Life Partner books and stories free download online pdf in Marathi

Life Partner - एक अव्यक्त प्रेमकथा..

नमस्कार वाचक मित्रहो.. 🙏🏻


मी अक्षय खापेकर. नेहमीच आपल्या सर्वांसाठी नवनवीन प्रेमकथा माझ्या लेखणीतून सादर करत असतो. हं आता मला प्रत्येक कथेचा पुढील भाग अपलोड करायला खूप वेळ लागतो. यासाठी मी अत्यंत मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण काय करणार कामाच्या व्यापातून वेळ काढून तुम्हा सर्वांसाठी काहितरी नवनवीन लिखाण करण्याचा माझा प्रयत्न सतत सुरू असतो.


आजही मी आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत छोटीशी लव्हस्टोरी लिहिली आहे. फार मोठी कथा नाही आहे पण कथा खुप प्रेरणादायी आहे. कारण प्रत्येक जण आपल्या लाईफ पार्टनर बद्दल काहीतरी एक्सपेक्ट करतच असतो. याच आशयाची एक लघुकथा आज मी सादर करत आहे. कथा खुप छोटी आहे आणि या एकाच भागापुरती मर्यादित आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.


आशा करतो की, आजची ही प्रेमकथा तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल आणि नेहमीप्रमाणे तुमचे भरभरून प्रेम आणि आशिर्वाद मिळतील. जाता जाता नेहमीचा प्रश्न "वाचताय ना.. ?" तुम्हीही वाचा आणि इतरांनाही वाचनास मदत करा. कथा आवडली तर कथेला रेटिंग द्यायला व शेअर करायला विसरू नका.. 🤗

Happy Reading.. 📖
धन्यवाद.. 🙏🏻🥰



चला मग कथेला सुरुवात करूयात..


नयन आणि मिताली दोघेही एकाच बॅंकेत जॉब करत होते. दोघांचे एकमेकांवर मनापासून प्रेम होते. पण पहिल्या नजरेतलं प्रेम होतं ते. शब्दांत व्यक्त करण्यास दोघेही मनातून घाबरत होते. आता इकडे त्याला वाटायचं ती आधी तिच्या भावना त्याच्याकडे येऊन व्यक्त करेल. व तिकडे तिला वाटायचं आधी त्यानी मला येऊन प्रपोज करावं आणि स्वतःच्या भावना माझ्याजवळ व्यक्त कराव्यात. अशा भ्रमातच दोघांचे बरेच दिवस निघून जात होते. पण मनातलं प्रेम व्यक्त करायला कुणीच तयार नव्हतं.


असंच एके दिवशी बॅंकेचा २५ वा वर्धापन दिन सोहळा होता. बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आज कामातून सुट्टी होती. म्हणजेच बॅंकेचे सर्व व्यवहार आजच्या दिवसापुरते स्थगित करण्यात आले होते. वर्धापण दिनानिमित्त बॅंकेने एक सोहळा आयोजित केला होता. तेथेच सर्व कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे नयन आणि मिताली दोघेही कार्यक्रमाला इतर कर्मचारी वर्गाप्रमाणे उपस्थित होते. बहुतेक बॅंकेतील सर्वच महिलांनी साडीचा वेश धारण केला होता. तर पुरूषांनी आपल्या रोजच्याच गणवेशात राहणे पसंत केले होते.


सर्व महिलांमध्ये मिताली आज काहीशी वेगळीच दिसत होती. न राहवून नयनचे लक्ष सारखे तिच्याकडेच जात होते. ती सुध्दा सर्वांचे लक्ष चुकवून त्याच्याकडे नजर चोरुन पाहत होती.


"काहीही झालं तरी आज आपण हिच्याकडे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्याच.."


असा त्याने स्वतःच्या मनाशी ठाम निश्चय केला. काही वेळ कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाच्या शेवटी बॅंक मॅनेजर साहेबांनी एक अनाउंसमेंट केली. जर कुणाला काही कला येत असतील तर सर्वांसमोर सादर करुन आमचं मनोरंजन करावं.


सर्वजण एकमेकांकडे नुसतेच बघत बसले होते. कोणी लाजत होते तर कुणी काय सादर करु या टेंशन मध्ये होते. शेवटी प्रत्येकाच्या नावाने बनवण्यात आलेल्या चिठ्ठ्यांचा बंच बाहेर काढण्यात आल्या. नावाची अनाउंसमेंट झाली. त्यात पहिलंच नाव मितालीचंच होतं. ती एक उत्तम गायक होती. तिनं गाणं म्हणायला सुरुवात केली अन् काही सेकंद त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. क्षणभरासाठी त्याच्या ऋदयाची स्पंदने थांबली व अतिशय तीव्र गतीने पुन्हा सुरू झाली. समोर ती गाणं गात होती..


अखियोंके झरोखोंसे
मैने देखा जो सावरे..
तुम दूर नज़र आएं,
बडी दूर नजर आएं..
बंद करके झरोखोंको,
जरा बैठी जो सामने..
मन में तुम्हीं मुस्काये,
सिर्फ तुम्हीं मुस्काये..



तिचे हे शब्द ऐकून तिच्या मनातलं त्याच्याबद्दलचं प्रेम त्याला स्पष्टपणे जाणवत होतं. ती त्याच्या नजरेत नजर घालून जीव ओतून ते गाणं गात होती. तिच्या नजरेत तो ही हरवत चालला होता. अचानक टाळ्यांच्या कडकडाटाने त्याचं चित्त थाऱ्यावर आलं. अजूनही ती त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. आता दुसर्‍या नंबरला त्याच्याच नावाची अनाउंसमेंट झाली. तसा तो गडबडला व सर्वांसमोर जाऊन उभा राहिला. त्याला गिटार छान वाजवता येत होती.


आज तो स्वतःची गिटार स्वतःसोबत घेऊन आला होता. त्याने गिटार वाजवत गाणं म्हणायला सुरुवात केली. तसा तिचा श्वास फुलू लागला. वाटलं त्याला जाऊन घट्ट मिठी मारावी आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन करून द्यावं. पण तो अजूनही अव्यक्तच होता प्रेमाच्या बाबतीत. तिने स्वतःच्या भावनांना जरा आवर घातला व त्याचं गाणं जरा लक्ष देऊन ऐकू लागली. तो समोर गाणं गुणगुणत होता.


हम दिल दे चूके सनम..
तेरे हो गए हैं हम..
तेरी कसम..



गाणं सुरुच होतं. तिच्या नाजूक अंगावर एक गोड शिरशिरी उमटत होती. किती छान गाणं गातो हा. मग इथं बॅंकेत काय करतोय हा.. ? असे मनात असंख्य प्रश्न पडले होते. इतक्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. तिने सुध्दा आनंदाने टाळ्या वाजवल्या.


त्याच दिवशी ते दोघेही कॉफी पिण्यासाठी बॅंकेसमोरील कॅफेमध्ये भेटले. त्याने तिला तिथंच प्रपोज केला. तिनेही त्याला लगेच होकार दिला. घरी सांगण्यात आलं. सर्वांची रीतसर परवानगी घेऊन दोघांचा प्रेमविवाह थाटामाटात पार झाला होता. संसारही व्यवस्थित चालू होता. पण जरी कितीही नाही म्हटलं तरी शेवटी भांड्याला भांडं लागतंच ना. आता लग्नाला बरोबर ६ महिने पुर्ण झाले होते. आज काही कारणावरून तिला त्याचा खूप राग आला होता. ती रागात काहीबाही बोलून गेली आणि वाद सुरू झाला.


ती : माझ्या आयुष्यात मी मोठी चुकी केली आहे. ती म्हणजे तुझ्याशी लग्न केलं. खरंच खुप पस्तावते आहे रे मी.


तो : तुला हे आज कळलं तर..


ती : हो ना जर आधीच कळलं असतं तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती ना. नसता धोंडा गळयात मारून घ्यायची.


तो : मला पण तसंच वाटतं. उगाचच नसतं ध्यान माथी मारून घेतलंय मी..


ती : तुला जराही लाज वाटत नाही का ते असं बोलायला.


तो : यात लाज कसली. जे आहे तेच बोललो ना.


ती : तुझ्याशी बोलून ना काही फायदा नाही. अतिशय निर्लज आहेस. त्यापेक्षा निर्लज्जपणाचा कळस आहेस तु असं म्हणायला पण हरकत नाही.


तो : यात तुझी हरकत कोण विचारतंय. मी आहे तसा आहे. पटलं तर रहा नाहीतर तुझा मार्ग तुला मोकळा आहे.


ती : तर तर. माझ्या जाण्यावरच टपला आहेस ना तु. मी जातेच एकदाची घर सोडून आता कायमची.


असं म्हणून ती रागारागाने पाय आपटत तणतणत त्यांच्या बेडरूममध्ये निघून जाते. व एक मोठी बॅग काढून त्यात आपले कपडे भरायला घेते. त्यावेळी तो बेडरूममध्ये येतो आणि तिच्याशी बोलू लागतो.


तो : मी मदत करू का तुझी ?


ती : नको काही गरज नाही तुमची. माझं मी करेन सगळं.


तो : बरं ठीक आहे. पैसे वैगरे आहेत ना जायला की देऊ मी माझ्याकडचे ?


ती : त्याची तू अजिबात काळजी करु नकोस. मीपण कमवते म्हणलं. आहेत माझ्याकडे पण पैसे बरका.


तो : खरंच तू जानार आहेस का मला एकट्याला सोडून ?


ती : नाही रे माझ्या राजा. मी गंमत म्हणून बॅग भरली आहे. तुला मस्करी वाटते का सगळी ?


तो : ओके. ठीक आहे मग जा. परत तोंड बघायला पण येऊ नकोस माझं.


ती : जाणारच आहे. कुणाची गरज नाही मला. माझी मी खंबीर आहे.


त्याच्याशी भांडता भांडतात तिने तिची बॅग भरली आणि ती त्याला हिसका मारुन बाहेरच्या दिशेने जायला निघाली. तो बेडरुमच्या दारात उभा होता. तिने जरासं सुध्दा मागे वळून पाहिलं नाही. किंवा जाताना बाय एवढंही बोलली नाही. ती चालत होती. अचानक तिला बेडरूमच्या दरवाजाच्या बंद होण्याचा जोरात आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर बेडरूमचा दरवाजा बंद होता. व तो आत होता. त्याने स्वतःला बंद करून घेतले होते. ती पळतच बेडरूम जवळ आली. दरवाजाजवळ जोरजोरात थापा मारू लागली. व जीवाच्या आकांताने मोठ मोठयाने ओरडून लागली..


ती : अरे मी जात नाही तुला सोडून कुठेच. प्लिज दरवाजा खोल ना.


तरीही तो काही दरवाजा उघडत नव्हता. आता ती मनातून पुर्णपणे घाबरली होती. हृदयाची धडधड वाढत चालली होती. डोळ्यातून अश्रूंचा पुर ओघळत होता. ती रडत रडत दरवाजा ठोठावत होती. हताश होऊन तीने दरवाज्यावर अंग टाकलंच होतं की, त्याच वेळी त्याने दरवाजा उघडला. तीने त्याला मीठी मारली व त्याच्या रेशमी मिठीत जाऊन रडू लागली. सारखं सारखं सॉरी म्हणू लागली. आता तोही थोडा सावरला होता व तिला धीर देतच तिचे अश्रू पुसत होता.


तो : मान्य आहे मला की, मी जरा गरीब आहे. तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. पण प्रत्येक वेळी तुझ्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार होतो ना मी. तुला नेहमीच आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. कारण तूच माझा जीव आहेस गं. मी फक्त तुझ्यासाठी जगतोय गं बाळा. आणि आता तूच जर माझ्या आयुष्यात नसशील तर, मी जगून तरी काय करू ? सांग ना.. 😟


ती : सॉरी.. पुन्हा असली चुक मी कधी करणार नाही. आय प्रॉमिस मी तुला सोडून कधी जाणार नाही. 🤝🏻 तु प्रेमाने भरवलेला चटणीभाकरीचा प्रत्येक घास मी तुझ्या सोबत आनंदाने खाईन.तु उपाशी राहिला तर मी पण उपाशीच राहीन. माझं जे काही आहे ते सर्वस्व मी तुला वाहीन.


असं बोलून तिने त्याच्या भोवतीची मिठी घट्ट आवळली. परत एकदा दोघे एकमेकांच्या मिठीत हरवले होते. संसार सुखाचे स्वर्गसुख ते अनुभवत होते. दोघांनी प्रत्येक सुख दुःखात एकमेकांना साथ देऊन आणि एकमेकांचा हातात हात घेऊन छान सुखाचा संसार मांडला.


__________________________________________


दोन वर्षांनंतर...


आज मितालीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. नयन आणि मिताली यांनी त्यांच्या मुलींची नावं दोघांच्या नावाच्या सुरूवातीचे अक्षर घेऊन नमिता आणि मिनल अशी ठेवली आहेत. आता सारं काही सुखात आनंदात चालू आहे.


==============(समाप्त)==============


प्रेरणादायी संदेश :


मित्रांन्नो आयुष्यात खूप खडतर प्रसंग येत असतात. पण खचून न जाता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जावं. धीर सोडू नये. आणि आत्महत्येसारखा विचार कधीही मनात आणू नये. आयुष्यात अशी एक व्यक्ती तरी असतेच जी सुखात जेवढी साथ देते तेवढी दुःखात ही साथ देते व वेळोवेळी समजून घेते. आपलं आयुष्य सुंदर बनवते. अशीच असावी आपली सर्वांची Life Partner..


==================================


कथा कशी वाटली नक्की कळवा.. कमेंट्स करा. शेअर करा आणि लिखाणास रेटिंग देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद 😊🙏🏻


लेखक : अक्षय खापेकर
©All Copyright Reserved


इतर रसदार पर्याय