Jhoka - 5 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

झोका - 5 - (अंतिम)

खंडूचा मोठ्ठा आवाज ऐकून पळतच गुंजा बाहेर आली आणि त्यामागून सुधाही आली. त्यांनी बघितलं तर खंडू दहा फुटावर उताणा पडला होता. गुंजा धावतच त्याच्या जवळ गेली. त्याने कमरेला हात लावला होता,त्याच्या हाताचे कोपरे खरचटले होते.


"काय झालं धनी, अशे कशे पडले तुमी हितं",गुंजा त्याला उठण्यासाठी आधार देत म्हणाली.


पण खंडू काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. सुधाने आतून पटकन त्याला पाणी आणून दिले. त्याने थोडं पाणी पिलं आणि व्हरांड्यात येऊन भिंतीला टेकून तो बसून राहिला.


इतक्यात सुधा,गुंजा आणि खंडू चे लक्ष झोक्याभोवती पसरवल्या पिठाकडे गेलं, त्या पिठावर पावलं उमटत होते, जसजसे पिठावर पावलं उमटत होते तसतसे ते पीठ काळे ठिक्कर पडत होते.


ते पावलं झोक्याभोवतीच उमटत होते, ते पावलं वेगळेच होते गोल गोल त्याला बोटं नव्हते, खूप विचित्र दिसत होते ते पावलं. अचानक पावलं उमटणं बंद झालं आणि झोका मागे पुढे हलणे सुरू झालं. झोका घेताना जसा आपण पायाने टेका घेतो त्याप्रमाणे त्या पिठावर पावलं उमटत होते.


सुधा,गुंजा आणि खंडू त्याकडे डोळे विस्फारून बघत होते. झोका आता अतिशय वेगाने झुलत होता, इतका वेगात की आता निखळून पडेल की काय अशी भीती निर्माण झाली होती.


सुधा,गुंजा आणि खंडू तिघेही व्हरांड्यातून धडपडत उठत आत बैठकीत बाहेरचं दार लावून जीव मुठीत घेऊन बसले. झोका जोरजोरात फिरत होता, झोक्याचा कर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र आवाज कानठळ्या बसेल एवढा जोरात येत होता.


त्यापाठोपाठ मोठमोठ्याने श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला. तो श्वास घेण्याचा आवाज हळू हळू खूप मोठा मोठा होत गेला, अगदी कोणीतरी आपल्या कानाजवळ जोरजोरात श्वास घेतेय असं त्या तिघांना वाटू लागलं. त्या तिघांना भीतीने आता हृदय बंद पडते की काय असं झालं होतं.


थोड्यावेळाने झोका शांत झाला. रात्र हळूहळू सरत होती, जराही खुट्ट आवाज आला की तिघेही दचकत होते. अचानक घरातील वीज गेली. तसे तिघेही भीतीने गारठले. आतून मेणबत्ती आणायचा सुद्धा त्यांना धीर झाला नाही. जागेवरच सुधा गुंजाचा, गुंजा खंडूचा हात घट्ट धरून बसून राहिले.


तेवढ्यात सुधाच्या खांद्यावर काहीतरी थंडगार पडल्या सारखं झालं. ती खांदा झटकत ताडकन उठली आणि तेवढ्यात वीज आली. तिने बघितलं दूर एक हिरवा सरडा जिभल्या काढत पडला होता.


"ईईईई!!!! किती घाण!!!", सुधा


"पन अंदर ह्यो आलाच कसा? हां ते खिडकी उघडीच हाय तथूनच आला ह्यो असं म्हणून गुंजाने त्याची शेपटी पकडली आणि खिडकी बाहेर फेकून दिला आणि ती खिडकीचं दार लावून वळली तर तिचा पदर कोणीतरी धरल्यासारखं तिला वाटलं.

धनीईईईई!!! असं ती जोरात ओरडली,खंडू धावत तिच्याजवळ आला, त्याने बघितलं खिडकीत तिचा पदर अटकला होता त्याने तो सोडवला.


भीतीने त्या तिघांच्याही मेंदूवर खूप ताण आला होता,तिघेही उपाशीच होते कारण त्यांना जेवणाचं भानच नव्हतं. ते थकून सोफ्यावर बसले.


तेवढ्यात फट फट फट असा आवाज येऊ लागला, कुठलं तरी दार आपटत होतं. तिघेही घाबरले. बराच वेळ तो आवाज येत राहिला आणि मग बंद झाला. पुन्हा तोच आवाज येऊ लागला. खंडूने कानोसा घेतला तेव्हा तो म्हणाला,


"मले वाटते मॅडम तो आवाज आतल्या खोलीतून येऊन राहाला, खिडकी उघडी असाल कदाचित. मी बंद करून येऊ की तुमी करता बंद"


"आपण तिघेही जाऊन बंद करून येऊ",असं सुधाने म्हंटल आणि ते आत बेडरूममध्ये गेले, तिथली खिडकी सताड उघडी होती,खंडूने पुढे होऊन ती बंद केली आणि परत ते तिघे बैठकीत आले आणि सोफ्यावर येऊन बसले.


मध्यरात्र उलटून गेली होती, झोक्याचा आवाज पुन्हा येणं सुरू झालं आणि तिघेही ग्लानी येऊन बेशुद्ध पडून गेले.


सकाळीच चाहूल बंगल्याचं फाटक वाजलं, सुरेंद्र दवाखान्यातुन घरी आला होता, घर शांत होतं. त्याने अंगणात येऊन सुधाला आवाज दिला पण आतून काहीच आवाज आला नाही. तोही रात्रभर ऑपरेशन मध्ये बिझी असल्याने थकून गेला होता. झोक्यावर सूर्याचे कोवळे किरणं येत होते म्हणून तो झोक्याच्या दिशेने गेला आणि त्याने जेमतेम बुड टेकवलंच होतं की त्याच्या पेकाटात कोणीतरी जोरर्रात लाथ मारल्यासारखं त्याला वाटलं आणि तो मोठ्याने ओरडत दहा फुटावर जाऊन पडला.


त्याची बॅग घेऊन दवाखाण्यातून कंपाउंडर आला होता त्याने सुरेंद्रला पडलेलं बघितलं तो घाईघाईत आत आला आणि त्याने सुरेंद्रला आधार देऊन उठवलं आणि आत नेलं. आत जाताच सुरेंद्रला धक्का बसला कारण आत सोफ्यावर सुधा,गुंजा आणि खंडू बेशुद्धावस्थेत पडले होते.


"अरे ह्यांना काय झालं, चल सदू ह्यांना दवाखान्यात न्यावं लागेल, एक दोन जणांना ambulance घेऊन बोलावून घे",सुरेंद्र म्हणाला.


तिघांनाही दवाखान्यात भरती केलं आणि उपचार सुरु केले. तिघांनाही खूप अशक्त पणा आला होता, जोररात पडल्यामुळे खंडूच्या कमरेचे हाडही दुखावल्या गेले होते. सुरेंद्रच्या कमरेलाही जबर मुकामार लागला होता त्यामुळे सगळ्यांवरच उपचार सूरु होते.


दोन दिवसांनी गुंजाला शुद्ध आली, खंडू ला चोवीस तासातच शुद्ध आली. सुरेंद्रलाही थोडं बरं वाटू लागलं पण मधून मधून खंडूच्या आणि सुरेंद्रच्या कमरेतून कळा येत होत्या.


सुधा अजूनही बेशुद्ध च होती, तिसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच ती घाबरून सुरेंद्रला म्हणाली,


"सुरेंद्र तुम्ही काहीही म्हणा पण मी त्या घरात आता येणार नाही त्यापेक्षा मी इथेच बरी"


"मला ते कळलंय सुधा जेव्हा माझ्या पेकाटात बसली तेव्हाच मला कळलं की तिथे राहण्यात काही अर्थ नाही मी आधीच आपलं सामान दुसऱ्या एका घरात शिफ्ट केलंय आणि हे घर गुरुजींकडून आधीच बघून घेतलंय ह्या घरात काहीच प्रॉब्लेम नाहीये."


काही दिवसांनी सुधा डिस्चार्ज घेऊन नवीन घरात आली. दिवसभर ती संपुर्ण घरात फिरून निरीक्षण करत राहिली.


एका रात्री बारा वाजता तिला झोक्याचा आवाज आला आणि ती खडबडून उठली. तिला दरदरून घाम फुटला होता. सुरेंद्र लगेच उठला आणि त्याने तिला पाणी दिलं.


"सुरेंद्र! मला मला", पुढे तिला बोलावलं नाही, सुरेंद्रने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला.


"थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल सुधा! हळूहळू तू सेटल होशील, रिलॅक्स! मी आहे तुझ्यासोबत."


काही दिवस सुधाला असेच भास होत राहिले मग हळूहळू ती सेटल झाली.


गुंजा आणि खंडू ने गावातल्या एकूण एकाला त्या चाहूल बंगल्याकडे फिरकू नका असं बजावून सांगितले.


आजही चाहूल बंगल्यात रात्री बारा ते तीन झोका आपोआप हलतो, बंगल्याच्या संपूर्ण अंगणात पुरुषभर उंचीचे गवत वाढलेले आहे. फक्त झोक्याभोवती सगळीकडे खुरटलेले काळे ठिक्कर पडलेले गवत आहे.

★☆★☆★☆★☆★☆★☆★


समाप्त

वाचकांनो कथामालिका कशी वाटली हे शक्य झाल्यास नक्की अभिप्रायाने कळवा. कारण वाचकांचा अभिप्राय हीच लेखकाची प्रेरणा!


धन्यवाद🙏


इतर रसदार पर्याय