सवत माझी लाडकी - भाग १ Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सवत माझी लाडकी - भाग १

दारावरची बेल वाजली..

तिनं लगबगीनं दरवाजा उघडला. नवऱ्याला असा लवकर आलेला बघून तिला अचंबित व्हायला झालं.

"काय झालं.. आज लवकर आलात.. तब्येत बरी नाहीये का?"

तो काहीही न बोलता बॅग ठेऊन तिथंच सोफ्यावर आडवा होतो.

पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत, "अहो काय झालं."

"काही नाही ग.. चक्कर आली आज ऑफिसमधे.. बॉस नी माझी अवस्था बघून टॅक्सी करून घरी जायला सांगितलं. आलो मग.. थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल. तू तुझं आवर . मी झोपतो थोडा वेळ."

किचन मध्ये काम करत करत तिचं विचारचक्र सुरू होतं.

हल्ली हे बराच उशिरा येतात घरी. घरी आल्यावर देखील अंगात काहीच त्राणचं उरत नाही. आल्यावर फ्रेश होऊन जेवणं झाल्यावर पडल्या पडल्या झोपतात.
पुन्हा सकाळी लवकर उठून ऑफिसला जायची घाई..
दिवसातले चार तास तर लोकलच्या प्रवासात जातात. मुंबईच्या लोकल बद्दल तर काही बोलायलाच नको. कधीही जा.. माणसांनी ओसंडून वाहत असते. तिच्यात चढायला मिळणे हेच एक दिव्य आणि महंत प्रयासाने जर चढलोच तर आतल्या गर्दीत प्रत्येक स्टेशन वर चढता उतरताना माणसांची जी घुसळण होत असते त्यात मण्यक्याचा मणी न् मणी ढिला झाल्याशिवाय राहत नाही.
आणि बर हे एक दिवसाचं नाही. लोकल प्रवास मुंबईतील चाकरमान्याच्या पाचवीला पुजलेला..
ह्यांच ही हेच होत असणार.. आता चाळीशी पार केल्यावर तर शरीरही पाहिल्यासारखं साथ देत नाही. त्यात ही रोजची दगदग.

बरं, दुसरीकडे कुठे जॉब बघावा जवळपास तर ही नोकरीही चांगली असल्यानं आगीतून फुफाट्यात जाण्यात अर्थ नाही.

यांच्या बरोबर माझीही ससेहोलपट होते ती वेगळी. कितीही कंटाळा आला असला तरी टिफीन बनवण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावेचं लागते.

लोकलच्या प्रवासामुळे येणारा शिणवटा त्यातून होणारी यांची सगळी चिडचिड माझ्यावरचं निघते कधी कधी. बेडरूम लाईफची तर पुरती वाट लागली आहे. पडल्या पडल्या झोपतात हे.माझ्या मनाची आणि शरीराची किती तळमळ होते.. यांच्या ध्यानी मनीही नसतील या गोष्टी.पण काही करू शकत नाही. ही परिस्थिती बदलणे सध्या तरी अशक्य आहे. आलिया भोगासी असावे सादर!!

मन संवाद साधत साधत तिचा आपला स्वयंपाक चालू असतो.
देवाला मनोमन प्रार्थनाही चालू असते.. काहितरी मार्ग काढ रे बाबा यातून, आता तुलाच आम्हा मध्यमवर्गियांची काळजी.

आता यात देव काय करणार म्हणा.. पण तिची मात्र भोळी भाबडी आशा..

जग इकडचं तिकड झालं तरी सूर्यनारायण आपलं काम चोख करत असतात. सृष्टीतील रोजचं रहाटगाडग नियमित चालू होतं

त्याच्यात मात्र काहितरी बदल होतोय हे तिला हळू हळू जाणवायला लागतं.

रोज सकाळी लवकर जाणारा तो हल्ली घरातून थोडा उशीरा निघतो. रात्रीही परत येतो तेंव्हा कधी शिळ घालत तर कधी एखाद गाणं गुणगुणत येतो.हल्ली स्वारी रात्रीची ही एकदम मूड मध्ये असते.

"अग माझा तो ब्लू शर्ट कुठं आहे ग.. बरेच दिवस घातला नाही. छान दिसतो ना मला तो."

"आणि ऐक ना, लायब्ररीची दोन पुस्तकांची मेंबरशीप करून घे. एक तुला नि एक मला.."

"या रविवारी थोड शॉपिंग करेन म्हणातोय.. तुलाही काही घ्यायचं असेल तर एकत्र जाऊया."

तिला मात्र हे ऐकून थोडा वेळ भिरभिरायला होतं. सातवे आसमान पे असल्याचा भास होतो पण क्षणभरचं.. हळूच तिच्यातील शंकासुर डोकं वर काढायला सुरवात करतो.

तिला त्याचं बदलेल वागणं बघून भलतीच शंका यायला लागते. कुठं गुंतले तर नाही ना या वयात. पुरुषाचं काही खरं नाही. नाहीतर आपण राहायचो स्वयंपाक रांधत अन् एकाधी फटाकडी उडवून न्यायची या येड्याला..


तिच्या विचारांनी तिलाच हसायला येतं.. स्वतःच्याच डोक्यावर टपली मारत, काय पण विचार करतेस तू. एवढी वर्षे पाहतेय त्यांना कधी संशय येतील असं वागले नाहीत. परस्त्रिशी तर चार हात लांबच राहते स्वारी . कधी माझ्या मैत्रिणी आल्या घरी तरी 'अहो जावो' केल्याशिवाय हाक मारत नाहीत की बाष्कळ गप्पा नाहीत.मी पण ना काहीही विचार करते..


रविवारी काय शॉपिंग करायची विचार करत असतानाच मोबाईल वाजतो.