Karamati Thami - 3 books and stories free download online pdf in Marathi

करामती ठमी - 3 - ठमीची फोटोग्राफी

गायनाच्या क्लास चं ते तसं झालं आणि ठमी ला रिकामा वेळ खायला उठला. तिचं चलवळं डोकं तिला शांत बसू देईना तिला हळूहळू फ्रस्ट्रेशन यायला लागलं.

परंतु हे तिचं फ्रस्ट्रेशन फार काही टिकलं नाही. त्याचं झालं काय की माझे बाबा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांनी आमच्यासाठी आणि माझ्या आत्याला द्यायला असे दोन डिजिटल कॅमेरे आणले. त्यामुळे घरात कुठलीही नवीन वस्तू आली की त्याचा ताबा ठमीच घेणार ह्या नियमाने तिने तो कॅमेरा आत्याच्या हातून अक्षरशः ओढून घेतला.

मग काय दिवसभर कुठले न कुठले फोटो ती काढू लागली. त्या कॅमेराने अनेक लपलेल्या बाबी तिने उघडकीस आणल्या.

दुधवाल्या गणूकाकाकांचा इकडे तिकडे बघत भररकन दुधात पाणी मिसळतानाचा फोटो.
केर-लादी करणारी यमू कोणी बघत नाही हे बघून केर न काढता कशी भराभर लादी पुसून घेते त्याचा फोटो.

ठमीच्या आजीला बऱ्याच दिवसांचं कोडं पडलं होतं ते तिने सोडवलं. त्यादिवशी यमूने कपडे धुताना मस्त इकडे तिकडे बघत सगळे कपडे मोरीतले दोरीवर केले होते. तो विडिओ ठमीने आजीला दाखवला.

"अरर तिच्या! लब्बाड यमू ती! रोज दुपारी मी जेवायला बसली रे बसली की येते आणि माझा वरण भात कालवणं होईस्तोवर कपडे धुऊन फाटकातून पसारही झाली असते मेली! ",ठमीची आजी म्हणाली.

झालं! ठमी फोटोग्राफीत हा हा म्हणता तरबेज झाली. पिलांच्या चोचीत दाणा टाकताना चिमणीचे एक्सप्रेशन्स, घाईघाईने कुठूनतरी भुईमुगाची शेंग घेऊन तिला घाईघाईतच खाणारी खारुताई, चोरून दुधपिताना मांजरीचे एक्सप्रेशन्स त्यानंतर लगेच पाठीत दांडकं बसल्यावर बदललेले एक्सप्रेशन्स हे सगळे ठमीचा कॅमेरा टिपू लागला.

एक्सपर्ट फोटोग्राफर जसा गळ्यात कॅमेरा टाकून हिंडतो तशी ती सगळीकडे कॅमेरा गळ्यात घालून हिंडू लागली.

फोटो घेताना एक हात वर आणि एक खाली असा कॅमेरा धरून ती एक डोळा बारीक करून फोकस सेट करायला लागली आणि असाच फोकस सेट करून बिल्डिंगचा वॉचमन ड्युटीवर असताना झोपल्यावर घोरण्याचे कसे व्हेरिएशन्स देतो आणि त्याच्या घोरण्याच्या आवाजाने कन्फ्युज्ड माशी कशी पुन्हा पुन्हा त्याच्याच उघड्या तोंडात जाते हे सगळं तिने कॅमेरात कॅपचर केलं.

लवकरच तिच्या फोटोग्राफीला चालना मिळणारी घटना घडली. आमच्या शेजारी राहणाऱ्या दिघे काकूंच्या नातवाचं बारसं होतं. अर्थात मी आणि ठमी आम्ही तिथे कार्यक्रम सुरू होण्याआधीच हजर झालो.

कार्यक्रमस्थळी फोटोग्राफर आधीच पोचणं आवश्यक आहे असं म्हणून तिने आत्याला काही बोलायच्या आधीच घरातून काढता पाय घेतला. तिथे गेल्यागेल्या ठमी जो दिसेल त्याचे फोटो काढत बसली. मी तिथे दिघे काकूंच्या नातीशी जी आमच्याच वयाची होती तिच्याशी काहीतरी गप्पा करत बसली.

हळूहळू सगळे मंडळी हॉल मध्ये जमा होणं सुरू झालं.
ठमी उगीच खऱ्या फोटोग्राफर च्या पुढे जाऊन लुडबुड करू लागली. तो जिथे जिथे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता तिथे तिथे ही त्याच्याही समोर जाऊन फोटो काढत होती. शेवटी त्याला अडथळा होऊ लागल्यावर त्याने ठमीला म्हंटल,ठमे इथे मी आहे बेटा फोटो काढायला, तू तिकडे जा. तिथे कोणीच नाही फोटो काढायला तिथले महत्वाचे फोटो राहून जातील न त्यामुळे जा पटकन तिकडे, असं म्हणून फोटोग्राफर ने तिला लांब पिटाळलं.

तिने ते फारच सिरियसली घेतलं आणि फार मोठ्या कामगिरीवर असल्यासारखी ती फोटो काढू लागली.

एका दहा मिनिटात तिने असंख्य फोटो काढले त्यापैकी वाखाणण्या सारखे काही फोटो म्हणजे
दिघे काकांच्या मित्राचे जांभई देताना होणारे मुखब्रह्मांड दर्शन, दिघे काकूंच्या मैत्रिणीच्या तोंडातील गुलाबजामावरील मुंगीचा पदन्यास(डान्स) दिघे काकूंच्या जाऊ बाईंचा आहेरातील साडी न आवडल्याने निषेधार्थ झालेला चेहरा.

हे सगळे फोटो काढणं झाल्यावर तिने पुन्हा तिचा मोर्चा वळवला मुख्य कार्यक्रमाकडे. तिथे फोटोग्राफर फोटो काढत होता. दिघे काकू आणि त्यांची बहीण 'कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या' असं म्हणत बाळाला एकमेकींच्या हातात कधी पाळण्यावरून तर कधी पाळण्याखालून देत होत्या. फोटो ग्राफर सारखा त्यांना पोज देण्यासाठी थांबवत होता. त्या हातात बाळ आणि चेहरा फोटोग्राफर कडे अश्या अवस्थेत उभ्या होत्या.

तेवढ्या वेळात दिघे काकूंच्या वंसं नी बाळाची आठवण काढली. ठमीला वाटलं वेळ आहे बायका तशाही नुसत्या उभ्याच आहे त्यामुळे तिने अलगद बाळाला उचलून त्या वंसं कडे दिलं आणि ह्या उभ्या असलेल्या बायकांची ओंजळ रिकामी राहू नये म्हणून त्यात पाळण्याखाली असलेला एक वरवंटा ठेवून दिला.

एवढं सगळं करेपर्यंत बायका उभ्या त्या उभ्याच आणि वरून फोटोग्राफर चं आपलं सुरूच थोडी मान खाली करा थोडं डोकं मागे करा थोडी नजर तिरकी करा थोडी मान खाली घालून डोळे वर करा.

हे सगळं झाल्यावर त्याने फोटो काढले आणि तेव्हा कुठे त्या बायकांचं स्वतः च्या हाताकडे लक्ष गेलं.

"अई बाई! बाळ कुठे गेलं गं आणि हातात वरवंटा कसा आला?"

"अहो फोटो काढायला एवढा वेळ लागला की बाळ रांगायला सुद्धा लागला तो बघा तिथे", असं म्हणत ठमीने बाळ ज्या नातेवाईकांच्या हातात होतं तिथे अंगुलीनिर्देश केला."

"फोटोग्राफर काका आता जरा तुम्ही रेस्ट करा बाकीचे फोटो मी घेते. फोटोग्राफर ला वाटलं एवढं ही म्हणतेय तर काढू द्यावे चार दोन फोटो.

ठमीने बरेच फोटो काढले पण शेवटी जे व्हायचं तेच झालं.

तिच्या कॅन्डीड फोटोग्राफीने दिघे काकू आणि फॅमिली फार म्हणजे फारच नाराज झाले.

त्याचं झालं असं की बाळाचे क्लोजप फोटो काढण्याच्या भानगडीत तिने बाळाला मांडीवर घेतलेल्या व्यक्तींचे मुंडकेच उडवून टाकले(फोटोत) आणि फक्त धडाचेच फोटो घेतले. त्यामुळे कोण कोणत्या फोटोत कुठे होतं ते कळणं कठीण झालं होतं.

मग दिघे काकूंच्या घरी ते एकमेकांना सांगू लागले,
हे बघ हे मामा त्यांनी तपकिरी रंगाचा झब्बा घातला नव्हता का! म्हणजे हेच असतील तुझे मामा(दिघे काकूंचा मुलगा सुहास त्याच्या बायकोला समजावत होता)

"अरे सुहास! आत्या कुठे आहे रे ह्या फोटोत? नेमकी ओळखू येत नाही रे ! माझी आणि वंसंचि साडी नेमकी एकाच रंगाची असल्याने ओळखू येत नाही मी कोणती आणि त्या कोणत्या ते?",दिघे काकू त्यांच्या मुलाला म्हणाल्या.

"आणा इकडे तो फोटो! मी चुटकीसरशी शोधतो",दिघे काका म्हणाले.

चार सेकंद फोटो बघून ते म्हणाले," गीतू ताई तर माहीत नाही पण तू कुठे आहे हे मी ओळखलं. डावीकडून तिसऱ्या नंबरच्या आपण आहात दंडाधिकारी!"

"हे कसं काय ओळखलं तुम्ही एवढ्या लवकर बाबा",त्यांचा मुलगा म्हणाला.

"अरे हे तर काहीच नाही अजून एखादा जरी मोठा बिन डोक्याचा(डोके नसलेला फक्त धडाचा) ग्रूप फोटो जर तू मला दिला न त्यातूनही मी तुझ्या आईला अचूक ओळखून दाखवतो."

"कसं काय?"

"अरे आमच्या दंडाधिकारी (स्वतःच्या दंडावर थाप मारत)आहेत त्या, त्यांना मी ओळखणार नाही तर कोण?", दिघे काका हसत म्हणाले.

सुहास ने आईकडे बघितले आणि त्याला बाबांनी म्हंटलेले कळले. तेवढ्यात दिघे काकू तावातावातावाने दिघे काकांना म्हणाल्या "आहेत माझे जरा पिळदार बायसेप म्हणून लगेच असं काही बोलायची गरज नाही"

पुढचे फोटो ते सगळे बघू लागले आणि सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. काही फोटोत बाळाचा क्लोजप फोटो काढण्याच्या भानगडीत ज्याने त्याला मांडीवर घेतले त्यांचे डोके ठमीने उडवले होते.

आणि जे फोटो पोज द्यायला लावून लावून फोटोग्राफर ने काढले होते त्यात बायकांच्या हातात वरवंटा आला होता. फोटोग्राफर सुद्धा जणू ठमी चा भाऊ च होता त्याने पोज द्यायला लावण्याच्या नादात हातात बाळ नसून वरवंटा आहे हे बघितलेच नाही

एवढ्याने भागलं असतं तर मग काय पाहिजे होतं पण नाही ठमी एवढं करून थांबली नाही, तिने सगळ्यांचा मस्त विडिओ काढला आणि त्यामुळे एकमेकांच्या पाठीमागे नातेवाईक कसे एक्सप्रेशन्स देतात हे एकुण एकाला कळून चुकलं आणि फारच गैरसमज झाले.

ठमीच्या आईला म्हणजे माझ्या आत्याला ठमीचे प्रताप जेव्हा दिघे काकूंनी सांगितले तेव्हा तर तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

ठमी,आत्या घरी आल्यावर तिला म्हणाली,

"आई! एव्हढावेळ काय बोलत होत्या गं दिघे काकू?अजून एखाद्या कार्यक्रमाचे फोटो काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय का दिघे काकूंनी ह्या ठमीला?"

आत्याने डोक्यावर हात मारून घेतला.

तर अशी आहे आमची ठमी
नाही कोणापेक्षा कमी
हमखास गोंधळाची हमी
अशी आहे करामती ठमी
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED