” – किरीट भाई. “मी बघतो पार्टी शी बोलून पण जर अंगावर आलच तर काही वाटा उचलायची तयारी ठेवा. आणि नागपूरच्या पार्टीला पण नीट सगळं समजाऊन सांगा.” आणि किरीट भाईंनी फोन ठेवला.

किरीट भाई काय म्हणाले ते मुकेशभाईंनी द्वारकाला सांगितलं. द्वारका तर रडायलाच लागला. आपल्या थोबाडीत मारून घेऊ लागला. थोड्या वेळाने शांत झाला आणि म्हणाला, “आता आपण काय करायचं?”

“आता मी आधी इथल्या पार्टीशी, कीर्तीभाईंशी बोलून त्यांना सर्व गोष्टीची कल्पना देतो मग जसं किरीट भाई सांगतील तसं करायचं.” मुकेश भाई म्हणाले. “सध्यातरी दूसरा काही उपाय दिसत नाहीये. तू बाकीच्या घरपोच डिलीव्हरी करायच्या आहेत त्या करून ये. तो पर्यन्त किरीट भाई काही तर मार्ग काढतील.”

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.