तो एका टेबल वर बसून तिची वाट बघत होता. त्याने पुन्हा घड्याळाकडे बघितले, वेळ थांबला तर नाही असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याने पुन्हा खिडकीच्या बाहेर बघितले. त्या कोफी हाऊस समोरून अनेक व्यक्ति पसार होत होते आणी तो प्रत्येक चेहऱ्याकडे निरखून बघत होता. काही व्यक्ति कोफी हाऊस मध्ये प्रवेश करून आपल्या आवडीच्या पदार्थाचा आस्वाद घेऊन तृप्त झाल्यानंतर पुढे जात होते.
वेइटर पुन्हा त्याच्या समोर येऊन थबकला आणी त्याने त्याच्या चेहऱ्याकडे न बघताच हाताने इशारा केला. त्या वेइटरने काउंटरवर बसलेल्या मॅनेजर समोर बघितले. मॅनेजरने नवीन आलेल्या व्यक्तिला बघ असा इशारा केला आणी वेइटर त्या नवीन व्यक्ति जवळ गेला. आलेल्या व्यक्तिने मेनू न बघता स्वतःच्या आवडीच्या पदार्थांचे नाव सांगू लागला.
गजबजलेल्या त्या कोफी हाऊस मध्ये खूप गोंधळ होता, पण त्याचे लक्ष खिडकी बाहेर च होते. त्याची नजर दुसरीकडे वळली आणी ती पसार झाली तर? त्याला वाटत होते की तो तिकडे बसून पसार होणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला बघू शकत होता, पण इकडेच तो चुकला होता. या आधी ती तीनवेळा तिकडून पसार झाली होती आणी तो तिची वाट बघत कोफी हाऊस मध्ये च बसलेला होता. त्याला तिच्या शिवाय पुढे जायायचे नव्हते, पण त्याचा मोह नसलेली ती तर कधीच पुढे गेली होती.
काउंटरवर बसलेल्या मॅनेजरला त्याची दया येऊ लागली होती. गर्दी कमी झाल्यावर तो उभा झाला आणी त्याच्या जवळ आला. त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणी म्हणाला, "मित्रा, हे कोफी हाऊस पुढे जाणाऱ्याची अतृप्त राहिलेली भूक आणी तहान भागवण्यासाठी आहे, पण तुझी तहान तर वेगळी च आहे. तुला आता पुढे जायायला हवे, शक्य आहे की ती पुढे तुझी वाट बघत असेल. तू एक टेबल रोखून ठेवले आहेस."
त्याचे डोळे पाणावले. स्वतःच्या भावनावर काबू करून तो म्हणाला, "मी खूप काळापासून इकडे आहे आणी मला माहित आहे की या मार्गावरचे हे शेवटचे ठिकाण आहे. अनेक जन्म वाट बघावी लागेल तर चालेल, पण तिच्याशिवाय मी पुढे जाणार नाही."
मॅनेजरने निराशेमध्ये मान हलवली आणी काउंटरकडे गेला. थोड्यावेळा नंतर तो मॅनेजर पुन्हा उठला आणी कोफी हाऊसच्या बाहेरून पसार होत असलेल्या युवतीकडे गेला. त्याने मॅनेजरला बाहेर जातांना बघितले, पण तो कुणीकडे जात होता हे त्याला कळले नाही. थोड्यावेळाने त्याने बघितले की मॅनेजर बोलत होता, पण त्याच्या समोर कुणीच नव्हते.
मॅनेजरने तिला विचारले, "तू त्याच्या सोबत असे का वागत आहेस? तो खूप काळापासून तुझी वाट बघतोय. त्याचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्याची तडप मी बघितली आहे. तुझे त्याच्यावर प्रेम नाही का?"
तिच्या डोळ्यात प्रेम ऐवजी तिरस्कार होता. तिच्या आवाजात रुक्षता होती, ती म्हणाली, "माझी वाट बघत असलेला तो आज केविलवाणा वाटत असला तरी मला त्याची दया येत नाही, कारण त्याने माझे जगणे जड केले होते. आत्मारूपात त्याचे प्रेम पवित्र वाटत असेल, पण दैहिक रूपात त्याने माझे शोषण च केले होते. त्याला इकडे पोहोचवणारी मी च आहे. मी इकडून खूपवेळा पसार झाले, पण तो कधीही बघू शकला नाही आणी पुढे हि बघू शकणार नाही. मी माझ्या प्रियकराला सात जन्मांचे वचन दिले आहे. मी त्याची साथ कधी हि सोडणार नाही. माझ्या जीवनाचा खलनायक आज माझी वाट बघत बसला आहे आणी अजून हि तो वाट च बघत बसेल."
आतमध्ये आलेल्या मॅनेजर कडे बघून तो हसला आणी बोलला, "अजून तिचे तीन जन्म बाकी आहेत. एक दिवस ती मला नक्की दिसेल आणी मी तिच्या सोबत जाईन. तिची वाट बघत इकडे बसणे हे च मी केलेल्या पापांचे प्रायश्चित आहे."