मुलीचा बाप Adv. krishna patil. द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुलीचा बाप

. 🟥 मुलीचा बाप 🟥


“दिवसभर पोलीस स्टेशनच्या बाहेर लिंबाच्या झाडाखाली थांबलो. खूप वाट पाहिली. आता येईल, मग येईल असं वाटलं. पण ती आलीच नाही. आता पुढे काय करायचं साहेब?”


अनिताचे आई वडील मला विचारत होते. ते हवालदिल झाले होते. गेले सहा दिवस त्यांना धड जेवण नव्हतं की झोप नव्हती. धास्ती तर रात्रंदिवस लागली होती. ते रोज पोलीस स्टेशनला हेलपाटे मारत होते. अगतिक होऊन दिवसभर थांबत होते. मात्र पदरी निराशाच येत होती. दिवस मावळला की उदास होऊन घरी परतत होते.


“दुसरा काही इलाज निघतोय का बघा ना साहेब. आणखी एखादा अर्ज करूया का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला पण एक अर्ज देऊया का?”


मग मी त्यांची समजुत काढली.

म्हणालो, “आपण जो एक अर्ज पोलीस स्टेशनला दिला आहे, त्याची एफआयआर नोंद झाली आहे. पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. आपण थोडी वाट पाहायला हवी”.


अनिताची आई घाबरत म्हणाली, “पोरीच्या जीवाला तर बरं वाईट झालं नसेल?”


मी म्हणालो, “काही काळजी करत बसू नका. थोडे शांत व्हा. घरातले वातावरण विनाकारण भयंकर करू नका. तुमची अनिता आता लहान नाही. ती सज्ञान झाली आहे. त्यामुळे तिलाही काही गोष्टी समजतातच की…”


“कशाची सज्ञान साहेब. सज्ञान असती तर असं झालं असतं का?”

मी त्यांना उगीचच धीर द्यायचा म्हणून म्हणालो, “काही झालेलं नाही. उगीच अभद्र विचार डोक्यात आणू नका. तुम्ही आता स्वतःला कंट्रोल करायला हवं.”

“कसं कंट्रोल करू साहेब? पोरगीला फसवले आहे. तिला नक्की कोणीतरी काहीतरी फुस लावली आहे. ती आमच्या शिवाय तासभर राहणार नाही. पण तिला डांबून ठेवलं असणार. त्याशिवाय ती थांबणार नाही. काहीतरी लवकर करा ना साहेब‌.”


अनिताच्या आईचा प्रक्षोभ झाला होता. ती बिचारी पार कोसळून गेली होती. आता कशातच राम उरला नाही असं तिला वाटत होतं. ती पतीला घेऊन रोज भटकत होती. कधी पोलीस स्टेशन, कधी गावचा पुढारी, कधी वकील तर कधी नातलगातला कोणीतरी जाणकार. पण कुठेच यश येत नव्हतं. सुभाषराव तर पार कोळपून गेले होते. तोंडावरची पार रया गेली होती. दोन दिवस त्यांनी अंघोळही केली नसावी. खुरटी दाढी वाढली होती. पोटात तर अन्नाचा पत्ताच नव्हता. घरघरणाऱ्या स्वरात आणि भीतीच्या आवाजात म्हणाले, “पुढे काय करायला पाहिजे? यातून मार्ग काय काढायचा? सगळं घरदार गेले आठवडाभर टेन्शनमध्येच आहे. पोरगा तिकडे नागपूरला. तो पार्ट टाइम जॉब करत शिकतोय. आम्ही दोघे इकडे गावी. काय करावं? आता डोकं चालायचं बंद झालंय साहेब.”


एवढ्यातच अनिताचे मामा आले. ते सनशाइन या कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करत होते. नेहरू शर्ट आणि पायजमा यामुळे ते पुढारी असल्यासारखे दिसत होते. त्यांचे शिक्षण बेताचेच होते. पण व्यवहार ज्ञान चांगले होते. त्यांच्या बोलण्यावरूनच ते ओळखू येत होतं. त्यांना सचिनराव या नावानेच सर्वजण ओळखत होते.


सचिनराव म्हणाले, “वकील साहेब, मी दाजींना नेहमी सांगत होतो, अनिताचा लै लाड करू नका. पोरं नेहमी धाकात असायला हवीत. शेवटी ती पोरीची जात आहे. तिला त्या पद्धतीनेच वाढवा. पण यांचं मात्र माझं तेच खरं. लाड तर किती करायचा? दोन महिन्यापूर्वी तिच्या आयफोनचा स्क्रीन गेला. दहावीस हजारात नवीन स्क्रीन बसवायचं सोडून यांनी नवीनच आयफोन घेऊन दिला. तोही सव्वा दोन लाख रुपये खर्चून.”


मी म्हणालो, “असू द्या सचिनराव. शेवटी बापाचं काळीज आहे. शिवाय एकुलती एक पोरगी आहे”.

“साहेब आम्हाला पण एकच पोरगी आहे. पण वाकडं पाऊल पडंल कुठलं?

मी म्हणालो, “अनिताने तर वाकडे पाऊल कुठे टाकले आहे? तिला बळजबरीने फूस लावून नेले आहे. आम्ही तशी तक्रार दिली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे”.


सचिनराव क्षणभर थांबले. त्यांना आश्चर्य वाटले. ते थोडे गंभीर झाले. त्यांनी अनिताच्या आईकडे आणि सुभाषराव यांच्याकडे पाहिले. सुभाषरावंना म्हणाले, “म्हणजे खरी वस्तुस्थिती तुम्ही सांगितलीच नाही म्हणायची..?”

सुभाषराव शांतपणे म्हणाले, “आमचा आमच्या मुलीवर विश्वास आहे. ती कधीच तुम्ही म्हणताय तसं करणार नाही. तिला लहानाची मोठी कशी केली आमचं आम्हाला माहिती”.


सुभाषरावांचा आवाज गहिरा झाला. ते गदगदले. पुढे काहीच बोलले नाहीत.

“बघितलं का वकील साहेब, अजूनही हे डोळे उघडण्यास तयार नाहीत. मुलीची चूकच नाही असं त्यांना वाटतंय.”

मी म्हणालो, “तुम्ही सर्वजण शांत व्हा. आता एक काम करूया. पोलिसांनी आपणास अजून दोन दिवस मागितले आहेत. आपण तोपर्यंत थोडं शांततेत घेऊया. दोन दिवसांनी चित्र स्पष्ट होईल. मग पुढे काय करायचं त्याचा निर्णय घेऊ.”


ही गोष्ट त्या तिघांनाही पटली. सचिनरावांची बहीण म्हणजे अनिताच्या आईलाही ती गोष्ट बरोबर आहे असं वाटलं. मग थोड्यावेळाने तिघेही उठले. जड पावलांनी ऑफिसच्या बाहेर पडले.


अनिता एसवाय बीएससीला होती. गेले आठ दिवस ती बेपत्ता होती. तिला फूस लावून पळवून नेलं आहे की ती स्वतःहून पळून गेली आहे याबाबत संभ्रम होता. तिच्या आई-वडिलांना वाटत होतं मुलगी भोळी आहे. निष्पाप आहे. सरळ मार्गी आहे. दिसायला सुंदर आहे. अत्यंत देखणी आहे. तिला कोणीतरी जाळ्यात ओढून फसवले आहे. तर अनिताच्या सख्ख्या मामाला खात्री होती की मुलगी स्वतःहून पळून गेली आहे. तिला कोणीही फसवलं नाही. फसवण्या इतपत ती काही भोळी नाही.


अनिता बीएससी नंतर एमपीएससी करणार होती. एमपीएससी करून ती क्लास वन अधिकारी होणार होती. तिने तिचे स्वप्न बोलून दाखवल्यानंतर सुभाषराव तर खूप आनंदात होते. तिच्या स्वप्नाचा ते गांभीर्याने विचार करीत होते. त्यामुळे सुभाषरावनी तिच्या इच्छेनुसार तिला अकॅडमीत घातले. अकॅडमीतच मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहू लागली. बीएससी आणि एमपीएससी यांचा एकत्रित अभ्यास करू लागली. दर पंधरा दिवसाला सुभाषराव पालक भेटीला जात होते. दर महिन्याला सुनिता भेटायला जात होत्या.


बीएससीची एक टर्म संपली असेल. एके दिवशी ऑफिसमधून सुभाषरावना फोन आला.


“हॅलो, मी सक्सेस अकॅडमीमधून रेक्टर साळवी बोलतोय. अनिताचे पप्पा, सुभाषराव आहेत का?”

“होय सर. मीच बोलतोय. बोला”.

“अहो, तुमची अनिता कालपासून कुठेतरी न सांगता गेली आहे. तिने मोबाईल स्विच ऑफ करून इथंच ठेवला आहे. आम्ही खूप शोधाशोध केली पण ती कुठेच सापडली नाही. तुम्ही ताबडतोब अकॅडमीत येऊन भेटा”.


सुभाषरावांच्या काळजाचं पाणी झालं. पायाखालची जमीनच हादरली. घशाला कोरड पडली. दरदरून घाम फुटला. कशीबशी त्यांनी सुनीताला हाक मारली आणि ते मटकन खालीच बसले. सुनीताबाईंनी सुभाषरावांची अवस्था बघितली. त्या तर घाबरूनच गेल्या. जवळ येऊन त्यांनी विचारलं, “अहो, काय व्हायला लागलंय? चक्कर आलीय का? थांबा मी पाणी आणते.”


त्या पळतच गेल्या. तांब्या भरून पाणी आणलं. सुभाषराव कसे तरी दोन घोट पाणी पिले. सुनिताबाईंनी त्यांचा घाम पुसला. ते थोडे शांत झाले. मग त्यांनी सुनीताबाईंना सर्व वृत्तान्त सांगितला. दोघेही गल्लीतगात्र झाले होते. पण आता अकॅडमीत तर जायलाच हवं होतं. एकमेकाला आधार देत ते कसेबसे अकॅडमीत पोहोचले.


रेक्टरने त्यांना एका खोलीत नेलं. त्यांना बसायला खुर्च्या दिल्या. फॅन चालू केला. रेक्टर म्हणाला, “गेले दोन-तीन महिने ती अस्वस्थ होती. तिचं कशावरच लक्ष लागत नव्हतं. सारखी मोबाईलवर असायची. रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागीच राहत होती. मी तरी दोन वेळा विचारलं, काय होतंय? आजारी आहेस का? घरी जाऊ वाटतंय का? पण ती काहीच बोलत नव्हती. मला काही होत नाही म्हणायची आणि काल रात्रीच कधीतरी ती निघून गेली आहे”. एवढं सांगून ते थांबले. पुन्हा म्हणाले, “घरी काय भांडण तंटा झाला होता का?

सुभाषराव म्हणाले, “अहो, कसलं भांडण आणि कसला तंटा? तसले शब्द पण माहित नाहीत अनिताला. तळ हातावरच्या फोडा सारखं जपलंय तिला”.

रेक्टर म्हणाले, “आता पुढे काय करताय बघा? नियमाप्रमाणे आम्हाला तरी पोलीस तक्रार करावी लागेल किंवा तुम्हाला तरी करावी लागेल?”


सुभाषराव आणि सुनीताबाईंनी थोडा वेळ विचार केला. म्हणाले, “ठीक आहे. आम्ही असेच पोलीस स्टेशनला जातो. तक्रार करतो. तुम्ही तक्रार केली तर पेपरला येईल. आमचीच अब्रू जाईल. त्यापेक्षा आम्हीच पोलिसांच्याकडे जाऊन तक्रार करतो. एखादा वकीलही पाहतो. पुढची सर्व कायदेशीर कारवाई करतो”.


रेक्टर आत गेला. एक मोठे रजिस्टर घेऊन बाहेर आला. त्यावर सुभाषराव आणि सुनिताबाईंच्या सह्या घेतल्या. दोन्ही हात जोडून त्याने नमस्कार केला. म्हणाला, “आता तुम्ही जाऊ शकता. सापडेल कुठेतरी. काळजी करीत बसू नका”.


दोघे उध्वस्त होऊनच बाहेर पडले. काळीज फाटलं होतं. समोर अंधारच दिसू लागला. लेकरू कुठे असेल? जिवंत असेल की?.. नाही नाही ते विचार घोंगावू लागले. त्या तंद्रीतच ते पोलीस स्टेशनला गेले. तक्रार दिली. मुलगी कुठेतरी गायब झाली आहे. पोलिसांनी मिसिंग तक्रार दाखल करून घेतली. सुनिताबाई आणि सुभाषरावंना बरेच प्रश्न विचारले. तिचे मित्र कोण आहेत? मैत्रिणी किती आहेत? केव्हापासून ती अकॅडमीत आहे? या अगोदर कधी ती अशी गेली होती का? दिवसभर प्रश्नांची सरबती चालू होती.


दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी सुभाषराव आणि सुनीताबाई पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी सांगितले तपास सुरू आहे. मोबाईल असता तर लोकेशन मिळाले असते. पण मोबाईल ही तिने इथेच ठेवला आहे.


रोज पोलीस स्टेशनला जाऊन वैताग आल्यानंतर ते दोघेही वकिलांच्याकडे म्हणजे माझ्याकडे आले होते. पण पोलिस ठाण्यात तक्रार तर दिली होती. थोडं वाट पाहणं हेच हाती होतं.


दोन दिवस गेले. तिसऱ्या दिवशी सकाळी अनिताचे मामा आले. मी नुकताच ऑफिसमध्ये बसलो होतो. मामा कपाळाला टिळा लावून, स्वच्छ कपडे घालून आले होते. आल्या आल्या त्यांनी नमस्कार केला. मी ही नमस्कार केला.

मामा म्हणाले, “आमचे दाजी अगदी सरळ मार्गी माणूस. सगळं काम अगदी वळूंब्यात. त्यात अनितावर तर इतका जीव की काही विचारू नका. पण पोरगीनं चुकीचं पाऊल उचललं. पोरगीनं त्यांचा घात केला.”

मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, “तुम्हाला सगळं माहिती आहे?

“सगळं माहिती आहे. खडा ना खडा माहिती आहे साहेब.

“मग तुम्ही बहीणीला कल्पना दिली नाही?”

“दिली ना. बहीणीला दिली, दाजींनाही दिली. पण ती सुचना ऐकून बहीण दोन वर्षे माझ्याबरोबर बोलत नव्हती. मग मी तरी किती भाग घेणार?

“मुलगा चांगला आहे ना?”

“बेकार फिरतोय साहेब. घरी एकटी आई. याला जगातली सगळी व्यसनं. बोंबलत फिरणे, मारामारी करणे, पुढाऱ्यांच्या मागे हिंडणे हाच याचा धंदा. त्याच्या पहिल्या बायकोला त्याने अशीच फसवून सोडून दिले आहे”.

“पण मुलगी तर इतकी शिकलेली. शिवाय एमपीएससीला बसलेली. तरी पण…?

“तेच तर आश्चर्य आहे. आता दाजींना कसं समजावणार. कारण अनिता म्हणजे त्यांचा जीव की प्राण. आजचा सातवा दिवस आहे साहेब. एखादा कप चहा घेतला असेल, नाहीतर पूर्ण उपाशी आहेत दाजी”.


सचिनराव पुढे गप्प झाले. त्यांना दाटून आलं. पुढे बोलता येईना. मी त्यांना टेबलवरची पाण्याची बाटली दिली. ते घोटभर पाणी प्याले. आणि पुन्हा बोलू लागले.


“अनिता पाचवीला होती साहेब. त्यावेळी तिला धाप लागू लागली. एक दोन दवाखान्यात दाखवलं. पण निदान लागेना. दाजींनी तिला ससूनला नेली. सर्व चेक केलं. तेव्हा डीपार्टमेंट प्रमुख डॉक्टर मानुगडे होते. त्यांनी दाजींना केबिन मध्ये बोलवून घेतले.”

म्हणाले, “आपण काय करता?

दाजी म्हणाले, “मी एमआयडीसीत आहे. अर्धवेळ नोकरी करतो आणि शेतीही करतो.” “तुमच्याबरोबर अजून कोण नातेवाईक आहेत का?

“नाहीत. मी एकटाच आलोय.”

“तुमच्या मुलीच्या हृदयाला होल आहे. त्यामुळे तिला धाप लागत आहे. एक झडप बदलावी लागेल. खूप मोठा खर्च आहे.”

“तरी किती पैसे लागतील?”

“अंदाजे वीस लाख लागतील”.

दाजी थोडा वेळच थांबले. म्हणाले, “माझी तयारी आहे डॉक्टर. मला फक्त दहा दिवस द्या. मी सगळ्या पैशाची व्यवस्था करतो”.


सुभाषरावंना पगार महिना पंधरा हजार. दोन्ही मुलांचे शिक्षण चालू होते. शेती पोटापुरती पिकत होती. तरीही सुभाषरावनी लाडक्या लेकीसाठी धाडस केलं होतं.


दहा दिवसांनी सुभाषराव मुलगीला घेऊन पुण्यात आले. आता ऍडमिट करण्याच्या तयारीनेच ते आले होते. केस पेपर काढला. नियमाप्रमाणे काही अँडव्हान्स भरला.


मुलीला ऍडमिट करताना कंपाउंडर सुभाषरावना म्हणाला, “बरका दादा, मुलीसाठी एवढा खर्च सहसा कोणी करत नाही. कारण शेवटी मुलगी ही दुसऱ्या घरचे धन आहे. पण तुमची मुलगी अगदी लाडाची दिसते. खूप जीव आहे तुमचा मुलीवर.”

सुभाषरावनी नुकते स्मितहास्य केले. पुढे काहीच बोलले नाही.


दोन दिवसांनी अनिताचे ऑपरेशन झाले. डॉक्टरनी अत्यंत यशस्वी शिस्तक्रिया केली.


डिस्चार्ज देतेवेळी डॉक्टरनी सुभाषरावना चेंबरमध्ये बोलवून घेतले.

म्हणाले, “आता ताण तणाव होईल असं तिच्याशी वागू नका. शक्यतो कोणत्याही बाबतीत तिला दुखवू नका.”


कदाचित त्याचा परिणाम असेल दाजी किंवा आक्का तिला एक शब्द बोलत नव्हते. चुकले तरी पोटात घालत होते.


तिच्या शिक्षणासाठी दाजींनी दोन शिफ्ट मध्ये कामाला सुरुवात केली. मुलीसाठी ते रात्रीचा दिवस करू लागले. पगार आला की तोळाभर सोनं घ्यावं. उसाचे बिल आलं की तिच्यासाठी एफडी करावी. दुधाचा पगार आला की तिच्यासाठी थोडाफार खात्यावर टाकावा. मुलग्याने कधी पैसे पाठवले तर थोडे तिच्यासाठी बाजूला ठेवावे. कधी कधी गमतीने मला दाजी म्हणायचे, “अनिताच्या लग्नापर्यंत ताकद आली तर तिच्या लग्नात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार आहे बघ”.


आमचे बोलणे चालू होते. एवढ्यातच सुभाषराव आणि सुनीताबाई आल्या. आत येता येताच त्यांनी विचारले, “काय लागला का तपास?”

मी म्हणालो, “पोलीस स्टेशनला गेल्यावर समजेल. पण बहुतेक तपास लागला नसावा. नाहीतर त्यांचा फोन आला असता”.

ते थोडावेळ थांबले. चहा झाला.

मी म्हणालो, “आता आपण पोलीस स्टेशनला जाऊया.”


आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला गेलो. पीआय डोंबे सरांनी आत बोलवलं. आम्ही पीआय समोर खुर्च्यावर बसलो. आम्ही काही बोलण्या अगोदरच साहेबांनी एक कागद आमच्याकडे दिला. सचिनराव तो कागद वाचू लागले. पोलीस स्टेशनला अनिताने दिलेला तो अर्ज होता.


“प्रति,

पोलीस निरीक्षक.

अर्जदार- अनिता सुभाष कावरे.

विषय- आई सुनीता आणि वडील सुभाष यांना कडक समज देण्याबाबत.

महोदय,

मी स्वखुशीने व माझ्या मर्जीने माझा मित्र रोहन याच्याशी लग्न केले आहे. परंतु ते लग्न माझे आई-वडिलांना मान्य नाही. त्यांचे पासून माझे पतीच्या व माझ्या जीवाला धोका आहे. तरी त्यांना भादंविप्रमाणे कडक समज देण्यात यावी.


अर्ज बघून सचिनरावांना आश्चर्य वाटलेच, पण सुभाषरावांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. सुनिताबाईंच्या पायाखालची जमीनच दुभंगली. कुणीच काही बोलायच्या अवस्थेत नव्हते. मलाही खूप आश्चर्य वाटले. सुनिता आणि सुभाषराव समजत होते काय आणि झाले काय? आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये त्यांचा अंदाज साप धुळीला मिळाला होता.


पीआय म्हणाले, “सुभाषराव, मुलगी आता सज्ञान आहे. तिचे हित अनहित तिला समजते. तिने तिच्या आयुष्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या निर्णयात तुम्हाला ढवळाढवळ करता येणार नाही. आता या सर्व गोष्टींचा शांत डोक्याने विचार करून या सर्व गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्याच लागतील. तुमच्या मुलीनेच सर्व तो निर्णय घेतला असल्याने त्याला इलाजही नाही.”


आम्ही पीआयला नमस्कार करून बाहेर पडलो.


सुभाषरावना चक्कर येऊ लागली. त्यांचा बीपी वाढला. त्यांना धड चालताही येईना. आता ते बेशुद्ध होऊन पडतील की काय अशी अवस्था झाली. सचिनरावनी तातडीने गाडी बोलवली. सुभाषरावना “वसुधा” हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.


दोन दिवस दवाखान्यात घालवल्यानंतर सुभाषराव बरे झाले. अशक्तपणा जाणवत होता पण कालच्या पेक्षा बरे होते.


आता मुलगी तर गेली होती. त्रागा करून काही उपयोग नव्हता. स्वतःला त्रास करून घेण्यातही अर्थ नव्हता. सुभाषराव आता बऱ्यापैकी सावरले होते. सुनीताबाईंनी सुद्धा मन घट्ट केले होते. जिच्यासाठी जीवाचं रान केलं त्या मुलीने दोघांनाही धोका दिला होता. धोक्याचं कारणही समजलेलं नव्हतं. पळून गेली ती गेली, ज्या मुलाबरोबर गेली त्या मुलाचे करिअर न बघता गेली. पूर्वीच्या लग्नाचा घटस्फोट झाला नसल्याने त्यांचे हे लग्न बेकायदेशीरच ठरणार होते.


एके दिवशी पुन्हा सुभाषराव, सुनिताबाई आणि सचिनराव असे तिघेजण ऑफिसला आले. पुढे काय करायचे हा प्रश्न होता. कोणत्या मार्गाने जावे याबाबत विचार विनिमय करण्यासाठी ते ऑफिसला आले होते. तिघेही येऊन माझ्यासमोर बसले होते. सुभाषराव अत्यंत तणावात पण शांत होते.


मग मीच म्हणालो, ”हल्लीच्या जनरेशनचं काही सांगता येत नाही. त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा आणि पुढे काय करतील त्याचा अंदाजच येत नाही. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. अर्थात हे सांगणं सोपं आहे. प्रत्यक्षात ज्याच्या जीवनात घटना घडेल त्याचं काय होईल याची मला कल्पना आहे. पण आता इलाज नाही.”


सुभाषराव अत्यंत लालबुंद डोळ्यांनी संतप्त होऊन म्हणाले, “साहेब, ज्या दिवशी पोरगी पळून गेली आणि तिने आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला अर्ज दिला त्याच दिवशी ती आमच्यासाठी मेली”.


मी म्हणालो, “मुलीने हा निर्णय भावनेच्या भरात घेतला आहे की कसा घेतला आहे कळायला मार्ग नाही. परंतु तो निर्णय तुमच्या दृष्टीने चुकीचा आहे. तिने तिच्या स्वतःच्या आयुष्याचा पालापाचोळा करून घेतला. सुभाषराव, तुम्ही आता मुलाकडे बघून तुमचे तुमचे जीवन आनंदाने जगायला शिकले पाहिजे”.


“होय साहेब. तेच ठरवलंय आम्ही. आता विषय फक्त एकच राहतो, आमची जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि त्यामध्ये माझ्या कष्टाने डेव्हलपमेंट केली आहे त्याबाबत काहीतरी बंदोबस्त आपण करूया”.


मी म्हणालो, तुमचा लहान मित्र म्हणून, सल्लागार म्हणून, एक माणूस म्हणून मला तर स्वतःला असं वाटते की मुलीचा वडिलोपार्जित हिस्सा तिचा तिला द्यावा. ती कधी ना कधी परत येईल. कदाचित त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. पण तिला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी ती तुमच्या रक्ताची आहे. त्यामुळे तिचा हिस्सा तुम्हाला द्यावा लागेल तुम्ही तो द्यावा….कायदेशीर सल्ला म्हणून विचाराल तर, तुम्ही एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून सगळी मिळकत कुटुंबाच्या कायदेशीर गरजेकरीता हस्तांतरित करू शकता. औषधोपचारासाठी, कुटुंबाच्या कर्जासाठी, कुटुंबाच्या इतर कायदेशीर गरजेसाठी तुम्ही ती इतर कोणाला हस्तांतर केली आणि नंतर ती तुमच्या मुलाने परत घेतली तर ती प्रॉपर्टी त्याची स्वतःची प्रॉपर्टी होईल. मुलीला त्या प्रॉपर्टी मध्ये कोणताही हिस्सा मिळणार नाही. परंतु संपूर्ण प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करून मुलगा तुम्हाला सांभाळेल याची शाश्वती तुमची तुम्हालाच घ्यावी लागेल.

मुलीला कोणताही हिस्सा न देता संपूर्ण वडिलार्जित प्रॉपर्टी हस्तांतरित करून मुलाचे नावावर करायची की मिळेल तेवढा मुलीला हिस्सा द्यायचा हे शेवटी तुम्हा दोघांच्या हातात आहे.


थोडा वेळ कुणीच कुणाशी काही बोललं नाही. सुभाषराव, सुनिताबाई एकमेकांकडे बघत राहिले. सचिनराव तसे शांतच होते. थोडा वेळ गेल्यावर सुभाषरावच म्हणाले, “दोन दिवसात आम्ही नवरा बायको विचार करतो आणि निर्णय घेतो. चालेल ना?”


मी म्हटलं, “अगदी निवांत निर्णय घ्या. कारण तो तुमच्या संपूर्ण आयुष्यभराचा निर्णय आहे.”


एवढ्यातच चहा आला. आम्ही सर्वांनी चहा घेतला. मग सुभाषराव, सचिनराव आणि सुनीताबाई शांतपणे ऑफिसच्या बाहेर पडल्या.

सुभाषराव पहिला निर्णय घेतील किंवा दुसरा निर्णय घेतील. त्यांना तो घ्यावाच लागेल. सुभाषरावांच्या निर्णयाला सुनिताबाई साथ देतील. ते त्यांची वडीलार्जित प्रॉपर्टी वाचवू शकतील किंवा पळून गेलेल्या मुलीला तिचा तिचा हिस्सा देतील. पण मुलीने केलेल्या कृत्यामुळे आतून रक्तबंबाळ झालेल्या आतड्याचं काय करायचं? मुलीच्या कृत्याने उध्वस्त झालेल्या कुटुंबाचं काय करायचं? मुलीच्या कृत्याने आई बापाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले त्याचं काय करायचं?


एकविसाव्या शतकातील युवा पिढीमधल्या काही युवक युवतींचे निर्णय अत्यंत घातक असे आहेत. कदाचित त्यांना त्यांच्या वयामधील थ्रील वाटत असेल. परंतु त्याचे परिणाम सर्वांनाच भोगायला लागतात त्याचं काय करायचं?


सुनीताबाई आणि सुभाषराव यांच्या कुटुंबात घडलेल्या या घटनेने माझ्यासमोर सगळे प्रश्नच प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिले???


©️ॲड. कृष्णा पाटील.

राष्ट्राधार, तासगाव. जि. सांगली.

✉️ adv.krishnapatil@gmail.com