ओढ - प्रेमकथा - भाग 1 Nikhil Deore द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ओढ - प्रेमकथा - भाग 1

ओढ -- प्रेमकथा (भाग 1)


कथेचे सर्व हक्क लेखकाकडे

'आज तिसरा दिवस तिला न पाहण्याचा' तो स्वतःशीच म्हणाला. त्याची अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. तिच्या असं अचानक गायब होण्याने त्याच्या हृदयात शल्य विशल्य निर्माण होत होतं. कितीतरी वेळ तो तसाच बाहेर कोसळणाऱ्या वर्षांसरिंना एकटक पाहत होता. कॉलेजनंतर फार क्वचितच त्याने असा शांत भासणारा पाऊस पाहला होता. आसमंतला सप्तरंगाचा इंद्रधनू शालू नेसलेला.. सात रंगाच्या छटेतून थंडगार पावसाचे थेंब धरणीला भेटायला आतूर झाले होते. त्या पावसात तरी त्याला काय दिसत काय असावं. तिची सुंदर मूर्ती की तिचे केळीच्या गाभ्यासारखे ईवले ईवले हात ज्यात ती हिऱ्यासारखे पावसाचे टपोरे थेंब मुठीत घट्ट आवळून लहान मुलांसारखा विभोर करीत होती? देवच जाणे.. आपल्या लहानश्या केसांवरून हात फिरवत समोरच्या चिंब भिजणाऱ्या पक्षांच्या जोडप्याला तो पाहत होता. चोचीत चोच टाकून एकरूप झालेले ते जोडपे.. हलकासाही दुरावा असाह्य होईल असं जणू ते दर्शवीतच होते.. पून्हा तिच्या आठवणीने त्याच मन घायाळ झालं. त्याच्या मनाच्या हिरव्यागार पर्णवेलीवर शंकेचे, तर्काचे काळे विहंग येऊन बसले होते. मनाची पर्णवेली तीव्रपणे झटकून तर्काचे काळे विहंग दूर पळवण्याचा अपुरा प्रयत्न त्याने केला.. पण छे! विचार एवढे नियंत्रित थोडी ना असतात.
" पुढचा शॉर्ट रेडी करायचाय नकुल.. जा सर्व तयारी करून घे " Director प्रभास यांचे शब्द त्याच्या कानावर आदळले. तसा तो भानावर आला. पुढच्या शॉर्टची संपूर्ण तयारी करू लागला. चित्त तर आधीच थाऱ्यावर नव्हतं. फिल्डवर जाऊन खळूने सर्व आखणी केली. नायक, नायीकेला तयार केलं. त्यांचे डायलॉगही त्यांना समजून सांगितले.

नकुल देवकर हे त्याच पुर्ण नाव. काही वर्षांपूर्वीच त्याने विज्ञान शाखेतून M.Sc पदवी घेतली होती. पुढे काही काळ Laboratory assistant म्हणून जॉबही केला.. पण मनाच भिरभिरत पाखरू शेवटी आपल्या घरट्याकडेच परत येत ना म्हणजे आपल्या प्रिय क्षेत्राकडेच वळत ना. नकुल तरी याला कसा अपवाद ठरला असता. काही काळ जॉब केल्यावर आतल्या दिव्य मनाने कौल दिला की आपला हर्ष नेमका कश्यात आहे. त्याला शालेय जीवनापासूनच लिखाणाचा छंद होता. कथा, कविता, चारोळ्या तो कायम डायरीवर उतरवीत रहायचा. यालाच त्याने आपल्या करिअरचा मार्ग निवडला. आधी Blogger म्हणून काम केलं.. त्यात त्याने अनेक प्रेमकथा, कविता, चारोळ्या आपल्या ब्लॉग साईट वर पोस्ट केल्या होत्या. हळूहळू त्याच्या प्रेमकथा लोकांना आवडू लागल्या. नकुलच्या कौटुंबिक प्रेमकथेचा विशिष्ट वाचक वर्ग निर्माण झाला. नकुल आणि प्रेमकथा हे समीकरण फार लोकप्रिय होऊ लागलं होतं. पुढे चालून याच लिखाणशैलीमुळे आधी Youtube वरून कथा अभिवाचणासाठी त्याला ऑफर येत गेल्या. त्यातून त्याला चांगली प्रसिद्धीही मिळत गेली. हळूहळू शॉर्ट फिल्मसाठीही त्याच्या कथांना दिग्दर्शकांनी पहिली पसंती दर्शविली. त्याच्या कथेवर बऱ्याच शॉर्ट फिल्म्सही येऊ लागल्या. नकुल मात्र स्वतःला फक्त लेखणापुरतच सीमित ठेऊ इच्छित नव्हता. दिग्दर्शक म्हणूनही लोकांपुढे यावं असं त्याला मनोमन वाटू लागलं. मग काय आपल्या करियरचा दूरचा विचार करता त्याने पुण्यातील एका फिल्म स्कूल मधून फिल्म मेकिंग आणि डीरेक्शनचा कोर्स केला. या कोर्समुळे त्याला शॉर्ट फिल्म आणि फिल्म मेकिंग मधला खडान खडा लक्षात आला. आधीच लिखाण आणि कल्पनाशक्तीत पारंगत असलेला नकुल फिल्म, वेब सिरीस बनण्यासाठी आता धडपडू लागला होता. या प्रवासात त्याला फिल्म क्षेत्रातले कितीतरी उमदे व्यक्तीमत्व मार्गदर्शक म्हणून भेटले. प्रत्येकांच्या अनुभवावरून तो फिल्म क्षेत्रातले विविध रंग पाहत होता..अनुभवत होता. आपल्या कल्पनारम्य जगाला लोकांपुढे चित्ररुपी साकरण्याच स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. फिल्मक्षेत्रात त्याच्या शॉर्ट फिल्ममुळे नकुल तसाही बराच चर्चेत होता. पुढे याच स्वयंमसिद्ध हिऱ्यावर मराठीतील प्रसिद्ध Director प्रभास यांची नजर पडली. नकुललाही Direction क्षेत्रात पुढे जायचं होतंच म्हणून त्याने Director प्रभास यांच्या आत सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Direction) म्हणून काम करायचं ठरवलं. दिग्दर्शक प्रभास हे सध्या 'प्रेमरंग' ही मालिका करत होते.. ज्यात एकूण वीस कथा असून पूर्णतः चौसष्ट भाग होते. नकुलने यात पाच कथांच लेखन केलं होतं. अबोली, तुझं माझं जमेना, श्वास, चैत्रऋतु, प्रेमाचे दिवस ह्या पुर्ण पाच कथा. आज शेवटची कथा चैत्रऋतू याच शूटिंग सुरु होतं. नकुलचं शारीरिक वर्णन करायचे झाल्यास.. पाच - साडेपाच फूट उंचीचा, लांब जरा अस्तव्यस्त केस पण त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर फार शोभून दिसायचे. आत गेलेले डोळे..जिम मारून शरीरयष्टी पीळदार किंवा फुगलेले बाहूकंटक असं काही फिल्मी वर्णन मी त्याच करू शकत नाही. देहाने मध्यम अगदीच बारीक नाही तर फिल्म मधल्या अभिनेत्यासारखी मुस्क्युलर बॉडीही नाही. योग करून ताणलेले दंड..गौऱ्या चेहऱ्यावर हलकी हलकी दाढी तर त्याविरुद्ध घनदाट मिश्या. नुकताच त्याने अठ्ठाविशीत प्रवेश केला होता. त्याच्या शरीरयष्टीवरून कुणीही त्याला अठ्ठाविशीतला तरुण म्हणणारच नाही. जास्तीत जास्त चोवीस किंवा पंचवीस वर्षाचा तो असेल असाच तर्क सर्व लावत होते. कामाप्रती समर्पित, भविष्यात स्वतःला दिग्दर्शक म्हणून पाहणारा, कमी बोलणारा, आपल्याच जगात तासान तास रमून असणारा तो.

" नकुल सर्व तयारी झालीय? " दिग्दर्शक प्रभास विचारत होते.
" हो सर झालीय सर्व तयारी ".
" नकुल तूला नाही वाटत तू ईथे काही बदल केलाय म्हणून?"
" नाही सर " त्यांना काहीशी अफरातफर झाल्या सारखी वाटली. खरंतर त्याने तिथले डायलॉग काढून टाकले होते.

क्रमश..

पुढचा भाग थोड्या वेळात.