Out of the fire books and stories free download online pdf in Marathi

आगीतून फुफाट्यात

अर्थ: एका संकटातून सुटका होत नाही तोवर दुसऱ्या संकटात सापडणे.

शैलजा आज बऱ्याच दिवसांनी मोकळी हसत होती. शरद शी लग्न केल्यापासून तर घटस्फोट घेतल्यावरही काही महिने ती उदासच दिसायची. शरद आणि शैलजा चे लव्ह मॅरेज. एकाच मेडिकल कॉलेजमध्ये ते शिकले आणि एकाच हॉस्पिटलमध्ये ते प्रॅक्टिस करत असत. शैलजा स्त्रीरोगतज्ज्ञ होती तर शरद बालरोगतज्ज्ञ होता. एकमेकांना पूरक असे त्यांचे व्यवसाय असल्याने आणि एकंदरीत दोघांना आपले स्वभाव जुळतात असं वाटल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय केला आणि एका शुभ मुहूर्तावर ते दोघे विवाहबद्ध झाले.

लग्न झाल्यावर शैलजाला शरद च्या वागण्यात कमालीचा फरक जाणवू लागला.
आधी तिच्या कामाची प्रशंसा करणारा शरद तिच्या वाढत्या प्रॅक्टिस वर जळू लागला.
शरद छोट्याछोट्या कारणांमुळे अपसेट होत असे आणि सतत शैलजाला दोष देऊ लागला. तिचं काही चुकलं असो नसो तिला तो घालून पाडून बोलू लागला. तिने काहीही स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला की तो तिच्यावर हात उठवत असे.

त्यामुळे शैलजाच्या आयुष्यातील सुख शांती नष्ट झाली होती. हॉस्पिटलमध्ये सुद्धा ती नीट काम करू शकत नसे. ती सतत तणावाखाली राहत असे. तिचा पूर्ण आत्मविश्वास ढासळला.
त्यादिवशी सकाळीच भाजीत मीठ जास्त पडल्यामुळे शरद तिला बोल बोल बोलला होता,
"काय धड भाजी सुद्धा करता येत नाही तुला? फक्त डॉक्टर म्हणून मिरवता येते आधी नीट स्वयंपाक करायला शिक. स्वतःला फार मोठी डॉक्टर समजू नको. जा पुन्हा भाजी बनव"

"शरद अरे आज माझं हॉस्पिटलमध्ये महत्वाचं ऑपरेशन आहे आधीच थोडा वेळ झाला आता परत जर भाजी बनवली तर आणखी वेळ होईल आजच्या दिवस ऍडजस्ट कर उद्यापासून मी लक्ष देऊन करेन भाजी"

"बस्स फक्त हॉस्पिटल हॉस्पिटल एवढंच सुचते तुला घराकडे कोण लक्ष देणार? "

"माझा नाईलाज आहे आता मला हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक आहे",असं म्हणून ती घराबाहेर पडणार तेवढ्यात शरद ने तिच्या हाताला धरून तिला थांबवलं आणि तिला जबर मारहाण केली."

त्यादिवशी असलेलं तिची महत्वाची सर्जरी बोंबलली दुसऱ्या दिवशी वरिष्ठांचे तिला बोलणे खावे लागले. ते बघून शरद मनमुराद हसत होता. तिच्या सतत होणाऱ्या चूका आणि कालचे महत्वाचे ऑपरेशन ला तिची अनुपस्थिती यामुळे तिला हॉस्पिटलमधून कमी करण्यात आलं.

शरद ला हेच हवं होतं. शैलजा त्यादिवशी घरी गेलीच नाही ती तडक तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिथूनच एक वकील बघून तिने शरद च्या विरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

त्यानंतर घटस्फोट द्यायला शरद ने बराच त्रास दिला. दोन वर्षे रखडत रखडत शेवटी तिला कसाबसा त्याच्यापासून घटस्फोट मिळाला.

घटस्फोट मिळवण्याच्या भानगडीत शैलजाचे वकील शेखर कडे वारंवार जाणे होत असे त्यातच शैलजा आणि वकील शेखर ह्यांचे स्वभाव जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काही महिन्यातच शेखर चा विक्षिप्त स्वभाव संशयी स्वभाव शैलजाच्या लक्षात येऊ लागला.

शेखर सतत तिच्या पाळतीवर राहू लागला. ती क्लीनिक मध्ये जाताना येताना ती क्लिनिकमध्ये असताना तो कधीही येऊ लागला.
ह्या पेशंट शी तू जास्त बोलली, ह्या पेशंट ला बघून तू का हसली, ह्या पेशंट ला तपासायला तुला जास्त वेळ लागला, असे तो निरर्थक संशय घेऊ लागला. कुठेही ती बाहेर जायला निघाली की कुठे जाणार? कोणासोबत? नक्की मैत्रिणींसोबतच न? कितीवेळ लागणार? कधी तिचा फोन एंगेज आला की कोणाशी बोलत होती? दाखव तुझा फोन!
बरेचदा तिचं लक्ष नसताना अचानक तो तिच्या हाताला सिगरेट चे चटके द्यायचा आणि तीला त्रास झालेला बघताच तो मोठमोठ्याने हसायचा.

शैलजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली होती. डॉक्टर शरद पासून घटस्फोट मिळवण्यासाठी तिने वकील शेखर ची मदत घेतली होती पण आता वकील शेखर पासून घटस्फोट घेण्यासाठी तिला आणखी एक वकील शोधणं गरजेचं होतं.
■■■■■■■■■■■■■■■

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED