सवत माझी लाडकी - भाग २ Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सवत माझी लाडकी - भाग २

"आदित्य भावोजी.. बोला.."

"आज मला कसा काय फोन केलात.. कसे आहात तुम्ही.."

"अहो वहिनी, शेखरचा फोन लागत नाही म्हणून तुम्हाला केला. निघाला का ऑफिसला जायला."

"कधीच गेले हे.."

"बाकी तुम्ही कसे आहात. ऑफिस काय म्हणतेय.."

"एकदम भारी चालू आहे बघा.. हल्लीच आमची नवीन बॉस आली आहे.. खूप को ऑपरेटिव्ह आहेत त्या मॅडम. राजेश तर त्यांचा एकदम फेवरेट झाला आहे आणि हो, तुमच्यात एरियात राहतात. राजेश काही बोलला नाही का.."

"हो हो बोलत होते एकदा पण मीच नीट ऐकलं नाही.."
तिनं सारवा सारव केली आणि थोड जुजबी बोलून फोन ठेऊन दिला..

आता मात्र शंकासुराने नुसतं डोकं नाही तर पुर्ण अंगच बाहेर काढलं..
आधी नुसती चुकचुकणारी शंकेची पाल आता मनात ठाणचं मांडून बसली.

तिनं मनोमन काहीतरी ठरवून स्वतःचीच पाठ थोपटली..

रात्री राजेश नेहमी सारखा घरी आल्यावर फ्रेश व्हायला गेला. ही संधी साधून तीनं गुपचूप त्याचा मोबाईल चेक केला. ऑफिस मधील बॉसची चॅटही बघितली. पण तिच्या पदरी घोर निराशा आली. तिला काहीही सापडलं नाही.

कधी त्याच्या कळत तर कधी नकळत रोज त्याचा मोबाईल साळसूद पणाचा आव आणून ती सावध गिरीने तपासू लागली.
हाय रे नशीब! दिवसेंदिवस तिच्या पदरी घोर निराशेशिवाय काहीही दान पडत नव्हते.

तरीही तिनं हार मानली नव्हती..

"अनु, आज मला यायला उशीर होईल. मी एका महत्वाच्या मीटिंग साठी बॉस बरोबर बाहेर जाणार आहे. तू जेवून झोपून जा. माझी वाट बघू नकोस. मी माझ्याकडील चवीने दार उघडेन.."

आजचा त्याचा एकंदरीत पेहराव बघून आणि ही बातमी ऐकून तर तिला खात्रीच वाटू लागली हा तिच्यात गुंतला आहे..

आज याचा पाठलाग करायचाच..

तो जसा बाहेर पडतो.. ती ही सुरक्षित अंतर ठेऊन त्याचा पाठलाग करते.

नेहमी सारखा स्टेशनच्या शेअर रिक्षात तो बसतो. तीही त्याच्या मागे लगेच दुसरी रिक्षा पकडते. त्याची रिक्षा तिच्या नजरेच्या टप्प्यात असते.

अचानक त्याची रिक्षा हायवे जवळ थांबते आणि तो तिथं उतरतो.
तिला धक्काच बसतो.. हे स्टेशन यायच्या आधीच का उतरले? ती पुढं जाऊन उतरते.

म्हणजे हा रोज तिच्या कार मधून जातो की काय.. आजकाल लवकर येतो.. सकाळी थोडा उशीरा जातो.. जास्त थकलेलही नसतो आजकाल..

आज याचा सोक्ष मोक्ष लावायचाच.. याला रंगे हाथ पकडायचा.. ती या विचारात त्याच्या पाठी अंतर ठेऊन चालली असतानाच तो अचानक वळतो..तिच्या मनात धडकी भरते. पण वळून तो रस्ता क्रॉस करु लागतो तीही तेच करते.

आणि अजून एक धक्का.. तो चक्क मेट्रो स्टेशन मधे प्रवेश करतो..

अरे.. हा कधी पासून मेट्रो ने जायला लागला..

आपल्याला कसं माहीत नाही..

आता तिला रहवात नाही.. लगबगीनं जात ती दत्त बनून त्याच्या पुढ्यात उभी राहते.

तिला अशी अचानक बघून तो ही बावचळतो..

"अनु.. तू काय करते इथ.."

तिला आधी रडायलाच येते.. त्याला काही समजत नाही. तिला गर्दीतून बाजूला घेत एका ठिकाणी बसवून पाणी देतो..

"काय झालं.. तू काय करतेस इथे.."

ती आतापर्यंतची सगळी हकीगत त्याला सांगते.. ती ऐकून तो मोठ मोठ्याने हसायला लागतो.

"अगं वेडी.. माझ्यातील हा सगळा बदल कोणी केला आहे माहितेय.. या मेट्रो ने.. ही आयुष्यात आली आणि माझं आयुष्यचं बदलून गेलं. येण्या जाण्याचा वेळ वाचू लागला. निवांत बसायला जागा मिळते मला तिच्यात. तो वेळ मी वाचनासाठी तर कधी आवडीचा सिनेमा बघण्यासाठी वापरतो.खूप रिलॅक्स होतो ग मी.. गर्दी नाही, धावपळ नाही.. सुखकर आयुष्य केलं हिने माझं.."

तिला खूप ओशाळल्यासारखं होतं.. त्याचा प्रेमळ निरोप घेउन ती निर्धस्त मनाने घरी येते

आपली सवत यांची मॅडम नाही तर ही मेट्रो आहे.. याचं तिला मनोमन हसायला येतं..
अन् मेट्रो नावाची सवत तिची लाडकी होऊन जाते..