सर येते आणिक जाते - 3 Ketakee द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सर येते आणिक जाते - 3


प्रथमाचे नवीन ऑफिस मधील ट्रेनिंग आणि सिलेक्शनचे सुरवातीचे दिवस अतिशय छान गेले होते. आता नवीन प्रोजेक्ट, ज्यात तिचे सिलेक्शन झाले होते तेथील दिवसही छान जातील अशी तिला खात्री होती. फार क्वचितच केव्हा तरी नकारात्मक विचार तिच्या डोक्यात येत असत. अन्यथा प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करून त्याचे फक्त सकारात्मक पैलू बघण्यात तिला रस असे.

आज वीकएंडची सुरुवात झाल्यामुळे, प्रथमा व तिची आई मनसोक्त गप्पा मारत बसल्या होत्या. तिच्या आईचे विचार तिला नेहमीच प्रोत्साहित करत असत. तिची आई तिला नेहमी सांगायची की "आयुष्यातील प्रत्येक उतार-चढाव हा आपल्या आंतरिक शक्तीच्या बळावरच सर करता येतो. आणि ते ज्याचे त्याने करायचे असते. ते करण्यासाठी स्वतःला इतके मजबूत बनवायचे की इतर कोणाच्याही मदतीशिवाय आपल्याला ते करता येईल."

आई बोलू लागली की प्रथमा बऱ्याचदा अधिक जास्त लक्ष केंद्रित करून तिचे म्हणते ऐकत असे. आई बरोबरचा प्रत्येक संवाद तिला अधिकाधिक समृध्द करून जात असे. आयुष्याचे निरनिराळे पैलू जे अद्याप तिला अनभिज्ञ होते, त्यांच्या विषयी तिला बऱ्यापैकी कल्पना येत असे. ती जरी खमकी होती तरीही तिला आईबरोबरच्या या संवादातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतं होत्या.

प्रथमा जरी सर्व सिलेक्शन प्रोसेस मनासारखी झाल्यामुळे खूप आनंदी होती, तरीही या पंधरा दिवसांचा, तसेच नवीन कंपनीच्या इंटरव्ह्यूच्या तयारीच्या प्रोसेसचा पाच सहा महिन्यांचा जो क्षीण तिला आला होता, तो घालवण्यासाठी आणि नवीन प्रोजेक्ट मध्ये फ्रेश होऊन रुजू होण्यासाठी तिला डीटॉक्स होणे खूप गरजेचे वाटत होते. त्यासाठी कुठेतरी निवांत, समवयस्क लोकांमध्ये जाऊन सो कॉल्ड चील करणे गरजेचे होते.

त्यामुळे तिच्या कॉलेजच्या ग्रुपने आज ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन बनवला होता.

गडकिल्ले, पर्वत रांगा, विस्तीर्ण पठारे, हिरवळ, धबधबे, आकाशाला गवसणी घालू पाहणारी उंचच उंच शिखरे तिला नेहमी खुणावत असत. आपणही आकाशाला स्पर्श करून, त्याच्यासोबत एकदातरी हस्तांदोलन करून यावे असे तिला नेहमी वाटतं असे.

आकाशाचे निरनिराळे रंगही तिला आयुष्याच्या रंगांची आठवण करून देत असत.

निरभ्र आकाशात कापूस पिंजून ठेवल्याप्रमाणे जमलेले पांढरे ढग, कधी अगदी संथ पद्धतीने तर कधी वाऱ्यासोबत वेगवान पद्धतीने पुढे सरकत जाणारे...

...कधी पाण्याने भरलेले काळे गडद रंगांचे, वर्षा ऋतूला सोबत घेऊन येणारे आणि आपल्या प्रेमाच्या वर्षावाने वसुंधरेला हिरवेगार आणि ओलेचिंब करून टाकणारे...

खरंच निसर्ग आपल्याला किती भरभरून देत असतो. आपलीच ओंजळ बऱ्याचदा ते सारे सामावून घेण्यासाठी अपुरी पडत असते...

"ओंजळ रिती करुनी, सारेच देत आहे
परिसा समान मजला कनकास नेत आहे..."

असो निसर्ग हा प्रथमाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता.

सकाळीच उठून सहा वाजेपर्यंत प्रथमा तयार झाली. बरोबर नेण्यासाठी तिने आदल्या रात्रीच सर्व गरजेचे समान भरून बॅगपॅक तयार करून ठेवला होता. थंडीचे दिवस असल्या कारणाने तिला हुडहुडी भरली होती. त्यामुळे आईच्या हातचा आले घालून केलेला गरमा गरम चहा समोर आल्यावर आणखी काय हवे होते. तिने मनसोक्त फुरक्या मारत, आईला चिडवत चहावर ताव मारला. तिच्या आईला तिने असा चहा पिताना आवाज केलेला अजिबात आवडत नसे. त्यामुळे अधेमधे लहर फिरली की आईला चिडवण्यासाठी प्रथमा अशीच फुरक्या मारत मारत चहा पित असे. आई नेहमी तिला पाठीत एक धपाटा मारत असे. पण आज ती सहलीला चालली असल्यामुळे आपल्याला अशीच चिडवण्यासाठी अशी करत आहे, हे ओळखून त्यांनी काही फार मनावर घेतले नाही.

तितक्यात प्रथमाचा फोन वाजला. तिच्या मैत्रीणीचा कॉल होता. ते सर्व लोक प्रथमाच्या घराबाहेर गाडी घेऊन येऊन पोहोचले होते.

प्रथमाने कपडे, शूज, स्वतःचा एकंदरीत अवतार आरश्यामध्ये काळजीपूर्वक न्याहाळला, थोडेसे केस व कपडे नीटनेटके करून, बॅगपॅक पाठीवर टाकून आईचा निरोप घेऊन ती घराबाहेर पडली.