यक्षिणी - भाग 3 Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

यक्षिणी - भाग 3



आता त्यांचं भेटणं रोजचं होऊन जाते. तिलाही मन मोकळे करण्यासाठी एक हक्काची जागा मिळते आणि तो रस्ताही तसा जास्त वर्दळीचा नसल्यानं काही गर्दुल्ले सोडले तर कोणी त्यांच्या गप्पामध्ये येत नव्हते. तिथले गर्दुल्लेही हळू हळू "अपने जैसी कोई पागल है "असा मनात विचार करून दुर्लक्ष करत.

असेच दिवस चालले होते. मधेच एकदा भावाने येऊन थोडी आर्थिक मदत केलेली . त्यावर आणि नवऱ्याच्या पेन्शन वर घर कसेबसे तग धरून होते.

पुन्हा आपला धंदा सुरू व्हावा म्हणून तीही तिच्या परीने धडपडत होती.

आज ती नेहमीप्रमाणे ती धंद्याच्या ठिकाणी जाते तर तिथले दुकानदार पेढे हातात घेऊनच तिची वाट बघत असतात .


"अहो ताई एक आनंदाची बातमी आहे त्या भिमाला पोलीस पकडून घेऊन गेले त्याच्यावर कसली तरी केस होती .गुंडच ना शेवटी तो ! आता काही येत नाही बघा सात आठ वर्ष बाहेर . तुम्ही सुरू करा तुमचा धंदा उद्यापासून . आम्ही आहोत सगळे तुमच्याबरोबर .

तिला आकाश ठेंगणं होते. सर्वांचे आभार मानून घरी जाताना मात्र नेहमीसारखी आपल्या त्या झाडाजवळ थांबते आणि मनातलं आनंद त्याला सांगू लागते.

तिची खुशी बघून त्याच्या पानांची जोरात सळसळ होते. तिला एक कळतं की यालाही भावना आहेत यालाही आपला आनंद कळतोय .

घरी येते तर मुलं दारात उभी राहून तिची वाट पाहत असतात.
कधी नव्हे ते सासूबाई आज उठून बसलेल्या असतात.

आई, आता एक काका येऊन गेले. बाबांचे मित्र आहेत म्हणाले. त्यांनी हे पैसे दिले म्हणाले खूप वर्षापूर्वी बाबांनी त्यांना मदत केली होती. कुठून तरी त्यांच्या कानावर बाबांच्या निधनाची वार्ता गेली आणि आपल्याला हे पैसे परत करण्यासाठी आले होते.

ती मनोमन देवाचे आभार मानते.

ती सासूबाईंच्या कुशीत जाऊन खूप रडून घेते आणि आत्तापर्यंत घडलेल्या सगळा वृत्तांत त्यांना सांगते.

तिच्या बोलण्यात जेव्हा त्या झाडाचं नाव निघते त्यावेळी त्या सासूबाई तिला विचारतात "अग त्या शंकर मंदिराजवळ असणाऱ्या झाडाबद्दल बोलते आहेस का तू ? त्याला बारीक बारीक पांढरी फुले आहेत.तुला माहितीये का सुनबाई ते कोणतं झाड आहे???

सातवीनीचे झाड आहे ते..

थंडी पडायच्या आधी म्हणजे याच महिन्यात फुल येतात त्याला.
अगं आमच्या जमान्यातील माणसं याला 'यक्षिणीचे झाड ‘ असेही म्हणतात .त्यावर यक्षिणी राहते आणि ती भल्या माणसांना मदत करते.

तुलापण तिनेच मदत केली बर का !!

सासूबाईंचे बोलणे ती मनापासून ऐकते.. काहीही असो पण उद्या सकाळी लवकर जाऊन त्या झाडाचे आभार मानायचे ती ठरवते.

सकाळी लवकर उठते आणि कधी एकदा त्या झाडाची भेट किती असते तिला होतं.
तिथे पोहोचल्यानंतर तिला आजूबाजूला बरीच गर्दी दिसते. काय झालं असावं असा अंदाज बांधत आणि गर्दीतून वाट काढत ती पुढं जाते.

समोरचं दृश्य पाहून तिला धक्का बसतो.

म्युनिसिपालटीचे कामगार नेमकं तेच झाड तोडत होते. तिला डोळ्यावर विश्वास बसेना.
ती धावत जाऊन त्यांना थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करते. पण तिथले सुरक्षा रक्षक तिला हाकलून देतात.

तिथं उभ्या असणाऱ्या एका माणसाला ती रडत रडत विचारते.

"दादा का तोडतायेत हे झाड. "

"अहो ताई.. हे सप्तपर्णीचे झाड आहे आणि सरकारने फतवा काढला आहे की या झाडामुळे लोकांना श्वासाच्या समस्या होत आहेत. त्यामुळे ही झाडं तोडण्यात येत आहेत.
आम्हीही खूप प्रयत्न केला हे थांबवण्याचा पण सरकारी नियमापुढे आमचं काही चाललं नाही.
तिला कळतच नव्हते की ज्याने माझ्या दुःखात मला मायेची ऊब दिली. माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं ते झाड कसं कुणाच्या आरोग्यास हानिकारक असेल.

उघड्या डोळ्यांनी ती आपल्या जिवलगाचे मरण बघत हताश उभी राहण्याशिवाय काहीही करू शकली नाही.