ठमीला आजकाल नवाच छंद लागला तो म्हणजे रियालिटी शो बघणे. आधी ठमी फक्त जाहिराती बघत असे. बाकी मालिकांशी तिला काही देणं घेणं नसे पण आजकाल जाहिरातींपेक्षा तिचे लक्ष वेगवेगळ्या रियालिटी शोज कडे वळलं होतं. मग नृत्याचा रियालिटी शो असो की गायनाचा, अभिनयाचा रियालिटी शो असो की विनोदाचा झाडून सगळ्या चॅनल्स वरचे रियालिटी शोज ठमी शांतपणे मांडी घालून एका हातावर हनुवटी टेकवून एकाग्र चित्ताने बघू लागली.
तिचा हा एकाग्र पणा बघून तिच्या आजी-आजोबा व आई-बाबा ह्यांच्या हृदयात धडकी भरू लागली.
तिचे आजोबा तर तिच्या आजीला म्हणाले सुद्धा, "पोरीने असा एकाग्रतेने अभ्यास केला तर कुठल्या कुठे जाईल." त्यावर तिची आजी म्हणे," हो न! पण मला वाटते लवकरच ही आपल्याला कुठल्या कुठे पळायला लावणार हे नक्की! आता बघाच तुम्ही!"
आणि तिच्या आजीचं झालं अगदी खरं! योगायोग पहा कसा झाला की आमच्या गावी 'मराठी सुपरस्टार करेल बेडा पार' नावाचा रियालिटी शो आयोजित करण्यात आला होता. त्यात तीन वयोगटातील व्यक्ती भाग घेऊ शकत होत्या.
एक म्हणजे वय वर्षे पाच ते बारा
दुसऱ्या ग्रुपमध्ये वय वर्षे 13 ते 19
आणि तिसऱ्या वयोगटात 20 ते 30
त्यापैकी ठमी वय वर्षे आठ असल्याने तिने पहिल्या ग्रुपमधून भाग घेतला. त्यात डान्स,गायन, मिमिक्री आणि अभिनय ह्यापैकी जेही कौशल्य तुमच्यात असेल ते दाखवायचे होते.
ठमी तर सर्वगुणसंपन्न असल्याने तिने सगळं च मला येते हे सांगून टाकलं. पण झालं काय की सहजच डान्स,गायन मिमिक्री आणि अभिनयाचे जजेस भाग घेतलेल्या मुलांची यादी चाळत होते त्यात सगळ्या स्पर्धांच्या यादीत ठमीचे ठळक नाव बघून त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला.
गानू सरांनी जे गायन स्पर्धेचे जज होते त्यांनी ठमीने त्यांच्या घरातील तबल्याची जी अवस्था केली होती तो पूर्वानुभव आठवून कानाला खडा लावला.
शास्त्रीय मॅडम व पाश्चात्ये मॅडम द्वयीची दातखीळ बसली त्यांना ग्रास हॉप स्टाईल हिप हॉप करणारी ठमी डोळ्यासमोर तरळली.
ठमीच्या स्नेहसंमेलनात जे सर मिमिक्री जज करत होते तेच ह्याही स्पर्धेत जज असल्याने त्यांनी ठमी मिमिक्री करत असेल तर मी हा पळून चाललो असे निक्षून सांगितलं.
अभिनयाचे जे जज सर होते ते मात्र ह्या सगळ्यांनी असा का पवित्रा घेतला त्याबद्दल अनभिज्ञ होते.
त्यामुळं सर्वानुमते असे ठरले की आपण ठमीने पोळलो आहे आता पोळायचे बाकी जे राहिलेले अभिनय स्पर्धेचे जज हावभावे सर आहे त्यांना एकदा मनसोक्त पोळू द्यावं म्हणजेच ठमीला आता फक्त अभिनय स्पर्धेतच एन्ट्री द्यावी. पण हे ठमीला सांगणार कोण? मग ही जबाबदारी धडाडीच्या अँकर सुहासिनी बडबडे ह्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी ठमीला बोलावलं व सांगितलं,
"ठमीss बाळsss ",त्यांनी आवाज दिला
त्यावर ठमीने सुद्धा त्यांच्याच प्रमाणे, "ओ ssss",असा प्रतिसाद दिला.
"हे बघ बाळा तू मल्टी टॅलेंटेड आहे हे आम्हास माहीत आहे. तू छान गायन करते,डान्स करते तसेच मिमिक्री सुद्धा करते",त्या हे म्हणत असताना ठमीने फुशारून आम्हा सगळ्यांकडे बघितलं. पुढे बडबडे मॅडम म्हणाल्या," पण आम्ही तुझा अभिनय बघितलाच नाही तेव्हा ह्या 'मराठी सुपरस्टार करेल बेडा पार' ह्या स्पर्धेत तू फक्त अभिनयच कर हं बाळा!"
मॅडम ने सारख बाळा म्हंटल्यामुळे ठमीचा कंठ दाटून आला आणि तिने भावनेच्या भरात मॅडमचे म्हणणे ऐकले. आणि मॅडम नि निश्वास सोडला.
झालं दुसऱ्यादिवशी स्पर्धेच्या वेळेत सगळे सहभागी विद्यार्थी कार्यक्रमात हजर झाले. दोन चार जणांचे परफॉर्मन्स झाले. कोणी नृत्य सादर केले. कोणी गायन केले. त्यानंतर ठमीचे नाव पुकारण्यात आले. ठमी तिचे भारदस्त पावलं टाकत स्टेजवर पोचली. ठमीने आग्रहाने तिच्या आईबाबांना कार्यक्रम बघायला बोलावले होते. मी सुद्धा माझ्या आत्याच्या बाजूला प्रेक्षकांमध्ये बसली होती. मी काही भाग घेतला नव्हता पण ठमीच्या आग्रहास्तव मी व आमच्या काही मैत्रीणी तिला चिअर अप करायला प्रेक्षकांमध्ये बसलो होतो.
"ठमी बेटा! आता तू काय सादर करणारेस?",अँकर बडबडे म्हणाल्या.
"मी अभिनय सादर करणार आहे. अभिनयातील नवरस मी सादर करणार आहे मॅडम! ",ठमीने असे म्हणतात सगळे अचंबित झाले. हावभावें सर तर काहींच्या काही प्रभावित झाले.
पण एवढ्या सगळ्या प्रभावित आणि अचंबित चेहऱ्यांमध्ये दोन चेहरे घाबरलेले होते आणि सारखे घाम पुसत होते. ते चेहरे म्हणजे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असतील. ठमीचे आई आणि बाबा.
आता ही काय सादर करते बापा! ह्याचा विचार करकरून त्यांना टेन्शन आलं.
"ठीक आहे तर ठमी सुरू कर तुझा अभिनय!",हावभावें सर म्हणाले.
"त्याआधी मला दोन शब्द इथे जमलेल्या प्रेक्षकांशी बोलायचे आहे.",तिने असे म्हणताच "अर्यो भापरे!",असं काही ओळखीच्या प्रेक्षकांना वाटून त्यांच्या पोटात गोळाच आला.
ठमीने माईक घेतला. आणि ती बोलू लागली. तिने मला आधीच सांगितलं होतं की मी जेव्हा बोलायला लागेल तेव्हा टेपरेकॉर्डर स्टेजवरच्या टेबलवर ऑन करून ठेवायचा. मी अगदी त्याप्रमाणे करून पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसून गेली. टेपरेकॉर्डर मधून एक सॅड ट्यून वाजू लागली. त्या बॅकग्राऊंड वर ठमीने घसा खाकरला आणि बोलण्यास सुरुवात केली.
"प्रेक्षकांनो! आज मी जिथे आहे तिथे पोचण्यास मला खूप मोठा पल्ला गाठून यावं लागलं आहे.",तिने असं म्हणताच माझ्या बाजूला बसलेल्या सुमीने विचारलं,
"का गं! आज काय तुम्ही लॉंग कट ने आले का? आम्ही तर घरून पाच मिनिटात येऊन पोचलो इथे."
"शू ss", तेवढ्यात पलीकडे बसलेल्या एक काकू म्हणाल्या. सुमी गप्प बसली. आम्ही ठमिकडे लक्ष वळवलं.
"आज जे काही यश मला मिळालंय ह्यात फक्त आणि फक्त माझ्या आईबाबांचा हात आहे(असं म्हणताना तिने तिचा हात उंचावला) त्यांनी.... त्यांनी......",असं म्हणून डाव्या हाताने पटकन ठमीने टेपरेकॉर्डर चा आवाज थोडा वाढवला आणि एकाएकी हमसाहमशी रडू लागली.
प्रेक्षकांमध्ये सगळ्यांना गहिवरून आलं. ठमीच्या आई बाबांनी श्वास रोखून धरला. थोडं रडून झाल्यावर ठमीने जवळचा लांबच लांब रुमाल काढला आणि डोळे पुसले.
"बोल बाळा! पुढे बोल",हावभावें सर सुद्धा सद्गदित झाले होते. ठमीने लगेच टेपरेकॉर्डर चा आवाज थोडा कमी केला आणि पुढे बोलणं सुरू केलं. माझ्या आई बाबांनी मोठा त्याग करून, खूप खस्ता खाऊन(असं म्हणताना ठमी खाण्याचा अभिनय करत होती),वेळ पडेल तेव्हा पोटाला चिमटा घेऊन(तिने पोटाला चिमटा घेण्याचा अभिनय केला) त्यांनी मला ह्या पोजिशन वर आणलं आहे",असं म्हणून ठमीने पुन्हा तिची रडण्याची सनई सुरू केली.
तेवढ्यात पुन्हा सुमी बडबडली,"का गं! एकट्या एकट्याच खाता बाई तुम्ही खस्ता! मला का नाही बोलावलं?",यावर मी काही बोलणार तेवढ्यात शेजारच्या काकूंनी पुन्हा "शू ss गप्प बसा हं",असा नाकात आवाज काढून म्हंटल.
ठमीला असं रडताना बघून तिचे बाबा मधून मधून रुमालाने डोळे पुसू लागले. तेव्हा ठमीची आई म्हणजे माझी आत्या त्यांना म्हणाली,"अहो रडताय काय! आपण खरंच असं सगळं केलंय का ठमीला वाढवताना?"
"नाही गं आपण काहीच नाही केलं! ती आपोआपच एवढी वाढली. म्हणजे मी तर काहीच केलं नाही. तूच तिला खाण्याचा आग्रह करकरून एवढं वाढवलं. पण पोर एवढी धाय मोकलून रडतेय म्हंटल्यावर मला राहवल्या गेलं नाही.",ठमीचे बाबा कपाळाला हात लावणाऱ्या ठमीच्या आईकडे बघत,नाक पुसत म्हणाले.
"बरं बेटा! शांत हो! आता तू अभिनयातले नवरस सादर करणार होतीस ते कर पाहू.",अँकर मॅडम म्हणाल्या.
त्यांनी असं म्हणताच ठमीने टेपरेकॉर्डर वगैरे सगळं लगबगीने आवरलं आणि बॅग मधून नऊ फलक काढले.
"आता ह्या ठिकाणी मी सादर करणार आहे अभिनयातील नवरस! तर पहिला रस आहे वीर रस", असं म्हणून तिने एक तलवार हातात घेतली आणि दात ओठ खात टेबलाभोवती गोल फिरून लढण्याचा अभिनय करू लागली.
हावभावें सरांना फार कौतुक वाटले. मिनिटभर ते करून झाल्यावर ठमी म्हणाली,
"आता रौद्र रस!",असं म्हणून ठमीने तांडव सुरु केला. तो बघून सगळ्यांना आता आपलं हृदय बंद पडते की काय असं वाटू लागलं.
"कोणीतरी आवरा रे त्या रौद्र रसाला!",प्रेक्षकांमधून कोणीतरी काकुळतेने विव्हळलं.
शेवटी ठमीला जेव्हा स्टेज कमी पडू लागला तेव्हा अँकर मॅडम ने तिला आवरलं.
"आता वात्सल्य रस! हा रस मी स्वतः इन्व्हेंट केला आहे बरं का!",असं म्हणून ठमीने बॅग मधून एक बाहुली काढून तिला मोठ्या वात्सल्याने अंगाई गाऊन दाखवली. तिची अंगाई एवढी वात्सल्याने ओतप्रोत भरली होती की काही प्रेक्षकांना झोप लागून ते चक्क घोरू लागले.
त्यानंतर ठमी म्हणाली,"आता भय रस!",असं म्हणून ठमीने खूप प्रयत्न करून भयानक चेहरा करण्याचा प्रयत्न केला पण तो इतका विनोदी दिसत होता की सगळ्यांची हसून पुरेवाट झाली.
"आता हास्य रस!",असं म्हणून ठमीने काही प्राण्यांचे आवाज काही वाद्यांचे आवाज आणि काही मर्कट चाळे करून दाखवले पण कोणीही हसले नाही. काही तिने जोक्स पण सांगितले. जोक मध्ये कुठे हसायचं हे सुद्धा तिने सांगितलं पण तरीही काहिकेल्या कोणालाही हसायला आले नाही तेव्हा तिने पिच्छा सोडला आणि स्वतःच गडगडाटी हसून पुढच्या रसाकडे मोर्चा वळवला.
"आता अद्भुत रस!",असं म्हणून ठमीने सगळ्यांना डोळे बंद करायला सांगून सगळ्या जजेस जवळच्या ज्यूस च्या बाटल्या गायब करून दाखवल्या तसेच काही प्रेक्षकांजवळचे वेफर्स चे पाकिटं सुद्धा गायब करून दाखवले. डोळे उघडल्यावर सगळे हा अद्भुत प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले.
"आता बिभत्स रस!",असं म्हणून ठमीने एका बरणीतून झुरळं काढले आणि स्टेजवर सोडून दिले. किळस आल्याचा अभिनय केला.
ई sss सगळेजण किंचाळले. अँकर मॅडम जोरजोरात पाय झटकत ओरडू लागल्या. सगळे जज आपापल्या खुर्च्यांवर पाय गोळा करून बसले. सगळ्यांना पुरेशी किळस आलेली पाहताच ठमीने एका छोट्या रिमोट ने सगळे झुरळं गोळा करून पुन्हा बरणीत टाकले. जेव्हा सगळ्यांना कळलं की ते खोटे झुरळं होते तेव्हा त्यांना हायसं वाटलं. म्हणूनच काल कुमीच्या जपानला राहणाऱ्या मामांनी तिला पाठवलेलं हे झुरळाचे खेळणे ठमीने तिच्या मागे लागून लागून आजच्या एक दिवसासाठी मागून घेतले होते.
नंतर ठमी म्हणाली,"आता करूण रस!",असं म्हणून ठमीने जे भोकाड पसरलं की सगळे त्या आवाजाने भीतीने थरथरू लागले. काय करावं काय करावं ठमीला कसं शांत करावं अश्या विचारात सगळे असताना अचानक बडबडे मॅडम ला एक आयडिया सुचली. त्यांनी लगेच आपल्या पर्स मधून एक चॉकलेट ठमीला काढून दिलं. ते पाहून ठमी ने करुण रस आवरता घेतला.
त्या नंतर ठमी म्हणाली,"आता शांत रस!",असं म्हणून तिने बॅगमधून एक देवाचा फोटो काढला आणि त्याची गंध लावून मनोभावे पूजा करून एक जपमाळ घेतली आणि सुखासनात बसून ती जप करू लागली.
काहीवेळाने जेव्हा जजेस व प्रेक्षकांना तिच्या शांत रसातील शांतता जीवघेणी होऊन ते चुळबुळ करू लागले तेव्हा तिने सगळं आवरतं घेतलं व पुढच्या रसाकडे वळली.
"आता नववा आणि शेवटचा रस म्हणजे शृंगार रस!",असे तिने म्हणताच अनेकांचे धाबे दणाणले. तिने सगळ्यांना डोळे मिटण्यास सांगितले. त्यानंतर थोडावेळ काहीतरी आवाज आला आणि तिने सगळ्यांना डोळे उघडण्यास सांगितले.
आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं दृश्य हे खालीलप्रमाणे होतं.
ठमीने डोक्याला लांब लचक गंगावण लावलं होतं. आणि ती एका लाकडी पेटीतील आरश्यासमोर बसून पावडर,टिकली,मस्कारा वगैरे लावून मेकअप करीत होती. आणि त्या लाकडी पेटीवर ठळक अक्षरात लिहिलं होतं 'शृंगार पेटी'. म्हणूनच काल ठमीने तिच्या आजीच्या नकळत तिच्या जुन्या कपाटातून ही पेटी हस्तगत केली होती.
मेकअप झाल्यावर घाईने ठमी म्हणाली,"आता सरते शेवटी नवरसांची आपण रेकॅप पाहू असे म्हणून तिने बॅगमधून नऊ ग्लास टेबलावर मांडले त्यात जवळ ठेवलेल्या थर्मास मधून कुठला तरी द्रव पदार्थ.... हां आत्ता आठवलं कार्यक्रमाला येताना तिने रसवंती वाल्याला "बरोब्बर नऊ ग्लास भरके देवो भाई", असं म्हंटलेलं मी ऐकलं होतं. तोच उसाचा रस तिने त्या नऊ पेल्यात ओतला आणि प्रत्येक पेल्याजवळ नऊ रसांचे नावे असलेले फलक लावून टाकले.
एवढं केल्यावर एकदा आरश्यात आणि एकदा परिक्षकांकडे व प्रेक्षकांकडे बघत ठमी अगदी गोड आवाजात म्हणाली,"कसे वाटले माझ्या अभिनयाचे नवरस?"
ते ऐकून आणि बघून सगळेजण एकदम शॉक मध्ये गेले. एकेका प्रेक्षकाला (तिच्या आई वडिलांसह) त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी हाताला धरून त्यांच्या त्यांच्या वाहनापर्यंत सिक्युरिटी गार्ड ला पोचवावे लागले. परीक्षक हावभावें सरांची अवस्था फार बिकट होती गेल्या पंधरवाड्यापासून ते कोमात आहेत आणि मधून मधून 'ठमी' 'नवरस' 'नको' असं म्हणत झटके आल्यासारखे ते मधूनच उठून बसतात आणि 'आssss' असे ओरडत पुन्हा झोपी जातात.
हा सगळा हलकल्लोळ झाल्यावर काही दिवसांनी मी ठमीला तिच्या कार्यक्रमात रडण्याबद्दल आणि नवरसांबद्दल विचारलं तर ती मलाच रागावून म्हणाली,
"अगं खुळे! रियालिटी शो काय कधी रडण्याशिवाय होतो होय? आणि नवरसांचे म्हणशील तर माझी कित्येक वर्षांची तपस्या मी ती सादर करण्यास पणाला लावली त्याबद्दल असं एक दोन वाक्यात कसं काय सांगता येईल?",असं म्हणत असताना तिचा झालेला गंभीर चेहरा पाहून कार्यक्रमात तिची आठ वर्षांची तपस्या चांगलीच फळाला आली असून त्यामुळे सगळ्यांचाच कसा बेडा पार झाला आणि जगाला दहावा वात्सल्य रस सुद्धा कसा मिळाला हे तिला सांगायचा मोह मला आवरावा लागला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★