चोरीचे रहस्य - भाग 2 Kalyani Deshpande द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चोरीचे रहस्य - भाग 2

सगळ्या फ्लॅट्समधील सदस्य ग्राउंड फ्लोअर ला कॉमन एरिया मध्ये जमले होते. तिथे जाता जाता पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली.

सगळ्यात आधी त्यांनी फर्स्ट फ्लोअर वरच्या फ्लॅट पासून म्हणजे माझ्या काकांपासून सुरुवात केली.

"आपलं नाव समजू शकेल का?",पोलीस

"मी जयवंत कल्याणी! ",काका

"तुम्ही कोणाला अपार्टमेंटमध्ये येताना जाताना बघितलं का ? कोणी संशयास्पद वगैरे?",पोलीस

"नाही आम्ही घरात होतो आणि दुपारची उन्हाची वेळ असल्याने कुलर सुरू होता त्यामुळे काहीच आवाज आला नाही.",काका

त्यानंतर त्यांनी 2nd फ्लोअर वरच्या श्री व सौ कुलकर्णींची चौकशी केली.

"हो तुमचं बरोबर आहे नेहमी ते आमच्याकडे किल्ली ठेवतात पण आज काही त्यांनी किल्ली ठेवली नाही. आणि आम्ही कोणालाही वर येताना बघितलं नाही",कुलकर्णी काकू

त्यानंतर त्यांनी सगळ्यात वर 4th फ्लोअर वर राहणाऱ्या भाले काकुंची चौकशी केली.
"हो मी खालून वर माझ्या घरात येताना जिन्यात एक इसम येताना बघितला होता त्याच्या हातात एक पार्सल होते मला वाटलं कोणी कुरिअर बॉय असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. बाकी मला काहीच आवाज ऐकू आला नाही.",भाले काकू

"ठीक आहे तुम्ही बघितलेल्या इसमाचे वर्णन करून सांगा हा आमचा स्केच काढणारा त्यानुसार त्या इसमाचे स्केच काढेल.",पोलीस

"बरं सांगा नाक कसं होतं?"
"पोपटासारखं!"
"डोळे कसे होते ?"
"घुबडासारखे"
"कान कसे होते?"
"माकडासारखे"
"अहो मॅडम पूर्ण प्राणिसंग्रहालय भरवता का इथे? जरा नीट सांगा. ह्या स्केच मुळेच पकडल्यागेला तर पकडल्या जाईल चोर",स्केच काढणारा

"बरं बरं आता मला जसं आठवते तसा मी नीट सांगण्याचा प्रयत्न करते.",भाले काकू

त्यानंतर भाले काकू वर्णन करू लागल्या आणि तो स्केच काढू लागला. तोपर्यंत पोलिसांनी अपार्टमेंटसमोरच्या दुकानाकडे मोर्चा वळवला.
"काहो ह्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये चोरी झालेली तुम्हाला माहीत असेलच नाही का?",पोलीस

"हो गर्दी बघून चौकशी केल्यावर कळलं मला. "

"तुम्ही कोणाला अडीच ते साडेतीन दरम्यान अपार्टमेंटमध्ये येताना बघितलं का?",

"हो साहेब! दुकानात दुपारच्या वेळेस जास्त गिर्हाईक नसतात त्यामुळे माझं लक्ष होतं. साधारण पांडे काका काकू बाहेर गेल्यावर अर्ध्या तासाने एक कळकटलेला शर्ट घातलेला इसम एक कळकटलेली थैली घेऊन आला होता.",दुकानदार

पोलीस इन्स्पेक्टरचे डोळे चमकले. त्यांनी पुढे विचारलं," तुम्ही त्याचं नीट वर्णन करून सांगू शकता का?"

"हो हो का नाही! मला स्पष्ट आठवतोय तो",दुकानदार

भाले काकूंनी सांगितलेल्या इसमाचे चित्र काढून झाल्यावर. चित्रकार दुकानदाराने वर्णन केलेल्या इसमाचे चित्र काढू लागला.
"राजेश हे स्केच काढणं झाल्यावर तू पोलीस ठाण्यात पोच तोपर्यंत मी जरा ह्या पांडेंकडे काम करणाऱ्या खंडूभाउ आणि सखूबईकडे चौकशी करून येतो.",पोलीस इंस्पे चित्रकाराला म्हणाले.

एक दोन दिवसांनी तपासाच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पांडे काका पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्यांच्यासोबत माझे काका सुद्धा गेले होते.
तिथून आल्यावर काकांनी जे सांगितलं त्यावरून मला कळलं की पोलिसांना तपासाअंती खंडूभाऊंकडे काहीच भेटले नाही तसेच मोलकर्णीकडे सुद्धा काहीच सापडलं नाही पण मोलकरणीने ती आजारी असल्याचं खोटं सांगितलं होतं. पोलिसांनी खंडूभाऊ आणि मोलकरणीला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. पोलिसांनी सर्वतोपरी खंडूभाऊ आणि मोलकरणीकडून खरं काढण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघंही आम्ही निर्दोष आहोत आणि आम्ही चोरी केली नाही असंच सांगत होते.

पांडे काकांच्या घरात सुद्धा त्यांना कोणताच क्लू, बोटांचे ठसे मिळाले नाही. पोलिसांची निराशा झाली.
दुकानदाराने सांगितलेल्या आणि भाले काकूंनी सांगितलेल्या इसमाचे स्केच घेऊन पोलिसांचा तपास सुरू होता.

एक दोन दिवसांनी पोलिसांनी एका इसमाला अपार्टमेंटमध्ये पकडून आणले. पोलिसांनी दुकानदाराला सुद्धा बोलावून घेतले.

"सांगा बरं त्यादिवशी आलेला इसम हाच होता का?",पोलीस इंस्पे

"हो हो साहेब हाच होता ह्याच्या डाव्या गालावरील चामखीळ मुळे मला हा चांगलाच लक्षात राहिला.",दुकानदार

"सांग रे कशाला आला होता तू इथे आणि कोणी बोलावलं होतं तुला?",पोलीस

सगळे कॉमन पॅसेज मध्ये जमले होते.
"मला एका मॅडम ने बोलावलं होतं साहेब! त्यांच्या कापटाची किल्ली हरवली होती म्हणून त्यांनी कापटाचे कुलूप तोडण्यासाठी मला बोलावलं होतं.",इसम

"तुझा काय लोकांचे कपाट तोडण्याचा धंदा आहे का?",पोलीस इंस्पे मोठ्या आवाजात म्हणाले.

"नाही साहेब! माझा डुप्लिकेट किल्ल्या बनवणे ह्याचा धंदा आहे. माझा काहीच दोष नाही साहेब घरमलकिणीने मला कपाट तोडायला सांगितलं म्हणून मी तोडलं",किल्लीवाला

"कोणत्या मजल्यावरच कपाट तोडलं तू?",पोलीस

"तिसऱ्या मजल्यावरच पांडेंकडंच",किल्लीवाला

"बाई बाई मी माझ्याकडचेच कपाट तुला का तोडायला लावीन? मी व माझे यजमान तर तेव्हा बाहेर गेलो होतो. हो किनई हो(पांडेंकाकांकडे बघत)",पांडे काकू आश्चर्याने किल्लीवाल्याला म्हणाल्या.

क्रमशः