सर येते आणिक जाते - 10 Ketakee द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सर येते आणिक जाते - 10

 


दोन दिवस आराम करून, औषधपाणी करून प्रथमाला बऱ्यापैकी नॉर्मल वाटू लागले होते. तोंडाला आता चव आली होती. थोडी चालू फिरूही शकत होती. तसेही परवापासून तिला ऑफिसला जाणे गरजेचे होते. त्यामुळे तीही लवकरात लवकर पूर्ण बरी होण्याचा प्रयत्न करत होती. आईलाही तिची तब्बेत पूर्ववत होत असल्याचे बघून बरे वाटत होते. आईने बराच संयम दाखवला होता. पण आज प्रथमाशी बोलणे रास्त होणार होते. संध्याकाळी प्रथमा आणि आई टीव्ही बघत बसल्या होत्या. प्रथमाचा मूडही बरा दिसत होता. आईला हीच योग्य वेळ वाटली विषयाला हात घालण्याची. आईने प्रथमाच्या हातातील रिमोट घेऊन टीव्हीचा आवाज बारीक केला. आणि प्रथमाकडे पाहू लागली. आई प्रथमाला विचारू लागली... "आता काही बोलणार आहेस का स्वतःहून? माझ्या मनाची घालमेल तुला कळत असेलच. नक्की काय झालंय? बोल प्रथमा... " प्रथमाला आईचा सूर अतिशय काळजी आणि सक्तीचा जाणवला. त्यामुळे तिला परत रडू कोसळले. पण यावेळेस तिने स्वतःच सावरले आणि दोन मिनिट डोळे बंद करून मोठ्याने श्वास घेतला... आणि आपल्या मनातील भावनांना आईपुढे वाट मोकळी करून दिली.

 

"अगं आई काय सांगू, तुझा कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही मी त्या दिवशीच्या घडामोडी सांगितल्यावर, तो दिवस इतर दिवसांपेक्षा फारच वेगळा होता. मी ऑफिसमध्ये गर्दीत असूनही मला अतिशय एकटे वाटत होते. ऑफिसच्या कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हते. त्यामुळे दिवस तसाच चाल ढकल करत कसातरी काढला. ऑफिस सुटल्यावर घरी देखील यावेसे वाटत नव्हते. फक्त समुद्रकिनारी बसून समुद्र, निसर्ग आणि सूर्यास्त यांच्या सोबत बसावे वाटले. तिथूनही घरी परतावे वाटत नव्हते. खरंच काय आणि का असे होत आहे याचा विचार करूनही काही निष्पन्न झाले नाही. तू घरी वाट बघत असशील हा विचार देखील माझ्या मनाला शिवला नाही. अचानक एक लाट येऊन सर्रकन मला भिजवून गेली. स्वतःला सावरत असताना अचानक घड्याळाकडे लक्ष गेले आणि मग तुझी आठवण झाली. तरीही घरी यावेसे वाटत नव्हते. याच मनाच्या घालमेलीत मला तिथेच रडू कोसळले. आणि मग मी तशीच निघून घरी आले. आई खरंच सॉरी. तुला या सगळ्याचा त्रास होत असणार आणि त्या दिवशीही झाला असणार. पण मला अजूनही का आणि काय या दोन्ही गोष्टींचा उलगडा होत नाहीय."

 

आता मात्र परत तिला त्रास होऊ लागला. ती तशीच हमसत हमसत आईच्या कुशीत शिरली. आई बराच वेळ तिला थोपटत होती. थोड्या वेळाने प्रथमाने स्वतःला सावरले आणि ती उठून बसली. आई थोडावेळ शांत होती. पण नंतर आईने तिला विचारले "कोणी आवडतो का तुला?" प्रथमा साठी हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. तिने या अनुषंगाने काही विचारच केला नव्हता. आणि तिने आईलाही तसे स्पष्ट सांगितले. आईने तिला आता या अनुषंगाने विचार करण्याचा सल्ला दिला. आई तिला म्हणाली "बघ प्रथमा, कदाचित असेल असा कोणी ज्याच्या सहवासात राहायला तुला फार आवडते. कदाचित एकटे, कदाचित ग्रुपमध्ये... तुला कदाचित अजून हे लक्षात आले नसेल पण तुझे मन कदाचित त्या व्यक्तीच्या ओढीने, त्याला भेटण्यासाठी या घडीला आतुर झालेले आहे'... ती व्यक्ती कोण असावी किंवा आहे याचा तुला शोध घ्यायचा आहे, किंवा तुझे मन ज्या गोष्टीचा कौल देते आहे ती गोष्ट तुला स्वतःलाच उमगायला हवी आहे... बघ विचार कर... पण या गोष्टींसाठी स्वतःचे प्रोफेशनल आयुष्य पणाला लावायची गरज नाही. ऑफिस तुला पगार देते. त्यामुळे तेथील वेळ हा ऑफिसच्या सत्कारणीच लागायला हवा. प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य कधीही मिक्स करू नकोस. त्या दोघांची आपापली अशी स्वतंत्र जागा असते. आणि ती कायम तशीच स्वतंत्र राहायला हवी...".

 

प्रथमा आता फार वेगळ्या अनुषंगाने, आईच्या सल्ल्यानुसार या सर्व गोष्टींचा विचार करू लागली...