प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ४) अक्षय राजाराम खापेकर द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ४)

प्रीत तुझी माझी 🐾♥
भाग - ३ पासून पुढे..


सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी या कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे तीन भाग नक्की वाचा. धन्यवाद 😊🙏🏻


======================================


नयना आज तिच्याच घरी थांबली होती. आराध्याला जसे समजले की आज निशांतचा बर्थडे आहे. तसं आपलं सारं आजारपण विसरून ती लगबगीने कामाला लागली. आईने तिला आत आराम करायला सांगितला पण तिने आजिबात ऐकले नाही. संध्याकाळी निशांतचा बर्थडे जोरात साजरा करण्यात आला. आराध्या खुप खुष होती. नयनाने विशालकडे पाहतच त्याला खुणावले. तसा विशाल उठला व फोटो काढण्याच्या निमित्ताने निखिलला आराध्या समोर घेऊन आला.


काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवले होते. काही वेळ गेला. फोटो शुट पण चांगलंच झालं. विशालने आराध्या, निशांत व निखिल यांचा एकत्र फोटो काढला. जेवणं झाली. सगळे गप्पा मारायला अंगणात बसले. गप्पा सुरु झाल्या. बोलता बोलता मधेच आराध्याच्या बाबांनी विषय काढला. काय मग निशांत उद्या तू बाबांसोबत घरी जाणार मुंबईला, मग आम्हाला विसरशील ना ? त्यावर मी त्याला माझ्यापासून कुठेही दूर जाऊ देणार नाही. असे आराध्या जरा ओरडतच म्हणाली.


तिची निशांतबद्दलची ओढ बघून सर्वच जण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. तसे तीचे बाबा उठून तिच्यापाशी जाउन बसले. व तिला शांत करत म्हणाले. कोण कुठला हा मुलगा, पण तुलाही त्याचा किती लळा लागला आहे. तुला निशांत हवा आहे ना. मग एक करशील ? तिने त्यांना प्रत्युत्तर म्हणून "काय ?" एवढंच विचारलं. तसे बाबा म्हणाले "तु लग्न करशील निखिलसोबत ?" बाबांचा हा प्रश्न ऐकून निखिल जरा शॉकच झाला. पण बाबा पुढे बोलू लागले. मला तुमच्याबद्दल सगळं समजलं आहे विशाल आणि नयनाकडून.


असं मनातल्या भावना मनात दाबून ठेवून काही होत नसतं बाळा. आज तू तुझ्या कॅन्सरमुळे आयुष्यभर एकटी राहणार म्हणतेस. आणि तो निखिल त्याच्या बायकोच्या आठवणींत एकटा जगणार. पण निशांतचं काय ? त्याला जन्मतःच आईची माया भेटली नाही पण तुझ्यात तो त्याची आई शोधातो ना. निदान तुम्ही एकत्र आलात तर. तुमचं प्रेमही तुम्हाला भेटेल आणि निशांतला त्याची आई. बाबांचे हे शब्द ऐकून आराध्या बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते. निशांत तिचे डोळे पुसत असतो.


दुर बसलेला निखिल बाबांचे सर्व बोलणे ऐकत होता. त्याचेही डोळे आता पाणावले होते. ती निशांतला जवळ घेत म्हणाली. "ए बाळा.. आजपासून मला रोज मम्मा म्हणशील ना रे." व त्याला घट्ट मिठी मारुन रडू लागली. आज तिच्या उरात दाटलेली आईची माया भरभरून ओसंडून वाहत होती. तिला असं निशांतच्या मिठीत बघून निखिलही निशब्द झाला होता. तिच्या भावना आज त्याने बरोबर ओळखल्या होत्या. तिच्या जवळ जात त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती जरा शांत झाली.


तो तिचा हात हातात घेऊन बोलू लागतो. "आराध्या बाबा बरोबर बोलत आहेत. निशांतला जर आईचे प्रेम मिळणार असेल, आणि ते पण तुझ्याकडुन तर आपण दोघांनी एकत्र यायला मला काही हरकत नाही. तो अजून खूप लहान आहे. किर्ती नंतर त्याला आईचं प्रेम व चांगले संस्कार फक्त तूच देऊ शकतेस याची मला खात्री आहे. मी वचन देतो की, मी निशांतला तुझ्यापासून कधीच वेगळं होऊ देणार नाही.


खरंतर किर्ती गेल्यानंतर तिची जागा मी तु सोडून इतर कोणालाच द्यायची नाही असे मनाशी पक्के ठरवले होते. पण अशातच तु पुन्हा आलीस माझ्या आयुष्यात. व माझ्या मनातील प्रेम पुन्हा जागं केलंस. आज सर्वांच्या साक्षीने मी तुला विचारतो. तु लग्न करशील का माझ्याशी ? मी तुला आत्ता आहे तशी स्विकारण्यास तयार आहे. अगदी तुझ्या ब्लड कॅन्सरसोबत." त्याचं असं बोलणं ऐकून तिला काय बोलावं हेच समजत नाही. ती फक्त मान हलवूनच लग्नाला होकार देते. आणि सगळे खुष होतात.


आराध्याचे बाबा शामरावांना फोन करतात व पुण्यात बोलावून घेतात. तसे शामराव पुण्यात येतात. आराध्याचे बाबा सर्व परिस्थितीचा त्यांना अंदाज देतात. लग्नाची सर्व बोलणी होतात. ब्राम्हणाकडून दोन दिवसानंतरचा मुहूर्त काढला जातो. लग्न अगदी साध्या पध्दतीने पार पाडण्याचे ठरलेले असते. ठरल्याप्रमाणे दुसर्‍याच दिवशी हळदीचा कार्यक्रम होतो, नंतर साखरपुडा संपन्न होतो. आता उद्या लग्न होते. सर्वच जण खूप आनंदात होते. हातावर मेहंदी काढायचा कार्यक्रम पार पडतो.


आता लग्नाचा दिवस उगवला होता. पुण्यात आराध्या राहत असलेल्या बंगल्याच्या आवारातच प्रशस्त लग्नमंडप सजवला गेला होता. वाजंत्री वाद्य वाजवत होते. सनई चौघडयांचा मंजुळ स्वर सर्वत्र दुमदुमत होता. बाजुच्या लॉनमध्ये आचारी जेवणाची व्यवस्था करण्यात दंग होते. घरात अगदी मंगलमय असे वातावरण निर्माण झाले होते. आईच्या घरचे काही पाहुणे मंडळी आले होते. ओळखीचे काही लोक होते. मुंबईतून आई -बाबांचे काही मित्र मैत्रिणी आले होते. नाही म्हणलं तरी जेमतेम ५० - ६० लोक तरी आजच्या विवाह सोहळ्यात हजर होते.


आतमध्ये नव्या नवरीचा श्रृंगार सुरू होता. तिने आज मोरपंखी रंगाचा शालू परिधान केला होता व त्यावर सुंदर असे डिझाईन केले होते. मेहंदीने संपूर्ण भरलेल्या हातात हिरवा चुडा, केसांत माळलेला मोगऱ्याचा गजरा, अंगभर शोभून दिसणारे सुवर्ण अलंकार, पायात छुमछुम वाजणारे नाजूक पैंजण, डोक्यात केसांच्या मधोमध लावलेली बिंदी, चेहर्‍याला शोभेल असा केलेला सुंदर मेक-अप, डोळ्यांवर हलकेच आयलाईनर, डोळ्यांत काजळ, कपाळावर छोटी चंद्रकोर असलेली टिकली आणि ओठांना शोभेल अशा रंगाची लिपस्टिक. या सर्वांमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.


आज कित्येक दिवसांनी आराध्या असे स्वतःला व स्वतःच्या सौंदर्याला आरशात निरखून पाहत होती. तिला कधी वाटलंही नव्हतं की, हा दिवसही तिच्या आयुष्यात येईल. आज ती खूप खुश होती. शेवटी सगळं काही अगदी तिच्या मनासारखंच घडत होतं. आज तिचा मेकअप, तिला नटवणं, सजवलं सगळं काही नयनानेच केलं होतं. आणि तो क्षण आलाच. हो तोच लग्नाचा क्षण. दोघांना बोहल्यावर चढवण्याचा क्षण. गुरूजी समोर असलेल्या स्टेजवर बसुन वधु - वराला बोलावत होते.


आराध्या देवघरात बसून सर्व देव देवतांच्या पाया पडत होती. निघताना तिने मनात बाप्पांचे मनोमन स्मरण केले व दोघांच्या सुखी संसारासाठी आशिर्वाद मागितला. आणि स्टेजच्या दिशेने निघाली. स्टेजवर विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजावट केलेली होती. नयना आणि तिची आई तिच्यासोबत पाठीमागून चालत होते. आराध्या समोरचे दृश्य पाहून अचंबित झाली होती. समोर दोन पाट ठेवले होते. एकावर गुरुजींनी तिला उभं केलं व दुसऱ्या पाटावर निखिलला.


दोघांचा जोडा आज शोभून दिसत होता. कपाळावर बांधलेल्या मोत्यांच्या मुंडावळ्यां चमकत होत्या. दोघेही एकमेकांना पाहण्यात दंग झाले होते. अशातच दोघांमध्ये अंतरपाठ धरण्यात आला. आणि मंगलाष्टक सुरू झाल्या.
तसे आराध्याच्या बाबांच्या डोळ्यांत खळखळून पाणी वाहू लागले. आईने खांद्यावर हात ठेवतच त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला पण तिचेही डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. लग्न लागले. शुभमंगल सावधान च्या गजरात मंगलाष्टका पार पडल्या. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या.


क्रमशः ..


=====================================


काय मग मित्रांनो कथा रंगात येत आहे. पण तुम्हाला आवडत आहे ना ☺ प्रतिक्रिया छान छान येत आहेत पण मागील भागाला प्रतिसाद जरा कमी आला आहे. खरंतर आजच्या भागात मला कथा संपवायची होती. पण तुमचा उत्स्फुर्त प्रतिसाद बघता पुढे लिहतंच रहावे असं मला वाटतंय. पुढील भागात अजून मजा येईल. धन्यवाद 😊🙏🏻


लेखक : अक्षय खापेकर.
©All Copyright Reserved