Jhoka - 3 books and stories free download online pdf in Marathi

झोका - भाग 3

पुन्हा एकदा फाटक वाजलं.


"कोण आलं पहा बरं गुंजा! ",सुधा म्हणाली


"हा बगते!",असं म्हणून गुंजा बाहेर आली, फाटकाजवळ खंडू उभा होता, त्याच्याजवळ जाऊन गुंजा म्हणाली," इकडं कशे आलं धनी, काई काम हाय काय?"


तिच्या कानाजवळ तोंड नेऊन खंडू तिच्या कानात काहीतरी पुटपुटला, ते ऐकून तिने झोक्याकडे विस्फारल्या नजरेने बघत तोंडाला हात लावला,

"या बया! खरं सांगतासा की काय?"


"सोळा आने खरं हाय! हे घे ",असं म्हणून त्याने एक पिशवी तिच्या हातात दिली.


"हे काय हाय?",गुंजा


"हे मंतारलेलं पीठ हाय", असं म्हणून त्याने परत एकदा तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि वापस जाताना तो म्हणाला," ध्यान ठिउन करजो बरं मी जे सांगतलं ते"


गुंजा एकदा झोक्याकडे आणि एकदा पिशवी कडे बघून आत गेली.

"काय झालं गं? कोण होतं? कोणाशी एवढा वेळ बोलत होती?",सुधाने विचारलं.


सुधा बोलली त्याकडे गुंजाचं लक्षच नव्हतं, ती कुठल्याशा विचारात गढली होती.


"अगं गुंजा! काय एवढा विचार करतेय? तुला विचारलं मी, ऐ गुंजा!",असं जोरात म्हंटल्यावर गुंजा भानावर आली.


"आं ! अं! हो! हो! काय म्हनलं वैणीसायेब?",गुंजा अडखळत म्हणाली.


"कोण आलं होतं बाहेर?",सुधाने पुन्हा एकदा विचारलं.


"ते माजे घरधनी आले होते",गुंजा


"ते पिशवीत काय आहे?",सुधा


"ते ! ते काई नाई!",गुंजा चाचरत म्हणाली.


"अगं गुंजा काही चिंतेची बाब आहे का? कारण आत्तापर्यंत तू चांगली हसत खेळत बोलत होती आणि बाहेरून जाऊन आली आणि तंद्रीतच गेली तू, जे काय आहे ते मोकळे पणे सांग बरं! त्यानंतर मलाही एक महत्वाची गोष्ट तुला सांगायचीय",सुधा म्हणाली.


"आदी तुमीच सांगा न वैणीसायेब!",गुंजा अजिजीने म्हणाली आणि खिडकीतून ती झोक्याकडेच बघू लागली.


"बरं! मी सांगते! अगं काल रात्री मला विचित्र अनुभव आला, तो अंगणातला झोका आपोआप कोणीतरी बसल्यासारखा मागे पुढे जोरजोरात एका लयीत हलत होता, रात्री बारा ते तीन अखंड तो झोका करssss करsssss आवाज करत हलत होता",सुधाने सांगितले.


तेवढयात धप्पsss असा काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि पाठोपाठ मांजरीच्या विव्हळण्याचा आवाज आला तशी गुंजा ताडकन उठली आणि घाबरत म्हणाली,"वैणीसायेब त्यो झोका बाधित हाय! बाधित हाय! आत्ता माज्या या डोळ्याने म्या बघितलं ती मांजर कोनीतरी ढकलून दिल्यावानी त्या झोक्यावरून पडली, तुमी इते राहू नगा वैणीसायेब, माजं ऐका! ",असं म्हणून ती पाय पोटाशी घेऊन भिंतीला टेकून बसली आणि एकटक विचित्र नजरेने त्या झोक्याकडेच बघू लागली.


सुधाला तिच्याकडे बघून भीतीच वाटायला लागली, थोड्यावेळ थांबून सुधाने गुंजाला पाणी देऊन विचारलं, " गुंजा ही पिशवी कशाची आहे? काय आहे त्यात?"


गुंजा गटागट पाणी पिऊन म्हणाली," तेच माजा घरधनी म्हनत व्हता की त्या झोक्यात काईतरी गोम हाय म्हून! ते कुत्रं म्हून ओरडत निघून गेलं व्हतं, त्यासाठीच त्याने मला हे मंतारलेलं पीठ दिलं"


"मंतरलेलं पीठ? आणि काय होईल ह्याने?",सुधाने विचारलं.


"ते त मला ठावं न्हाई पन माजा घरधनी म्हनला की झोक्याभोवती हे पीठ टाकून देजो म्हून आनी याच्यावर काई उमटलं तर मला सांगजो म्हून",गुंजा म्हणाली.


"मग टाकणार का तू?",सुधा


"टाकणार व्हती म्या, पन आता मले भेव वाटाया लागलं वैणीसायेब!",गुंजा म्हणाली.


"खंडू इथे येणार आहे का पुन्हा?",सुधा


"हाव! ते सांजच्याला येनार हायती",गुंजा


"मग तो आला की त्यालाच टाकायला सांगितले तर चालणार नाही का?",सुधा म्हणाली.


"तसंच कराया लागल असं वाटतया",गुंजा म्हणाली.


"मी सुरेंद्रना सांगितलं पण त्यांचा विश्वास बसत नाही ह्या गोष्टींवर, आता संध्याकाळी आल्यावर पून्हा एकदा सगळं सांगून बघते",सुधा


"ह्या पिठावर जर काई खुना उमटल्या तर त्यानला बी विसवास ठिवावाच लागल वैणीसायेब!",गुंजा


"तशीही संध्याकाळ होतच आलेली आहे, सुरेंद्र येतीलच एवढ्यात!",असं सुधाने म्हणण्याची आणि टेलिफोन खणखणण्याची एकच वेळ झाली.


संध्याकाळच्या त्या शांततेत फोनचा तो आवाजही दचकवणारा होता.

★☆★☆★☆★


क्रमशः


( मंतरलेल्या पिठावर खुणा उमटतील का? सुरेंद्रचा सुधाच्या बोलण्यावर विश्वास बसेल का? संध्याकाळच्या शांततेत येणारा तो फोन कोणाचा होता? जाणून घ्या पुढच्या भागात.)


वाचकांनो कथामालिका कशी वाटली हे शक्य झाल्यास नक्की अभिप्रायाने कळवा. कारण वाचकांचा अभिप्राय हीच लेखकाची प्रेरणा!


धन्यवाद🙏


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED