सोबती Krishnashuchi द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सोबती

महत्त्वपूर्ण निवेदन :-

● सदर कथेचा उद्देश हा निव्वळ शुद्ध-मनोरंजनासाठी असून त्याद्वारे समाजात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा गैरसमज पसरविण्याचा लेखकाचा उद्देश नाही, हे कृपया वाचकांनी जाणावे.
● कथेतील सर्व पात्रे, स्थळे आणि घटना या पूर्णतः काल्पनिक असून केवळ कथेची आवश्यकता म्हणून त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे, त्यांचा वास्तवातील कोणतीही जीवित किंवा मृत व्यक्ती, स्थळे अथवा घटना यांच्याशी संबंध नाही. तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
● कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव असून, लेखकाच्या परवानगीशिवाय सदर कथा-
१) अन्य व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहांच्या नावे प्रकाशित केल्यास,
२) गैर अथवा अनधिकृत वापर केल्यास,
३) अन्य प्रकाशनीय माध्यमांमार्फत प्रदर्शित केल्यास,
संबंधित व्यक्तीवर/व्यक्तीसमूहांवर अथवा संस्थेवर कठोर कार्यवाही करण्यात येईल याची कृपया वाचकांनी दखल घ्यावी, ही नम्र विनंती.
◈◈◈

 

पौर्णिमेचं टिपूर चांदणं संबंध आसमंत व्यापून टाकीत होतं. सर्वशक्तिनिशी भूतलावर प्रकाश पसरविणारा चंद्रमा आज आपल्या श्वेतप्रभेची मुक्त उधळण करीत रात्रीच्या गहन अंधाराला छेदण्याचा प्रयत्न करीत होता. गडद काळ्या आकाशातून परावर्तित होणाऱ्या त्या सफेद-निळसर चंद्रप्रकाशात रस्त्यावरच्या मोठमोठ्या झाडांच्या सावल्या काळ्याकभिन्न दिसत होत्या. थंडगार वाऱ्याची झुळूक त्यांच्या प्रत्येक पानांना हलकासा स्पर्श करून जात होती. त्यातून निर्माण होणारी पानांची विचित्र सळसळ रात्रीची गहन शांतता हळूच भंग करू पाहत होती...

मध्यरात्रीचे साधारण दीड-दोन वाजत आले असावेत. साधं चिटपाखरूही नसलेल्या त्या निर्मनुष्य अश्या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती हळूहळू चालत येत होती. पायात घातलेल्या चामड्याच्या वहाणा खरखरीत रस्त्यावरून घासतांना विचित्र आवाज करीत होत्या. तो एकमात्र आवाज सभोवताली पसरलेला शांततेचा डोह हलक्याने ढवळून काढत होता आणि पुन्हा काही क्षणांत विरून जात होता. अतिशय सावधपणे एक एक पाऊल टाकत ती व्यक्ती हळूहळू मार्गक्रमण करीत होती. क्षणभरच थांबून आजूबाजूच्या गहन शांततेत होऊ पाहणाऱ्या सूक्ष्म आवाजाचा कानोसा घेत होती आणि पुन्हा चालू लागत होती. एकूणच देहबोलीवरून ती व्यक्ती खूपच सावधपणे चालत होती हे एव्हाना कुणीही पाहिलं असतं तर लक्षात आलं असतं पण त्या भयाण शांततेत बुडालेल्या रस्त्यावर माणसाच्या अस्तित्वाचा पुरावा देणारं कदाचित त्या व्यक्तीशिवाय आणखी असणार तरी कोण ?

त्या व्यक्तीचा अवतार वर्णन करायचा झाला तर पायात चामड्याच्या कोल्हापुरी पद्धतीच्या वहाणा, वर मळकट सफेद धोतर, अंगात तशीच फिकट्ट मातकट बंडी आणि डोक्यावर मात्र पूर्ण मान, डोके आणि पुढच्या बाजूने अगदी चेहराही झाकला जाईल अश्या पद्धतीने पांघरून घेतलेली गडद काळी जाडजूड घोंगडी... रात्रीच्या काळ्याकुट्ट काजळी अंधाराशी ती घोंगडी ज्या बेमालूम पद्धतीने एकरूप झाली होती की, पाहणाऱ्याला क्षणभर अंधाराची अन् त्या मूर्त वस्तूची सीमा ओळखूच येणार नाही !
धिम्या गतीने एक एक पाऊल शांतपणे टाकत जाणाऱ्या त्या माणसाने आपल्या दोन्ही हातात मात्र काहीतरी व्यवस्थित धरलं होतं. एका आडव्या धरलेल्या पोत्यावर काहीतरी मोठं गोलाकार ठेवलेलं होतं जसा की एखादा लहान आकाराचा माठ असावा, आणि त्यावर त्या घोंगडीसारख्याच कापडाची एक घडी अंथरलेली होती किंवा कदाचित आत जे काही होतं त्याला व्यवस्थितपणे झाकून ठेवता येईल अश्या पद्धतीने ती घोंगडी त्यावर आंथरून घातली होती. त्या माणसाने ते पोतं अगदी अलगद काळजीपूर्वकपणे हातात धरलं होतं. जेणेकरून आतली ती वस्तू अगदी सुरक्षितपणे इच्छित स्थळी नेता येईल. चालण्याची लय आणि शरीराच्या ढोबळ खाणाखूणांवरुन त्या व्यक्तिचं वय साधारणतः साठीच्या पुढचंच असावं...

१५-२० पाऊले पुढे जाताच रस्त्याच्या कडेला दोन पाट्या लावलेल्या होत्या. त्यातल्या एकीवर 'नांदगाव ११ किमी' आणि दुसरीवर 'बारगाव ६ किमी' असं लिहिलेलं होतं. त्यांवरचे बाण वेगवेगळ्या दिशा दाखवीत होते. 'बारगाव ६ किमी' लिहिलेल्या पाटीवर त्या व्यक्तीने क्षणभर थांबून एक कटाक्ष टाकला. अर्थातच तिथून पुढे रस्त्याला दोन फाटे फुटत होते. एक रस्ता नांदगावला घेऊन जाणारा तर दूसरा रस्ता म्हणजे बारगावला घेऊन जाणारी संपूर्ण जंगलाची वाट ! क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीने बारगावला जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने आपले पाऊले वळवली. कदाचित तो रस्ता त्याच्या नित्याचाच असावा म्हणून नवख्या प्रवश्यासारखी त्याची द्विधा मनःस्थिती किंवा गफलत झाली नाही. जंगलाची वाट धरताच संथ गतीने चालणाऱ्या त्याच्या पावलांची गती आता मात्र वाढली. झपाझप पावले टाकीत तो मार्गक्रमण करू लागला.

सुरुवातीस विरळ असणारी रस्त्यालगतची झुडूपं आता हळूहळू मोठ-मोठ्या वृक्षांमध्ये बदलू लागली. बघता बघता त्यांची घनता वाढू लागली. हळूहळू ती वाट घनदाट अश्या जंगलाच्या बरोबर मधून जाऊ लागली. अवतीभवती अक्राळविक्राळ वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि पारंब्या यांची गर्दी वाढू लागली. रात्रीच्या त्या अंधारात आजूबाजूला वाढलेली ती मोठमोठी झाडे भक्ष्यावर दबा धरून बसलेल्या श्वापदांप्रमाणेच भासत होती. इतकावेळ मोकळ्या माळरानावरून येणाऱ्या हवेची हलकी झुळूक आता थंडगार वाऱ्याच्या झोतांमध्ये रूपांतरित होऊ लागली. पुढे जाणारी रस्त्याची रेखा मध्यरात्रीच्या गडद काळोखात विरळ होऊन जाऊ लागली. पार दिसेनाशी झाली. धरतीला प्रकाशित करू पाहणाऱ्या चंद्राचा प्रकाश आता मात्र घनदाट वाढलेल्या वृक्षांच्या फांद्यामुळे जमीनिपर्यंतही पोहोचेनासा झाला. जंगलाच्या खोल गर्भातून जाणारी ती वाट काळोखाच्या आणखीनच अधीन होऊ लागली.

आजूबाजूला आपलं रूप पालटणाऱ्या निसर्गाच्या या विविध माध्यमांकडे संपूर्ण दुर्लक्ष करत ती व्यक्ती मात्र झपाझप पावले टाकीत पुढे चालली होती. रात्रीच्या त्या काजळी अंधाराचा, भोवताली सुटलेल्या पिसाट वाऱ्याचा आणि पंजे वाढवून भक्ष्याचा घात करू पाहणाऱ्या श्वापदासारख्या अजस्त्र वृक्षांचा त्या व्यक्तीवर जणू काहीच परिणाम होत नव्हता किंवा कदाचित होतही असेल, परंतु मन घट्ट करून निग्रहाने एक एक पाऊल टाकत ती व्यक्ती चालत जात होती. क्षणाचाही विलंब करून चालणार नाही, अश्या निग्रहाने ती व्यक्ती अंधाराने गुडूप करून टाकलेली ती वाट भरभर कापत होती.

दोन-पाच मिनिटं झाली असतील आणि वेगाने पावलं उचलणाऱ्या त्या माणसाच्या कानांना हलकी शीळ घातल्याचा आवाज येऊ लागला. वाऱ्याच्या झोतांवर स्वार होऊन येणारा तो हलकासा आवाज मागून येऊन त्या व्यक्तीच्या कानात शिरला आणि त्या क्षणी ती व्यक्ती जागच्या जागी थिजली. मागून नक्कीच कुणीतरी येत होतं. एक क्षण त्या व्यक्तीला काय करावं तेच कळेना. मागे वळून पाहावं का थेट आपल्या रस्त्याने सुसाट पळ काढावा असा विचार कदाचित त्या माणसाच्या मनात सुरू होता. तश्याच अवस्थेत मागे वळून न बघता तो मागून येणाऱ्या त्या आवाजाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करू लागला. हातात धरलेल्या त्या पोत्यावरची पकड आणखीनच घट्ट झाली. मागून ऐकू येणारी ती अनामिक शीळ आता हळूहळू स्पष्ट ऐकू येऊ लागली. चालत येणारी ती व्यक्ती बहुदा वेगात अंतर कापत असावी.
काही क्षणांच्या मनातल्या संभ्रमावस्थेला न जुमानता अखेर त्या व्यक्तीने मागे वळून सर्वत्र पसरलेल्या त्या अंधाऱ्या वाटेवर आपली नजर रोखली आणि काहीच क्षणात नाजूक शीळ घालत एक इसम त्याच्याच दिशेने चालत येतांना त्याला दिसून आला.

'अरेच्चा, इतक्या येळ आपुन हितनं एकलेच जात व्हतू, अन् अचानक कसं काय ह्ये बेनं उपटलं ?' मनातल्या मनात विचार करीत ती व्यक्ती तो इसम जवळ येण्याची वाट पाहु लागली.

दुरून धूसर वाटणारी त्या इसमाची आकृती आता स्पष्टपणे नजरेस दिसू लागली तसं मागे रोखून पाहणाऱ्या या व्यक्तीने त्याचं नीट निरीक्षण केलं. साधारण विशी-पंचविशीचा तरुण असावा तो. देहबोलीवरून फारच बेफिकीर आणि उछ्रुलुंक वाटत होता. बेफिकीरपणे शिट्टी वाजवत आणि स्वतःच्याच या कलेचं कौतुक केल्यासारखं दात विचकून हसत, हेलकावे खात चालत येणाऱ्या त्या मुलाकडे बघून महाशय निश्चितच मदिरादेवीचा भरगच्च प्रसाद भोगून आलेत हे तात्काळ लक्षात येत होतं. त्या गहिऱ्या अंधारात तसं निटसं दिसतही नव्हतं. डोक्यावर पसरलेल्या फांद्यांच्या आडून चंद्रप्रकाशाची एखादी तिरीप जमिनीवर उतरली तरच काय ती दृश्यमानता जाणवत होती. बाकी मात्र सर्वत्र पसरलेला काजळी काळोख !

मागून येणाऱ्या त्या तरुणानेही कदाचित ह्या समोर उभ्या व्यक्तीला बघितलं असावं. त्याने गपकन शीळ घालणं थांबवलं आणि सावधपणे एक एक पाऊल टाकत या व्यक्तीकडे येऊ लागला. चालतांनाचा त्याचा वेग कमालीचा कमी झाला. आजूबाजूला पसरलेल्या भयाण काळोखाची आणि किर्र जंगलाच्या साम्राज्याची प्रचिती कदाचित आत्ता त्याला होत असावी. दाबून पिलेली दारू उतरली असावी बहुतेक ! इतकावेळ बेफिकिरपणे चालणाऱ्या त्याचं प्रत्येक पाऊल आता सावधपणे पडू लागलं. पुढे उभ्या या इसमाला तो तरुण आता गंभीरपणे चालत येत असल्याचं दिसत होतं. काहीच क्षणात दबकत दबकत पावलं टाकत तो तरुण या इसमजवळ येऊन थांबला...

"कोन हाय रं ?", अंधारात दोन पावलांवर उभ्या त्या आकृतीकडे बघत जरासं भीतभीत त्या तरूणानं विचारलं.

"आरं तू कोन हाय ?", समोरच्या त्या व्यक्तीनेही तोच प्रश्न विचारला.

आता त्या तरुणाला जरासं हायसं वाटलं. 'हाय हाय, मानूसच हाय !', मनातल्या मनात म्हणत आता तो बिनदिक्कतपणे त्या इसमासमोर उभा राहिला.

"कोन हाय रं तू ? कुठनं आलास लेका ?", आपल्या डोक्यावरची घोंगडी एका हाताने आणखी डोक्यावरून खाली ओढून घेत त्या इसमानं या तरुणाला विचारलं.

"आवं बाबा, म्या सदा हाय, सदा पाटील, आपल्या बारगावचाच हाय ! तुम्ही आनिक कुनीकडचे म्हनायचे ?" , त्या तरुणाने विचारलं. बोलतांना तो जरासं वाकून त्या इसमचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होता पण काळोखात एक रेघही नजरेस पडणं मुश्किल होतं.

"म्यां ? आरं म्या बी बारगावचाच हाय की !" त्या मुलाकडे एक क्षणही वळून न बघता या इसमाने सांगितलं.

"वा वा हे ब्येस झालं, चला आता सोबतीनच जंगलाची वाट सर करू" म्हणत त्या तरुणाने चालायला सुरुवातदेखील केली. तो इसमही त्याच्या बरोबरीने चालू लागला. या भयाण वाटेने चालतांना कुणाची तरी सोबत मिळाली याचं त्या इसमालाही हायसं वाटत असावं, पण ते त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं का नव्हतं हे मात्र सांगता येणं मुश्किल होतं...

"राहायला कुठले तुम्ही ?", चालता चालता तरुणाने विचारलं.

"आं? हा म्या ? म्या तिकडं परडेवस्तीच्या जवळ राहातू. आंन तू रं ?", जरासं अडखळत त्या म्हाताऱ्याने विचारलं.

"म्या तिकडं हाणमंत पाटलांची तालिम हाय ना, त्याच्या मागच्या वस्तीत, तिथं राहातू", सदाने उत्तर दिलं.

चालत चालत एव्हाना दोघे पन्नासेक पावलं अंतर चालत आले होते. हा तोच 'चिंच्या भगिनींचा' इलका होता. अख्ख्या बारगावात आणि आजुबाजूच्या तमाम पंचक्रोशीत कुप्रसिद्ध असणारी ही जागा आणि इथं उभं ते भरगच्च, अवाढव्य चिंचेचं झाड ! दहा वर्षांखाली बारगावातल्याच दोन सख्ख्या बहीणींची निर्घृण हत्या दरोडेखोरांच्या एका फिरत्या टोळीने याच चिंचेच्या झाडाखाली केली होती. त्याच वर्षीच्या अमावस्येपासून गावातल्या लोकांना त्या झाडाच्या अवतीभोवती त्या बहीणींचं अस्तित्व वेगवेगळ्या मार्गांनी, संकेतांनी जाणवू लागलं अन् आवस-पौर्णिमेला २-३ माणसंही गायब होण्याच्या घटना घडल्या. आता यात किती खरं अन् किती खोटं याची शहानिशा करण्यात कुणालाही रस नव्हता कारण त्या गायब झालेल्या माणसांची ख्याती गावात काही फार चांगली नव्हती आणि मग हाती आलेली करकरीत कैरी जशी तिखटमीठ लाऊन खावी अन् घासागणिक तिची आंबट चव आणखी वाढत जावी तशी ही भुतावळीची गोष्ट वर्षानुवर्षे अधिकाधिक प्रभावी होत गेली अन् गावापासून ते मुख्य सडकेपर्यंतच्या जंगलाच्या या वाटेवरल्या जवळपास मध्यावर येणारी ही चिंचेच्या झाडाची जागा हळूहळू पूर्णपणे शापित अन् झपाटलेली अशी 'चिंच्या भगिनींची' जागा म्हणून ओळखली जाऊ लागली..!

म्हातारबाबा सोबत बोलण्याच्या नादात आपण कुठं आलोय आणि तेही अश्या भयाण रात्रीच्या वेळी, हे लक्षात येताच सदाच्या चेहेऱ्यावर भीती पसरू लागली. रानतले अस्सल थंड वारे अंगाला झोंबत असूनही त्याच्या कपाळावर घामाचे थेंब उभारू लागले.

'मायला, नाम्याच्या घरी उगीच इतकायेळ दारू ढोशीत बसलो ! लवकर निघाय पायजे व्हतं. आत्ता ह्यायेळी ह्या रानात अडकून पडायची बारी आली नस्ती राव... आन त्यातनं हा सगळा इलाका साल्या त्या चिंच्या भइनिंनी पिसाटून सोडलेला इलाका..! ह्या अश्या टायमाला धरलं यखादीनं तर..?!!' विचारासरशीच त्याच्या हातापायतलं बळ गेल्यासारखं झालं. चाल जराशी मंदावली. सोबतीला चालणारा तो म्हातारबाबा मात्र झपाझप आपली पावलं वाढवत पुढं निघाला होता. सदाला ते बघून जाम आश्चर्य वाटत होतं. जणू काही त्याला त्या आजुबाजूच्या परिसराविषयी काहीच माहीत नव्हतं किंवा माहीत असूनही त्याच्याशी काही देणं-घेणं नव्हतं अन् त्याहून विचित्र बाब म्हणजे म्हातारा एका क्षणानेही तोंड वर करून बघायला तयार नव्हता. जेणेकरून त्याला भीती वाटत आहे का नाही हे तरी सदाला धान्यात आलं असतं. शेवटी न राहवून त्याने त्या म्हाताऱ्याला विचारलंच...
"आवं बाबा, कुठ निघाले इतक्या घाईत? ही जागा ठाव हाय नव्हं कोनाची हाय ? भ्या नाय वाटत व्हय तूमास्नि ?", सदा म्हणाला. त्याला वाटलं म्हातारा निदान आता तरी वर मान करून बघेल. पण छे ! म्हाताऱ्यानं चुकून सुद्धा किंचितभर मान वर करून पाहिलं नाही. आजुबाजूच्या गर्द काजळी अंधारात त्या सैतानासारख्या पसरलेल्या चिंचेकडे मान वर करून बघण्याचीही सदाची हिम्मत होईना. न जाणो आपली नजर झाडावर लटकणाऱ्या 'कुणावर' पडायची अन् येऊन बसायचं की ते मानगुटावर !

"आरं कसली भूतं नि कसली भीती ! सब झूट असतंय", म्हातारा डोकं हलवत म्हणाला. क्षणभर तर त्याचा आवाज एखाद्या खोल घळईतून आला असाच सदाला भास झाला.

बोलता बोलता अखेर ते अवाढव्य चिंचेचं झाड मागे सरलं तसा भीतीनं जीव मुठीत धरून चालणाऱ्या सदाच्या जिवात जीव आल्यासारखा झाला. मनावरची भीती थोडी का होईना कमी झाली तेव्हा त्याला बरं वाटलं. तो म्हातारा मात्र आपल्याच तारेत झपाझप चालत होता. अगदी क्षणभराची उसंत घेण्यातही त्याला वेळ दवडायचा नव्हता. त्याच्या बरोबरीनं चालता चालता सदाची मात्र आता दमछाक होऊ लागली होती. बाबा जराही थांबायचं नाव घेत नव्हता. त्याच्या त्या वेगाचं सदाला मात्र भलतंच नवल वाटत होतं. 'इतल्या रातीची कुठली गाडी गाठायची या बाबाला ?' त्याला वाटून गेलं.
अखेर सदाचं लक्ष म्हाताऱ्याच्या हातातल्या वस्तूकडे गेलंच....
आडव्या गोणीवर धरलेली अन् तश्याच दुसऱ्या गोणीखाली झाकून ठेवलेली ती गोलाकार वस्तू बघून सदाला नवल वाटलं. हातातली ती वस्तू म्हातारा अगदी काळजीपूर्वक धरून चालत होता.

"म्हातारबा येक इचारू का? काय धरलंय ह्ये हातात ? काय भाजी-पाला घिऊन जाताव का?", सदाने विचारलंच...

इतकावेळ फारसं काही बोलण्यात स्वारस्य नसणाऱ्या म्हाताऱ्याने अखेर आपलं मौन तोडलं..
"हे व्हय, आरं हे लय महत्वाची वस्तु हाय.. माझ्या जीवपेक्षा बी किमती गोष्ट हाय", म्हातारा घसा खांकरून म्हणाला. पुन्हा तोच घळईतून आल्यासारखा खोल आवाज...
सदा चपापला !
'मायला, म्हाताऱ्यानं काय सोनं-नानं लपीवलं का काय पोत्यात ?!' सदा मनातल्या मनात म्हणाला.

"पर नक्की हाय काय ते ?", पोत्यावरली ती गोष्ट काय आहे हे समजेपर्यंत सदा काही म्हाताऱ्याची पाठ सोडणार नव्हता..
म्हातारा तरी कुठं खुलवून काही सांगत होता ? अंधारात मागून अचानक उपटलेला हा पोरगा बघून म्हाताऱ्याचीच कदाचित दातखिळ बसली असावी आणि वर हा पोरगा अडून-अडून 'भूता-खेतांची भीती वाटते का?' असं विचारत होता. न जाणो हाच भूत असला तर ?!!.. 'या अश्या भयंकर अंधाऱ्या जंगलात, काट्याकुटयांची वाट तुडवतांना सोबतीला हा असा अनोळखी माणूस असणं ज्याचा काही क्षणांपूर्वी मागमूसही नव्हता' या विचाराने कदाचित म्हातारा घाबरला असावा पण पुन्हा ते त्याच्या चेहेऱ्यावर दिसते का हे सांगण्याची सोय नव्हती. आसपासच्या काळोखाने अन् उरल्या-पुरल्या त्या जाड काळ्या घोंगडीने त्याच्या चेहेऱ्यावरची रेघही दिसणं मुश्किल होतं..!

"हां ?", सदाने पुन्हा विचारलं.

"हे ना? .. ही.. ही कुणाची तरी अमानत हाय.. लय खास.. लय किमती... ", काहीसं हसत म्हाताऱ्याने उत्तर दिलं. आतल्या वस्तूवर झाकलेली गोणी पुन्हा नीट केली आणि पावलांची गती आणखीन वाढवली.

त्याचं ते वाक्य ऐकून सदाची मात्र पक्की खात्री झाली. 'म्हातारा नक्कीच काय तरी घबाड घेऊन चाललाय.' त्याच्या डोक्यातलं विचारांचं जाळं गडद होऊ लागलं, कुठतरी त्याच्या मनात एक दुष्ट कल्पना जन्माला येऊ लागली.
'समजा.. अगदी समजा, आपुन ह्या म्हाताऱ्याला अडीवलं अन् घेतलं ते पोतं हातातनं काढून त काय करनारे म्हातारं !! आवाज केला जास्ती त द्यायचा टकूऱ्यात टोला ठिवून अन् जायचं पळून.. च्या मारी एवढं मोठालं घबाड घावल की एका फटक्यात.. नक्कीच काय त पैसं नाय त दागिनं असत्याल लपवून ठिवलेले !' मनातले विचार पार शिखर गाठायला लागले तसं सदाने त्यांना कसंबसं अडवून धरलं.

'न्हाय न्हाय सदा.. हे गलत हाय.. असं चोरी करून पळून जानं पाप हाय... बिचारं म्हातारं.. त्याचं त्याचं चाललंय आपापल्या वाटेनं.. कशाला ह्यो पाप.. अन् तसं बी, या अंधारल्या वाटेवर त्येच त येकटं सोबती हाय' सदाच्या मनात विचार आला...


रात्र क्षणाक्षणाला गडद होत होती. हाडं गोठवणाऱ्या वाऱ्याने आजूबाजूच्या झाडावरच्या पानांची विचित्र सळसळ आणखीनच वाढवली होती. मध्यरात्रीचा बहर सर्वशक्तिनिशी शिगेला पोहोचला होता. रात्रीच्या भीतीने पूर्णिमेचं चांदणंही काळ्याकुट्ट अंधाराच्या चादरीखाली लपून गुडूप झोपून गेलंसं वाटत होतं. फांद्यांवरील पानांचा होणारा आवाज, अन् या दोघांच्या पायाखाली चिरडणाऱ्या पाचोळ्याव्यतिरिक्त तिथे आणखी कुठलाही आवाज होत नव्हता. सारं जंगल एखाद्या महाकाय अजगरासारखं शांत, निपचित पडून होतं... दबा धरून बसलेल्या शिकाऱ्याप्रमाणे सावजाची वाट बघत...

बघता बघता दोघांनी मिळून निम्म्याहून अधिक अंतर सर केलं होतं. म्हातारा आपल्याच तारेत अन् सदा मनात येणाऱ्या भल्याबुऱ्या विचारात हरवत रस्ता तुडवत होते. बऱ्याच वेळेपासून दोघात काहीच संभाषण होत नव्हतं. चालता चालता सदा चोरट्या नजरेने म्हाताऱ्याच्या हातात धरलेल्या त्या वस्तूकडे पाहत होता. कितीही समजावलं तरी मनाच्या कुठल्या न कुठल्या कोपऱ्यातून तो भयंकर विचार सदाच्या डोक्यात घोळका करत होता. म्हातारा बिचारा निमूटपणे झपाझप पावलं टाकीत अंतर कापण्याचा प्रयत्न करत होता.

मनातला विचारांचा कोलाहल अन् बाहेरची जीवघेणी शांतता मोडून काढण्यासाठी सदाने परत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली...

"बर बाबा, शेतमळा हाय का काही ? का कसाय जाताव कुनाकडं ?" सदा.

"बापाकड व्हती चार येकर, आक्कांच्या लग्नापायी कर्जपानी केलं सावकाराकडं... अन् स्वता गेलं मरून... जमीन गेली त्या हरामखोर पाटलाच्या घशात... कायमची... तवापासनं राबतोया मांज्याच जमिनीवर.. अन् पैकं जातंय पाटलाच्या खिचात.. कर्ज फिटेस्तवर... ", म्हाताऱ्याच्या शब्दा-शब्दातून राग आणि दुःख व्यक्त होत होतं.
यावर सदा काहीच बोलला नाही.

जसजशी जंगलाची वाट सर होत होती तसतशी सदाच्या डोक्यातली ती भयंकर कल्पना आणखी आणखी जोर धरू पाहात होती. त्याने कितीही विरोध करायचा प्रयत्न केला तरी पुन्हा तेच विचार त्याच्या मनात उफाळून येत होते.

एव्हाना बारगावाची वेस जवळ येत चालली होती. 'जे काही करायचं ते आत्ताच ! एकदा गावाची सीमा ओलांडली की, तिथून पुढे मात्र काहीच करता येणार नव्हतं !', बघता बघता त्याच्या डोक्यात तो विषारी बेत शिजू लागला. आजारी बाप, घरात बसलेली लग्नाची बहीण, शेतात नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी म्हणून सावकाराकडून घेतलेलं कर्ज या साऱ्या गोष्टी त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागल्या. 'म्हाताऱ्याचं हे जे काही घबाड हाती लागेल ते विकून पुष्कळ पैका उभा करता येईल.. शंभर टक्के सोनं-नाणंच असेल..' त्याच्या मनात विचार आला. चालता चालता सदाचं लक्ष सारखं म्हाताऱ्याच्या हातातल्या वस्तूकडेच जात होतं. विचार तर पक्का झाला होता आता फक्त त्याची अंमलबजावणी करायची बाकी होती. इतकावेळ बडबड करणारा सदा आत्ता मात्र अगदी शांतपणे, बेरकीपणे चालत होता. डोक्यात तर पुष्कळ योजना तयार होती पण हात मात्र बर्फासारखे गार पडले होते. म्हाताऱ्याचं मानगुट धरून ते पोतं हातातून काढून घेण्याची त्याची हिम्मतच होईना... विचारांना कृतीत उतरविण्याची वेळ आली तेव्हा हात गळून पडायला लागले. 'करू का नको करू' अशी त्याच्या मनाची द्विधा मनःस्थिती झाली. पाप-पुण्य या संकल्पनांची किंमत मनाने पार मातीमोल ठरवली आणि त्याक्षणी त्याने  निग्रह केला ! आत्ता जे होईल ते होईल.. हे पोतं घेऊन पळ काढायचा म्हणजे काढायचाच..!

मनात निश्चय झाला, मेंदू सर्वंशक्तिनिशी कार्यान्वित झाला आणि त्यासारशी चालणारा सदा गपकन जागच्या जागी चालायचा थांबला ! म्हातारा मात्र आपल्याच तंद्रीत दोन-चार पावलं पुढे गेला. त्याच्या तर गावी गोष्ट नाही की, आपल्या बरोबरीने चालणार हा भंपक पोरगा मनात हे असले काही भयंकर विचार घेऊन आपल्या सोबतीने चालत असेल.
दोन-चार ढेंगा पुढे जाऊन तोही थांबला आणि त्याने मागे वळून त्या मुलाकडे मान फिरवली.
"थांबला का रं ? चल की ", म्हातारा सदाला म्हणाला.

तरीही सदा जागचा हलला नाही.
हळूहळू सदाच्या चेहेऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. वेडपट, बडबड्या सदाच्या जागी आता कठोर, निग्रही चहऱ्याचा सदा उभा दिसू लागला.
"अय म्हातारबा, गप गुमानं ते पोतं माझ्याकडं द्यायचं नायतर हितंच गाडीन जीत्ता !", आवाज चढवत सदा म्हाताऱ्याच्या अंगावर अक्षरशः किंचाळला. त्याचा तो भयंकर पवितत्रा बघून म्हातारा केव्हाच मान मोडलेल्या बगळ्यासारखी हातातली पिशवी खाली टाकून देईल आणि पळ काढेल नाहीतर हात जोडत जिवाची भीक तरी मागेल, असं सदाला वाटलं पण म्हातारा मात्र तसूभरही जागचा हलला नाही.
सदाने क्षणभर त्याच्या चेहेऱ्याचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु सभोवती दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधाराने त्याला म्हाताऱ्याच्या चेहेऱ्यावरची रेघही दिसू दिली नाही !
सदाने पुन्हा एकदा आवाज चढवला. " म्हाताऱ्या जास्त शानपट्टी करू नको, गपगुमान पोतं खाली टाक नायतर तुझं काय खरं नाही !"
तरीही म्हातारा ढीम्मच !
आता मात्र सदा वैतागला. हा म्हातारा आपल्याला घाबरत कसा नाहीये हे त्याला कळेना. 'एव्हाना त्याच्या जागी जर दुसरं कुणी असतं तर केव्हाच जिवाच्या भीतीने पोतं फेकून पळून गेलं असतं', त्याच्या मनात विचार आला.

"दुसरं कुनी असतं तर गेलंच असतं पळून... पर म्या ?! हिहीहीssss ", एकाएकी म्हाताऱ्याच्या तोंडातून शब्द फुटले आणि एखादी काच खळकन फुटावी तसा म्हातारा चिरकत हसला. काळोखात दाटून आलेला शांततेचा गहिरा डोह त्या आवाजाने तळापासून अगदी ढवळून निघाला. रिकाम्या खोलीत घुमणारा आवाज जसा आपल्याच अंगावर येऊन धडकावा तसं ते म्हाताऱ्याचं विकृत हास्य चहू बाजूंनी येऊन सदाच्या कानांवर आदळलं.
सदा ते ऐकून नखशिकांत हादरला. गप्प असलेला म्हातारा असं अचानक बोलेल याची त्याला शंकाही नव्हती.

'मायला, याला आपल्या आपल्या मनातलं कसं काय ऐकू गेलं?" तो मनातल्या म्हणतो न म्हणतो तोच म्हातारा पुन्हा एकदा कर्कश चिरकला...
"हिहीहीहीsssss मला सगळं ठाव हाय, मला सगळं माहीत हाय", आता मात्र सदा पूर्णपणे हादरला. 'म्हातारा नक्कीच काहीतरी चेटूक-बिटूक जाणत असावा..' सदाला शंका आली. याला आपल्या मनात काय चाललंय हे कळलंच कसं ??'.... म्हाताऱ्याचा तो एक न एक शब्द ऐकून कुणीतरी आपल्या कानात गरम उकळतं तेल ओततंय असाच त्याला भास झाला.
तरीही सदा माघार घेणाऱ्यांपैकी नक्कीच नव्हता. 'कितीही केलं तरी मी एक उमदा तरुण गडी आणि माझ्यासमोर हा म्हातारा म्हणजे कीस झाड की पत्ती !', त्या विचारासरशी त्याच्या अंगात थोडं का होईना बळ संचारलं. वेळ आली तर म्हाताऱ्याला आपण एका मुठीत गार करू शकतो; हा विश्वास त्याला वाटला. 'आता काहीही झालं, म्हाताऱ्याला उडवायची जरी वेळ आली तरी मागे हाटायचं नाही, हाती आलेली अशी ऐती संधी बिलकुल सोडायची नाही !', त्याने मनात निश्चय केला...
"दात काय काढतो रे म्हाताऱ्या, त्वांड बंद कर नायतर एका बुक्कीत खल्लास करीन तुला !! गप गुमान पोतं हिकडं दे नायतर फुकाट जीवाला मुकशील !", सदाने बिनधोकपणे म्हाताऱ्याला धमकी दिली. 'आता सरळ येईल बेनं !' तो मनात म्हणाला.
त्याची ती धमकी ऐकून म्हातारा दुप्पट मोठ्या आवाजात चिरकून हसायला लागला ! त्याचं ते काळीज चिरून टाकणारं गडगडाटी हास्य ऐकून तिथल्या प्रत्येक झाडचा थरकाप उडाला. उभ्या रानात त्या विचित्र हास्याने काहाळी माजवली ! मुसळधार पावसात सौदामिनीने आभाळात आपला तांडव माजवावा त्याप्रमाणे म्हाताऱ्याचं ते गडगडाटी हास्य संबंध आसमंतात दुमदूमलं !

"तू..?! हिहीहीहीssss... तू मारनार व्हय मला ?? म्या कोन हाय आंन तू कुठं वूभा हाय माहीत हाय का तुला ??!" म्हातारा एका क्षणात जागा बदलून सदाच्या पुढ्यात हजर झाला आणि वाकून हळूच त्याच्या कानात म्हणाला. त्याचा तो चिरका किनरी आवाज कानात शिरताच असंख्य जहरी इंगळ्यांनी चावा घ्यावा अन् ती वेदना क्षणात शरीरातल्या नसानसांत भिनावी, तशी सदाची अवस्था झाली. त्याच्या आवाजाने सदाच्या अंगावरचा एक न एक केस उभा राहिला. निमिशमात्रात तो म्हातारा आपल्या पुढ्यात कसा काय उभा ठाकला हे सदाला कळेना. आता मात्र त्याचं पूर्ण अवसान गळालं. काळोखाने गच्च भरलेल्या त्या अवकाशात पाच-दहा पावलं दूर असणारी म्हाताऱ्याची काळी काया क्षणार्धात त्याच्या पुढे उभी अवतरलेली बघून सदाने मनात जमवून गोळा केलेली सारी हिम्मत एकाच क्षणी मातीच्या मडक्याप्रमाणे खळकन फुटली. सदाच्या उभ्या अंगाला इतक्या गारठ्यातही सडकून घाम फुटला ! 'हे प्रकरण दिसतंय तसं नाही अन् हा म्हातारा माणूस नक्कीच नाही !', याची सदाला पुरेपूर जाणीव झाली. इतकावेळ घशातून निघणारा मग्रूरासारखा जरबी आवाज आता मात्र घशातून फुटेनासाच झाला. सदा भयंकर घाबरला. झटक्यात तो दोन पावलं मागं सरकला !

त्याच क्षणी आभाळात एक अतिभयंकर वीज कडाडून उठली अन् त्या क्षणभराच्या तीव्र प्रकाशात म्हाताऱ्याच्या चेहेऱ्याचं रूप बघून सदाचा प्राण अक्षरशः त्याच्या घशात उसळून आला..! लांबूडकी काळीकंच कवटी, तिला संबंध चिकटलेली सडकी लालभडक मांसाची लक्तरं, पांढराशिप्पट पडलेला लाल बुबुळचा- पिवळ्या किनारीचा एकच बीभत्स डोळा, दुसरी खोबणी पूर्ण रिकामी, तोंडाच्या जागी प्रकाशात चमकणारे असंख्य तीक्ष्ण, अणुकूचीदार सुळे अन् त्यांची दाहकता वाढवणारं, त्याच्याकडे बघत वासलेलं भयंकर किनारी विकट हास्य...! साक्षात मृत्यूचं ते भयाण रूप बघून सदा क्षणभर स्तब्ध झाला ! एक अक्षरही त्याच्या तोंडून फुटेना... पुढ्यात उभ्या त्या भयाणाने डोक्यावर पांघरलेली ती काळी घोंगडी एका हाताने हळूहळू सरकवत काढून टाकली अन् त्याच्या बीभत्स रुपाचं संपूर्ण दर्शन होताच सदाच्या काळजाचा भीतीने ठोकाच चुकला ! त्याच प्रकाशात त्याला बाजूला उभं आडदांड तेच ते 'चिंच्या भगिनींच्या' इलाक्यात उभं अवाढव्य चिंचेच झाड दिसून आलं..! चकवा ! भर मध्यरात्रीचा रानतला चकवा ! सदा चांगलाच सटपटला...

"आता समजलं व्हय कोन हाय म्या ? हिहीहीssss आरं म्याच हाय या रानाची अमानत, म्याच हाय रातीचा धनी, म्याच हाय या चिंच्या भइनिंची भूतं अन् म्याच हाय या रानाचा राजा- काळा चकवा !!.... कवाच वळखलं व्हतं मी, तुझ्या मनातलं पाप... असहाय म्हातारं दिसलं कि लुबाडा त्याला, परकी अमानत दिसली, येकटीदुकटी बाई दिसली की वरबाडा तिला... ही असली घानेरडी फितरत हाय तूमा मानसांची... हाटss... वाटच बघून व्हतो म्या... कधी तू मला धमकावतो ते... पापं कराय जी घाबरत नाय ना तुमचं..!? मग आता मरायला बी तयार राहा !! हिहीहीहीssss", कर्कश आवाजात चिरकत ते पिशाच्च सदाच्या दिशेने येऊ लागलं. भीतीने वेडापीसा झालेला सदा ततपप करत एक एक पाऊल मागे सरकायचा प्रयत्न करू लागला पण एकही पाऊल जागचं हालेना ! भीतीने त्याची पावलं जागच्या जागी गोठून पडत होती..!

"आनं कवाधरनं तुझा डोळा व्हता नं या पोत्यावर ? बघ आता काय हाय त्यात" म्हणत त्याने त्या वस्तूवर झाकून घातलेली गोणी खसकन बाजूला काढून भिरकावली तांब्याचं गोलाकार वेष्टण बाजूला केलं... आणि त्यात ठेवलं होतं साक्षात मृत्यूचं अस्त्र ! "ह्याला म्हनत्यात 'कालीअस्त्र' ! तुझ्यासारख्या नराधमांच्या नरडीचा घोट घेन्यासाटी बनवलं हाय हे !", ते पिशाच्च पुन्हा चिरकलं. निमुळत्या लाकडी दंडावर जोडलेलं रुंद, वळीव तीक्ष्ण धातूचं पातं. एकाच वारात देहाचे तुकडे तुकडे करणारं एक प्राचीन, निर्दयी नामचीत अस्त्र !
दोन्ही हाताच्या मुठीत लाकडाचा दंड धरून त्या पिशाच्चाने ते अस्त्र वर उंचावून धरलं अन् काळीज भेदून टाकणारी एक जोरदार आरोळी दिली आणि त्याक्षणी अवकाशात कडाडलेल्या विजेच्या लख्ख प्रकाशात त्याचं ते भयंकर रौद्र रूप सदाच्या भीतीने वासलेल्या डोळ्यांत परावर्तित झालं !

"न्हायsss माफ कर मला, माझं चुकलं.. मला मारू नको.. म्या पुन्यांदा असं करनार न्हाय..", भीतीने रडत, गयावया करत सदा एक एक पाऊल मागे मागे जाऊ लागला. मध्येच एका दगडाला लागून पायाला ठेच लागली आणि तोल जाऊन तो धप्पकन जमिनीवर आपटला. तसाच हातांनी खुरडत खुरडत मागे सरकू लागला.

"हे हे ब बघ बाबा, म म माझं चुकलं, म्या असं कराय न्हाय पायजे व्हतं.. पन, पन देवा शप्पथ, म्या पुण्यांदा असं कधी बी करणार नाय मला सोडून दे, मला मारू नको" सदा गयावया करत रडत म्हणाला.

"हम्मssss आस्सं म्हनतोस ? मग एक काम करू, आपुन आता लपाछुपीचा खेळ खेळू.. तू रानात लपनार अन् म्या तुला शोधायला येनार..! जर तू मला सापडला नाय तर तुझी जान म्या माफ केली अन् जर तू मला घावला तर मातर हाल हाल करून तुझ्या नरडीचा घोट घेईल म्या... बोल... हाय कबूल ? हिहीहीहीsssss " चकवा पुन्हा चिरकला.

ते ऐकून सदाला आपला जीव वाचण्याची थोडी तरी आशा वाटू लागली. कसं तरी करून गावाची वेस ओलांडून गावात प्रवेश करायला हवा होता. एकदा का गावात पाय ठेवला की या भयंकर मृत्यूचक्रातून त्याची सुटका होणार होती. त्याला स्वतःचा जीव वाचविण्याची पुसटशी का होईना संधी मिळाली होती.
तसंच डोळे पुसत तो क्षणात उठला.
"म्या म्या तयार हाय ", जीवात उरलीसुरली सारी हिम्मत करून तो म्हणाला.

"हिहीहीहीsssss आत्ता कसं !.. आता जा लप तू.. म्या ईसपर्यंत आकडे मोजनार अन् तुला शोधायला येनार ! बघू तरी कुठपर्यंत पळतो तू माझ्या तावडीतून... अन् एकदा का सापडला की....! हिहीहीहीsssss", सदाच्या काळजात धस्स झालं..! त्याला एक क्षण वाटलं, करावे एकदाचे डोळे बंद अन् जावं सामोरं साक्षात मरणाला ! पण मेंदू मानायला तयार नव्हता. सुटकेची संधी सोडायला तयार नव्हता !

"ठीक हाय" कसं बसं सदा म्हणाला आणि त्यानी काळोखाने खच्च दाटलेल्या त्या रानात गावाच्या दिशेनं जीव खावून धावायला सुरुवात केली. तो पळाला त्या वाटेकडे बघून ते पिशाच्च जिवणी वाढवून कुत्सित हसलं ! कोपऱ्यातले अणुकूचीदार सुळे लक्कन चमकले..! मान वळवून त्याने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला आणि आकडे मोजायला सुरुवात केली..

"येक .... दोन .... तीन .... !"

आघात केलेल्या अजस्त्र नगाऱ्याच्या खोल गर्भातून जसा नाद घुमून यावा आणि संबंध आसमंतात त्याच्या लहरी पसराव्या त्याचप्रमाणे त्याचा आवाज जंगलाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून घुमू लागला. पळून पळून बऱ्याच लांबवर आलेल्या सदाच्या कानांवर अजूनही तो आवाज पडत होता. जितका तो वेगाने पळत होता त्याच्या दुप्पट वेगानं तो आवाज अंतर कापत त्याच्या कानांवर धडकत होता. जसा की अगदी फुटभर अंतरावरूनच येत असावा ! तो आवाज ऐकून सदाने आपला वेग आणखी आणखी वाढवला. अंगाखांद्यावरून घामाच्या धारा निखाळत होत्या, डोळ्यांतून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.. तसाच पळत-धडपडत, ठेचकाळत वाट फुटेल तिकडे सदा धावत होता, त्याला आता कशाचीच पर्वा राहिली नव्हती. काहीही करून त्या पिशाच्चापासून आपला जीव त्याला वाचवायचा होता. गावाची वेस गाठायची होती. तिथं सैतानाचं राज्य संपत होतं..!

काट्याकुटयांनी भरलेल्या, अंधारलेल्या वाटेवर सदा जीव खाऊन पळत होता अन् इकडे त्या पिशाच्चाचे अखेर आकडे मोजून झाले !
"यकोनिस .... ईस .... आलो म्या ! हिहीहीहीsssss" दात विचकून हसत त्याने आपली मान वर केली... पुन्हा एकदा गडगडाटी गर्जना केली अन् जी मोठ्ठी उडी घेतली ती थेट तिथे उभ्या एका उंच, आडदांड झाडाच्या शेंडयावरच ! मध्यरात्रीच्या काळोखाने भारलेल्या त्या भयाण रानात एका शेंडयावरून दुसऱ्या शेंडयावर उंच झेपा घेत ते पिशाच्च कर्कश चिरकत सदाचा पाठलाग करू लागलं. त्याचा ती काळीज भेदणारी गर्जना अवघ्या जंगलात घुमली..!

आभाळातून भूमीवर अवतरू पाहणाऱ्या चंद्रकिरणांच्या प्रकाशात तो भयंकर सैतान आपल्या सावजाचा पाठलाग करत सुसाट वेगात झेपा घेत येत होता. 'कसं तरी करून गावाची वेस ओलांडून गावात प्रवेश करायला हवा', सदाने मगाशी मनात केलेला विचार त्याने केव्हाच ऐकला होता. सदाचा मनसुबा त्याला केव्हाच ठाऊक झाला होता. 'पळून पळून कितीक पळतंय.. म्याच बघतो हिहीहीहीssss ' कर्कश आवाजात पुन्हा एकदा ते खिंकाळलं.

पळून पळून धाप लागलेला सदा अखेर एका मोठ्या वडाच्या झाडापाशी येऊन थांबला. खोडाचा आधार घेत त्यानं श्वासोच्छवास शांत करायचा प्रयत्न केला. दोन-पांच सेकंद झाल्यावर मग कुठं त्याला समोरचं चित्र दिसायला लागलं. 'त्या' चिंचेच्या झाडपासून पळत आल्यापासून आत्ता बऱ्याच अंतर कापून झालं होतं. एव्हाना गावाची वेस अंधुकशी का होईना नजरेस पडायला हवी होती. काळोख्या वाटेवर त्याने डोळे ताणून दूर दूर पर्यंत नजर फिरवली. अजूनही गावच्या वस्तीचे पुसटसे सुद्धा दिवे नजरेस पडत नव्हते. सदा मनातून चपापला. 'देवा, रस्ता हुकलो का काय म्या ?!' मनातल्या विचारसारशी त्याच्या काळजात धस्स झालं. पण ते शक्य नव्हतं. ही रानतली वाट त्याच्या नेहमीच्या पायाखालची होती. फरक फक्त इतकाच होता की रात्रीच्या ह्या अश्या भयाणवेळी मरणाचं संकट मागावर असतांना जंगलाची वाट सर करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती !
भीतीचं सावट पुन्हा त्याच्या मनात घर करू लागलं. त्याला शंका आली. 'पुन्हा चकवा !!'.. क्षणात त्याच्या मनात भीतीचा स्फोट झाला. त्याचवेळी त्याच्या कानांवर एक कर्कश कर्णभेदी आरोळी पडली. सावजाचा खतमा करण्यासाठी साक्षात सैतानच सर्वशक्तिनिशी वेगात अंतर कापत होता..!

'आता पळून अर्थ नाही' सदाच्या डोळ्यांत पाणी आलं. 'आता आपला अंत निश्चित आहे !', मनाने जाणलं !

तसंच होलपडत तो आजुबाजूच्या मोठ्मोठ्या झाडांमध्ये त्या सैतानापासून आपला जीव वाचविण्यासाठी, लपण्यासाठी जागा शोधू लागला. रात्रीच्या अंधारात निटसं दिसणंही मुश्किल होत होतं.
प्रत्येक झाडाच्या बुंध्याला हाताने चाचपडून बघता बघता अचानक त्याच्या हाताला एका मोठल्या वडाच्या झाडाची रिकामी ढोली लागली. त्याने वाकून तसंच हाताने आणखी चाचपडून बघितलं. जेमतेम एका लहान मुलाला व्यवस्थित बसता येईल एवढीच त्या ढोलीची रुंदी होती. सदाने झटक्यात आपलं अंग कसंबसं आकसून घेतलं अन् त्या ढोलीत कसाबसा वाकून लपून बसला. हातांचं कडं करून पाय पोटाशी घट्ट धरले. श्वास रोखून तो पुढं घडणाऱ्या भयनाट्याची वाट बघू लागला !
पाच दहा सेकंद होतात न् होतात तोच त्यांच्या कानांना आजुबाजूच्या पानांची विचित्र सळसळ ऐकू आली. मुसळी मारून जनावर गवतात-झाडीत घुसावं तसा धसमुसळा आवाज त्याच्या कानांवर पडू लागला. जसे की कुणीतरी त्या झाडा-झुडुपांना खिसखिस करून हलवत होतं. त्यांच्या मुळाशी काय दडले हे बघण्याचा प्रयत्न करीत होतं.
निसंशय चकवा तिथं अवतरला होता ! भीतीने सदाच्या डोळ्यांतून अश्रूंची एक धार ओघळत त्याच्या हातांवर विसावली. भरलेल्या डोळ्यांत त्याला आपला भयानक मृत्यू दिसू लागला, अनाहूतपणे एक हुंदका घशातून बाहेर पडला अन् त्याक्षणी त्यानी आपलं तोंड हाताने गच्च आवळून धरलं !

"आलो रं म्या, कुठं लपला हैस ? ये बघू भाइर.. इथ का ?.. इथं का ?.." छद्मी आवाजात चिरकत ते पिशाच्च प्रत्येक झाडाच्या आगेमागे बघत होतं. झाडांच्या बुंध्यापाशी उगवून आलेल्या झाडीतून ते धारदार हत्यार फिरवत ती झाडी पार अस्ताव्यस्त करून टाकत होतं !
इकडे सदा आपला जीव मुठीत घेऊन ढोलीत लपून बसला होता. इंचभरही हालायची सोय नव्हती अन्यथा जर त्या पिशाच्चाच्या कानांवर जरासा जरी आवाज पडला तरी क्षणात त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होणार होते. तोंडावर हात घट्ट दाबून धरत सदा आजुबाजूच्या परिसरात होणाऱ्या अगदी बारीकश्या आवाजाचा मागोवा घेऊ पाहत होता. काजळी काळोखात डोळ्यात बोट घालून बघण्याचा प्रयत्न करत होता
आणि...
धप्पsssss....
पापणी लवायच्या आत खुद्द सैतान त्याच्या पुढ्यात झेप घेऊन दात विचकत उभा ठाकला ! सदाचा श्वास भपकन त्याच्या छातीतच अडकला..! डोळे विस्फरले..! तोंडातून एक शब्दही फुटेनासा झाला..! भीतीने चेहऱ्यावरचा रंगच उडाला..!

"सापडला .. आता कुठं जाशील ?? हिहीहीहीssss" त्याचा किनरी आवाज सदाच्या कानात घुमू लागला.. हाता-पायांतलं उरलं सुरलं त्राणही संपून गेलं. क्षणात आपल्या अक्राळविक्राळ पंज्याने सदाचं बखोटं धरून त्याने त्याला खस्सकन ढोलीच्या बाहेर ओढून मोकळ्या जागेत फेकलं !
"मम म न नको म मा मारू मला" सदा फक्त एवढंच बोलू शकला. त्याचा सगळा जीव त्याच्या दोन्ही डोळ्यांत साकाळून आला होता. सैतानाकडे बघून आपल्या जिवाची तो भीक मागू लागला. आता मात्र सुटका नव्हती. अवाढव्य पात्याचं ते धारदार हत्यार उगारून साक्षात सैतान त्याच्या दिशेने एक एक पाऊल वाढवत येत होता..!

"आता तुजा खेळ संपलाssss पापं करनाऱ्या एका बी हरामखोराला हा चकवा ह्या रानातून जित्ता जाऊ देणार न्हायsssss " कर्कश किंचाळत त्याने उगारलेलं ते भयंकर कालीअस्त्र क्षणात खाली घेतलं अन् खसकन ते अख्खं च्या अख्खं पातं सदाच्या छातीत आरपार घुसवलं..!! छातीच्या पिंजऱ्याची हाडं काडकाड मोडली तशी काळीज चिरून टाकणारी आर्त किंकाळी सदाच्या तोंडून बाहेर पडली....! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सदाच्या शरीराने शेवटचे दोन आचके दिले अन् खुद्द सैतानाचं प्रतिबिंब उतरलेल्या त्याची डोळ्यांची पापणी क्षणार्धात झटका लागून बंद झाली...!

तडफडणाऱ्या त्याच्या शरीराची हालचाल थंड झाली तशी सैतानाने भयंकर हसत जोरदार गर्जना केली अन् सदाचं ते निश्चल पडलेलं शरीर खांद्यावर उचलून एका क्षणात तो हवेत विरून गेला.....

 


पूर्वेची प्रभा उजळून येत होती... पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताचे सोनेरी सूर्यकिरण हळूहळू भूमीवर येऊन विसावत होते...

मध्यरात्रीच्या कटुवेळेत धरणीवर खेळलेला हा रक्तरंजित खेळ बघून धास्तावलेला चंद्रमा आत्ताकुठे विसाव्याला गेला होता. रात्री घडून गेलेल्या भयाण घटनेच्या पडसादांचा साधा मागुमूसही मागे उरला नव्हता. न जाणो अशी कैक अमानवी रहस्य पोटात दडवून ठेवत, वरून निरागसतेचा बूरखा ओढून घेतलेलं ते रान आता मात्र शांत, निपचित पाडून होतं....

***

पौर्णिमेचं टिपूर चांदणं संबंध आसमंत व्यापून टाकीत होतं. सर्वशक्तिनिशी भूतलावर प्रकाश पसरविणारा चंद्रमा आपल्या श्वेतप्रभेची मुक्त उधळण करीत रात्रीच्या गहन अंधाराला छेदण्याचा प्रयत्न करीत होता. गडद काळ्या आकाशातून परावर्तित होणाऱ्या त्या सफेद-निळसर चंद्रप्रकाशात रस्त्यावरच्या मोठमोठ्या झाडांच्या सावल्या काळ्याकभिन्न दिसत होत्या. थंडगार वाऱ्याची झुळूक त्यांच्या प्रत्येक पानांना हलकासा स्पर्श करून जात होती. त्यातून निर्माण होणारी पानांची विचित्र सळसळ रात्रीची गहन शांतता हळूच भंग करू पाहत होती...

मध्यरात्रीचे साधारण दीड-दोन वाजत आले असावेत...
त्या निर्मनुष्य रस्त्यावर आपली पावलं झपाझप टाकत हरी, किशाबा आणि रघू निघाले होते. शेजारच्याच वाडीतल्या गावजत्रेत आज त्यांनी पोट फुटेस्तोवर दारू ढोसली होती अन् परतीच्या वाटेवर आयत्या घावलेल्या त्याच गावतल्या एका एकट्या-दुकट्या बाईला आडोश्याला नेऊन 'मन भरून' उपभोगलं होतं अन् तिथंच टाकून दिलं होतं !

दात विचकून हसत, केलेल्या मौज-मजेची आठवण करत तिघं भेलकांडत भेलकांडत चालत होते. 'बारगाव ६ किमी'ची पाटी ओलांडली आणि तिघांनी जंगलाच्या वाटेवर प्रवेश केला !

एकमेकांच्या सोबतीने दंगामस्ती करत, अश्लील विनोद करत तिघं जंगलाची वाट सर करत होते, आजुबाजूच्या भयाण जंगलाचा त्यांच्या मनावर परिणाम होण्याची काही सोयच नव्हती कारण त्यातल्या एकही जण आपल्या पूर्ण शुद्धीत नव्हता...

शंभर-एक पावलं चालून जातात न जातात तोच तिघांच्याही नजरेला एका पाठमोऱ्या बाईची आकृती नजरेस पडली. या एवढ्या रात्री अश्या गर्द जंगलात ही एकटी-दुकटी बाई बघून तिघं एकमेकांकडे आ वासून बघू लागले. झपाझप पावलं टाकत तिघांनी तिला गाठली. डोळे फाडून तिचं निरीक्षण करायचा प्रयत्न केला...
हिरव्याकंच भरजरी साडीत, चमचमत्या लकाकणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांनी उजळलेलं तिचं देखणं रूप पाहताच तिघं च्या तिघं जागच्या जागी गोठून गेले ! चंद्रप्रकाशात उजळून निघालेली तिच्या सोनेरी कायेवरची बाकदार वळणं ज्याच्या-त्याच्या डोळ्यांना आव्हान देऊ लागली...!
हिरव्या भरजरी शालूच्या पदारखाली बाईने हातात काहीतरी आडवी वस्तू लपवून धरली होती, जसे की एखादा बटवा असावा !
पुढ्यात उभी ती बाई भेदरलेल्या नजरेने आपला पदर सावरत उभी याच तिघांकडे बघत होती.
त्या तिघांनी एकमेकांकडे 'त्याच त्या' सूचक नजरेने पहिलं. त्यांची वखवखलेली नजर तिच्या सर्वांगावरून फिरत होतीच की तेवढ्यात त्यातला किशाबा पुढे आला...

"आवं बाई, कुनिकडच्या म्हनायच्या तुम्ही?, इतक्या रातीच्या येकट्या-दुकट्या कुठ जाताव ?", उसन्या सामंजस्याचा आव आणत त्याने तिला विचारलं.

"म म्या ? म्या जी बारगावलाच जाती हाय की ! आंन तुम्ही कुणीकड जाता ?", कोमल आवाजात तिनं विचारलं तसा तिचा आवाज ऐकून हरी आणि रघूही पुढं झाले !!

पुढ्यात उभ्या त्या चौघांचंही बोलणं तिथे उभी झाडं मुकपणे ऐकत होती... सोबतीला धावणारा वारा जणू घडणाऱ्या भयनाट्याची नांदी ऐकायलाच आतूर होता... काहीकाळ सुरू असलेलं त्यांचं संभाषण ऐकणाऱ्या तिथल्या झाडांना आता मात्र चौघं च्या चौघं सोबत मिळून पुढची वाट सर करतांना दिसत होते... हळूहळू नजरेपासून दूरदूर जात होते...

चालता चालता त्या बाईने क्षणभर वळून पाठीमागे पसरलेल्या अंधारात बघितलं तेव्हा, हसऱ्या ओठांच्या कोपऱ्याआड दडलेला, तीक्ष्ण अणुकूचीदार सुळा चंद्रप्रकाशात लक्कन चमकला...!!

*********************************************************************

समाप्त