"आमदार धनंजय देसाई यांची त्यांच्याच फार्म हाऊस मध्ये झालेली हत्या, त्यानंतर राज्याचे पर्यावरण व विकास मंत्री विलासराव सावंत यांच्यावर भर प्रचार सभेत झालेला जीवघेणा हल्ला, आणि या हल्ल्यानंतरच्या अवघ्या काहीच तासांमध्ये ' जनशक्ति पक्षकार ' आप्पासाहेब गडकरी यांच्या नाट्यमय हत्येने राज्य हादरून गेलंय,
आणि विशेष म्हणजे हल्लेखोराने आज आप्पासाहेब गडकरींच्या हत्येअगोदर याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजतीये ,त्यामुळें ' जनता खरंच पोलिसांच्या जीवावर सुरक्षित आहे का? ' असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जातोय..." टीव्ही वर सुरू असलेल्या बातम्या शिव भावनाशून्य नजरेने पाहत होता.
"अहो! अजून किती वेळ असं स्वतःला दोष देत बसणार आहात?" वैदही शिव च्या शेजारी बसत म्हणाली .
"आज त्याने खूप मोठी चाल खेळलीये, विलासराव सावंतांची हत्या करण्याची धमकी देऊन त्याने पोलिसांचं सगळं लक्ष आधी प्रचारसभेमध्ये गूंतवलं,आणि त्याचा प्लॅन फसला असं दाखवून पोलिसांना अजून बेसावध करत त्याने रेड लिस्ट मध्ये असलेल्या आप्पासाहेबांचा शिताफीने काटा काढला, आणि आपण जिंकूनसुद्धा हरलो." शिव स्वतःच्या विचारात अजूनही बुडाला होता.पराभवाची सल त्याच्या नजरेत स्पष्ट दिसत होती.
"पण समोरच्याने एक चाल जिंकली, म्हणजे अख्खा डावंच मुठीत घेतला असं नाही ना?अजूनही तुमच्याकडे त्याची चाल उलटवून लावायला वेळही आहे आणि त्याचा अख्खा डाव उलथवून लावण्याची धमक ही आहे." वैदही शिवचा हात हातात घेत म्हणाली.
"ह्म्म्म्म्म्म...बरोबर आहे तुझं."
"बरं चला जेवून घेऊ, बराच उशीर झालाय मी पानं वाढायला घेते."
" हो.आलोच मी पण."
"वैदही स्वयंपाक घराकडे वळली.
शिव ही उठणारच होता इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली.
फोनच्या स्क्रीनवर ' Unknown Number ' अशी अक्षरं पडली होती.त्याने थोडं चकित होत फोन उचलला.
"हॅलो! शिव पटवर्धन हिअरींग."
"बंधातला वजीर मी,
विराण अन् बधीर मी,
ग्रहणाताला मिहिर मी,
संपण्या अधीर मी."
"कोण बोलतंय ?"
शिव आता कोड्यात पडला होता.
"ते महत्त्वाचं नाहीये. तू जो स्वतः ची चिता रचण्याचा मूर्ख पणे खेळ मांडलायस तो थांबवणं महत्त्वाचं आहे."
"I am sorry, मला वाटतंय तुम्ही चुकीच्या नंबरवर फोन लावलाय."
"नंबर तर बरोबरच आहे, पण पण तू मरण्यासाठी जो मार्ग निवडलायस तो चुकीचा आहे. अरे ए पटवर्धन,अरे मरण्यासाठी जगात चिक्कार मार्ग आहेत पण तुला का कोणास ठाऊक माझ्या हातून तडफडूनच मरायची हौस आहे.अरे तू तर मरशीलाच ,पण तुझी मुलगी आणि बायको पण टाचा घासत मरतील आणि त्यांचं प्रेतसुद्धा हाती लागणार नाही तुझ्या."
एक तीव्र सणक शिवच्या डोक्यात गेली.
"ए...कोण आहेस रे तू ? एकदा समोर तर ये, नाही तूझी चामडी सोलून तुला उभा गडला ना तर मी सुद्धा नावाचा शिव पटवर्धन नाही आणि हे इतक्या नीचपणे बोलताना लाज नाही का रे वाटत तुला? अरे माणूस आहेस की हैवान आहेस?"
"पटवर्धन...पटवर्धन...इतका राग बरा नव्हे पटवर्धन. ऐक शेवटचं सांगतोय मी तुला, माझ्या मार्गात आडवा येऊ नकोस, नाहीतर सात जन्मातही रडून संपणार नाही इतकं दुःख घालीन तुझ्या पदरात.मागच्या वेळी धडक मारून सोडून दिलं होतं पण पुन्हा पुन्हा आयुष्याची भीक नाही मिळणार तुला लक्षात ठेव."
शिव ने काही बोलायच्या आत त्याने निर्लज्जपणे हसत फोन कट केला.
शिवचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता त्याची छाती भात्याप्रमाने हलत होती.त्याने करकचून उजव्या हाताची मूठ आवळून भिंतीवर बुक्की मारली."
"अहो...!काय झालं? कोण होतं ?फोनवर."
वैदही त्याला शांत करत म्हणाली.
"हरामखोर सापडू तर दे एकदा मग दाखवतो त्याला."
"तुम्ही...तुम्ही शांत व्हा बघू आधी. घ्या पाणी प्या थोडं."
वैदही त्याच्या ओठाला पाण्याचा ग्लास लावत म्हणाली.
"नकोय मला." शिवने तो ग्लास मागे सारला.
"मी आलोच थोड्या वेळात."शिव सोफ्यावरून उठून जायला निघाला.
"अहो पण इतक्या रात्री कुठे चाललाय."
"एक काम आहे आलोच तुम्ही दोघी जेवून घ्या माझी वाट नका पाहू मी येतो तासाभरात."
"अहो पण..."
वैदही काही बोलायच्या आधी शिव निघून गेला होता आणि वैदही काळजीने दरवाजाकडे पाहत उभी होती.
...दोन दिवसानंतर...
स्थळ : जूना राजवाडा पोलिस स्टेशन.
इन्स्पेक्टर सरनाईक आणि शिव कसल्याशा चर्चेत गर्क झाले होते.इतक्यात फोन खणानला.
"हॅलो! जुना राजवाडा पोलिस स्टेशन, इन्स्पेक्टर सरनाईक हियर..."
"सर.जय हिंद सर. हो सर...नक्की सर.ठीक आहे सर."
इन्स्पेक्टर सरनाईकांनी फोन ठेवला.
"मिस्टर पटवर्धन,आयपीएस साहेबांचा फोन होता त्यांनी तुम्हाला ताबतोब भेटायला पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावलंय."
शिव थोडा चकित झाला.
"माझी भेट का?"
शिव थोडा कोड्यात पडत म्हणाला.
"ते तर तुम्हाला तिथे जाऊनच कळेल.पण मला वाटतं या केसच्या बाबतीतच त्यांना तुमच्या सोबत काही बोलायचं असेल."
"ह्म्म्म्म...मला सुद्धा तसंच वाटतं."
***
आयपीएस ऑफिसर राजवाडे थोड्याशा त्रासलेल्या चेहऱ्याने समोरची फाईल चाळत होते त्यांच्या कपाळावर पुसटसं आठ्यांच जाळं विणलं होतं.त्यांच्या खुर्चीच्या मागेच कोल्हापूरचा नकाशा लावला होता. आणि त्याच्या पुढेच कोल्हापुरच्या शान असलेल्या स्थळांची आणि अभिमान बिंदूंचे छानसे कोरीव कटाउट लावलं होतं.
" मे आय कम इन सर?"
शिव ने आदबिने विचारलं.
आयपीएस साहेबांची तंद्री भंग झाली.
"अरे मिस्टर शिव पटवर्धन, या ना...या बसा. actually मी तुमचीच वाट पाहत होतो."
आयपीएस साहेबांनी चेहऱ्यावरचं आठयांच जाळं पुसत शिव चं स्वागत केलं.
"आता कशी आहे तुमची तब्येत?"
"ठीक आहे सर,आधीपेक्षा अगदीच उत्तम आहे."
शिव खुर्चीवर बसत म्हणाला.
"मला या केसमध्ये तुमची गरज आहे,म्हणूनच मी तुम्हाला बोलावलं.एकतर हाती पुरावे सापडत नाहीयेत,वरून pressure वाढत चाललंय आणि यासगळ्यात तेल ओतायला मीडिया आहेच.अख्ख्या पोलिस डिपार्टमेंटची झोप उडालीये."
"हो बरोबर आहे तुमचं, सध्याची परिस्थिती खूपच बिघडलीये,आणि या परिस्थतीमध्ये आणखी काही अभद्र नाही घडून चालणार."
"ह्म्म्म...बरं आता आपल्याला लवकरच..."
इतक्यात टेबलवरचा फोन खणानला.
"दोनच मिनिट."
त्यांनी फोन उचलला आणि कानाला लावलाच होता आणि ते काही बोलणार इतक्यात अचानक त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
"हॅलो...,कोण बोलतंय?.. हॅ..... हॅ.. हॅलो?"
पलीकडच्याने फोन ठेवल्यावरही पोलिस अधीक्षक राजवाडे काही क्षण कानाला फोन लाऊन उभे होते आणि त्यांची चिंताक्रांत नजर शून्यात खिळली होती.
"सर...?सर!"
शिवच्या आवाजाने ते भानावर आले,त्यांनी खुर्चीवर बसत टेबलवरचा अर्धा ग्लास रिकामा केला.
"सर, आर यू ओके? कोण होतं कॉल वर?"
एव्हाना शिवला अंदाज आलाच होता.
"मी सांगतो तुम्हाला मिस्टर पटवर्धन हा माथेफिरू खरंच पिसाळला आहे अक्षरशः ,त्याला जरासुद्धा जाणीव नाहीये की तो काय करतोय."
कपाळावर साचलेले घर्मबिंदू पुसत राजवाडे म्हणाले.
"काय म्हणाला तो?"
"राजीव धोत्रे,वय ५४ विराज सिटी."
शिव चकित झाला.
"हे राजीव धोत्रे म्हणजे, तेच ना जे मोठे फौंड्री उद्योगपती आहेत कोल्हापूरचे?"
"हो.तेच."
"पण त्याला त्यांना का मारायचंय? म्हणजे त्यांचा तर राजकारणाशी काहीच संबंध नाही."
"पण ते कोल्हापुरातले फार मोठे प्रस्थ आहेत."
"ह्या माथेफिरूच्या डोक्यात काय चाललंय कोणास ठाऊक."
राजवाडे अर्धा ग्लास संपवत म्हणाले.
"बरं चला आपल्याला आता घाई करावी लागेल यावेळी काहीही झालं तरी तो हातातून सुटता कामा नये".
शिव खुर्चीतून उठत म्हणाला.
"हो चला."
शिवच्या मस्तकात वणवा पेटला होता, 'आता काहीही झालं तरी त्या माथेफिरूला सोडायचं नाही', अशी पक्की खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती.पण त्याच्या नशिबात पुढे नियतीने काय वाढून ठेवलंय याची त्याला यत्किंचितही जाणीव नव्हती तो बेमालूमपणे चालला होता एका मोठ्या वादळाकडे त्याचा त्या वादळाच्या विध्वंसापासून अगदीच अजाणपणे...
क्रमशः