घरोघरी मातीच्या चुली पळसाला पाने तीन Kalyani Deshpande द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घरोघरी मातीच्या चुली पळसाला पाने तीन

शब्दशः(अक्षरशः) अर्थ:- सगळीकडे मातीच्याच चुली असतात कोणाकडे लाकडाची कोणाकडे लोखंडाची असे नसते.
किंवा कुठेही गेलं तरी पळसाला तीनच पानं असतात.

लाक्षणिक अर्थ(गर्भितार्थ):- इथून तिथून सगळीकडची परिस्थिती सारखीच असते आणि मानवी स्वभाव थोडया फार फरकाने सारखाच असतो.

त्यावर आधारित कथा:-

या उन्हाळाच्या सुट्टीत रमा आत्याच्या मुलाचं लग्न होतं त्यामुळे सगळे पाहुणे गावी तिच्या घरी जमले होते. रमा आत्या मोठी आणि शामा आत्या धाकटी अश्या मला दोन आत्या आहेत. आणि रमेश काका माझे धाकटे काका आहेत. रमेश काकांना एकच मुलगी आहे नीता तिचं नाव ती साधारण माझ्याच वयाची आहे.

रमा आत्याकडेचे हे शेवटचेच कार्य कारण राकेश चे लग्न झाले होते त्याला तर पाचवर्षांची मुलगी आहे. राकेश ची बायको रत्ना वहिनी स्वभावाने खूप छान आहे. आणि सुदेश हा आत्याचा धाकटा मुलगा . त्याच्याच लग्नाच्या चार दिवस आधीच आम्ही सगळ्या जणी बहिणी बहिणी जमलो होतो. आत्याच्या चौसोपी वाड्याच्या गच्चीवर बसून गप्पा ठोकत होतो .आमचे आईवडील खाली बैठकीत बसले होते.

शामा आत्याला दोन मुली मोठी मुलगी शीतल आणि लहानी मीनल
त्या दोघी आणि मी,नीता व राकेश दादाची बायको रत्ना वहिनी अश्या गप्पा करत होतो.

बोलता बोलता गाडी केव्हा सासरच्या मंडळींवर गेली कळलं ही नाही.
"का गं नीता तुझ्या सासूबाईंचा स्वभाव फारच खाष्ट आहे असं ऐकलं.",शीतल

"हो न बाई! काय करणार? मी केलेल्या प्रत्येक कामात त्या दोषच काढतात! उपमा पिवळा का केला? कढी पांढरी असते आपल्याकडे! माहेरचं माहेरीच विसरायचं आता. तुझ्या माहेरी असेल हळकुंडाची शेती. मी किती जेवायचं, मी आणि नितीन(तिचा नवरा)आम्ही बाहेर जायचं की नाही गेलो तर किती वेळात परतायचं हे सगळं सासू बाईच ठरवतात.",नीता

"बाई ! कठीणच आहे! ",मीनल

"का गं मीनल मी तर ऐकलं की तुझ्या सासूने आत्या आणि मामा तुमच्याकडे आले तेव्हा त्यांनी लवकर घराचं दारचं उघडलं नाही आणि आत गेल्यावर ही त्या बोलल्याच नाही म्हणे",मी

"हो माझ्या सासूबाई खूप वक्तशीर आहेत आई बाबांना यायला वेळ झाला त्यामुळे त्यांना राग आला अश्या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप राग मनात धरून ठेवतात त्या. तुझ्या कडे कसं वातावरण आहे नेहा!",मीनल ने मला विचारलं.

"माझ्या सासरी तर वेगळंच प्रकरण आहे. माझे सासू सासरे मी समोर असली की इतरांसमोर माझी खूप प्रशंसा करतात पण माझ्या माघारी काही एकाचं दोन लावून माझी बदनामी करतात.",मी

"बाई! एकेकाची वेगळीच तऱ्हा आहे. माझ्या कडे माझी नणंद लग्नाची आहे ती सतत माझ्यावर वॉच ठेवत असते. मग माझी सासूबाई आणि नणंद दोघी मला सारख्या टोमणे मारत असतात.
नणंदे कडून काही चुका झाल्या तरी सासूबाई तिला काहीच म्हणत नाही पण माझ्याकडून थोडीशीही चूक झाली कधी क्वचित दूध उतू गेलं की "बाई यांच्या माहेरी दुधाच्या नद्या वाहतात ह्यांना काय किंमत असणार" किंवा भाजीत मीठ जास्त पडलं की "घरी काही शिकवत नाही आणि लग्न करून पाठवून देतात असे दिवसभर टोमणे मारत असतात. ते तरी बरं नवरा त्यांचं एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो म्हणून कसंतरी निभतेय",शीतल म्हणाली.

एवढा वेळ रत्ना वहिनी शांत बसलेली बघून "अगं वहिनी बोल न काहीतरी", असं मी तिला म्हंटल.

"तू पण कमाल करते नेहा! ती सध्या तिच्या सासरी आहे. इथेच राहून इथल्याच तक्रारी कशी करेल ती? आपण माहेरी आहोत म्हणून आपण एवढं सगळं बोललो. ती जेव्हा माहेरी जाईल तेव्हा बोलेल, नाही का गं वहिनी!",नीता हसत बोलली.

"नाही हो तसं काही नाही!",असं म्हणत वहिनी हसायला लागली आणि तिच्या पाठोपाठ आम्हीही हसू लागलो.

तेवढ्यात रमा आत्याचा मोठा आणि थोडा रागात आवाज आला,
"रत्ना!! ए रत्ना sss"
असा आवाज देत आत्या वरच गच्चीवर आली.
"कमाल आहे रत्ना तुझी इथे चक्क बसून गप्पा काय छाटतेय? इकडे तुझी सासू एकटी काम करतेय दिसत नाही तुला?"

"आत्या आम्ही सगळ्याच येतो मदतीला",मी म्हंटल.

"नका गं! तुम्ही बसा! तुम्ही माहेरवाशिणी पण हिला कळायला नको का! एका मुलीची आई आहे पण बालिशपणा काही जात नाही. चल बरं रत्ना भाज्या वगैरे निवडून घे. अंगण वगैरे झाडून घे नुसती बसू नको",असं म्हणत आत्या तरातरा निघून गेली आणि तिच्या मागून रत्नाही निमूटपणे निघून गेली.

आम्ही चौघीही पाच मिनिटं एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसून राहिलो.
"बघितलं सगळीकडे मानवी स्वभाव सारखाच. सगळी कडची परिस्थिती सारखीच.",शीतल म्हणाली.

"ते म्हणतात न! घरोघरी मातीच्या चुली",मीनल

"किंवा पळसाला पाने तीन",नीता व मी सोबतच म्हणालो.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆