Preet tujhi majhi - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : १)

नयना आणि विशाल दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. कॉलेजपासून दोघेही एकत्र होते. अभ्यास असो, कॉलेजच्या सहली किंवा वार्षिक स्नेहसंमेलन, काहीही असो दोघे नेहमी एकत्रच असायचे. दोघांमध्ये एक वेगळच बॉंडिग तयार झालं होतं. हळूहळू नकळतच मैत्रीच रुपांतर कधीतरी प्रेमात होत गेलं.


खरंतर दोघंही एकमेकांना खूप आवडत तर होते पण स्वताःहून बोलायला कोणीच तयार नव्हते. त्याला उगाचंच वाटायचं की, तिला आपल्या मनातला सारं समजलं तर ती दोघांत असलेली मैत्री सुध्दा तोडून टाकेन. आणि इकडे तिला वाटायचा की मी स्वतःहून विचारलं तर तो म्हणेल की आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत. उगाचच कहीसा गैरसमज होईल दोघांमध्ये.


दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते. पण बोलायला मात्र कुणीच तयार नव्हते. रोजच समोर यायचे, बोलायचे, पण फक्त मैत्रीच्या नात्याने. मनात चाललेली ती अनामिक हुरहुर मनातच सलत होती. मनात विचारांचं काहूर तर माजत होतं पण बोलायचं धाडस दोघांपैकी कुणातच नव्हतं. दिवसेंदिवस दोघेही एकमेकांत चांगलेच गुंतत चालले होते.


दिवस असेच निघून जात होते. एकदा नयनाने तिच्या जिवलग मैत्रिणीला आराध्याला सहज म्हणून कॉल केला. तर ती हॉस्पिटल मधे ॲडमिट आहे. असं तिला समजलं. काय करावं. बॉस सुट्टी देईल का ? या विचारातच तिने बॉसची केबिन नॉक केली. बॉसने आत यायची परवानगी देताच, आत जाऊन सर्व प्रकार नयनाने बॉसला सांगितला. व बॉसची रितसर परवानगी घेऊन आज अर्ध्या दिवसांची रजा टाकली. व लगेच स्वतःची कार सुरु करत ती पटकन हॉस्पिटलच्या दिशेने तिला भेटायला गेली.


हॉस्पिटल मध्ये जाताच कार पार्क केली. आत जाऊन रिसेप्शन मध्ये येऊन आराध्या देसाई असे विचारले. रूम नंबर रिसेप्शन वरुन समजताच ती धावत धावत लिफ्टच्या दिशेने आली. लिफ्ट नुकतीच वर गेली होती. आता तिला समोरील स्टेअरकेस वरुन तीन मजले चढून जायचं तिच्या जीवावर आलतं. पण तिच्या जिवलग मैत्रिणीसाठी तिला असे करणे भागच होते. ती धापा टाकत पटापट तीन मजले चढून वर आली. आणि समोर असलेल्या सिस्टरला रुम नंबर ३०४ बद्दल माहिती विचारली.


तसं त्या सिस्टरने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला व डाव्या बाजूला शेवटची रूम आहे असे सांगितले. तसे ती धावतच रुमकडे आली. ती दरवाजा नॉक करणार होती इतक्यात तिला रूमच्या आतून आराध्याचा कुणा एका पुरूषासोबत बोलण्याचा आवाज आला. तिने क्षणभर स्वतःशीच काहीसा विचार केला. आणि रूमचे दार जोरात ढकलून ओपन केले.


समोरील ते दृष्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती अवाक होऊन सारा प्रकार पाहत होती. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. रूमच्या आत प्रवेश करताच तिने एक अनोळखी माणूस पाहिला होता. त्याचा हात आराध्याच्या हातात गुंफलेला होता. आराध्याचे डोके त्याच्या मांडीवर होते. दोघेही डोळ्यात आसवं घेऊन एकमेकांच्या नजरेत हरवले होते. तिच्या येण्याची चाहूल लागताच तो माणूस जरा दचकला आणि उठून बाजूला विंडोजवळ जाऊन पाठमोरा उभा राहिला.


हा सर्व प्रकार बघून नयनाला जरा रागच आला होता. पण तरीही ती स्वतःला शांत करत तिच्या कॉट जवळ गेली. तिच्यापाशी असलेल्या स्टुलवर बसत तिची अतिशय प्रेमाने विचारपूस करू लागली. बराचवेळ दोघींच्या छान गप्पा झाल्या. तब्येतीची थोडी विचारपूस झाली. आपल्या मैत्रीणीला सुखरुप पाहून तिला काही क्षण का होईना जरा बरं वाटलं. तिला ॲडमिट होण्याचे नेमके कारण नयनाने विचारले असता आराध्याचे डोळे अचानकच भरून आले.


तिच्या साठलेल्या अश्रूंना बांध फुटला होता. नयनाला आता नेमके काय झाले हेच समजेना. ती काय झाले ? असे तिला विचारणार होतीच इतक्यात तो पाठमोरा उभा असलेला व्यक्ती नयना सोबत बोलू लागला. तेव्हा तिला समजलं की तिच्या मैत्रिणीला म्हणजेच आराध्याला ब्लड कॅन्सर झाला आहे. आणि ती सध्या कॅन्सरच्या थर्ड स्टेज मधून जात आहे. आता काही दिवसच ती आपल्यासोबत जगणार आहे.


त्या व्यक्तीचे ते बोलणे ऐकून नयनाला जबर धक्काच बसला. तिने आराध्याला घट्ट मिठी मारली. दोघीही खूप वेळ धाय मोकलून रडत होत्या. तिला मगाशी रूममध्ये आल्यावर बघितलेला प्रकार बघून आलेला राग, आता दूर कुठेतरी निघून गेला होता. बराच वेळ निघून गेला. दोघी आता जरा शांत झाल्या होत्या. नयना आता आराध्याला धीर देऊ लागली. नंतर थोड्या वेळाने तिने विषय काढतच आराध्याला त्या माणसाविषयी विचारले. कोण आहेत हे ? कुठले आहेत ? आणि मी यांना कधीच पहिलं नाही. तसं आराध्या जरा उदास नजरेने त्या व्यक्तीकडे नजर रोखून पाहते व बोलू लागते.


पूर्वार्ध (आराध्याचा भूतकाळ):

हा निखिल आहे माझा मित्र. तुझ्याप्रमाणेच अगदी जवळचा. आम्ही लहानपणापासूनच फ्रेंड्स आहोत. आम्ही एकाच चाळीत रहायचो. आमचे घर समोरासमोरच होते. एकत्रच लहानाचे मोठे झालो. नेहमीच सगळी सुख-दुःख आम्ही एकत्र वाटली. बारावी पर्यंतचे शिक्षणही आम्ही एकत्र केले. त्यानंतर बाबांची नोकरी बँकेत असल्याने त्यांची बदली पुण्यात कर्वेनगर शाखेत झाली. आणि नाईलाजास्तव आमचं घर बदलावं लागलं.


आम्ही मुंबई सोडून इथे पुण्यात आलो. इथेच स्थाईक झालो. निखिलने त्याचे ग्रॅज्युएशन मुंबई विद्यापीठातूनच कंप्लिट केलं व त्याला जॉब मुंबईतच लागला. आणि मी माझं ग्रॅज्युएशन पुणे विद्यापीठातून पुर्ण केले. मला जॉब पुण्यातील बॅंकेत मिळाला. दोघेही वेगळे झालो होतो. सर्व काही काळाच्या ओघात बदलले होते. पण मैत्री तशीच जिवंत होती. आम्ही दोघे एकमेकांवर खूप मनापासून प्रेम करायचो अगदी जीवापाड. पण आम्ही कधी आमच्या भावना एकमेकांकडे व्यक्त केल्याच नाहीत.


आम्ही दोघेही मनातून खूप घाबरायचो. सतत समोर असायचो. पण बोलायची कधी हिंमतच झाली नाही. आणि नंतर आमच्यात असलेला दुरावा वाढतच गेला. पण एकदा मी मनाशी ठरवला की, नाही आज त्याला सगळं मनातलं सांगून टाकायचं. भरभरून व्यक्त व्हायचं. त्याच्या मिठीत विरून जायचं. त्याच्या डोळ्यात पहिल्यासारखंच स्वतःला हरवायचं. त्याचा हात हातात धरून चौपाटीवर फिरायचं. फेसळत्या लाटांप्रमाणे एकमेकांत मिसळून जायचं.


कित्येक स्वप्न माझ्या उरात होती. विरहात घालवलेले क्षण मी आठवत होते. त्याला भेटण्याची एक वेगळीच हुरहुर मनात दडून होती. डोळ्यांत एक वेगळी नशा दाटली होती. कित्येक वर्ष न भेटलेलो आम्ही आज अचानक असे एकमेकांच्या समोर येणार म्हणून मन खुप आनंदात होतं. चेहर्‍यावर एक वेगळंच तेज आलं होतं. लाजेने चेहरा पार लाल गुलाबी झाला होता. म्हणून त्याला सरप्राइज द्यायच्या वेड्या आशेने मी मुंबईत आमच्या जुन्या चाळीत गेले. तेथे मी त्याच्या घरी गेले. पण तिथे गेल्यावर मला समजले की त्याचं लग्न ठरले आहे.


दारात लग्नाचा मंडप सजला होता. सर्वत्र मंगलमय वातावरण होते. घरी सवाशनींच्या भोजनाचा कार्यक्रम सुरु होता. लग्नाला दोनच दिवस बाकी होते. अजूनही रात्री बांगड्या भरण्याचा कार्यक्रम बाकी होता. अशातच मला त्याला माझ्या मनातलं सारं सांगून त्याच्या आनंदावर विरजण नव्हतं टाकायचं. म्हणून मग मी स्वतःहुनच त्याला काहीच सांगितले नाही. आज माझी जागा कुणीतरी दुसरं घेणार आहे हा विचार माझ्या मनात सतत फिरत होता. खूप वाईट वाटत होतं.


मन आतून पुर्णपणे तुटलं होतं. खूप खूप रडू येत होतं. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. मन खुप रडत होतं पण चेहर्‍यावर खोटं हसू आणून मी सर्वांमध्ये वावरत होते. माझ्या काळजावर दगड मी ठेवला होता.पण आहे ती परिस्थिती स्वीकार करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय माझ्याकडे नव्हता. मी स्वतःला सावरत होते. क्षणातच माझ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. पण मी अजूनही त्याच्या आठवणींतून बाहेर पडू शकत नव्हते.


मी तशीच दुपारची सिंहगड एक्सप्रेस धरली व थेट पुणे स्टेशन गाठले. घरी आले आणि स्वतःला बेडरुममध्ये बंद करून घेतले. माझ्या लाडक्या टेडीला मिठी मारून खुप रडले. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. रात्री जेवण पण केले नाही. तशीच झोपले. सकाळी लवकर उठून आवरले आणि सातच्या दरम्यान घर सोडले. बाहेर येताच पीएमपीएमएलच्या बसने दगडूशेठ गणपती बाप्पांचे मंदिर गाठले. बाप्पांचे डोळे भरून दर्शन घेतले. आणि स्वतःला सावरण्याची बुध्दी मागितली. व थेट कामावर निघून गेले.


स्वतःला कामात मी खुप व्यस्त केले. कामाच्या व्यापात मला त्याचा विसर पडला. थोडा वेळ लागला पण सावरायला पण मी स्वताःला अखेर सावरलेच. मी आता आनंदी होते. निदान तो त्याच्या आयुष्यात सुखी आहे हेच समजून मी जगत होते. माझ्या प्रेमाला दोष देत बसले होते. एक दिवस अचानक बाबांनी मला त्याच्याबद्दल सांगितले की त्याला मुलगा झाला. आणि माझ्या चेहऱ्यावर जरा समाधान आलं. चला त्याचा संसार आनंदात चालू आहे हे पाहून मी आनंदी झाले. पण बाबांचे पुढचे वाक्य ऐकताच नकळतच माझ्या डोळयांतून अश्रुच आले. बाळंतपणात निखिलची पत्नी गेल्याचे समजले.


क्रमशः


======================================


काय मग वाचकहो कशी वाटली आजची लव्हस्टोरी 🤔 आवडतेय ना. ☺ अजून काय घडले असेल आराध्याच्या आयुष्यात ? तुम्हाला काय वाटते ते मला कमेंट करुन नक्की कळवा. पुढील भाग हा विशेष भाग असेल. धन्यवाद 😊🙏🏻



✍️ लेखक : अक्षय खापेकर
©®All Copyright Reserved

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED