गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - अंतिम भाग Kalyani Deshpande द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - अंतिम भाग

एक आठवढ्यापुर्वीच रत्नेश च वर्गातल्या आणि हॉस्टेल मध्येच राहणाऱ्या दांडगट मकरंद शी भांडण झालं होतं, मकरंद नेहमीच रत्नेश ला चिडवायचा, सतत त्याला taunt मारायचा,रत्नेश चा शांत स्वभाव बघून तो जास्तच चेकाळायचा, आम्ही बरेचदा त्याला समज दिली होती पण तो म्हणजे कुत्र्याचं वाकडं शेपुटच होता,समज दिल्यावर काही दिवस शांत राहायचा आणि परत मूळ पदावर यायचा, वास्तवात रत्नेश च्या हुषारीवर तो जळायचा,सगळे प्राध्यापक रत्नेश चं कौतुक करायचे ते त्याला सहन व्हायचं नाही. पण म्हणून तो एवढ्या खालच्या थराला जाईल?

विचार करता करता अचानक मला सुचलं आणि लगेच मी विघ्नेश ला रूममध्येच थांबायला सांगून कॉलेज मध्ये गेलो तिथे देशपांडे सरांची परवानगी घेऊन मी इंस्पेक्टरांना भेटायला पोलीस स्टेशन मध्ये पोचलो.

"ये बेटा स्वतः हूनच आला तू , घाई केली फार उद्या मी येणारच होतो ",इन्स्पेक्टर

"नाही सर मी अटक करवून घेण्यासाठी नाही आलोय,मला तुम्हाला मह्त्वाचं काहीतरी सांगायचंय. ",असं म्हणून मी इंस्पेक्टरांना सगळं सांगितलं.

"ठीक आहे,तू एवढ्या आत्मविश्वासाने म्हणतोय तर करून बघू. ",इन्स्पेक्टर

दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपॉल सरांनी नोटीस पाठवून जे आदल्या दिवशी इंटरव्यू साठी हजर होते त्या सगळ्या मुलांना कॉलेज मध्ये बोलवून घेतलं .
कोणाला काहीच सांगितलं नाही सगळ्यांना वाटलं की इंटरव्यू च्या रिझल्ट साठीच बोलावलंय.
सगळे बोलावल्याप्रमाणे कॉलेज मध्ये आले त्यांना लायब्ररीच्या जवळच्या हॉल मध्ये बसवण्यात आलं.

कॉलेज मधील चपराशाने एका मुलाचं नाव घेऊन त्याला लायब्ररीत सर बसले आहेत त्यांनी बोलावलं असं सांगितलं.त्या मुलाला वाटलं की आपण इंटरव्यूत सिलेक्ट झालो असल्यामुळे आपल्याला बोलावलंय तसा तो लायब्ररीत आला. आल्यावर त्याने इन्स्पेक्टर व मला बघितलं आणि त्याची दातखीळच बसली.

ते बघून इन्स्पेक्टर म्हणाले,"ये बेटा,चैतन्य तूच का ?"

चैत्या चाचरत म्हणाला ,"ह हो सर,पण मला का बोलावलं तुम्ही इथे ?"

"अरे हा तुझा वर्गमित्र राघव आहे नं त्याचं म्हणणं आहे की तू रत्नेश ला विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय",इन्स्पेक्टर

"म मी मी कशाला असं करेन? माझा काय संबंध ?इनहेलर तर राघवनेच दिलं होतं रत्नेश ला",असं म्हणून चैत्या ने जीभ चावली.

"ऑ ,कमाल आहे,इनहेलर चा काय संबंध ? मी इनहेलर चं नाव पण घेतलं नाही. तुला कसं माहित की विष इनहेलर मध्ये होतं ते, हे तर फक्त तीन जणांनाच ठाऊक आहे मी,हा राघव आणि तुमचे प्रिन्सिपॉल देशपांडे सर. कारण मीच या दोघांना ते सांगितलं. तुला कसं कळलं?",असं इन्स्पेक्टर म्हणाले व पुढे बोलू लागले,
"आता तू सांगितलंच आहे तर ऐक ,या राघवचं म्हणणं आहे की इनहेलर रत्नेश ला देण्याआधी तू याला मुद्दाम धडकला आणि इनहेलर बदललं,कारण राघवने आणलेल्या इनहेलर वर मेडिकल चं लेबल होतं जे तू बदललेल्या इनहेलर वर नव्हतं तसेच दोन्ही इनहेलर ची एक्सपायरी डेट वेगवेगळी आहे.

"पण सर राघव मला अडकवण्यासाठी खोटा पण बोलू शकतो,मी हे सगळं केलं यावर पुरावा काय ?",चैतन्य तावातावाने म्हणाला.

"अरे काल तू मला धडकल्यावर खाली जाताना कचरापेटीत इनहेलर टाकलं तेव्हा मी तुला पाहिलं होतं पण तेव्हा ते इनहेलर असेल असं मला माहित नव्हतं,पण जेव्हा मी शांततेने विचार केला तेव्हा मला सगळं पिक्चर क्लिअर झालं,आणि माझा अंदाज खरा आहे का हे बघण्यासाठी मी परत कॉलेज मध्ये येऊन त्या कचरापेटीत पाहिलं तेव्हा मला तिथे एक इनहेलर दिसलं,जे मी मेडिकलमधून आणलं होतं तेच ते होतं कारण त्यावर 'राधा मेडिकल'असं स्टिकर आणी दोन वर्षानंतरची एक्सपायरी डेट होती. आणि त्यामुळेच माझी पक्की खात्री पटली की गुन्हेगार तूच आहे,तुलाच रत्नेश चा काटा काढायचा होता म्हणून मुद्दाम तू धुळीने भरलेलं पुस्तक रत्नेश समोर झटकलं कारण तुला त्याच्या ऍलर्जिक सर्दी बद्दल ठाऊक होतं. विघ्नेश माझ्याशी फोनवर बोलत होता आणि मला कोल्ड्रिंक आणि इनहेलर आणायला सांगत होता तेव्हा तू तिथेच होतास आणि म्हणून मी येत असताना तू मला धडकला आणि इनहेलर बदललं.",एवढं बोलून मी थांबलो.

"अरे पण हे तू सांगतोयेस म्हणून खरं मानायचं का,कशावरून ही तुझी मनघडत कहाणी नसेल,अरे पुरावा काय आहे या सगळ्याला.", चैतन्य

"मला वाटलंच होतं तू असं म्हणशील म्हणून मी ते इनहेलर पोलिसांना तपासासाठी दिलं त्यांनी ते फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी दिलं त्याचा रिपोर्ट आला, त्यावर तुझे बोटांचे ठसे आहेत.",मी

एवढा वेळ इन्स्पेक्टर शांत राहून बारकाईने आमचं संभाषण ऐकत होते आणि एकदम ते म्हणाले ,"चल चैतन्य तुझी जेल मध्ये जाण्याची वेळ झाली "

"सर असं एकाएकी तुम्ही मला अटक करू शकत नाही,माझे कसे काय बोटांचे ठसे त्यावर सापडतील शक्यच नाही ",चैतन्य

"का,का नाही सापडणार? तुझेच बोटांचे ठसे आहेत ते ,चल तयार हो जेल मध्ये जायला,मी काहीही कारणे ऐकून घेणार नाही.",इन्स्पेक्टर

"हो हो चैतन्यचेच बोटांचे ठसे आहेत ",मला ही चेव आला

"शक्य नाही ",चैतन्य

"का शक्य नाही ",इन्स्पेक्टर

"खोटं बोलतोय सर हा,याच्याच बोटांचे ठसे आहेत ",मी

एकदम चैतन्य उसळून मला म्हणाला," अरे मुर्खा मी हातमोजे घातले होते माझे बोटांचे ठसे येतीलच कशे ?"

आणि पुढच्याच क्षणी तो मट्कन डोक्याला हात लावत खाली बसला.

"इन्स्पेक्टर खोखो हसत बोलले ,"अरे गाढवा ,तू हातमोजे घातले होते हे मला राघव ने कालच सांगितलं होतं आणि त्या इनहेलर वर तुझ्या बोटांचे ठसे नाहीत हे ही खरं पण राघव ने मला तुझ्या बोटांचे ठसे मिळाले असं खोटंच सांगण्याची विनंती केली आणि बघ तू स्वतः च कबूल करून माझं काम सोपं केलं.,पण असं कृत्य करण्याचं कारण काय?सांग ",इन्स्पेक्टर

बराच वेळ शांत राहून चैतन्य बोलू लागला,"मला रत्नेश चं यश,त्याची हुशारी सलत होती. मला वाटलं रत्नेश नसेल तर माझं कंपनीत खात्रीनें सिलेक्शन होईल,मी पकडला जाईल असं मला वाटलंच नाही "

"व्वा चैत्या,मस्त मला मधल्या मध्ये अडकवत होतास तू ",मी

"पण तुझ्या हुशारीने तू अडकला नाहीस बेटा राघव, नाहीतर मी तर तुला अटक करण्याची पूर्ण तयारी केली होती,खरं तर तू I.T. क्षेत्रात असण्यापेक्षा आमच्या क्षेत्रात असायला हवं ",इन्स्पेक्टर हसत बोलले मग चैतन्य कडे बघून म्हणाले,"चल चैतन्य बाळ पोलीस स्टेशन मध्ये. तिथे आपण इनहेलर-इनहेलर खेळू. "

हॉस्पिटल मधून निरोप आला होता रत्नेश ची तब्येत स्थिर होती. धोका टळला होता.

म्हणतात न ‘देव तारी त्याला कोण मारी.'

चैतन्य ला आय. पी.सी. .सेक्षन ३०७ अंतर्गत अटेम्प्ट टू मर्डर या गुन्ह्या साठी शिक्षा झाली.

पोस्टपोन झालेला इंटरव्यू १५ दिवसांनी झाला त्यात रत्नेश आणि विघ्नेश चे इंटरव्यू झाले आणि त्या कंपनीत मी,विघ्नेश,प्रणव व रत्नेश असे आम्हां चौघांचेही सिलेक्शन झाले.

या प्रकरणामुळे कॉलेज मध्ये व संपूर्ण शहरात सगळे जण मला गुप्तहेर राघव कल्याणी म्हणून ओळखू लागले.

पण खरंच सांगतो इन्स्पेक्टर नाईकांसारखा प्रेमळ इन्स्पेक्टर मी बघितलाच नाही सारखं आपलं बेटा आणि बाळ.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★