पश्चाताप - भाग 3 (अंतिम भाग) Ankush Shingade द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पश्चाताप - भाग 3 (अंतिम भाग)

पश्चाताप भाग तीन

महेश हा रुपालीच्या कार्यालयात कार्यरत असलेला अधिकारीच. तो गरीब असल्यानं गावच्या सरकारी शाळेत शिकला होता. तसं पाहिल्यास त्याची कॉन्व्हेटला शिकायची ताकद नव्हती. कारण कॉन्व्हेटचं शुल्क अतोनात होतं व ते शुल्क सर्वसामान्य लोकांना परवडणारं नव्हतं. तस ते शुल्क महेशच्या वडीलांना परवडणारं नसल्यानं त्यांनी महेशचं गावच्या शाळेत नाव दाखल केलं होतं व तो तिथंच हिरीरीनं शिकून आज मोठ्या पदावर गेला होता.
कॉन्व्हेटनं त्यावेळेस आपलं बस्तान बसवलं होतं व सर्वसामान्य लोकांना वाटत होतं की कॉन्व्हेटला शिकविल्याशिवाय आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकणार नाही. त्याला अधिकारी बनवता येणार नाही. त्यातच याच काळात शिकवणी वर्गाचंही अति प्रमाणात प्रस्थ वाढलं होतं. मान्यता होती की शिकवणी वर्ग लावल्याशिवाय व कॉन्व्हेटला शिकविल्याशिवाय पर्याय नाही. त्याच मान्यतेनं रुपालीच्या आईनं इतर व्यवसाय करण्याऐवजी देहविक्रीचा व्यवसाय केला की ज्यातून तिला जास्त पैसे मिळत गेले. ज्यातून तिच्या मुलीचं कॉन्व्हेटचं शिक्षण झालं. परंतु महेशचं तसं झालं नाही.
ती जिल्हापरीषद शाळा. त्या शाळेकडे लोकांचं आज दुर्लक्ष झालं होतं. तिथं कोणीच शिकवायला तयार नव्हतं. परंतु महेशच्या वडीलांसमोर पर्याय नव्हता. म्हणूनच महेशला कॉन्व्हेट ऐवजी जिल्हापरीषद शाळेत शिकणं भाग पडलं.
ती जिल्हापरीषद शाळा कौलारु होती. कधी पाऊस आलाच तर त्या शाळेचं छत गळत असे. अशातच त्या पावसाळ्याच्या दिवसात शाळेचा खेळखंडोबाच होत असे. परंतु त्याही शाळेत शिकविणारे शिक्षक चांगले होते. ते प्रेम करीत होते आपल्या विद्यार्थ्यांवर. शिवाय तेवढीच महत्वाकांक्षाही भरत होते विद्यार्थ्यांच्या मनात. ते असे विद्यार्थ्यांना तयार करीत होते की जणू ती त्यांचीच मुलं असावीत. याव्यतिरिक्त त्या शिकविण्याच्या क्लुप्त्यानं विद्यार्थी पुढे जावून कोणत्या शिक्षकानं एखादा भाग शिकवला नाही, तरीही ते स्वतः इकडून तिकडून संदर्भ साहित्य गोळा करुन शिकत होते. त्याच अनुषंगानं त्यांना कोणत्याही प्रकारची शिकवणी लावावी लागत नव्हती.
महेशच्या बाबतीतही अगदी तसंच झालं होतं. महेश शिकत गेला व त्याला लाभलेल्या शिक्षकांच्या प्रेरणेनं महेशच्या मनात शिक्षण घेण्याबाबत कळकळ निर्माण झाली. ज्याचा परिणाम तो उच्चशिक्षीत झाला होता.
महेश हा रुपालीचा अधिकारी होता. त्यातच रुपालीच्या तो संपर्कातही होता. तसं पाहिल्यास त्याचा नेहमी सहवास लाभत होता तिला. तो तिला कोणत्याही स्वरुपाची मदत करायचा. मात्र त्याची मदत कधीकधी ती टाळायची. कारण तिला प्रेम करणं वा बॉयफ्रेंड ठेवणं आवडत नव्हतं. कधीकधी तिला वाटायचं की अशी मदत घेतल्यानं महेश व आपल्यात प्रेम निर्माण होईल. मग जीवनाचं नुकसान होईल. महेश आपल्या शरीराचा फायदा घेईल व वेळ आल्यावर तो तिला सोडून देईल. म्हणूनच ती त्याचेबाबतीतील आपलं वागणं 'कामापुरता मामा' अशाच स्वरुपाचं ठेवायची.
काळ हळूहळूच सरकत चालला होता. त्यातच तिचा व त्याचा संपर्क वाढत चालला होता. कधी कधी तिच्याशी एखाद्या विषयावर महेशचा संवाद व्हायचा. ज्यात विषय असायचा, कॉन्व्हेटचं शिक्षण आणि जिल्हापरीषदेचं शिक्षण. महेश तिला म्हणायचा,
"आपल्याकडं शिक्षणाबद्दल असुया आहे. शिक्षणाचा अर्थच लोकांना आज समजेनासा झाला आहे. लोकांना वाटते की कॉन्व्हेट शिकल्याशिवाय तरणोपाय नाही. कॉन्व्हेट शिकणारी मुलंच उच्च पदावर जावू शकतात. त्यांनाच नोकऱ्या लागू शकतात. इतरांना नाही. परंतु तसं नाही. लोकांची ती धारणा आहे. परंतु लोकांची ती धारणा जरी असली आणि अलिकडील काळात लोकं कॉन्व्हेटचं शिक्षण जरी देत असतील तरी जिल्हापरीषद शाळेत शिकणारीही मुलं ही काही कमजोर नाहीत. तिही माझ्यासारखी उच्च पदावर जावू शकतात. त्यांनाही माझ्यासारखी उच्च पदाची नोकरी लागू शकते."
त्याच्या त्या काही गोष्टी तिला पटायच्या व वाटायचं की जर मी कॉन्व्हेट नाही शिकले असते तर बरे झाले असते. माझ्या आईनं उगाचंच कॉन्व्हेटचं शिक्षण शिकवलं. त्यासाठी लागणारा पैसा कमविण्यासाठी देहविक्री केली. स्वतःचा देह विकला. ज्यातून माझं शिक्षण झालं. अशी देहविक्री करण्याऐवजी मला माझ्या आईनं कॉन्व्हेंट नसतं शिकवलं तर बरं झालं असतं.
रुपालीच्या आईची देहविक्री. आपण कोणतं काम करतो ते आपल्या मुलांना माहीत असतं. मग आपण कितीही लपवलं तरी. तीच गोष्ट रुख्माच्याही बाबतीत घडली. रुपालीलाही माहीत होतं. तिची आई कोणतं काम करते ते. त्यातच तिला तिच्या आईचा रागच येत होता. जरी तिचं त्या पैशात शिक्षण झालं असलं तरी. आज जी तिला नोकरी लागली होती व ती पैसाही कमवीत असली तरी तिला ती नोकरी व ते घेतलेलं शिक्षण तिच्या आईच्या देहविक्रीतून झाल्यानं तिला त्यात निरसता वाटत होती. कारण आज तिच्या आईला ओळखणारे अरुणसारखे लोकं तिच्याकडे पाहतांना हिनतेनंच पाहात असायचे.
रुपालीला आवडू लागला होता महेश. जरी तिला कोणते बॉयफ्रेंड आवडत नसले तरीही. ती बोलू लागली होती महेशशी. जरी तिला कोणत्याही परपुरुषांसोबत बोलणं आवडत नसलं तरीही. त्यातच दोघात प्रेमही निर्माण झालं होतं. तसं त्यांचं गावच्या मातीतील प्रेम होतं. जे प्रेम आजपर्यंत त्यांना समजलं नव्हतं. परंतु आज? आज ते प्रेम समजू लागलं होतं. कारण त्यांचं वय. ते तरुण झाले होते आज. त्यांना प्रेम म्हणजे काय, तेही कळू लागलं होतं.
रुपालीचं महेशवर प्रेम निर्माण झालं होतं व तिनं काही दिवसातच निर्णय घेतला. निर्णय घेतला विवाहाचा. तिनं काही दिवसातच महेशशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं आपला विवाह साजरा केला व ती महेशच्या घरी राहायला गेली होती.

************************************************

रुपालीला नोकरी लागली होती व ती आपल्या आईला काम करायला आणि कामावर जायला मनाई करीत असे. कारण तिची आई कामावर जाण्यात तिला तिची बदनामी झाल्यासारखी वाटत असे. परंतु तिची आई तिचं काही एक ऐकत नव्हती व ती कामावर नित्यनेमानं जातच असे. त्यामुळंच रुपाली चिडली होती व ती आता ना आपल्या आईच्या घरी येत होती ना ती आपल्या आईला आपल्या घरी येवू देत असे.
रुख्माकडे तिची मुलगी आज येत नव्हती. तशीच तिही मुलीकडं जात नव्हती. रुपाली आपल्या आईला फोन करीत नव्हती. ना ती आपल्या आईचा फोन उचलत होती. तसं पाहिल्यास तिला आजही आपल्या आईचा रागच आला होता. ती ऐकत नसल्यानं. त्यातच ती तिला घरीही येवू देत नव्हती. तसं तिनं एकदा आपल्या आईला बजावून सांगीतलं होतं. म्हटलं होतं की तिची तिच्या आईमुळं बदनामी होतेय. तिनं तिच्या घराकडे फिरकू नये. शिवाय तिला तिची आई आणखी एका कारणानं आवडत नसे. त्याचं कारण होतं तिचं वडील. तिला वाटत होते की आपले वडील आपल्या आईच्या घाणेरड्या सवयीनं मरण पावलेत. आपण आपले वडील गमावलेत. अन् ही मस्त माझे वडील गेल्यानंतर सुखात आहे. मस्त बॉयफ्रेंडसोबत हिंडत आहे. रंगरलिया मनवीत आहे.
रुपाली तिला शिकविण्याचे व नोकरी लावून द्यायचे उपकार विसरली होती. तशी त्या कार्यालयात रुपालीच्या आईनंच तिची शिफारस करुन नोकरीही लावून दिली होती. परंतु त्या गोष्टीची रुपालीला कोणतीच माहिती नव्हती. त्या गोष्टीपासून रुपाली अनभिज्ञ होती.
आज रुपालीची आई एकाकी झाली होती. तिला आता पश्चाताप वाटत होता. वाटत होतं की बेकारच तिनं रुपालीला कॉन्व्हेटचं शिक्षण दिलं. विनाकारणच तिला कॉन्व्हेटला शिकविण्यासाठी जास्त पैसा लागतोय म्हणून तिनं देहविक्रीचा व्यवसाय केला. विनाकारणच तिची शिफारस करीत तिला नोकरी लावून दिली.
आज ती एकाकी झाली होती व तिच्या सोबतीला आज कोणीही नव्हतं. आयुष्यभर तिनं आपल्या मुलीला रुपालीला सांभाळलं होतं. तिला तिनं उच्च शिक्षण शिकवलं होतं नव्हे तर कॉन्व्हेटचं शिक्षण शिकवलं होतं. त्याचं कारण होतं कॉन्व्हेटचं वाढलेलं प्रस्थ. कारण कॉन्व्हेटला आज बरे दिवस आले होते. परंतु त्याच कॉन्व्हेटच्या हव्यासासाठी तिनं केलेल्या देहविक्रीनं आज म्हातारपणात रुसलं होतं. तिची स्वतःचीच मुलगी आज म्हातारपणात दुरावली होती.
रुपाली आपल्या आईच्या देहविक्रीच्या पैशातून कॉन्व्हेटचं शिक्षण शिकली होती. परंतु ती आपली बदनामी होईल या धाकानं तिच्याकडं फिरकत नव्हती. अशातच विचार करता करता रुख्मा आजारी पडली. त्यातच तिच्याजवळ पश्चातापाशिवाय काहीच उरलं नाही. शेवटी आजारपणानं एक दिवस तिची आई पश्चाताप करीत करीत मरण पावली.
रुपालीची आई मरण पावली होती आजारानं. त्या आजाराच्या वेळेसही रुपाली तिच्याजवळ नव्हती. ना तिच्या आईच्या मरणाच्या वेळेस. त्यानंतर ते प्रेत महानगरपाविकेनं उचलून नेलं. परंतु ते प्रेत उचलून नेतांना त्यांना एक चिठ्ठी सापडली. ज्या चिठ्ठीवर तिनं जमाखर्च लिहिला होता आणि लिहिलं होतं,
"तिही एका जिल्हापरीषद शाळेतच शिकली की ज्या जिल्हापरीषद शाळेत शिक्षक तालुक्यावरुन यायचे. कधी यायचे, कधीकधी यायचेच नाही. त्यामुळंच तिचं नुकसान झालं होतं. तरीही ती शिकली. परंतु जिल्हापरीषद शाळेतील शिकलेली मुलगी म्हणून तिची सर्वच कार्यालयात हेटाळणी केल्या गेली. तेच अनुभवलं होतं तिच्या आईनं. म्हणूनच तिनं ठरवलं होतं की ती आपल्या मुलीला कॉन्व्हेटला शिकविणार. तिची आबाळ होवू देणार नाही. परंतु ते तिचं जणू स्वप्नच होतं. ते स्वप्नच राहणार होतं. कारण तिचा विवाह एका शेतकऱ्याशी झाला होता. जो रुपालीचा बाप होता. परंतु ती डगमगली नाही. तिनं आपल्या पतीला स्मार्टफोन घेवून मागीतला व त्या स्मार्टफोनवर ती आपल्या मुलीला स्मार्ट बनविण्याचे किस्से शोधू लागली. त्यातच तिला कॉन्व्हेटचं तत्वज्ञान गवसलं. मग ठरलं. ठरलं की मुलीला कॉन्व्हेट शिकवायचं. ज्या कॉन्व्हेटसाठी तिचा पती बाळकृष्णशी भांडण व्हायचं. बाळकृष्ण म्हणायचा की त्याची परिस्थिती नाही आपल्या मुलीला कॉन्व्हेट शिकवायची. परंतु तिची जिद्द होती. तिनं ती जिद्दच लावून धरली होती. ज्यातून बाळकृष्णला निराशा आली व त्यानं आत्महत्या केली. तरीही ती डगमगली नाही. ती रुपालीला घेवून शहरात आली. मोलकरीण बनली. त्यावेळेस तो पैसा रुपालीला कॉन्व्हेंट शिकविण्यासाठी तुटपुंजा पडू लागला. शेवटी अतिरिक्त पैसा कमविण्यासाठी तिनं गैरमार्ग धरला. ज्या मार्गानं तिला आपल्या मुलीचं कॉन्व्हेंटचं शिक्षण करता येत होतं. ज्यातून तिच्या मुलीचं कॉन्व्हेंटचं शिक्षण झालं. परंतु आज तिला एकाकीपणा छळतो आहे. आज तसं केल्यानं तिला पश्चाताप होतो आहे व आज ती तिला एकच सल्ला देत आहे की ज्या कॉन्व्हेंटनं तिच्या पतीला हिरावलं. ज्या कॉन्व्हेंटनं तिची मुलगी हिरावली. ते कॉन्व्हेंटचं शिक्षण तिनं आपल्या मुलांना देवू नये. ते इंग्रजांचं शिक्षण असून ते शिक्षण तमाम देशवासियांना गुलाम करणारं शिक्षण आहे. नातंही तोडणारा आहे. कॉन्व्हेंट याचा मुळात अर्थ होता, सोडलेल्या मुलांची शाळा. विदेशात काही मुलांना त्यांचे मायबाप जन्म झाला की सोडून देत असत. काही प्रेमवीरही प्रेम करीत व त्यातून झालेल्या मुलाचं संगोपन कसं करायचं याचा विचार करुन आपल्या मुलांना सोडून देत. काही मुलं अनैतिक संबंधातून होत. अशी मुलं कॉन्व्हेंटला राहायची. याचाच अर्थ असा की कॉन्व्हेंट याचा अर्थ अनाथांची शाळा वा अनाथालय असं होतं. तसंच घडलं माझ्याही बाबतीत. शेवटी मी तुला कॉन्व्हेंट शिकवून परकं केलं. याची जाणीव आज मला आहे. शेवटी मी हेच सांगते की कॉन्व्हेंटचं शिक्षण हे नातं तोडणारा शिक्षण आहे. ते शिक्षण शिकल्यावर भाऊ बहिणीला ओळखत नाही. मुलगा मायबापांना ओळखत नाही. तो विदेशात जातो व त्याचे आईवडील मरण पावल्यानंतरही येत नाही. कारण तो आपल्याच जन्म दिलेल्या मायबापापासून दूर करणाऱ्या कॉन्व्हेंटला शिकतो ना. यापेक्षा आपलंच जिल्हापरीषद शाळेचं शिक्षण बरं की जे शिक्षण कोणीही घेवू शकतो. त्याला पैसे लागतच नाही. शिवाय एखादा अधिकारी बनायचंच असेल तर तेही शिक्षण कामात येतं. इंग्रजी शिक्षण नाही. शिवाय ते शिक्षण आपलं नातंही जोपासत असतं. अशा शाळेत शिकणारी मुलंच ही आयुष्यभर आपल्या आईवडीलांना वा आपल्या नातेवाईकांना अंतर देत नाही. मग भाऊ, बहिण वा एखादा दूरचा नातेवाईक का असेना. मात्र माझ्या मृत्यूनंतर एक कर. हा मी कमविलेला जेवढाही पैसा आहे. तो गरीबांच्या शिक्षणासाठी दान कर. जेणेकरुन त्यातून ज्या मुलांना शिकण्याची इच्छा असेल व ते परिस्थितीवश शिकू शकत नसतील, त्यांचा फायदा होईल."
ती चिठ्ठी रुपालीला प्राप्त होताच ती चिठ्ठी रुपालीनं वाचली. त्यातच तिच्या पतीलाही तिच्या आईची महानता कळून आली. त्याला तिच्या आईचा अभिमान वाटू लागला होता व एक शल्यही वाटू लागलं होतं की अशा निरामयी तिच्या आईची त्याच्या हातून कोणतीच सेवा झाली नाही.
रुपालीची आई जीवनभर कॉन्व्हेंट शाळेचाच विचार करीत करीत जगली होती. तिच्या कॉन्व्हेंटच्या अट्टाहासानंच तिला तिच्या मुलीपासून दूर केलं होतं.
महेशची एकदा प्रकृती खराब होती. त्याला बरं वाटत नव्हतं. त्यातच तो अंथरुणावर पहुडला होता. अशातच घरात उंदराने एक पुस्तक पाडलं. ते पुस्तक महेशनं उचलून वर ठेवलं. तेव्हा त्यात असलेली चिठ्ठी नकळत त्या पुस्तकातून खाली पडली. तशी ती चिठ्ठी उचलून महेशनं वाचली व त्याचे खाड्कन डोळेच उघडले. ज्यात रुपालीच्या आईनं रुपालीसाठी काय काय केलं. कसं कसं शिकवलं. याचा इत्यंभूत इतिहास लिहिला होता.
तिच्या आईचा हा कॉन्व्हेंटचा हट्टं. ही गोष्ट जेव्हा त्या चिठ्ठीमधून महेशला माहीत झाली, तेव्हा महेश तिला म्हणू लागला,
"तुझ्या आईनं फालतूच इंग्रजीचा अट्टाहास केला आणि त्याच कॉन्व्हेंटच्या नादाला लागून आपल्या जीवनाची धुळधानी केली. त्यापेक्षा तुलाच जर तिनं माझ्यासारखंच जिल्हापरीषद शाळेत टाकलं असतं तरीही तू शिकलीच असती. अगं कितीतरी मुलं अशी आहेत की जी कॉन्व्हेंटला शिकूनही उच्च शिक्षण घेवू शकली नाहीत. गुणवत्ता संपादन करु शकली नाहीत. त्याचं कारण म्हणजे प्रत्येकाच्या मेंदूची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता. प्रत्येकाचा मेंदू हा काही सारखा नसतो. काहींना एखादी गोष्ट लवकर समजते तर काहींना तीच गोष्ट उशिरा तर काहींना तीच गोष्ट समजतही नाही. शिवाय आपले आईवडील आपल्या बाळाच्या त्या मेंदूला सारखंच समजून प्रत्येक बाळावर दबाव टाकत असतात आणि म्हणत असतात की त्यानं एवढं करावं, तेवढं करावं. मग नाही झालं की ते आपल्या बाळाला नाही तेवढे बोल बोलतात. ज्यातून बाळात नैराश्य येतं व ते आत्महत्या करुन मरण पावतात. परंतु ते सगळं जावू दे. तुझ्या आईनं जे काही केलं, ते तुझ्या भल्यासाठीच केलं. याला तू विसरु नये. तुझी आई खुप महान होती. शिवाय अशी आई प्रत्येकाला लाभत नाही. तिनं आपल्या शरीराचा प्रसंगी छळ करीत तुला कॉन्व्हेंटचं शिक्षण दिलं. तिलाही वाटत असेल की जिल्हापरीषद शाळेत बरोबर शिकवीत नाही. म्हणूनच तुला कॉन्व्हेंटला शिकविण्याची कास धरली. त्याचं कारणही तसंच आहे. अलिकडील काळात बऱ्याचशा जिल्हापरीषद शाळेतील शिक्षक हे ऑनलाईन कामानिमित्त तालुक्यालाच असतात. काही शिक्षक तर आपल्या शिपायाच्या हाती शाळा सोपवून तालुक्यालाच असतात. ज्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं. काही शिक्षक हे शाळेत येतात. ते दिखावा म्हणूनच. ते शाळेत आले की अर्धा एक तास मेकअपमध्येच घालवतात. ज्या मेकअपमध्ये, ते बनवत असतांना कितीतरी लहान मुलांचा जीव जातो. त्यांच्या रक्तातून, मृत्यूतून मेकअपचं सामान बनत असतं. शिवाय सायंकाळ होताच असे शिक्षक विद्यार्थ्यांनाच आपल्या शेतातून भाजीपाला आणायला लावतात. ज्याचे पैसे ते त्या विद्यार्थ्यांना देत नाहीत. त्यानंतर ते तो भाजीपाला तोडत बसतात. मग शिक्षण राहिलं दूरच. अशी काही काही जिल्हापरीषद शाळेची अवस्था. पावसाळ्यात तर अशा शाळांना सुगीचेच दिवस असतात. चिखल असतं व पाय फसतात म्हणून बरेचसे केंद्राधिकारी अशा शाळांना भेटीच देत नाहीत. शिवाय जंगलातील शाळा असल्या तर कितीतरी किमीचं अंतर हे पायीच तुडवत जावं लागतं. ज्यातून संबंधीत शालेय भेटीला जाणाऱ्या केंद्राधिकारी महोदयाचा जीवही जावू शकतो. मग मला सांग, कोण अशा ठिकाणी भेटीला जाईल, आपला जीव मुठीत घेवून. त्यानंतर अशा शाळेतील ते शिक्षक शिकवतात की नाही शिकवीत, याकडे कोणी पाहात नाही. यामुळंच अशा जिल्हापरीषद शाळेचा खेळखंडोबाच होतो. मी तर म्हणतो की तुझ्या आईनं तीच गोष्ट लक्षात घेवून कॉन्व्हेंटचं पाऊल उचललं. त्यामुळं तुला शिकता आलं.
मिही शिकलो जिल्हापरीषद शाळेत आणि त्याच शाळेतून बनलोही. ती माझी जिज्ञासा. शिवाय मला गावच्या शाळेत शिकायला छान वातावरण मिळालं होतं. मला शिकविणारे शिक्षक हे हिरीरीनं मी वर्गात हुशार असल्यानं जास्त मेहनत घ्यायचे. त्यामुळंच मला शिकता आलं. मिही न लाजता उद्भवणाऱ्या समस्या माझ्या शिक्षकांना विचारायचो. त्यातूनच मी घडत गेलो व आज अधिकारी बनलो. जर मला तसं वातावरण मिळालं नसतं तर माझ्यात असलेल्या हुशारीचं पाठबळ मला मिळत गेलं नसतं. अशा स्वरुपाच्या सर्वच जिल्हापरीषद शाळा नसतातच. म्हणूनच कॉन्व्हेंट शिकवावं लागतं लोकांना.
अलिकडील काळात कॉन्व्हेंट शाळा चालू लागल्या आहेत. त्याचं मुख्य कारण हेच आहे. तिथं प्रत्येक विद्यार्थ्यांत असलेल्या सुप्त गुणांना संधी उपलब्ध करुन दिली जाते. प्रत्येक विद्यार्थ्यात होत असलेला बदल दिसतो. त्या कॉन्व्हेटमधील शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकविणं कमी आणि त्यांच्या सुप्त गुणांच्या विकासाकडेच जास्त लक्ष देतात. जे वाढतांना दिसतात. त्याचबरोबर शिक्षक अशा विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतात की आम्ही तुम्हाला संधी तेव्हाच देवू, जेव्हा तुम्ही अभ्यासातही आपली रुची दाखवाल. मग काय, मुलांना वाटते की जर आपण अभ्यासात मागे पडलोच तर आपल्याला जे करायचे आहे. ते करण्याची संधी आपल्याला मिळणार नाही. मग आपण मागे पडू. शिवाय काही काही शाळा अशाही आहेत की ज्या मुलं आठवीत गेल्यावर वा वरच्या वर्गात गेल्यावर जर त्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा मिळत असतील तर ते त्या मुलांना शाळेतून काढूनच टाकतात जबरदस्तीनं. त्या शाळा कमजोर मुलं ठेवतच नाहीत शाळेत. म्हणूनच मुलंही हिरीरीनं चांगला अभ्यास करुन आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवतात.
तुझ्या आईनं तसं पाहिल्यास बरीच मेहनत घेतलीय हे विसरता कामा नये. तुझ्या आईपासून बराच बोध घेण्यालायक आहे. जरी तिनं आपल्या देहाची लक्तरं विकली असली तरी. तिचा मला अभिमान वाटतो. तिनं तुझ्यासाठी बरंच काही केलंय. शिवाय तू तिच्या अंतिम समयीही तिच्याकडे गेली नाही. हे एक वाईटकर्म तुझ्या हातून घडलंय. आता आपण एकच करु. जे तुझ्या आईनं सांगीतलं व म्हटलं की हा माझा पैसा त्या जिल्हापरीषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या विकासासाठी लाव. आपणही तेच करु. हा संपूर्ण पैसा बँकेत मुदत ठेवीत ठेवू. त्याचं जे व्याज येईल, त्या व्याजाच्या पैशात आपण अशाच जिल्हापरीषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश दरवर्षी घेवून देत जावू. तसंच काही परीवारांनाही त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी पैसेही पुरवू. काही लेकरांनाही दत्तक घेवू शिक्षण शिकविण्यासाठी. ज्या घरी फक्त एकच मुल असेल."
महेशचं बोलून झालं होतं. त्याचं बोलणं संपलं होतं. तिला आता तिनं केलेल्या कृत्याचा पश्चाताप होवू लागला होता. परंतु आता त्याचा उपयोग नव्हता. तिची आई आता तिच्यापासून बरीच लांब निघून गेली होती. तोच तिनं विचार केला. विचार केला की आपल्या आईचा हा पैसा आपल्याला आपल्या पतीनं सांगीतलेल्या सल्ल्यानुसार आपण त्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी खर्च करु. ज्या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा व जिद्द आहे.
रुपालीनं तसा विचार केला. लागलीच तिनं आपल्या आईची ती सर्व मालमत्ता विकली व तो सर्व पैसा बँकेत मुदतठेवीवर ठेवला. ज्यातून दरवर्षी चांगलं व्याज मिळत असे. ती तो सर्व व्याजाचा पैसा काढत असे व ती त्या पैशात काही वह्या, पुस्तके खरेदी करीत असे. काही गणवेश खरेदी करीत असे व ते सर्व साहित्य अशा जिल्हापरीषद शाळेतील अशा विद्यार्थ्यांना देत असे. ज्या विद्यार्थ्यांना खरंच त्याची गरज आहे. तसंच तिनं काही होतकरु मुलंही दत्तक घेतली होती. ज्यांची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्याचा खर्च ती आपल्या आईच्या पैशातून करीत नसे तर ती त्याचा खर्च आपल्या वेतनातून करीत असे. तसंच तिला त्या कार्यात तिच्या पतीचाही हातभार लाभत असे.
आज तिला तिच्या आईला अंतिम समयी न भेटण्याचा पश्चाताप वाटत असला तरी ती फार खुश होती. त्याचं कारण म्हणजे तिचे कार्य. ती तिच्या आईनं सांगीतलेलं कार्य इमानीइतबारे दरवर्षी न चुकता करीत होती, मनात कोणताही किंतू परंतु न बाळगता. ज्या कार्यातून तिला समाधान लाभत होतं.
तिला तिचा पती आवडत होता व ती त्याचेवर जीवापेक्षाही जास्त प्रेम करु लागली होती. त्याचं कारण होतं त्यानं उघडलेले तिचे डोळे. ज्यावेळेस त्याला तिच्या आईची चिठ्ठी तिच्याच एका पुस्तकात सापडली होती. ते वाचून त्याला खरा इतिहास माहीत झाला होता तिच्या आईचा. ज्यातून त्याला तिचे डोळे उघडणे सहज शक्य झाले होते.
आज ती फारच खुश होती आपल्या कार्यावर. त्यातच त्या जोडप्यांनी आपली मुलं त्याच जिल्हापरीषद शाळेत टाकली होती शिक्षणासाठी. जी हिरीरीनं शिकत होती त्यांच्याचसारखी. त्यांच्याचसारखी अंतिम ध्येय गाठण्यासाठी. आज सामाजीक परीवर्तनही होवू लागलं होतं. लोकांना वाटू लागलं होतं की कॉन्व्हेंट शाळा हे पैसे कमविण्याचं एक माध्यम आहे. तिथं मुलांच्या गरीबीला मोजलं जात नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी लोकं आजही कॉन्व्हेंट शाळेत शिकवू लागले होते. स्पर्धा दोन्ही शाळेत होत्या. तसेच स्पर्धेत असलेल्या बऱ्याच लोकांपैकी कोणी कॉन्व्हेंटच्या शाळेला चांगले म्हणत होते तर कोणी जिल्हापरीषदच्या शाळेला चांगले म्हणत होते. मात्र खेळ हा आकड्याचा होता. कोण किती विद्यार्थी पळवतो यासाठीच जणू स्पर्धा लागली होती.
सामाजीक परीवर्तन झालं होतं. कॉन्व्हेंट शाळेकडे जाणारा लोंढा काही प्रमाणात कमी झाला होता. हे दोन्ही ठिकाणच्या पटसंख्येवरुन दिसून येत होतं. जशी कॉन्व्हेंट शाळेत पटसंख्या होती. तेवढीच पटसंख्या जिल्हापरीषद शाळेतही होती. शिवाय आज कॉन्व्हेंट शाळेसारख्याच जिल्हापरीषद शाळाही बनवल्या गेल्या होत्या. ज्या शाळेत आज विद्यार्थ्यांना अगदी प्रसन्न वाटत असे. तसंच शिकण्यालाही वाव मिळत असे. कंटाळा येत नसे.
रुपालीला आज आठवत होतं तिचं बालपण. त्या बालपणात तिनं शोषलेला त्रास. ज्यावेळेस तिला तिच्या वडीलाची आठवण येत असे. वाटत असे की आपली आई एवढी वाह्यात की तिच्यामुळं आपले वडील गळफास लावून मरण पावले. परंतु आता तिला हेही आठवत होतं, जे तिच्या आईनं चिठ्ठीवर लिहून ठेवलं. ते काही खोटं नसेल. माझ्या वडीलांनी तसं करायला नको होतं. तो त्यांचा निर्णय तडकाफडकीचा होता. ज्यातून माझ्या वडीलांचा मृत्यू झाला आणि तो शेतात झाल्यामुळं आम्हाला त्याचा मोबदलाही मिळालाय. ज्याला सरकारनं शेतकरी आत्महत्या घोषीत केलंय. असंच होत असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं. शेतात वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या घडत असतील. खरं कारण बाजूला पडत असेल व लाभ भलत्याच कारणानं मिळत असेल. सर्व सरकारी पैसा लाटण्याचा खेळ. शिवाय आज मला केलं की मला माझ्या वडीलांमुळं नाही तर माझ्या आईमुळंच शिकता आलं. वडील तर मला शिकवूच पाहात नव्हते.
सरकारी पैसा...... सरकारी पैसा असाच लोकं विविध कारणांनी लुटत असावेत. कोणी लाडली बहिण म्हणून अगदी श्रीमंत असतांनाही बनावट कागदपत्र तयार करुन तर कोणी जीवनधारा विहिरीच्या नावानं. प्रत्यक्षात ज्या विहिरी बनल्याच नाहीत. मात्र खर्च दाखवला. विहिरी बनल्या असं सांगून. केवळ कागदपत्रावरच विहिरी बनवल्या गेल्या आणि त्या पासही झाल्या. लाडली बहिण योजनेत तेच झालं. श्रीमंत बहिणींनी चक्कं सरकारला लुटलं. केवळ सरकारलाच लुटलं नाही तर तमाम गरीब जनतेला लुटलं. ज्यांनी कर रुपात पैसा भरला. आजही लुट आहे राशनमध्येही. धान्य लोकांना फुकट हवं. हाही लुटण्याचा एक प्रकार. सरकार मस्त देतं. कारण त्यांचं काहीच जात नाही. जातं बिचाऱ्या कष्टकरी कामगारांचं आणि जातं त्या गरीब शेतकऱ्यांचं. ज्यांना शेत कसं पिकवावं ते कळत नसतं दुष्काळानं. ज्याचं नुकसान होतं, तो आत्महत्याही करीत नाही. कारण नुकसान म्हणजे काय? हे त्याला कळत असतं.
आज लुटालूट सगळीकडेच आहे. लोकं कॉन्व्हेंट शाळा काढून जनतेला लुटतच असतात. ते अतिरिक्त शुल्क वाढवतात. जे सामान्य लोकांना परवडत नाही. ते पोशाख, वह्या पुस्तके शुज यामधूनही लुटतात. त्यात भ्रष्टाचार करणारे फसतात. कारण त्यांच्याजवळ जास्त पैसा असतो. मात्र सामान्य माणसं फसू शकत नाहीत. कारण ते शिकवूच शकत नाहीत अशा कॉन्व्हेंट शाळेत.
सरकारी शाळेतही तोच प्रकार. सरकारी शाळा ह्या नावापुरत्याच सरकारी आहेत. मात्र त्याचा मालक हा कुणीतरी असतो. तो शिक्षकांच्या वेतनातून पैसा लुटत असतो. ज्यातून असा शिक्षक आपल्या वेतनातील पैसा तर देतो. परंतु मुल्याच्या हेतूनं व विद्यार्थी विकासाच्या हेतुनं शाळेत शिकवीत नाही. अशा खाजगी संस्था कधी परीक्षेच्या नावानं विद्यार्थ्यांना शाळेसाठी पैसा मागून पालकांनाही लुटत असतात. कधी खिचडीतून पैसा वाचवून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी चारुन लुटलं जातं व पैसा कमवला जातो. ह्या खिचडीतून येणारा पैसा हा सरकारचाच असतो. कधी जिल्हापरीषद शाळेतूनही पैसा कमवायला संधी असते. त्या शाळेच्या माध्यमातूनही पैसा येतो. ज्या पैशात शाळेच्या मुख्याध्यापकासह सरपंच, ग्रामसेवक व गावातील काही प्रतिष्ठित माणसांची हिस्सेदारी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण बरोबर होत नाही. मग इतर सामान्य पालकांना वाटतं की याही सरकारी अनुदानीत शाळेत पैसा मोजावाच लागतो. कधी टिसी मिळण्याच्या बहाण्याने शाळेला पैसा मोजावा लागतो तर कधी देणगी वा शाळा फंड म्हणून. शिवाय तो पैसा मोजूनही जिल्हापरीषद वा सरकारी अनुदान असलेल्या शाळेत विद्यार्थी विकासाचा दर्जा मिळत नाही. मग काय करावे? त्यापेक्षा कॉन्व्हेंटला टाकावं. म्हणूनच पालक कॉन्व्हेंटकडे धाव घेतात.
माझ्या आईचंही असंच झालं. माझी आई खोटी नव्हतीच. तिनं जे केलं, ते बरोबर केलं. अलिकडे इमानदारीनं काम करुन शिक्षण शिकवताच येत नाही. लोकं म्हणतात की वीज माफ पाहिजे. परंतु ते कधी वाचवत नाहीत. पाऊस चांगला पाहिजे. परंतु झाडं कधीच लावत नाहीत. भ्रष्टाचार कमी व्हायला हवा नव्हे तर बंद. परंतु स्वतःच लाच देतात. त्याची तक्रार कधीच करीत नाहीत. मात्र कारवाईची अपेक्षा असते. शहरात सर्वांना स्वच्छता पाहिजे. परंतु ते आपल्याच घराच्या खिडक्यातून रस्त्यावर कचरा फेकतात. त्यांना देश धर्मनिरपेक्ष व जातीनिरपेक्ष हवा. परंतु जातीच्या नावानं सवलती हव्यात की लोकांवर सत्ता गाजवता येईल नव्हे तर देशाला लुटता येईल. जात लावणं बंद करायला हवी. परंतु मतदान करतांना जातीचाच उमेदवार हवा. तसंच देशाचाही विकास जोरात व्हायला हवा आणि ज्या करातून विकास होतो. तो कर भरायचा असेल तर पळवाट हवी वा करातून त्यांना मोकळीक हवी. शिवाय नेते आम्हाला प्रामाणिक हवेत. परंतु मतदान करुन तसे नेते निवडून आणायला आम्ही बाध्य नाही.
देशाची ही खस्ता हालत. देशातील असे काही लुटारू घटक. कोणी कोणकोणत्या प्रकारे सरकारला लुटतील याचा काही ठावठिकाणा नाही. त्यांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाशी काही घेणंदेणं नाही. कितीतरी हजारो रुपये कॉन्व्हेंट शाळेचा खर्च करुनही पाल्य शिकत नसेल तर अशी मंडळी त्या पाल्यांना वेगळी शिकवणी लावून देतात. ती शिकवणीही काही कमी पैशाची नसते. तरीही त्या पाल्यांचे गुण पाहिले तर त्याची टक्केवारी अतिशय कमीच असते. मग म्हटलं जातं की बरं झालं शिकवणी लावली म्हणून. शिकवणी लावली म्हणून एवढे गुण तरी वाढले. नाही तर नापास व्हायची पाळी माझ्या पाल्यावर आली असती.
प्रत्येक पालकांचा असा समज, त्यामुळंच लावली जाणारी शिकवणी. त्यातच विद्यार्थ्यांशी काही घेणंदेणं न ठेवणारी शिक्षक मंडळी. कदाचीत याचाच शिक्षणासाठी पैसा कमविण्याच्या हव्यासानं नाईलाजास्तव, मनात इच्छा नसूनही लोकं भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबतात. कारण आज साधारण डॉक्टर, इंजिनिअर बनवायचे असेल तर अशा शिक्षण संस्थांचे शुल्क हे अवाढव्य आणि कितीतरी आहे. जे सामान्य माणसाला परवडणारेही नाही.
शिक्षक...... जो देशाच्या जडणघडणीतील महत्वाचा घटक आहे. त्याला आज विशेष असं महत्व नाही. मग त्यानं कितीही चांगलं शिकविलं तरी. शिवाय अशा खाजगी संस्थेत चांगल्या शिक्षकांच्या गुणांची किंमत होत नाही. चांगल्या शिक्षकांना नोकरी लागत नाही व ते बेरोजगार असतात. कुठंतरी असे शिक्षक पानठेला लावतात वा चहाची चपरी लावतात व आपला उदरनिर्वाह करीत असतात. अन् ज्यांच्यात गुण नसतात, असे शिक्षक वर्गामध्ये नियुक्त होवून राष्ट्र घडवीत असतात.
विशेष म्हणजे असे घटक जे आपल्या स्वतःचंच भलं पाहतात. त्यात वेळ घालवतात, ते काय दुसऱ्याचं भलं करु शकतील! ते कोणाचंच भलं करु शकत नाहीत. महत्वपुर्ण बाब ही की राष्ट्र घडविण्यासाठी लाचार असलेला शिक्षक हा आजच्या काळात गरजेचा नाही तर शिक्षक हा स्वाभिमानी असायला हवा. परंतु असा स्वाभिमानी शिक्षक आजच्या काळाला चालत नाही. तसाच जो शिक्षक स्वाभिमानी असेल, त्या शिक्षकाच्या मागं वेळोवेळी संकटं उभी राहात असतात. परंतु हे जरी खरं असलं तरी संकटांना घाबरून शिक्षकांनी विद्यार्थी विकास करण्यावर बंधन घालू नये. संकटाशिवाय जीवन नाही. संकटांनी राम व क्रिष्णासारख्या देवांनाच सोडलेलं नाही. आपण तर माणसंच आहोत. असं समजून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत राहावं. कुणाच्याही बंधनात राहू नये. तसंच कोणाच्याही हुकूमशाहीत स्वतःला जोडू नये. स्वाभिमान बाळगावा. जेणेकरुन विद्यार्थी विकास होईल व विद्यार्थ्यांना उत्तुंग शिखरावर जाता येईल.
रुपालीची ती खंत. ती खंत तिला पडणं साहजीक होतं. तसा तिला पुन्हा विचार आला तिच्या आईचा कदाचीत तिच्या आईला वाटत असेल की आज जर आपली मुलगी शिक्षण शिकली नाही तर उद्या हाच समाज तिला काय म्हणेल. कदाचीत तिनं आपल्या मुलीला तिच्या पायावर उभं करण्यासाठी उचलललेलं पाऊल होतं.
तिच्या आईचा तो विचार. चार लोकं काय म्हणतील. ती त्या बाबतीतील विचार साऱ्या जीवनभर करीत आली होती. शेवटी त्या विचारांनी अंतिम समयी व्यक्त केलं की ते चार लोकं राम नाम सत्य शिवाय काहीच म्हणत नव्हते.
रुख्मानं आपल्या मुलीला तिच्या पायावर तर उभं केलं. परंतु त्या उभ्या असलेल्या पावलानं तिच्या आईला अंगूपंगू बनवलं होतं. पुत्रीचं भलं पाहणारी व तिच्यासाठी सुयश चिंतणारी तिची आई अंतिम घटका मोजत असतांनाही तिला भेटायला रुपालीचं न येणं. तिला तर ती घटना पश्चाताप देणारी ठरली होती. व्यतिरीक्त तिच्या मुलीलाही तिच्या मुलीच्या आयुष्यभर पश्चातापच देणारी ठरली. त्याचं कारण होतं तिचा अंतिम काळ.
रुपाली आता म्हातारी झाली होती. आजपर्यंत तिनं कितीतरी मुलांना मदत केली होती व त्यांचे आयुष्य घडवले होते. त्यातील काही विदेशातही नोकरी करायला गेली होती. कधीकाळी ते येत. तिला भेटून जात. तेव्हा तिला अतिशय आनंद होत असे.
रुपालीनं आज वसा घेतला होता समाजसेवेचा. ती समाजातील होतकरु असलेल्या मुलांचा शोध घेत असे. त्यांना शिकायला प्रेरीत करीत असे. त्यातच ती त्यांना आता मदत करीत असे. आज तिनं आपल्या आयुष्यभर कितीतरी मुलं घडवली होती. परंतु हे सगळं नियती जरी पाहात असली तरी तिच्या अंतिम समयी ते कोणीच कामात आले नाहीत. तिची दोन्ही मुलं तिला सोडून दूर विदेशात राहायला गेली होती. ती फिरकतही नव्हती तिच्याकडे. तिचा पतीही अकाली मरण पावला होता. त्यातच तिची अंतिम वेळ आली व त्या अंतिम समयी रुपालीजवळ कोणीच नव्हतं. कोणीच तिला पाणीही देणारं नव्हतं. कोणीच तिला औषधी चारणारं नव्हतं आणि बोलायला तर कोणीच नव्हतं. ती अंतिम समयीही आपल्याच आईसारखी कुढत कुढत मरण पावली होती आणि मरतांना तिला आठवत होती तिचीच ती आई. ज्या आईनं आपली मुलगी आपल्या पायावर उभी राहावी म्हणून आपल्या उभ्या जीवनाची राखरांगोळी केली होती. त्याच आईच्या कर्तृत्वाला रुपाली विसरल्यानं आज नियतीनंही तिच्यासोबत तेच केलं होतं. त्या नियतीनंही तिच्या अंतिम समयी तिला एकाकीच ठेवलं होतं. जो एकाकीपणा जीवनभराच्या पश्चातापापेक्षाही महाभयंकर होता. आयुष्याच्या अंतिम समयी तिला आता तिला तिच्या मुलांपेक्षाही तिची आईच आठवत होती आणि आठवत होत्या त्या आठवणी. ज्या आठवणींचा इतिहास तिनं घडवला होता. त्या तिच्या आयुष्यातील तिनं अनुभवलेल्या एकेक घटना आज तिला आठवत होत्या. ज्या आठवणीनं ती घायाळ होत होती एखाद्या घायाळ वाघिणीसारखी. ज्या वाघिणीच्या आयुष्यात तिनं कितीतरी सेवा केली असली तरी पश्चाताप आणि पश्चातापच उरला होता. आनंद शब्द तिच्या शब्दकोषातून हद्दपार झाला होता केव्हाचाच. रामनाम हा शब्द सत्य झाला होता. शिशिराच्या पिकलेल्या पानांसारखा.........

******************************************************************************समाप्त************