असतील शिते तर जमतील भुते Kalyani Deshpande द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

असतील शिते तर जमतील भुते

अक्षरशः(शब्दशः) अर्थ: जिथे अन्नाचे कण पडलेले असतात ते खाण्याच्या मोहाने भुतं तिथे येऊन जमा होतात.

गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ): जिथे काही फायदा होण्याची शक्यता वाटते तिथे लोभी लोकं आपोआप गोळा होतात.

एका गावात एक प्रसिध्द वकील राहत असत. प्रल्हाद पंत म्हणून ते गावात ओळखल्या जात. बायकोच्या पश्चात ते एकटेच आपल्या घरी राहत असत. त्यांना दोन अपत्ये होते. मोठी मुलगी तिच्या नवऱ्याची नोकरी परदेशी असल्याने परदेशी स्थायिक झाली होती.

आणि धाकटा मुलगा हा शिक्षण घेण्यासाठी शहरात राहत असे. शहरात शिक्षण घेतल्यावर आहे ते शिक्षण अपुरं आहे असं त्याला वाटल्याने तो वर्षभर उच्चशिक्षणासाठी परदेशी गेला.

त्यामुळे प्रल्हादपंतांना नोकरांच्या भरवश्यावर गावी असलेल्या घरात एकटंच राहावं लागे. मुलगा मधून मधून वडिलांना भेटत असे परंतु कायमस्वरूपी त्यांच्याजवळ कोणीच राहत नसे.

त्यामुळे नोकर माणसे सुद्धा एकटा म्हातारा बघून कामं करायला नखरे करत असत. त्यामुळे प्रल्हादपंतांना अवा च्या सवा पैसे देऊन नोकरांना धरून ठेवावं लागे.

प्रल्हादपंतांना चमचमीत पदार्थ खाण्याची आवड असल्याने ते त्यांना हवे ते पदार्थ नोकरांकडून बाहेरून मागवून घ्यायचे. नोकर सुद्धा परकेच असल्याने ते सुद्धा त्यांच्या पथ्याची काळजी घेत नसत. त्यामुळे त्यांचं त्यांच्या पथ्याकडे साफ दुर्लक्ष व्हायचं. नोकर लोकं 10 रुपयाचं सामान 20 रुपयाला सांगून त्यांच्याकडून पैसे उकळून घेत असत. मुलगा जेव्हा जेव्हा त्यांना भेटे तेव्हा त्यांना त्यांच्या पथ्या ची जाणीव करून देई. मुलगा असेपर्यंत त्यांच्याच्याने पथ्य पाळल्या जाई परंतु तो शहरात गेला की त्यांच्या पथ्याची काळजी घ्यायला कोणीही नसे.

नाही म्हणायला त्यांना नातेवाईक बरेच होते. एक धाकटा भाऊ व त्याचे कुटुंब , एक धाकटी बहीण व तिचे कुटुंब हे सगळे जवळच्याच गावी राहायचे. एक बहीण व तिचे कुटुंब शहरात राहत असे. परंतु चार दिवस प्रल्हादपंतांकडे ते एकटेच राहतात तर त्यांच्या सोबतीला येऊन राहावं असं कोणाला वाटेना.

परदेशी असलेली मुलगी भारतात कधी काळी येऊनही चुकूनही आपल्या वडिलांना भेटायला गावी जात नसे. जे काय त्यांचं बोलणं व्हायचं ते फक्त फोन वरून.

अशातच एके दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचं देहावसान झालं.

झालं आधी त्यांच्याकडे एकही दिवस येऊन न राहिलेले नातेवाईक भराभर जमा झाले.
प्रल्हादपंतांच्या धाकट्या भावाने दांभिकपणा करून मी भावासाठी काय काय केलं ह्याचा नातेवाईकांना पाढा वाचून दाखवला. ह्यापुढे दादाच्या पश्चात त्याच्या मुलाला मी वडिलांसारखाच आहे असं त्याने नातेवाईकांना सांगितले.

आणि तेरवी चौदावी झाली रे झाली की लगेच दिवंगत प्रल्हादपंतांची मुलगी तिच्या धाकट्या भावाशी इस्टेटी वरून भांडू लागली. प्रल्हादपंतांचा धाकटा भाऊ त्याची बायको हे सगळे सुद्धा त्यांच्या मुलाशी पैश्यांवरून भांडू लागले. प्रल्हादपंतांच्या मुलीने आणि धाकट्या भावाने त्यांच्या मुलाला पैश्यांवरून मारहाण करायला सुद्धा कमी केलं नाही.

इकडे नोकर चाकर सगळे खोटे खोटे वाढवून चढवून पगाराचा आकडा सांगू लागले. एकदा पगार घेतला तरी पुन्हा पुन्हा पैसे मागू लागले. दिवंगत प्रल्हादपंतांच्या मुलाला त्यांनी पैशासाठी भंडावून सोडले.

शेजारचे आश्चर्यानं त्यांच्या घराकडे बघू लागले आणि आपापसात चर्चा करू लागले.

"काहो ह्यातले तर काही नातेवाईक आपण एवढ्या वर्षात बघितले सुद्धा नाही. ह्यांच्या मुलीला तर आज मी पहिल्यांदा बघतोय एवढ्या वर्षात कधी फिरकली सुद्धा नाही",एक शेजारी

"आणि भाऊ तर जवळच राहायचा तो ही कधी दिसला नाही आणि आज काय भांडतायेत पैश्यांसाठी वारे वा! कमाल आहे!",दुसरा शेजारी

"अहो प्रल्हादपंतांकडे बरीच संपत्ती होती आणि त्यांनी मृत्युपत्र केलं होतं की नाही काय माहीत? ते म्हणतातच ना 'असतील शिते तर जमतील भुते' सगळे जण पैशासाठी जमलेत आणि कडाकड भांडतायेत",पहिला शेजारी

"कठीण आहे! दुसरं काय!",असं हातवारे म्हणत शेजारी पांगले.
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆

मातृभारती च्या वाचकांनो कथा वाचल्यावर अभिप्राय जरूर द्या कारण वाचकांचा अभिप्राय हीच लेखकांची प्रेरणा

धन्यवाद 🙏🏻