किस्से चोरीचे - भाग 6 Pralhad K Dudhal द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किस्से चोरीचे - भाग 6

किस्से चोरीचे

आपण चोरी म्हटले की साधारणपणे कोणत्या तरी महत्वाच्या किंमती वस्तूची चोरी असे गृहीत धरतो;पण चोरी फक्त वस्तूचीच होते असे नाही. तर अशाच एका वेगळ्या प्रकारच्या चोरीबद्दलचा हा किस्सा मी सांगणार आहे...
त्यावेळी नोकरीत माझे नुकतेच पहिले वाहिले प्रमोशन झाले होते आणि पुण्यातील कॅम्प विभागातल्या जुन्या टेलिफोन लाईन आणि केबल नेटवर्कचे अपग्रेडेशन अर्थात नूतनीकरण करायचे महत्वाचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते.
या कामात नवीन केबल टाकणे जुनी संसाधने बदलून नवी बसवणे टेलिफोन नादुरुस्त होण्यासाठी कारणीभूत असलेली तांत्रिक कारणे कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करून निरीक्षणासाठी नेमलेल्या विशेष विभागाकडून प्र माणि त करून घ्यायचे अशा प्रकारचे काम माझ्यावर सोपवले गेले होते.ठराविक काळाच्या मुदतीत हे काम करायचे असल्याने वरून खूप प्रेशर होते मी स्वतःला या कामात झोकून दिले होते.या कामातला माझा झपाटा पाहून माझे वरिष्ठ माझ्यावर चांगलेच खुश होते.
हे काम अधिक वेगाने करण्यासाठी मला मदत व्हावी म्हणून माझ्या उपमहाप्रबंधक साहेबांनी माझ्या मदतीला म्हणून माझ्या एका सिनियर अधिकाऱ्याला पाठवले....
खरं तर तोपर्यंत आमचे साहेब माझ्याकडून मिळणाऱ्या आऊटपुटवर खुश होते.ते दररोज रात्री मला घरी फोन करून आजची कामातली प्रगती आणि उद्याचे कामाचे नियोजन याबद्दल सविस्तर माहिती घ्यायचे. कामाचा आढावा घेऊन उपयुक्त सूचनाही करायचे. माझ्यावर कामाचा अतिशय ताण आहे याची त्यांना जाणीव होती त्यामुळे तो ताण थोडा हलका करून मला अजून वेगाने काम करून घेता यावे अशा चांगल्या हेतूने त्या अधिकाऱ्याला माझ्या मदतीला पाठवले होते.झाले काय की साहेब आणि माझ्यामधे हा सिनियर आल्याने अर्थातच मिळणाऱ्या आऊटपुटचे आकडे तो सिनियर माझ्याकडून घ्यायचा आणि मोठ्या साहेबाला द्यायचा!
मी दिवसभर राब राब राबायचो आणि हाताखालच्या लोकांकडून काम करून ते निरीक्षण टीमकडून प्रमाणित करून घ्यायचो. दररोज संध्याकाळी माझ्या मदतीसाठी आलेला तो अधिकारी फक्त माझ्याकडून आऊटपूटचे आकडे घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्याचे पोस्टमनचे काम करून तो साहेबांकडून त्या कामाचे श्रेय लाटायला लागला.
प्रत्यक्षात माझ्या कामात काडीचीही मदत न करता तो माझ्या कामाचे श्रेय चोरतो आहे हे माझ्या लक्षात आले....
मी वरिष्ठ अधिकाऱ्याला माझी होणारी कुचंबणा जाऊन सांगू शकत नव्हतो.सरकारी नियमाप्रमाणे मी मधल्या अधिकाऱ्याला डावलूही शकत नव्हतो.
यावर काय करता येईल याचा मी बराच विचार केला आणि साहेबांना न दुखावता मधल्या सिनियर अधिकाऱ्याला बाजूला करण्यासाठी मी एक गनिमी चाल केली....
मी भरपूर काम करून घ्यायचो;पण दिवसभरात झालेल्या कामाचे आकडे अर्ध्याने कमी करून मधल्या अधिकाऱ्याला सांगू लागलो. माझ्याकडून मिळालेले चुकीचे आकडे तातडीने वरच्या साहेबापर्यंत जाऊ लागले...
वेगाने काम व्हावे म्हणून दोन दोन अधिकारी देऊनही प्रत्यक्षात आऊटपूटचे आकडे कमी झाल्याचे साहेबांच्या निदर्शनाला येऊ लागले. साहेबांनी मधल्या अधिकाऱ्याला याबद्दल जाब विचारला परंतु तो अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही...प्रत्यक्ष कामात त्याचा सहभाग नसल्याने तो काहीच सांगू शकला नाही! आठवडाभरातल्या आकड्यांवरून कामाची प्रगती खालावलेली आढळून आल्याने जनरल मॅनेजरनी एक दिवस संध्याकाळी मला फोन करून आकडे कमी का झाले, काही अडचण आहे का असे विचारले.
मी साहेबांच्या फोन कॉलची वाटच पहात होतो.
मी त्यांना काम अत्यंत वेगाने चालू असल्याचे सांगितले आणि माझ्याकडील झालेल्या कामांचे खरे खरे आकडे सांगितले...
आमचे हे वरिष्ठ खूपच मुरलेले होते. त्यांना मिळालेल्या आकड्यापेक्षा मी सांगितलेले आकडे त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होते. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सगळा लेखी रिपोर्ट घेऊन त्यांच्या ऑफिसला बोलावले.माझा प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गांवर होता!
मी दुसऱ्या दिवशी झालेल्या कामाचे रिपोर्ट्स तसेच पुढच्या एक दोन महिन्यासाठी मी केलेले नियोजन लिखित स्वरूपात साहेबांसमोर ठेवले.
माझा तो आत्मविश्वास बघून साहेब चांगलेच प्रभावित झाले होते!
मधल्या अधिकाऱ्याने केलेल्या केवळ पोपटपंचीचा त्यांना चांगलाच अंदाज आला होता. मी त्या अधिकाऱ्याबद्दल तोंडातून एकही चुकीचा शब्द बोललो नव्हतो तरीही त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्या सिनियरला माझ्या विभागातून दुसरीकडे हलवले..
माझे काम स्वतःच्या नावावर खपवणारा व्यक्ती दूर झाल्याने अर्थातच माझ्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे श्रेय आपोआपच मला मिळू लागले..ते काम उत्कृष्टरित्या पार पाडल्याने मला त्या वर्षीचा संचार सारथी पुरस्कार दिला गेला!
'क्या करे खुदका आत्मसन्मान बचाने हेतू करना पडता है कभी ऐसा भी!'
©प्रल्हाद दुधाळ.
9423012020