प्राक्तन - भाग 5 अबोली डोंगरे. द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्राक्तन - भाग 5

प्राक्तन -५


" यश________" तिने अगतिकपणे त्याच्या खांद्यावर थरथरता हात ठेवला. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात उभे ठाकलेले असंख्य प्रश्न त्याला कळत होते.

" लिव्ह इट. कुल डाऊन... ओके. " तो स्वत: ला सावरत म्हणाला.

" नाही मला जाणून घ्यायचंय तुझ्या या खोल दुःखामागचं कारण... तू सांग यश, बोल, रड आणि मन मोकळं कर. जर खरंच तू मला तुझी मैत्रिण समजत असशील तर..." अनिशा मन घट्ट करत म्हणाली. मैत्रिण म्हणून तिचा हक्क दाखवणं, तिचं स्पष्ट बोलणं जे त्याला नेहमीच आवडायचं ते आज पुन्हा त्याला मनापासून आवडून गेलं.

" माझंही एक छोटंसं कुटूंब होतं. मी, माझी पत्नी वीणा जी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉब करायची. आणि १० वर्षाची मुलगी निधी. लहान भाऊ यूएस मध्ये नोकरी साठी गेला आणि तिथेच त्याने त्याचा संसार बसवला. त्यामुळे आई वडिल माझ्याकडे असायचे. पण वीणाचा स्वभाव फारच संकुचित आणि फटकळ होता म्हणून तिचं कधीच त्यांच्याशीच काय कुणाशीच पटलं नाही. म्हणून त्यांनी दुसरीकडे रहायचा निर्णय घेतलेला. तरी आमचं मात्र रोजच या ना त्या कारणाने वाजायचं. मग शेवटी मी कंटाळून जास्त वेळ घराबाहेर रहायला लागलो. कित्येक दिवस रात्र मी हॉटेलमध्ये रूम घेऊन राहिलोय. पण तिला वाटायचं माझे बाहेर अफेयर्स असतील. मुलीच्या मनावर मात्र याचा वाईट परिणाम होत होता त्यामुळे ती जास्तीत जास्त आमच्या विनाशकारी जगण्याचा भाग होणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेत होतो. दिवसभर स्कूल आणि त्यानंतर तिला वेगवेगळे क्लासेस लावून दिले जिथे तिचं मन रमेल यासाठी... पण तिला मात्र फक्त आई बापाचं प्रेम आणि त्यांचा वेळ हवा होता. हे फक्त आठवड्यातून एकदा तिला मिळायचं. पण तेव्हाही वीणाचं मला आणि माझ्या घरच्यांना टोचून बोलणं तिच्या कानावर पडायचं. वीणा मात्र तिच्या प्रत्येक गोष्टीला मला जबाबदार धरायची. त्यानंतर मी उन्हाळी सुट्टी असो की दिवाळी, गणपती अगदी वीकेंडच्या दोन दिवसांच्या सुट्टीतही निधीला बाहेर फिरायला घेऊन जायचो. ती दिवसभर खेळायची, बागडायची.. पण रात्री मात्र आवर्जून आई पण आपल्या सोबत इथे यायला हवी होती ना असं बोलत वीणाची आठवण काढायची. मी शब्दात सांगू शकत नाही त्यावेळी माझ्या मनाचे किती ठिकरे उडायचे. कारण मी एक बाप होतो, आपल्या लेकराच्या प्रत्येक इच्छेला स्वत: च्या जगण्याचं ध्येय मानून त्यासाठी झटत होतो. पण तिची ती इच्छा मात्र कधी पूर्ण करू शकलो नाही. ना कधी माझ्या मनाची विटंबना तिला सांगू शकलो नाही...." एवढं बोलून तो अचानक थांबला. हुंदका दाटून आलेला, तो उमाळा असह्य होत होता त्याला... त्या जुन्या आठवणींना पून्हा मांडताना मनावर न जाणो कितीतरी वेदनादायी घाव होत होते. अनिशा पण त्याच्या प्रत्येक शब्दागणिक घायाळ होत होती. त्याच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती.

" आणि एके दिवशी कामानिमित्त एका हॉस्पिटलमध्ये गेलो असता माझी माझ्या एका जुन्या मैत्रिणीशी योगायोगाने भेट झाली. खूप दिवसांनी भेटल्यामुळे तिने जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये कॉफीसाठी आग्रह केला. आणि मीही नाही म्हणू शकलो नाही. संध्याकाळ झालेली.. आणि नेमकं तेव्हाच वीणाने आम्हाला पाहिलं. आणि तिने तिथे येऊन जणू रंगेहाथ पकडल्याच्या आविर्भावात दोघांचा खूप उद्धार केला. आता मात्र माझी सहनशक्ती संपत आलेली आणि मी तिथून तिला खेचत बाहेर आणून समजावण्याचा बाष्कळ प्रयत्न करत होतो. आणि रागाच्या भरात मी तिच्यावर प्रथमच हात उचलला. कारण पुरूषाने जर स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेतला तर तो पुरूष असूच शकत नाही. मग एका स्त्रीकडून पुरूषाच्या चारित्र्यावर संशय घेतला तर त्यास काय समजावं हे अजून मला कळलेलं नाही. त्यादिवशी घरात आल्यानंतरही जोरात भांडण झालं आमचं.. मी मुलीला तिच्या खोलीत सोडून कानात हेडफोन्स वर गाणे ऐकायला लावून बाहेरून दार लावून घेतलेलं. घरात एकही अशी वस्तू उरलेली नव्हती जी आधीसारखी व्यवस्थित असेल. मी तिच्यावर हात उगारलेला तिला पचवता येत नव्हतं. पण मी मात्र शांतच होतो जे चाललंय ते कितीवेळ चालेल हे निरखत.. तिचं दुःख, त्यामागची प्रकोपी भावना मी समजू शकत होतो कारण चुक माझी होती मी हात उचलायला नको होता. पण इतके दिवस माझ्या चारित्र्यावर नको ते आरोप करून माझ्या मनाची अशीच अवस्था होत असताना तिच्या मनात आला असेल का हा विचार, हा प्रश्न नियतीला विचारत तसाच मख्खपणे तिथून उठून गॅलरीत जाऊन उभारलो तसाच शून्यात बघत... आणि काही वेळाने वीणा निधीला घेऊन कुठेतरी जातेय असं दिसलं ते बघून धावतच तिच्या मागे गेलो. नेमकं तेव्हाच अंगातलं अवसान गळून पडल्यासारखं झालेलं. माझ्या फिटनेसचा तेव्हा खऱ्या अर्थाने तिरस्कार वाटला मला. आणि..... आणि माझी धाव अपूरी पडली. वीणाने थेट इथे याच कठड्यावर उभारून निधीसह____________" तेव्हाचा तो क्षण जशाच्या तसा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि तो उठून त्या पुलाच्या कठड्याजवळ जात जमिनीवर गुडघे टेकवून ओक्साबोक्शी रडायला लागला. ते बघून कुणीही गळून पडेल इतका तो हद्यद्रावक प्रसंग होता. अनिशाने त्याच्याजवळ जात त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. थोड्या वेळाने तो शांत झाला.

" एका चुकीची इतकी जीवघेणी शिक्षा मी भोगतोय. माझं दैव पण किती निर्दयी असेल बघ मी माझ्या पत्नी आणि मुलीचं संरक्षण नाही करू शकलो. निधीने या उंचावरून खाली कोसळताना शेवटची हाक मारलेली मला बाबा म्हणून... जणू तीच ऐकण्यासाठी मी रोज पहाटे इथे येतो. माझी इवलीशी परी मी इथे येऊन रडताना माझ्या अवतीभवती बागडत मला सांगते, बाबा रडू नकोस मी खूप खूश आहे. माझी काळजी करू नकोस. तू रडलास तर मीही रडेन. तेव्हा मात्र मी पटकन डोळे कोरडे करून घेतो. मग ती खळखळून हसत पून्हा माझ्या भोवती बागडत असते आणि मी तिला डोळ्यात साठवून घेतो. कारण मी तिला माझ्या मिठीत नाही घेऊ शकत.. मला एकटं सोडून खूप खूप दूर निघून गेलीय ती या विचाराने स्वत:ला कोसत राहतो. याशिवाय हातात आता काहीच उरलं नाहीये. " एवढं बोलून यशने डोळे कोरडे केले पण आज मात्र अश्रू थांबतच नव्हते. तो बसल्या जागी तसाच नकळत अनिशाच्या खांद्यावर मान टेकवत कोसळला. तिलाही हुंदका आवरता आला नाही. तिच्याकडे त्याच्या सांत्वनासाठी शब्दच नव्हते. ती फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती.

पण अचानक त्याचा रडण्याचा आवाज शांत झाला. त्याला श्वास घेता येत नव्हता, ना काही करता येत होतं. त्याचे हात थरथरत होते. ते बघून अनिशा त्याच्याजवळ बसून त्याला पाणी देत होती. पण तेवढ्यात तो बेशुद्ध झालेला...

तेव्हा सकाळचे सहा वाजलेले. अनिशाने तिथे मॉर्निंग वॉकला येत असलेल्या काही लोकांच्या मदतीने त्याला जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेलं.

क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.