Karamati Thami - 5 books and stories free download online pdf in Marathi

करामती ठमी - 5 - ठमीचे मॉडर्न आर्ट पेंटिंग

एकदा आमच्या शाळे तर्फे एका मॉडर्न आर्ट पेंटिंग प्रदर्शनाला आम्ही सगळे शाळेचे विद्यार्थी आमच्या वर्गशिक्षकांसोबत गेलो होतो. सगळे जण एका रांगेत आम्ही जात होतो.

"ऐ ढकलू नको गं मला,ती समोरची मुलगी भराभर चालत नाही त्याला मी काय करू? मला ढकलशील तर आपण सगळ्याच पडू मग मॉडर्न आर्ट राहील बाजूला ",ठमी अखंड बडबडत होती.

"बरं बरं! मॉडर्न आर्ट पेंटिंग माहिती आहे का काय आहे ते!",मी विचारलं

"हॅ! अगं अशी एक तरी गोष्ट आहे का जगात जी मला माहित नसेल? मला सगळं माहिती आहे!",ठमी तिरपं हसत खांदे उडवत म्हणाली.

"मग सांग न!",मी

"ते आपलं म्हणजे हे पहा मॉडर्न आर्ट पेंटिंग म्हणजे....ते मी तुला सांगितलं असतं पण मग त्यात मजा नाही. आपण प्रदर्शनात जाणारच आहोत न मग तेव्हाच बघण्यात मजा आहे. आता मी सांगितलं तर तुला पेंटिंग बघण्यात इंटरेस्ट वाटणार नाही म्हणून मी सांगत नाही बाकी काही नाही",ठमी फुशारक्या मारत म्हणाली.

हळूहळू आम्ही प्रदर्शन असलेल्या मोठया हॉल मध्ये पोचलो.

सगळीकडे भिंतींवर खूप वेगवेगळे चित्रं लावले होते.

आम्हाला पहिल्या चित्रा पासून सुरुवात करायची होती. डावीकडून उजवीकडे जायचं होतं. पाहिलं चित्र मोठ्या कॅनव्हास वर एक लोण्याने भरलेलं मडकं आणि त्याच्या बाजूला एक सुंदर बासरी जिच्या टोकाला लोणी लागलेलं होतं.

त्या चित्राकडे बघून ठमी सरांना म्हणाली,
"सर कृष्ण कुठे गेला? बासरी विसरून कसा काय गेला तो?"

"बेटा बासरी म्हणजेच कृष्ण आहे. बासरी हे कृष्णाचेच प्रतीक आहे न म्हणून त्याचित्रात बासरीच आहे"

आणखी काही चित्रांत तसंच होतं कृष्णा ऐवजी बासरीच दाखवली होती. कालिया मर्दन चे पेंटिंग आणि त्याच्या डोक्यावर बासरी, गोवर्धन पर्वत आणि त्याच्या खाली बासरी असे सगळे पेंटिंग होते.

ते बघून पुन्हा ठमीने सरांना अत्यंत गंभीरपणे म्हंटल,"सर तुम्ही म्हणता ते बरोबरच असेल पण मला वाटते ते लांब केसांचे पेंटर आहेत न त्यांना बहुतेक कृष्णाचं चित्र काढणं जमत नसावं! सगळ्याच चित्रात बासरी आहे हो कृष्णाऐवजी"

ठमीचा गंभीर अविर्भाव बघून सर हसू दाबत लांब पळून गेले. ठमीला कळेचना सरांना एवढं हसण्यासारखं काय झालं ते. नंतर इतकावेळ बाजूला उभं राहून आमचं संभाषण ऐकणाऱ्या मॅडम आमच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या.
"ठमी बाळ! त्याला अँबस्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट पेंटिंग म्हणतात. म्हणजे बऱ्याच बाबी रूपकात्मक असतात. जसे कृष्णा ऐवजी बासरी शबरी ऐवजी बोरे अश्या तर्हेने आणि त्यांना पेंटर म्हणत नसतात बाळ! आर्टिस्ट म्हणायचं कळलं.

पुढचं चित्र द्रौपदी वस्त्रहरण याच होतं त्यात दोन हात जोडलेले आणि त्यातून मोठ्ठा लांब पदर काढला होता आणि त्या पदरचे दुसऱ्या टोकाला एक सुदर्शन चक्र काढलं होतं.
ते सगळे चित्र बघून मला ठमीचंच खरं वाटू लागलं. नक्कीच यांना चित्र काढता आलं नसेल म्हणून काहीतरी अबस्ट्रॅक्ट नाव दिलं असेल. ठमी ला मात्र मॅडम चं पटलेलं दिसत होतं कारण ती प्रत्येक चित्र नीट निरखून बघत होती. आम्हा सगळ्यांचं दोनदा सगळे चित्र बघून झाले तरी ठमी चे अर्धे सुद्धा चित्र बघणं झालं नव्हतं.

प्रत्येक चित्र ती बराच वेळ बघत होती. मॅडम ठमिकडे कौतुकाने बघत होत्या कारण त्यांना माहीत नव्हतं की ही पुढच्या धोक्याची नांदी होती. मला ठमीची भीती वाटू लागली. नक्की ठमी ह्याचा प्रयोग करणार आणि सरतेशेवटी बोलणे खाणार. आणि नंतर झालंही अगदी तसंच.

दुसऱ्याच दिवशी तिने तिच्या बाबांकरवी पेंटिंग चं सामान मागवून घेतलं. कॅनव्हास पेपर्स उंच स्टँड कलर्स ब्रश सगळं जमवून ती तासन्तास गहन विचारात गढलेली दिसे आणि मधूनच ब्रश ने पुढच्या कॅनव्हास वर फराटा मारे. आम्ही बघायला गेलो की
"थांबा थांबा सध्या नका बघू ते सरप्राईज आहे असं म्हणून आम्हाला लांबच थांबायला सांगे.

त्या दिवशी शाळेचा शेवटचा दिवस होता म्हणजे तसा शेवटचा नव्हे, दुसऱ्या दिवशीपासून आम्हाला दिवाळीची सुट्टी लागणार होती. त्यामुळे चित्रकलेच्या बाईंनी आम्हांला वर्गात बरेच चित्र काढायला विषय दिले होते. शाळा संपायच्या आत आम्हाला ते पूर्ण करायचे होते.

"चला मुलींनो आता तुम्हाला तीन चित्रे काढून पूर्ण करायची आहेत.
1 म्हणजे दिवाळी
2 म्हणजे रंगपंचमी
आणि तिसरे चित्र तुम्हाला पहाटेचे निसर्गचित्र काढायचे आहे त्यात सूर्योदय नदी नाव नावाडी झाडं डोंगर पक्षी मंदिर असं सगळं आलं पाहिजे.

चला काढा चित्र मी येतेच थोड्या वेळात असं म्हणून वर्गाबाहेर पडल्या(गेल्या)

"ऐ मला डिस्टर्ब करू नका बरं आर्टिस्ट ला शांतता हवी असते. एक महान आर्टिस्ट तुमच्या सोबत शिकतेय हे विसरू नका",ठमी पहिल्या बेंच वरून मागच्या बेंचवर सगळं रंगकामचं साहित्य नेत म्हणाली.

आम्ही आज्ञाधारकपणे माना डोलावल्या. आम्हा सगळ्या मुलींची मने आणि डोळे त्या महान आर्टिस्ट च्या कौतुकाने आणि अभिमानाने ओसंडून वाहत होते.

थोड्यावेळाने बाई परतल्या.

"चला झालं का मुलींनो "

"हो sss",आम्ही एकसुरात ओरडलो.

ठमी मात्र अजूनही काहीतरी काढतच होती. मॅडम तिच्याकडे कौतुकाने बघत होत्या. दहा मिनिटाने ठमी तीन पेंटिंग घेऊन पुढे आली.

तोपर्यंत मॅडम नी आमचे चित्र डोळ्या खालून घातले होते. ठमीचे चित्र सगळ्यात चांगलं असेलच अशी मला खात्री होती.

"आण बेटा ठमी तू काढलेले चित्र दाखव"

ठमी मोठ्या दिमाखात उठली आणि तिने तिन्ही चित्रे मॅडम च्या हातात दिले.

मॅडम नी पाहिलं चित्र बघितलं आणि लगेच त्यांनी जवळच्या भिंतीचा आधार घेतला. नंतर त्यांनी दुसरं चित्र बघितलं आणि त्यांना टेबलचा आधार घ्यावा लागला. तिसरं चित्र त्यांनी भीतभित बघितलं आणि त्या धाडकन खुर्चीवर कोसळल्या.

आम्ही भयभीत होऊन एकमेकींकडे बघू लागलो. ठमी मात्र निश्चल उभी होती.
'बघितलं किती प्रभावी आहेत माझे चित्रं', असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

थोड्यावेळाने एका मुलीने त्यांच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडल तेव्हा त्यांना शुद्ध आली.

"शुद्धीत आल्या आल्या त्या ओरडल्या,"ठमे काय आहे हे काय काढलं तू हे चित्रात",त्यांनी एक चित्र फडफडवले

त्या चित्रात ठमीने तीन चौकोन तीन चौकोनात तीन वर्तुळ आणि तीन चौकोना खाली एक वर्तुळ आणि त्या वर्तुळा खाली एक बहुतेक फराळाची ताटली असावी खाली दिवाळी असं लिहिलं होतं पण एवढे चौकोन वर्तुळ तिने का काढले होते कोणास ठाऊक?

"दिवाळीचे चित्र आहे न हे मग हे चौकोन वर्तुळ काय आहेत?",बाई खेकसल्या

ठमी शांतपणे सांगू लागली,"मॅडम ते तीन चौकोन म्हणजे आमच्या घरातील तीन खुर्च्या आहेत त्यात तीन वर्तुळ म्हणजे अनुक्रमे माझी आजी,बाबा आणि आई आहेत आणि त्या खालील वर्तुळ म्हणजे मी आहे."

"आणि त्या खालच्या वर्तुळा खाली आणखी एक ताटली सारखे दिसतेय त्यात काही पदार्थ असावेत दिवाळीचे आणि छोटी हातोडी सारखं काय दिसतेय त्यात?",मॅडम

"मॅडम तुम्ही बरोबर ओळखलं ती हतोडीच आहे ती पदार्थांची ताटली आहे त्यात अनारस्या जवळ मी एक हातोडी ठेवली आहे आमच्याकडे आईने अनारसे बनवले की सगळ्यांना अशी छोटी हातोडी लागतेच",तिने असं म्हणताच वर्गातून वेगवेगळ्या कोपऱ्यात दबक्या हसण्याचा आवाज येऊ लागला.

"शांत बसा मुलींनो",बाईंनी दरडावले पुढे त्या म्हणाल्या,"आणि हे वर्तुळ वर्तुळ का काढलेत?"

"ते रूपकात्मक आहेत मॅडम मी अबस्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट पेंटिंग केलंय. पहिला वर्तुळ म्हणजे मला रोज गोल लिम्लेट ची गोळी देणारी माझी आजी, दुसरा वर्तुळ म्हणजे माझे बाबा कारण माझी आजी त्यांना गोळ्या म्हणते. तिसरा वर्तुळ म्हणजे माझी आई कारण माझे बाबा आईला लाडू म्हणतात, आणि तिसरा वर्तुळ म्हणजे मी स्वतः कारण माझी आई मला गोलू म्हणते.",तिने असं एकेक गोष्टींचं स्पष्टीकरण देताच वर्गात हशा पिकला आणि बाईंनी डोक्याला हात मारून घेतला.

"बरं हे रंगपंचमी च्या चित्राचं काय ? फक्त एका आयताकृतीत तू चार काळे डॉट्स आणि बाहेर पाच डॉट्स काढलेत त्याचं काय?",मॅडम इरेला पेटल्या

"मॅडम ते सुद्धा मॉडर्न आर्ट आहे आयताकृतीतील चार डॉट्स म्हणजे घरात असलेले माझे आजोबा,आजी, आई आणि बाबा
आणि बाहेरचे पाच डॉट्स म्हणजे आम्ही पाच मैत्रिणी रंग खेळल्यावर आम्हा सगळ्यांचे चेहरे असेच दिसतात काळे, कोणीही ओळखायला येत नाही. एकदा तर मी समजून माझ्या बाबांच्याच हातावर आजीने लिम्लेट ची गोळी ठेवली होती. "

बाई आता मोठमोठ्याने निःश्वास सोडू लागल्या. ठमीच्या चित्रांनी त्या फारच प्रभावित झालेल्या दिसत होत्या.

"तिसऱ्या चित्रबद्दल सांगू का बाई?",ठमीने निरागसपणे विचारलं

मॅडम ने खुणेनेच नाही म्हणून सांगितले. तिसरं चित्र असं होतं

आकाशाच्या बाजूने एक केशरी टिम्ब(सूर्याचे रूपक) त्याच्या खाली चार तीन दोन असे एका खाली एक काळे ठिपके(पक्ष्यांचे रूपक) त्याच्या खाली तीन तपकिरी ठिपके.(डोंगराचे रूपक)

नदीच्या ठिकाणी एक निळा मोठा टिम्ब( नदीचे रूपक) त्यात काळे दोन टिम्ब( नाव आणि नावड्याचे रूपक) दोन हिरवे टिम्ब (झाडांचे रूपक)आणि कोपऱ्यात एक घंटा(मंदिराचे प्रतीक)

ते चित्र बघून मॅडमचा चेहरा कानात हजारो घंट्या एकत्र वाजल्यावर होतो अगदी तसा झाला.

त्यांनी आमच्या वर्गावर चित्रकला शिकवणं सोडून दिलं.

एवढं होऊनही ठमीची मॉडर्न आर्ट ची खुमखुमी सरली नाही.

तिने तिच्या घरच्या गच्चीवर एक प्रदर्शन भरवलं सगळ्या मैत्रिणी शेजारचे पाजारचे सगळ्यांना आमंत्रित केले. सगळे मोठ्या हौसेने प्रदर्शन बघायला आले. ठमीने एकेक चित्रावरचे आच्छादन दूर केले आणि सगळे आश्चर्यचकित झाले. कारण प्रदर्शनात ठेवलेल्या दहाही चित्रांवर हाताच्या पंजाचे चित्र काढले होते. फक्त रंग वेगवेगळे होते बस एवढंच.

तिला तिच्या बाबांनी विचारलं ठमे हे सगळ्या चित्रात हाताचे पंजे कसे काय?

"बरोबर आहे तुम्हाला अबस्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट माहीत नसेल न म्हणून प्रश्न पडणं साहजिक आहे बाबा! पहिला पंजा म्हणजे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे
दुसरा पंजा म्हणजे पंचप्राणांचे प्रतीक आहे
तिसऱ्या चित्रातील पंजा म्हणजे देवघरात जे पंचपाळं आहे त्याचं प्रतीक आहे.
चौथ्या चित्रातील पंजा म्हणजे आम्ही पाच मैत्रिणी आहोत न त्याचं प्रतीक आहे.
पाचवा पंजा तुम्ही मला दे टाळी म्हणता न त्याचं प्रतीक आहे
सहावा पंजा म्हणजे आपलं कॉलनीत कितव्या नंबरचे घर आहे हं बरोब्बर पाच ! त्याचं प्रतीक आहे

सातवा पंजा मी लिम्लेटच्या गोळीसाठी आजीसमोर हात करते त्याचं प्रतीक आहे

आठवा पंजा...

तिने एवढं संगेपर्यंत प्रदर्शनाला आलेले सगळे भिंतीचा आधार घेऊन जागा मिळेल तिथे हवालदिल होऊन बसून गेले.

आठवा पंजा आपल्या अंगणात फुलांच्या पाच कुंड्या आहेत त्याचं प्रतीक आहेत

नववा पंजा म्हणजे माझ्या कपाटाला पाच खाणे आहेत त्याचं प्रतीक आहे आणि हा शेवटचा पंजा म्हणजे आई मला धपाटा देते त्याचं प्रतीक आहे.

"ठमे आता तुझ्या त्या दहाव्या चित्रातील पंजा खरा होणार आहे पळ लवकर नाहीतर माझ्या धपाट्यांपासून आज काही तुझी धडकत नाही",आत्या तिच्या मागे चवताळून धावली.

ठमी धावत धावत येऊन आमच्या घरातल्या पलंगाखाली लपून बसली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED