"पण इनहेलर त्याला आणून द्यायचं कारणच काय,त्याच्या जवळ नव्हतं त्याचं ,मी तर ऐकलं की त्याला ऍलर्जिक सर्दी असल्यामुळे नेहमीच त्याच्याजवळ इनहेलर असते",इन्स्पेक्टर
"हो सर नेहमीच असते त्याच्या जवळ पण आज इंटरव्यू च्या गडबडीत तो कदाचित विसरला असेल.",मी
"सर एकदा मी ते इनहेलर बघू शकतो ",मी. मला इनस्पेक्टरांनी इनहेलर दिले ते मी ४-५ सेकंद बघितले आणि सांगितले, "सर मी जे इनहेलर रत्नेश ला आणून दिले होते ते हे नाहीये. "
"असं कसं म्हणू शकतो तू ? यावर तुझ्या बोटांचे ठसे आहेत.",इन्स्पेक्टर उसळून म्हणाले.
"सर कारण मी जे इनहेलर आणलं होतं त्यावर 'राधा मेडिकल'असं मेडिकल च्या नावाचं लेबल होतं आणि एक्सपायरी डेट ही दोन वर्षानंतरची होती पण या इनहेलर वर लेबलही नाहीये आणि एक्सपायरी डेट सहा महिन्यानंतरची आहे .
"ठीक आहे चल आपण त्या मेडिकल मध्ये जाऊन येऊ ",इन्स्पेक्टर
मी आणि इन्स्पेक्टर सर मेडिकल मध्ये गेलो,तिथे मेडिकल मालकाला इंस्पेक्टरांनी काही प्रश्न विचारले," हे इनहेलर तुमच्या मेडिकल चं आहे का ?"
दुकानदाराने इनहेलर ला बारकाईने पाहून नाही सांगितले.
इंस्पेक्टरांनी विचारले,"का ? हा मुलगा (माझ्याकडे अंगुलीनिर्देश करून) तुमच्या दुकानात आला होता न इनहेलर घ्यायला साधारण दुपारी एकच्या सुमारास"
" कदाचित आला असेल साहेब कारण तेव्हा मी आत केबिन मध्ये जेवत होतो माझ्याकडे कामावर असणाऱ्या माणसाने दिले असेल ,थांबा आत्ता बोलावतो त्याला","ए संदीप बाहेर ये जरा ","पण हे इनहेलर आमच्या दुकानाचे नाही कारण यावर आमच्या दुकानाचे लेबल नाही",दुकानदार
संदीप बाहेर आला त्याला इन्स्पेक्टर नी विचारले,"का रे बेटा,हा मुलगा दुपारी तुमच्या कडे इनहेलर घ्यायला आला होता का?"
" हो साहेब आला होता हा,बरेचदा हे येतात औषधं घ्यायला. यांच्या हॉस्टेल चे पण बरेच मुलं येतात.",संदीप
"मग मला आता सांग हेच इनहेलर तू याला दिले का ?",इन्स्पेक्टरांनी इनहेलर दाखवत विचारले.
"नाही साहेब हे ते इनहेलर नाही कारण यावर आमच्या दुकानाचं नाव नाही",संदीप
"मग तुझ्या दुकानातील एखादं इनहेलर दाखव", इन्स्पेक्टर
संदीप ने त्यांना इनहेलर दाखवलं व तो म्हणाला,"साहेब कालच माल आला त्यातलंच इनहेलर मी याला (माझ्याकडे बघून ) दिल.
इन्स्पेक्टर सरांनी ते इनहेलर बघितलं त्यावर दुकानाचं नावही होतं आणि मी सांगितल्याप्रमाणे एक्सपायरी डेट दोन वर्षानंतरची होती. आता त्यांची खात्री पटली की मी खरं बोलत होतो म्हणून.
पण थोड्याच वेळात ते विचारमग्न झाले व म्हणाले ,"तुझं काही वैर होतं रत्नेश शी ,तुमचं भांडण झालं होतं का ?,मला खरं सांग,तुझी हुशारी तू अशी वापरली, इनहेलर बदलून वर्गमित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहेस तू.
"सर हे तुम्ही काय बोलत आहात ? मी असं घाणेरडं कृत्य करणं शक्य नाही,तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय,ही काहीतरी वेगळीच भानगड आहे कोणीतरी रत्नेश च्या आणि माझ्या वाईटावर आहे त्या व्यक्तीनेच मला अडकवण्याचा हा कट केलेला दिसतोय. तुम्ही मला थोडा वेळ द्या मी नक्कीच निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवतो. ",मी
"सध्या आपण तुमच्या प्राचार्यांना भेटायला जाऊ ",इंस्पेक्टर
प्रिन्सिपॉल सरांच्या केबिन मध्ये गेल्यावर.
"सर मला ह्या तुमच्या विद्यार्थ्यांवर दाट संशय आहे. खूप हुशारीने त्याने हे कृत्य केलं आहे,मला त्याला संशयाच्या आधारावर अटक करावी लागेल.",इन्स्पेक्टर
"सर मी गुन्हेगार मुळीच नाही इन्स्पेक्टर साहेबांना खूप मोठा गैरसमज झालाय ,प्लिज मला थोडा वेळ द्या या मागे जो कोणी आहे त्याला मी सगळ्यांच्या समोर आणीन.उगीच मला अटक झाली तर माझी तर बदनामी होईलच पण कॉलेज ची सुद्धा विनाकारण बदनामी होईल ",मी प्रिन्सिपॉल सरांना पोटतिडीकेने म्हणालो.
"ठीक आहे",प्रिन्सिपॉल मला उद्देशून म्हणाले. व नंतर इंस्पेक्टरांना म्हणाले,".सर मलाही वाटते की तुमचा गैरसमज झालेला आहे. मी राघव ची जबाबदारी घेतो याला एक दिवसाचा वेळ द्या तपास सुरु असेस्तोवर हा कुठेही जाणार नाही शहर सोडून,तसाही तो कॉलेज हॉस्टेल मधेच राहत असल्यामुळे माझं त्याच्यावर लक्ष राहीलच तेव्हा सध्या तुम्ही त्याला अटक करु नका ही माझी विनंती ऐका. "
"ठीक आहे देशपांडे सर तुम्ही एवढं म्हणताय तर एक दिवसाचा वेळ मी देतो ",असं म्हणून इन्स्पेक्टर निघून गेले.
मी प्रिन्सिपॉल सरांचे आभार मानले आणि लायब्ररी जवळच्या हॉल मध्ये गेलो तिथे विघ्नेश माझी वाट बघत होता. प्रणव आणि आमचे एक सर हॉस्पटलमध्ये रत्नेश जवळ त्याचे आईवडील येईपर्यंत थांबायला गेले होते. बाकीच्या मुलांना आपापल्या घरी किंवा होस्टेलवर जायला सांगितलं होतं.
मी विघ्नेश ला सगळं सांगितलं. रत्नेश अशा अवस्थेत असल्यामुळे आमची भूकच मेली होती त्यामुळे हॉस्टेल वर जाऊन आम्ही न जेवता विचार मग्न होऊन बसून राहिलो. मला व विघ्नेश ला , रत्नेश ला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण तिथे जास्त गर्दी करायची नाही त्यामुळे भेटता येणार नाही असा डॉक्टरांचा निरोप प्रिन्सिपॉल सरांनी आम्हाला सांगितला होता. त्यामुळे नुसतं बसण्याखेरीज उपाय नव्हता.
बसल्या बसल्या मी सकाळपासूनचा घटनाक्रम आठवू लागलो. नेहमीप्रमाणे सकाळचं रुटीन आटोपून नाश्ता करून आम्ही सगळे कॉलेज मध्ये इंटरव्यूसाठी गेलो. तिथे आम्हाला वेळ असल्यामुळे आम्ही लायब्ररीत बसलो. माझा व प्रणवचा इंटरव्यू झाल्यामुळे आम्ही चहा प्यायला गेलो तिथे विघ्नेश ने मला कोल्ड्रिंक आणि इनहेलर आणायला सांगितलं म्हणून ते मी घेतलं आणि व्यवस्थित एक्सपायरी डेट तपासून घेतलं, मग मी रत्नेश ला दिलेलं इनहेलर कुठे गायब झालं आणि हे इन्स्पेक्टर दाखवतात ते इनहेलर कुठून आलं ? काही समजत नव्हतं
क्रमशः