भाग 6
चालता चालता डोक्यात विचारांनी थैमान माजवले होते त्याच्या... केव्हा झोपडी वजा घर आले समजले ही नाही.
आणि त्याचे समोर लक्ष गेले....तर...
समोर त्याचे वडील वाट पाहत होते त्याची.
आपल्या मुलाला पाहून त्याचे आई वडील दोघेही भारावून गेले होते.
तरी पार्वती अधेमधे शहरात जाऊन मोहितला भेटून येत होती. पण कवडूला मात्र कधीही वेळ मिळत नव्हता.
अंगाने भरलेला जरी कवडू होता तरी त्याचे मन फारंच भावनिक होते.
मोहितही आपले आई-बाबांना फार फार दिवसांनी भेटत असल्यामुळे तात्पुरते तो सर्व काही विसरून गेला.
त्याच्या आईला भारावल्यागंत ...त्याला काय करून देऊ खायला...?? आणि काय नाही ....??..असे वाटू लागले.
मोहित ने मग एक एक किस्से सांगितले.
मोहितचे बाबा कवडू आणि आई पार्वती आज निवांत बसले होते त्याच्याच बरोबर.
दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झाली.
सूर्यबिंब क्षितिजाकडे ढळलं.
सावल्यांच्या लांबी वाढू लागल्या.
ते तिघेही अंग मोडून विश्रांती घेत होते.
पण ...आता पार्वती संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागली आणि आता झोपडीतला आतल्या खोलीत मोहित आणि त्याचे बाबा कवडू दोघेच होते.
कवडू हळूच मोहितशी बोलायला लागला...
कवडू....
"मोहित.... आज तू एवढया दिवसांनी आलाय.. तुला तुझ्या मनासारखं शिकता आलं . हे सर्व तुझ्या मामामुळे शक्य झालं आहे... तो नसता तर तुझं शिक्षण झालं नसतं.
त्याहीपेक्षा तुला आज एक गोष्ट सांगायची आहे.....
लोकांच्या तोंडून माहित होण्यापेक्षा मलाच तुला सांगू वाटतंय. .....आणि हे रहस्य फक्त तुलाच माहीत नाही. गावातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे.
म्हणूनच तुला मी इथे राहू दिले नाही. तसंही इथे जात-परजात जास्त चालते. तुझं शिक्षणंच झालं नसतं तुला इथलं ठेवलं असतं तर.."
मोहित....
"बाबा... मला मामाने येण्याच्या अगोदर खूप काही म्हटले.
तो हेही म्हणाला की तुम्ही माझे लग्न त्यांच्या मुलीशी करून देणार म्हणून त्यांना शब्द दिला होता.
असं का केले बाबा??..."
कवडू....
"त्याचे खूप खूप मोठे कारण आहे रे राजा.
आम्हाला तरी कुठे असं करायचं होतं...???
पण आता इलाज नाही रे बाबा...!!! त्यावेळी शब्द द्यावा लागला मला..!!!"
मोहित....
"बाबा ....!!....पण ...
मला मामाचा व्यवसाय सांभाळायचा नाही.
मला एवढे शिक्षण घेऊन ते नाही रे करायचं.
मला या शिक्षणाचा फायदा आपल्या गावाला करून द्यायचा आहे. येथेच मी नोकरी करेन... येथेच मी....या गावाला जे होईल ते आपल्या परीने उद्धार करण्याचा प्रयत्न करेल."
कवडू...
"अरे बाबा..!!!
हे डोक्यातले खूळ काढून टाक.
या गावात राहून कुणाचेच भलं झालं नाही आजपर्यंत.
हे राजकारणी लोक या गावातले पुढेच जाऊ देत नाही कुणाला. त्याच्यात त्यांनी भांडणं लावून ठेवलेली आहेत.
येथे तुझ्यासारख्या शिकल्या सवरल्या माणसाचं काहीच काम नाही.
तू आपला शहरातंच राहा..... तुला सुखी पाहून आम्ही म्हातारा-म्हातारी दोन दिवस जास्त जगू. ....मरेस्तोवर माझी तर वतनदारी काय सुटायची नाही आता.
पण तू इथे राहशील तर सुखाने जगू देणार नाहीत इथे लोक तुला...!!"
मोहित...
"का बाबा ???का ???
मला का नाही राहू देणार इथे लोकं सुखाने..
लहानपणापासून मला तुम्ही बाहेर ठेवलं तर आपल्या आणि आईच्या प्रेमाला मुकवलं.
तिथे मी कसे दिवस काढले असतील...???
घरच्या ओढीने येथे आलोय तर तुम्ही असे म्हणत आहात...??"
तेवढ्यात बापलेकाच्या काय गोष्टी एवढ्या सुरू आहेत??
त्या कुतूहलाने त्याची आई पार्वती तेथे आल्या.. तर त्यांच्या कानावर मोहितचे बोलणे पडले.
ना राहवून त्या मोहितला म्हणाल्या....
पार्वती....
"हे बघ मोहित्या... तुला तर येथून जावंच लागेल पोरा तेही दोन दिवसात...?? तू एक मिनिट थांब... मी चुलीवरून भात उतरवून येते. मग तुला सांगते का तुला इथून जायचे आहे...?? (कवडू कडे पाहत )....का वं ...??
तुम्ही अजून पर्यंत त्याले सांगितलं नाही का...??"
त्यावर कवडू ....."नाही" ....म्हणून मान हलवतो.
आता पार्वती चुलीवरून भात उतरवण्यासाठी गेल्या.
कवडू आता शांत बसला होता...
तर मोहितला अचानक पॅन्ट मध्ये मायराने दिलेली चिट्ठी आठवली. पटकन त्याने खिशातून काढली.. आणि वाचू लागला.
जरी बाजूला कवडू होता तरी त्याला काही फरक पडणार नव्हता.... कारण कवडूला काहीही वाचता-लिहिता येत नव्हते आणि पार्वतीलाही.
चिठी मध्ये मायराने उद्या त्याला भेटायला बोलावले होते एका ठिकाणी.
कुठे भेटायचे ते सुद्धा तिने लिहिले होते.
दोन ओळीची चिठ्ठी तिने त्याच्या हातात दिलेली होती.
चिट्ठी वाचून त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरले. 😊
आणि ते मंद स्मित त्याच्या मिशीत अडकलेले कवडूला दिसले.
कवडूला कागदातले जरी वाचता-लिहिता येत नसले...
तरी ......उन्हाळे जास्त पाहिले असल्यामुळे.... चेहरे वाचता येत होते. ....आणि क्षणात त्याने आपल्या पोराचा चेहरा वाचला.
पण त्याने आपल्या पोराला ...."त्याला समजले "....असे जाणवून दिले नाही.
वाचलेली चिट्ठी मोहितने तशीच पुन्हा त्याच्या खिशात ठेवली.
खिशात चिठ्ठी ठेवल्यानंतर त्याने एक क्षण आपल्या वडिलांकडे पाहिले. तर कवडूनेही पाहून त्याच्याकडे पाहून मंदस्मित केले.
क्षणभर मोहित चपापला.
आपल्या बाबांनी आपल्याला चिठ्ठी वाचताना पाहून काही विचारले का नाही...??
मग त्यालाच आठवले की बाबाला कुठे वाचता लिहिता येतं. मग... त्यांना समजलं नसेल...चिठ्ठीत काय आहे...??
तो विचार करत असताना पार्वती आल्या आणि खाटेवर त्याच्या बाजूला बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला .
बोलण्याच्या पहिले त्यांनी कवडू कडे एकदा पाहिले.
कवडूनेही मानेने होकार देऊन इशारा दिला पार्वतीला.
एकंदरीत दोघांच्या वागण्यावरून मोहितला कळले होते.... काहीतरी गंभीर बाब आहे.
पार्वतीने बोलायला सुरुवात केली...
" मोहित... तू माझ्या पोटचा मुलगा नाहीस...."
पार्वतीने असं म्हणताच मोहित डोळे मोठे करून पहात होता पार्वतीकडे आणि कवडूकडे.
कदाचित आपण काही चूक तर नाही ना ऐकले...!!!
असे मोहितला वाटत होते आता.
पार्वती....
"मोहित.... काय सांगते मी... ते पूर्ण ऐकून घे.
त्याशिवाय तुला पूर्ण समजणार नाही..."
पार्वती आता सुरुवातीपासून सविस्तरपणे त्याला सांगू लागल्या
(भूतकाळ मोहितचा)
🔸🔸🔸🔸
कवडू हा एका गावाच्या स्मशानाचा वतनदार.
स्मशानाला लागूनच त्याची झोपडी आणि... त्यामध्ये तो आणि त्याची बायको दोघेच राहत होते.
कवडू हा दिसायला अगदी काळाकुट्ट कोळसा.
गेंड्याच्या कातडी सारखी दणकट चमडी. ...पण अत्यंत हळव्या मनाचा.
छोटी छोटी मुली पाहिली की अगदी हळवा व्हायचा.
खुश व्हायचा ....लहान मुले पाहिले की खूप खूप.
आणि पार्वती ही तशीच. तिलाही लहान मुलांचा फारच लळा होता. एखाद्या लहान मुलाचे स्मशानात प्रेत आले की दोघेही फार फार रडायचे.
पण लग्नाला पंधरा वर्षे होऊन गेली तरीही तिची कूस भरली नव्हती. त्यांनी कित्येक देवाला कोंबडे कापले. बोकड कापला पण कोणत्याही देवाला तिची दया आली नाही.
एक दिवस नेहमीसारखीच ती शंकर-पार्वतीच्या देवळाजवळ आली. देवळात ती गेली नाही...
कारण त्यांना देवळाच्या आत मध्ये जाण्याची मूभा नव्हती गावच्या प्रथेनुसार.
मग तिने बाहेरूनच नेहमीसारखा नवस केला. रोजचाच नवस होता तिचा आजकाल.... थोडा वेळ ती तिथेच बसली आणि झपाझप चालू लागली.
ते मंदिर गावापासून दोन ते अडीच किलो मीटर अंतरावर होते. डोंगराच्या माथ्यावर असलेले शंकर-पार्वती चे मंदिर.
आजपर्यंत चढण्याचे खडतर तप तीने सुरूच ठेवले होते.
एकही दिवस हा खंड पडू दिला नव्हता तिने.
खूप ऊन तापले होते.
सर्वांगातून घामाच्या धारा वाहत होत्या.
कासावीस झाला होता. एका दमात उभा डोंगर चढणारी पार्वती आज थकली होती.
प्रथमच एका झुडपांच्या जाळीत गारवा पाहून बसली.
सारे शरीर थकले होते. छाती भात्यासारखी वर खाली होत होती. चेहरा घसा सुकल्यासारखा झाला होता
आणि प्यायला पिण्याच्या पाण्याचा घोट सुद्धा देवळाकडे गेल्याशिवाय तिला मिळणार नव्हता.
बऱ्याच वेळाने आज ती देवळाजवळ जाण्याला उठली.
पण त्याचवेळी ती थबकली. तेथेच तिचे पावले रेंगाळली. तिच्या तीक्ष्ण कानांनी अस्पष्ट असा आवाज टिपला होता वेगळा कुठलातरी.
कसला आवाज आहे तिच्या लक्षात आले नाही लगेचच.
सर्वप्रथम ती घाबरली. तिला वाटले भुताकटी तर नसावी.
घाबरून इकडे तिकडे पाहू लागली.
पुन्हा तसाच आवाज ऐकू आला.
ती दचकली.
एक लहान मूल क्षीण आवाजात रडत होते.
तिच्या उजव्या बाजूला कुठेतरी असा आवाज लहान बाळाचा वाटत होता.
तिला वाटले पटापट पुढे जावे आणि पहावे काय आहे..??? खरंच असेल का छोटं बाळ?? कुठे आहे छोटेसे बाळ...???
पण तिने हेही ऐकले होते की भूत प्रकारांमध्ये अशाच प्रकारचे खेळ चालतात.. कधी लहान बाळांचे रडण्याचा आवाज येतो. तर कधी लहान बाळांची हसण्याचे आवाज येतात.
तसंच तर काही नसेल ना हे....??
हाच विचार तिच्या डोक्यात तुफान सारखा फिरत होता.
...जावे ...नाही जावे या गोंधळात अडकली होती.
पण तिचे त्या छोट्या बाळाचा आवाज आल्यासारखा ऐकू येत असल्यामुळे पायं.... ना पुढे जात होते.... ना मागे जात होते.
आणि मग शांत वातावरणात रडण्याचा आवाज स्पष्टपणे उमटू लागला. कदाचित ते बाळ थोडे जोरात रडत असावे..
आता मात्र पार्वतीला अगदी राहावले नाही.
नकळत आपोआप तिचे पाय आवाजाच्या रोखाने जाऊ लागले.
आणि जवळ जाताच ती खुळ्यागत पाहतच राहिली.
झुडपांच्या जाळीत एक गोरेपान पोर अडकलेले होते.
क्षीण आवाजात अधून मधून रडत होते.
तोंडातून फेस ही येत होता त्याच्या.
न रहावून पार्वती त्याला घेण्यास खाली वाकली..
पण ती पाहून आणखीन थबकली....
कारण....
🌹🌹🌹🌹🌹