सेल्फी विषयी… संदिप खुरुद द्वारा पुस्तक पुनरावलोकने मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सेल्फी विषयी…

           अरविंद जगताप लिखीत व सकाळ प्रकाशनाकडून प्रकाशित झालेलं बहुचर्चित ‘सेल्फी’ हे पुस्तक वाचून पूर्ण झालं. त्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य मनाला स्पर्श करुन जातं. भाजलेल्या मनावर हळुवार फुंकर घालून जातं. वाचता-वाचता वाचक काही वेळ थांबतो आणि पुस्तकातील वाक्यांवर थोडावेळ का होईना विचार करतो. लेखकाने प्रस्तुत पुस्तकात वाक्यांची खूपच छान पेरणी केली आहे. पुस्तकातील माझ्या मनाला भावलेली काही वाक्य पुढे नमूद करत आहे. त्यातीलच एक वाक्य पहा.
‘स्वतः मध्ये डोकावत राहिलं पाहिजे. माणूस एकटा पडत नाही.’
           त्या वाक्यांप्रमाणेच वाचक सेल्फी मधील प्रत्येक वाक्य वाचताना स्वत:मध्ये डोकावत राहतो.
पुस्तकातील ‘आपल्या पिढीचे बाप’ या मथळयाखाली बापाचे जे वर्णन केले आहे ते खरंच बाप लेखन आहे. वाचताना बाप डोळयासमोर उभा राहतो. लेखातील एक-एक वाक्य हृदयावर कोरले जाते. नकळतपणे डोळे पाणावतात.
           मराठी भाषेविषयी एक वाक्य आहे. ‘मराठी वाचत राहिलं की मराठी वाचणारच.’ या एका ओळीत किती मोठा अर्थ सामावला आहे. खरंच आपणच आपली भाषा जपली पाहिजे. याबाबत खूप छान संदेश दिला आहे.
           थोडेसे लेखन करून स्वत:ला थोर समाजणाऱ्या व थोडया यशाने हुरळून जाणाऱ्या लेखकांसाठी पुढीलप्रमाणे एक वाक्य आहे.
           ‘आपण खूप चांगले लेखक आहोत, असं वाटत असेल, तर समजायचं की आपलं वाचन खूप कमी आहे.’
           आणि हे वाक्य वाचून खरंच लक्षात येतं साहित्याचा समुद्र खूप मोठा आहे. आपण कितीही वाचन केले तरी ते कमीच आहे. आपलं आयुष्य संपून जाईल पण साहित्य संपणार नाही.
राजकारणांविषयी लिहिताना त्यांचं लिखाण कोण्या एका पक्षाची बाजू घेत नाही. जे राजकीय नेते चुकत असतील, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. त्यांच्या चुकीबद्दल त्यांच्या डोळयात व समाजाच्याही डोळयात अंजण घालण्याचं काम त्यांचं लिखाण करतं.
          मोबाईलचा अतिप्रमाणात वापर आपल्यासाठी घातक आहे. त्यामुळे आपल्या शारीरीक, मानसिक आरोग्यावर तर परिणाम होतोच पण त्यासोबत आपला अमूल्य वेळही वाया जातो. त्याबद्दल एकाच वाक्यात लेखकाने खूप मोठा संदेश दिला आहे. ते वाक्य पुढीलप्रमाणे आहे.
          ‘आपण मोबाईल मध्ये नाही, मोबाईल आपल्या आयुष्यात जास्त डोकावतोय.’
         आपलं अर्ध आयुष्य हे झोपण्यात जाते. उरलेल्या अर्ध्या आयुष्यापैकी अर्धे आयुष्य हे मोबाईलमध्ये जात आहे. लहान मुलं, तरुण एवढंच काय? ज्येष्ठ नागरीकही मोबाईलच्या आहारी गेले आहेत. परंतू सर्वात जास्त आजची तरुण पिढी ही मोबाईलवर आपला जास्त वेळ वाया घालत आहे. मुलांना मोबाईलवर गेम खेळताना वेळेचं, काळाचं कशाचच भान राहत नाही.त्यामुळे त्यांच्या पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. यावर भाष्य करताना प्रस्तुत लेखामध्ये लेखकाने किती अप्रतिम वाक्य वापरलं आहे.
          ‘पोरगं मोबाईल मध्ये खेळायला लागलं ना, पोराला काही लागत नाही पण आई बापाच्या मनाला लागतं.’
          माणसाने केवळ पैसा देवूनच इतरांना सहकार्य करणे अपेक्षीत नसते. आपण इतरांशी चांगले वागण्याने देखील इतरांना मदत होते. हा महत्वपूर्ण संदेशही खालील वाक्यांमधून दिलेला आहे.
          ‘लोक कर्तुत्वाने मोठे होतात हे खरे. पण कौतुकाने त्यांना बळ मिळतं.’
         ‘आजारी माणसाला भेटायला जाणारी लोक डॉक्टर नसले तरी ते आले म्हणून पेशंटला बरं वाटतं.’
         ‘एकट्याने प्रवास पूर्ण होतो पण सोबत असली की तो मजेत होतो.’

         ही वाक्ये किती छोटी आहेत. पण मनावर खूप मोठे संस्कार करण्याचे काम करतात.


         पुर्वी माणूस आकाशातून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. असे कोणी म्हणाले असते तर लोकांनी त्याला वेडयात काढले असते. पण कोणाला तरी एकाला पुढाकार घेऊन बदल करावा लागतो. बदल स्विकारण्याजोगा असला, त्या बदलामुळे मानवी जिवनामध्ये सहजता येत असेल. तर लोक तो बदल स्विकारतात. हे सांगण्यासाठी एक वाक्य वापरलं आहे. ते वाक्य किती ताकदीचं आहे हे वाचूनच समजेल.
         ‘बदल होतो पण कुणाला तरी धाडस करून पुढे यावं लागतं.’
         माणूस माणुसकी ही आपली खरी जात विसरुन केवळ आपल्या जातीचे पाहतो. जातीवर बोलतो. इतर जातीतील लोकांना दुय्यम मानतो. जात, पात करण्याच्या नादात आपण देशबंधु आहोत हेच विसरून जातो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही शाळेमध्ये हात पुढे करुन घेतलेली प्रतिज्ञाही विसरुन जातो. त्याबाबत किती छान-छान वाक्य लेखकाने वापरली आहेत.
         ‘जातीची माणसं एकमेकांच्या मदतीला धावून आली असती तर कुठल्याच जातीत गरीब माणूस दिसला नसता.’
         ‘गरीबी ही एक वेगळी जात होऊन जाते.पैसा नसेल तर माणसं सहसा जवळ येत नाहीत.’
‘जातीचं सोडा; नात्यातले लोकसुद्धा कामी येत नाहीत एकमेकांच्या! आश्चर्य वाटेल; पण कोर्टात जास्त केसेस जमिनीच्या आहेत, मालमत्तेच्या आहेत, आणि त्यातही नात्यातल्या लोकांच्या... भावांच्या! म्हणून तर बांधाला बांध असले की वाद असतात. बांध कोरण्यासारखे प्रकार होतात. हे का घडायला पाहिजे? नातं असून एका जातीचे असून असं होतं.’‘आपण रक्ताच्या नात्यावर खूप बोलतो पण रक्ताच्या जातीवर फार बोलत नाही. रक्तगट म्हणजे जातीच असतात. दवाखान्यात आयसीयू मध्ये जायची वेळ येते तेव्हा आपली नाही रक्ताची जात विचारली जाते.’


        आपल्याला एखादी समस्या असेल तर ती संवादामधून सुटते. भांडणातून नाही. याची शिकवण देणारं ‘आजकाल माणसं संवाद कमी साधतात, भांडतात जास्त!’ हे वाक्यही खूप मोठी शिकवण देवून जातं. भांडण्यापेक्षा माणसाने संवाद साधला पाहिजे. संवादातून समस्या सुटतात तर भांडणातून आणखी समस्या निर्माण होतात.
          माणसं देवाकडे किती अपेक्षा ठेवतात. देवाला नवस करतात. याबाबत लेखकाने खूप मजेशीर व तितकेच डोळयात अंजन घालणारे वाक्ये वापरली आहेत.
          ‘माणसं देव आपल्याकडे कामाला आहे असं समजून चालत असतात.’
         ‘देवावर माणसं एवढया जबाबदाऱ्या देतात.देव गोंधळून जात असेल काय करायचं.’
         ‘देव जेवढा श्रीमंत असेल तेवढे देवळा भोवती भिकारी जास्त असतात.’


         आपल्या देशात खूप पुतळे आहेत. पण आपण कधी त्या पुतळयांचा विचार अंमलात आणतो का? याबाबत पुढील वाक्य पहा.
         ‘आपण पुतळ्यावर जेवढा विचार करतो.तेवढा पुतळ्यांच्या विचारांचा करत नाही.’
        आपण एखाद्या गोष्टीवरुन चिंचातुर असतो. पण त्याच चिंतेने एखादा दुसरा कोणी ग्रासला असेल. तर आपल्याला जरा हायसं वाटतं. आपल्यासारखाच कोणीतरी समदु:खी आहे. हे मनाला आधार देतं. याबाबतही किती छान वाक्य वापरलं आहे.
         ‘आपण एकटेच चिंतेत नाही ही गोष्ट खूप लोकांसाठी चिंता घालवणारी असते.’
          सेल्फीमध्ये एक लेख आहे. ‘त्या नदीच्या पार तेथे.’
          या लेखामध्ये गावाकडील ग्रामीण जीवनाचे, स्त्रीयांच्या कष्टाचे खूप छान वर्णन करण्यात आले आहे. जे परत परत वाचण्यास उद्युक्त करते. मनाला सुखद आठवण देते. जी आठवण कायम हृदयात साठवून ठेवावी वाटते.
         माणसाचे विचार जसे असतात तसाच माणूस असतो. त्यामुळे आपल्या मनावर संस्कार करण्यासाठी सेल्फी एकदा आवर्जून वाचलं पाहिजे. आणि वाचून खरंच एकदा आपल्या मनात डोकावलं पाहिजे.
- पुस्तक परिचय
संदीप खुरुद (लेखक,कवी)