Jhoka - 1 books and stories free download online pdf in Marathi

झोका - भाग 1

डॉक्टर सुरेंद्र हे सरकारी डॉक्टर असल्यामुळे भानपूर नावाच्या गावात त्यांची बदली झाली होती,त्यामुळे ते व त्यांची पत्नी सुधा हे दोघे सरकारी संस्थेने ने दिलेल्या एका बंगल्यात राहायला आले.


बंगल्यासमोर डॉ. सुरेंद्र यांची रिक्षा थांबली,डॉ. व त्यांची पत्नी सुधा सामान घेऊन खाली उतरले,खाली उतरल्या उतरल्या सुधाची नजर बंगल्याच्या नावकडे गेली, 'चाहूल' असं बंगल्याचं नाव होतं, त्याकडे बघून सुधा म्हणाली,

" नाव जरा विचित्रच वाटते, नाही!"

डॉ सुरेंद्र नी एकदा तिच्याकडे आणि एकदा घराच्या नावाकडे बघितलं आणि रिक्षाला पैसे चुकते करून चलाss असं हाताने चलण्याची खूण करून म्हंटल.


सुधाने घराचं फाटक उघडलं तसे त्या फाटकाने मोठयाने करकर आवाज केला. थोडं दचकतच सुधा सुरेंद्र बंगल्यात शिरले, आत शिरल्या शिरल्या बंगल्याच्या उजव्या बाजूला मोठ्ठा झोपाळा होता,तो बघून सुधाला आनंद झाला. तिने सुरेंद्र ला म्हंटल,

"किती छान झोपाळा आहे ! खूप मोठा!"

"कमाल आहे तू सुधा! अजूनही लहानमुलींसारखा आनंद होतो तुला झोका बघून ", डॉ सुरेंद्र हसत म्हणाले.


तेवढ्यात बंगल्याची साफसफाई करणारा कर्मचारी खंडू तिथे आला आणि त्याने बंगल्याचं दार त्यांना उघडून दिलं, अर्धे सामान लावेपर्यंत दुपार झाली, खंडू ची बायको गुंजा सुधाच्या मदतीसाठी आली, दुपारी सुधा सुरेंद्र चं जेवण आटोपल्यावर संध्याकाळपर्यंत संपूर्ण घर सुधाच्या मनाजोगतं लागलं.


"साहेब मॅडम स्नि फिरवून आना की गावात दिवसभर घरीच होता तुमी दोघे", गुंजा सुरेंद्रला म्हणाली.


"मोट्टी शानी हाय तू! ते त्यांचं बगतील, आपन मधी मधी बोलू नाय,सायेब स्वारी बरं का! माजी घरधणीन लय तोंडाळ हाय",खंडू म्हणाला.


"अरे खंडू काही सॉरी म्हणू नको, बरोबराय तिचं, आत्ता आम्ही दोघे बाहेर जाणारच होतो",डॉ सुरेंद्र म्हणाले.


संध्याकाळी सुरेंद्र आणि सुधा दोघेही गावात फिरून आले ग्रामदैवताचं दर्शन पण त्यांनी घेतलं आणि घरी परतले.


"उद्या सकाळपासून दवाखान्यात मला जॉईन व्हावं लागेल,दिवसभर घरी तुला एकटंच राहावं लागेल सुधा!

इथे आसपास फारसे घरं सुद्धा नसल्याने तुला कदाचित बोअर होईल पण त्या खंडू च्या बायकोशी बोलून तू टाईमपास करू शकते,इकडली तिकडली माहिती पण मिळेल तुला,थोडा टीव्ही बघ, काही वाचन कर, हवं तर तुझ्या आवडत्या झोपाळ्यावर बसून गाणे ऐक,संध्याकाळपर्यंत मी येतोच घरी, काय!",सुरेंद्र म्हणाला


"हो हो तुम्ही काही काळजी करू नका मी होईन ऍडजस्ट",सुधा हसत म्हणाली.


रात्री झोपण्याची वेळ झाल्याने दोघेही झोपायला बेडरूममध्ये गेले, सुरेंद्र क्षणात घोरायला सुद्धा लागला,पण सुधाला मात्र नवीन जागी काही झोप येत नव्हती,ती जागीच होती.


ह्या कुशीवरून त्या कुशीवर होता होता मध्यरात्र झाली, समोरच्या रस्त्यावरील चौकातल्या मोठया घड्याळात बाराचे टोल पडले,आणि सुधा दचकून उठून बसली,

'बापरे एवढ्या जोरात टोल पडतात! इथल्या लोकांची झोपमोड होत नसेल', असा विचार तिच्या मनात आला आणि तिचं लक्ष सुरेंद्र कडे गेलं, त्याच्यावर पडलेल्या टोल चा काहीही परिणाम झाला नाही, तो पूर्वीप्रमाणेच घोरत होता.


तेवढ्यात सुधाला करकरण्याचा आवाज येऊ लागला,बाहेरचं लोखंडी फाटक वाजते की काय असा विचार करून,तिने खिडकीतून बाहेर बघितलं, फाटक लावलेलं होतं, मग करकरण्याचा विचित्र आवाज कुठून येत होता?


बेडरूम च्या खिडकीतून तिला फक्त बाहेरचं फाटक दिसत होतं, पूर्ण अंगण दिसत नव्हतं,मग ती बैठकीच्या खोलीत आली आणि तिथली खिडकी उघडून तिने इकडे तिकडे बघितलं.


इतक्यात तिला दिसलं, अंगणाच्या डाव्या बाजूला असलेला झोपाळा करकरत वाजत होता आणि मागे पुढे हलत होता,बाहेर हवा सुरू होती म्हणून हवेने हलत असावा असं तिला वाटलं आणि ती खिडकी बंद करून पुन्हा बेडरूम मध्ये आली.


पुन्हा पुन्हा तोच करकरण्याचा सारखा आवाज येत राहिला,हवेने एक सारखा झोका कसा काय हलू शकतो? आणि एवढा जड झोका थोड्याशा हवेने एवढा कसा काय हलू शकतो? तिला विचित्र वाटू लागलं,ती पुन्हा बैठकीच्या खोलीत आली आणि पुन्हा तिने खिडकी उघडून झोक्याकडे बघितलं आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला.


×××××××××××××××

क्रमशः

(सुधाने काय बघितलं? झोका आपोआप कसा काय हलत होता? नवीन घर सुधाला लाभेल की नाही? हे जाणून घ्या पुढच्या भागात.)


मातृभारतीच्या वाचकांनो कथामालिका कशी वाटली हे शक्य झाल्यास नक्की अभिप्रायाने कळवा. कारण वाचकांचा अभिप्राय हीच लेखकाची प्रेरणा!


धन्यवाद🙏


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED