नात्यामधील ओलावा अबोली डोंगरे. द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नात्यामधील ओलावा

सगळीकडे काळाकुट्ट अंधार, मध्येच गडगडाटी आवाजासह कोसळणाऱ्या वीजा, त्यात भर म्हणजे सपासप तोंडावर मारे करत बरसणारा पाऊस....एक जोरात किंकाळी मारावी तर ऐकायला तिथे कुणी असेल की नाही याची शाश्वती नव्हती. वातावरणातल्या गारव्यामुळे शरीर गोठल्यासारखे झाले होते. श्र्वासांची गती मंदावत होती. डोळे जड झाले होते अन् अशातच डोळ्यासमोर अंधारी आली. तेवढ्यात अचानक अतिशय कर्णकर्कश आवाज झाला आणि तो ताडकन उठून बसला. त्याने लगबगीने आजुबाजुला पाहिले. ते ठिकाण आणि ती जागा त्याला ओळखीची वाटली. कपाळावरचा घाम पुसत त्याने एक दीर्घ श्वास घेतला.
" संदेश, अरे काय झालं, बरा आहेस ना तू ; काही वाईट स्वप्न पाहिलस का तू आता झोपेत ? केवढ्याने दचकून उठलास तू" त्याची आई काळजीच्या स्वरात म्हणाली.
" सगळं डोळ्यांना दिसत असूनही तेच विचारायची सवय कधी जाणार तुझी काय माहित. काही आभाळ वगेरे कोसळलेलं नाहीये माझ्यावर , बरा आहे मी" असं म्हणत तो बाथरूमच्या दिशेने जायला निघाला.
थोड्या वेळाने तो फ्रेश होऊन बाहेर आला तर बाबा आणि त्यांच्यासोबत एक गृहस्थ बसलेले दिसले.
आणि आई किचनमध्ये त्यांच्यासाठी चहा बनवत होती. पण त्याची नजर कोणालातरी शोधत होती. त्याने घरात सगळीकडे पाहिलं पण हाती निराशाच आली. शेवटी कंटाळून तो परत बेडरूमकडे जातच होता की पाठीत जोरात धपाटा बसला.
"आली मोहतरमा, झाली का तुमची पावसासोबतची मिटींग " त्याने तिचे ओले केस पाहून विचारलं.
"गप, पावसासोबतची मिटींग काय म्हणतोस गाढवा; पावसातली सफर म्हण हवं तर... पाऊस अन् पावसातला तो ओलावा मन प्रफुल्लित करतो. हवेतला तो गारवा अंगावर शहारे आणतो, पावसाच्या सरींनी चिंब झालेल्या मातीचा सुगंध वातावरणात आणखी भर घालतो, अरे, पाऊस म्हणजे परीसस्पर्श !" ती म्हणाली.
" बस्स कर बाई तुझं पाऊसपुराण. मला तर आता झोपच यायची बाकी होती तेवढी" तो हसत तिला म्हणाला.
" हम्म, बंदर क्या जाने अदरक का स्वाद" तीही तोंड वेंगाडत म्हणाली.
" संदेश.... चहा घ्यायला ये रे" आईची हाक ऐकताच तो बाहेर आला.ते गृहस्थ अजूनही तिथेच बसले होते.
" काय ग वर्षा ताई, तू ओळखते का यांना? " त्याने चहाचा एक सिप घेत तिला हळूच विचारलं.तिने मान हलवत नाही असं सांगितलं.
" काय मग संदेश, कसा आहेस ?" त्या गृहस्थांनी आत्मीयतेने विचारले.
" अम्म् माफ करा पण मी ओळखलं नाही तुम्हाला, म्हणजे याआधी कधी बघितलं नाही ना तुम्हाला म्हणून विचारलं" त्याने प्रतिपादन दिलं.
" अरे हो तुमची ओळख करून द्यायची राहिलीच की, हे बघ संदेश हे माझे मित्र आहेत जुने पण ते दुसऱ्या शहरात होते आणि आता ते परत इथे स्थायिक झालेत रिटायरमेंट नंतर. परवाच आमची एका ठिकाणी भेट झाली." बाबांनी त्यांचा परिचय करून दिला.
" ओके " तो एवढंच म्हणाला.
" ओके काय ओके, नमस्कार कर ना त्यांना." वर्षाने त्याला हळूच दटावणीच्या सुरात सांगितलं.
"काका नमस्कार, मी संदेश प्रोफेसर आहे." त्याने स्वता:ची ओळख करून दिली.
" हो बाळा, तुझ्या बाबांनी बरंच काही सांगितलय तुझ्याबद्दल. तुला भेटुन आनंद झाला." त्यांनी हसून प्रतिसाद दिला.
"अहो बाबा, वर्षा ताईची ओळख नाही करुन दिली तुम्ही त्यांना..." संदेश म्हणाला तसं त्याच्या बाबांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं.
" अं ते वर्षा माझी मोठी मुलगी तीही शाळेत शिक्षिका आहे. तिच्या बद्दल मी सांगितलं होतं आता ती नाहीये नाहीतर तिचीही भेट झाली असती" बाबांनी जरा चाचरतच सांगितले.
" असं काय करता बाबा अहो इथेच तर आहे ती" असं म्हणत त्याने मघाशी ती बसलेल्या जागी पाहिले तर ती तिथे नव्हती."असं कसं वागते ही ताई " तो गोंधळून स्वत:शीच म्हणाला.
"असो काही हरकत नाही. मी येतो आता. आता असंच अधूनमधून येणं होतच राहिल. निघतो." असं म्हणत त्यांनी यांचा निरोप घेतला.
संदेश मात्र बराच वेळ गेला तो कसल्याशा विचारात दंग होता. डोकं जड झालं होतं. तेवढ्यात त्याच्या कानांवर आवाज आला.तो आवाजाच्या दिशेने गेला.
"सरीवर सरी झेलतेय पोरं, रानात नाचे थुईथुई मोर" असं म्हणत ती दारात साचलेल पावसाचं पाणी पायाने उडवत होती.
एवढं कसलं पावसाचं वेड हिला कुणास ठाऊक. काय तर म्हणे मी वर्षा ऋतूत जन्मले , माझं नावही वर्षा आणि मला हा वर्षा ऋतू अतिशय प्रिय आहे.
"हाहाहा " तो हसत बाहेर जायला निघाला.
" श्शी काय हे किती चिख्खल साचलाय, किती पडावं या पावसाने पण, खरच पावसाला बायको असली असती तर किती बरं झालं असतं निदान तिच्या धाकात तरी राहिला असता. " तो मनातल्या मनातच पावसाला शिव्या देत निघाला. कारण उद्या रक्षाबंधन होतं आणि त्याला त्याच्या ताईसाहेब साठी गिफ्ट आणायचं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिला हाका मारत होता पण ती कुठेच नव्हती. बघता बघता संध्याकाळ होत आली तरी तिचा पत्ता नव्हता अजून. आता मात्र त्याला काळजी वाटत होती. तिला काही झालं तर नसेल ना असे नको ते विचार मनात पिंगा घालत होते. तेवढ्यात आई बाबा एकत्रच म्हणाले , " संदेश ती नाही येणार रे, " त्यांचा आवाज कातर झालेला. त्याला कळत नव्हतं काय चाललंय ते.
" नाही ती येईल ना , मागच्या वर्षी तिने माझ्या कडून गिफ्ट घेतलं नव्हतं, त्या बदल्यात तिने माझ्याकडुन पावसाळी पिकनिक ला जायचं वचन घेतलं होतं. आम्ही जाऊनही आलो होतो हो ना "
" हो बरोबर पण तिथून तू एकटाच परत आलेला संदेश"
" काय बोलताय बाबा हे तुम्ही" तो डोक्याला धरून खाली बसला.
" संदेश,...." हा आवाज ऐकून तो उठून बसला.

" नाही संदेश ती आता परत कधीच येऊ शकणार नाही.चल मी तुला सांगतो खरं काय ते, " असं म्हणत बाबा त्याला एका फोटोसमोर आणून उभा करतात. तो फोटो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून वर्षाचाच असतो.
" तिला जाऊन एक वर्ष झाले. तुम्ही पावसाळी पिकनिक ला निघाला होतात तेव्हा घाटात दरड कोसळून तुमच्या बसचा अपघात झाला होता. आणि त्यात बसमधील अठरा जणांचा मृत्यू झाला होता. त्यात आपल्या वर्षाचाही समावेश होता. तू दरीत कोसळला होता. त्यामुळे तुझ्या डोक्याला गंभीर मार लागला होता आणि त्या नंतर तू सात महिने कोमात होतास. तू शुध्दीवर आला तेव्हा तुला ही गोष्ट समजली तेव्हा तू मानसिक धक्क्यात होता. आणि त्या दिवशी तू ज्या गृहस्थांना भेटला ते एक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.वर्षा तर आता या जगात नाही हे वास्तव स्वीकारणं एवढंच हातात आहे. तू सावरावंस स्वत:ला " असं म्हणत ते एकाएकी रडायला लागले.
तो तसाच उठून वर्षाच्या खोलीत गेला. तिच्यासोबत च्या आठवणी जाग्या झाल्या.
" किती ते पाऊसवेड, एक दिवस हा पाऊसच तुझा घात करेल ताई"
" करूदे उलट चांगलच आहे. जशी धरती शेवटी अस्ताला जाऊन मिळते तसच मीही अखेर पावसालाच धरून जाईन." तिला किती ठामपणे म्हणाली होती. तो ओक्साबोक्शी रडायला लागला.
"संदेश रडू नकोस रे, मी तुमच्या मनातून व आठवणीतून कधीच जाणार नाही. तुला माझी कधी आठवण आली तर या पावसाला बघ. या पावसातल्या ओलाव्याला आणि मनातल्या जिव्हाळ्याला कायमचं जप.पावसातला ओलावा जसा मातीला न्हावून टाकतो तसाच नात्यातील ओलावा मनातल्या भावनांना प्रफुल्लित करतो. " त्याला तिचे शब्द आठवले आणि तो तसाच पावसाकडे एकटक पाहत राहिला.


समाप्त.

©️®️ अबोली डोंगरे.