झोका - भाग 4 Kalyani Deshpande द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

झोका - भाग 4

सुधाने फोन उचलला.

"हॅलो",सुधा


"हॅलो सुधा नीट ऐक, आज रात्री मला इथेच राहावं लागेल, इमर्जन्सी केस आहे त्यामुळे मी उद्या सकाळीच येईल घरी. रात्री सोबतीला गुंजाला बोलावून घे, मी खंडूला सांगून ठेवतो.

जास्त विचार न करता लवकर झोपून जा,उद्या सकाळी येतोच मी लवकर,ठीक आहे!",सुरेंद्र


सुधा ला क्षणभर काही सुचलंच नाही काय बोलावं ते.


"अगं सुधा! ऐकतेय न! तुझ्याशी बोलतोय मी!",सुरेंद्र


"अं हो हो, ठीक आहे",सुधा


पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला.


"काय झालं वैणीसायेब? कोनाचा व्हता फोन?",गुंजा


"अगं डॉक्टरांचा, ते आज रात्री येऊ शकणार नाहीत घरी, इमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये, तू येशील का सोबतीला माझ्या आज रात्री",सुधा


"बापरे! रातीला! तसं भेव वाटते मले पन तुमच्या संगतीला येतो, आज रातभर काई झोप लागायची नाई मले वैणीसायेब! आज माज्या घरधन्याला इते आनलं तर चालन काय? भाईर इते हाल मदे झोपू आमी कारन आपन दोगीच राह्यलो आनी काई झालं तर! म्हनुन म्हनतो. आज तर आवस बी हाय!",गुंजा भेदरलेल्या आवाजात बोलली.


"ठीक आहे बोलावून घे आणि तसंही ते मंतरलेलं पीठ टाकायचं आहे न झोक्याभोवती",सुधा म्हणाली.


"मग मी जातो आता आणि धन्याला घेऊन येतो, हे पीठ इतेच रहाऊ द्या,बातच येतो म्या",गुंजा घाईघाईने बाहेर पडली.


आज आवस म्हणजे अमावस्या असं गुंजा म्हणाली,अमावस्येच्या दिवशी दुष्ट शक्तीचा प्रभाव वाढतो असं तिने ऐकलं होतं. आज तर ती एकटी होती, सुरेंद्र हॉस्पिटलमध्ये आणि गुंजा पण घरी गेली होती म्हणजे एवढ्या मोठ्या घरात सुधा एकटीच होती.


तेवढ्यात अंगणात झोक्याचा कर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र असा आवाज येऊ लागला.


सुधाने खिडकीतून बघितलं, झोका मागे पुढे एका लयीत संथपणे हलत होता. सुधाच्या हृदयाचा ठोका चुकला.

ती भेदरलेल्या नजरेने झोक्याकडे एकटक बघत राहिली.


इकडे गुंजा खंडूला सांगण्यासाठी तिच्या घरी आली, तर खंडू घरी नव्हताच,बराच वेळ त्याची वाट बघितल्यावर तो येताना दिसला. तिने त्याला निरोप सांगितला आणि तिच्यासोबतच त्याला चलायला सांगितलं.


बराच वेळ झाला तरी गुंजा आली नाही म्हणून सुधा काळजीत पडली, आज रात्रभर आपल्याला एकटचं राहावं लागते की काय ह्या विचाराने तिला कापरं भरलं. इतक्यात तिला झोका अचानक थांबलेला दिसला आणि मागोमाग मोठमोठ्याने उसासे टाकण्याचा आवाज येऊ लागला. धापा टाकल्याचा आवाज वाढू लागला.


तिचे हात पाय थरथरू लागले, घशाला कोरड पडली. अचानक तिच्या कानाशी कोणीतरी हळूच हसल्याचा तिला भास झाला. तिने झटकन मान फिरवून इकडे तिकडे बघितलं पण कोणीच नव्हतं.


तिला एकदम चक्कर आली आणि ती धाडकन कोसळली.


तिला तोंडावर पाण्याचे शिंतोडे पडल्यासारखे वाटले. तिने डोळे उघडले तेव्हा गुंजा तिच्या बाजूला बसलेली दिसली, ती खडबडून उठून बसली.


"अहो! वैणीसायेब काय झालं तुमाला, मी आली तवा तुमी बेसुद पडल्या व्हत्या, मला तर काई बी सुदरना, म्हून म्या तुमच्या तोंडावर पानी शिपडल तवा तुमाला सूद आली.",गुंजा


"तू कधी आलीस गुंजा? एवढा वेळ कसा काय लागला तुला? त्या झोक्यावर कोणीतरी उसासे टाकत होतं. इथे राहणं खरंच खूप असह्य झालंय,खूप विचित्र वाटतेय मला.",सुधा म्हणाली.


"आवाज बी आला तुमाला, बापरे!!",गुंजा तोंडावर हात ठेवत म्हणाली.


"खंडूला बोलवायला गेली होती न तू! आला नाही का तो?",सुधा घाबरलेल्या आवाजात म्हणाली.


"आले व्हते पन तुमाला बेसुद बगून इस्पितळाकडे गेले हायती,येतच असतील बगा.",गुंजा


तेवढ्यात खंडू एका डॉक्टरांना आणि एका नर्सला घेऊन आला.


"कसं वाटतेय मॅडम? खंडूने सांगितलं तुम्ही बेशुद्धावस्थेत आहे म्हणून आम्ही लगबगीने आलो, सर च येणार होते पण एका इमर्जन्सी ऑपरेशन मध्ये ते गुंतले असल्याने येऊ शकले नाही.",आलेल्या डॉक्टर ने म्हटलं.


डॉक्टरांनी सुधाला तपासलं, काही जवळचे आणलेले टॉनिक्स दिले.


"मॅडम मेंटल स्ट्रेस मुळे चक्कर आली होती तुम्हाला. आता काळजी करण्याची काही गरज नाही.

हे टॉनिक्स घ्या बरं वाटेल तुम्हांला.


ऑपरेशन जसं पूर्ण होईल तसे सर लगेच घरी येतील असा त्यांनी निरोप दिलाय. आता तुम्ही आराम करा, येतो आम्ही.

काही गरज पडली तर खंडू! सांग आम्हाला! ",असं म्हणून ते डॉक्टर आणि नर्स निघून गेले.


"आता ह्या डागदर ला कोन सांगल की हिते काय भानगड हाय म्हून",गुंजा डोक्याला हात मारून म्हणाली.


"मी झोक्याभोवती पीट टाकून येतो गुंजा,दे मले ते मंतारलेलं पीट",खंडू म्हणाला.


"तुला हे पीठ कोणी दिलं खंडू?",सुधा


"वैणीसायेब! माझ्या मित्राच्या ओळखीचा एक मांत्रिक हाय त्याला ह्याचं ग्यान हाय, त्यानंच दिलं मले. मी त त्यालेच घेऊन येनार व्हतो पन म्हनलं सायेबांच्या परवानगी बगर कसं आनावं म्हून राहू देलं.",खंडू म्हणाला.


गुंजाने त्याला ते पीठ देत म्हंटल, "बगा धनी! सांभाळून टाकजा"


"हाव! तू बस अंदर तदरोक, जा!",असं म्हणून तो बाहेर पीठ टाकायला गेला.


गुंजा आत सुधा जवळ जाऊन बसली आणि थोड्याचवेळात


"आयायो! मेलो!!मेलो!!",असा जोरात आवाज आला. तो आवाज एवढा मोठा होता की गुंजा आणि सुधाला धडकीच भरली.

क्रमशः


(खंडूला काय झालं असेल? झोक्याचे गूढ उलघडेल का? जाणून घ्या पुढल्या भागात.)


वाचकांनो कथामालिका कशी वाटली हे शक्य झाल्यास नक्की अभिप्रायाने कळवा. कारण वाचकांचा अभिप्राय हीच लेखकाची प्रेरणा!


धन्यवाद🙏