"कर्म- गीतारहस्य"
गीतारहस्य हा ग्रंथ गीतेतील कर्मयोगाचे महत्व स्पष्ट करतो.
कर्मयोगाच्या साधनेसाठी आवश्यक असलेल्या निःसंग व ब्रह्मनिष्ठ स्थितीची प्राप्ती कोणत्या साधनांद्वारे होते, ते आता सांगितले आहे.
मनात फलाशा न ठेवता जो आपली नेमून दिलेली कर्मे करतो, तोच खरा संन्यासी आणि कर्मयोगी समजावा. ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्म योग समजावा कारण काम्यबुद्धीरुप फलाशेचा त्याग (संन्यास) केल्याशिवाय कोणीही कर्मयोगी होत नाही.
साधनेच्या पहिल्या अवस्थेत कर्म हेच योगसिद्धीचे कारण बनते.
कर्मयोगी आपली सर्व कर्मे शांतचित्ताने, कर्तव्य म्हणून, फळाशा न ठेवता करतो.
अशा प्रकारे फळाशेचा त्याग करणारा मनुष्यच खरा संन्यासी आणि योगारूढ मानला जातो.
प्रयत्नशील मनुष्यांसाठी फळाशेचा त्याग करून कर्मयोगाची साधना शक्य होते.
मनुष्याने स्वतःच आपला उद्धार करावा, कारण आपणच आपले मित्र आणि शत्रू असतो.
जो स्वतःला ओळखत नाही, तो स्वतःचा शत्रू ठरतो.
'आत्मा' या शब्दाचे अनेक अर्थ होतात, जसे की अंतरात्मा, मन, आणि स्वतः. कर्मयोगी एकांतात राहून आत्मा व चित्तावर नियंत्रण ठेवतो आणि पापाचा त्याग करून योगाभ्यास करतो.
इतर कर्मे न सोडता योगाभ्यास महत्त्वाचा मानला आहे.
कर्मयोगाचे आचरण हे कल्याणकारी असून, त्यामुळे अखेरीस मोक्ष प्राप्त होतो. तपस्वी, कर्मठ आणि ज्ञानमार्गीपेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ मानला गेला आहे.
भगवंतांनी स्पष्ट केले आहे की, जो माझ्या ठिकाणी अंत:करण ठेवून भक्ती करतो, तोच उत्तम कर्मयोगी आहे.
कर्मयोगात भक्तीचा समावेश महत्त्वाचा आहे कारण भक्तीमुळे चित्तशुद्धी होते.
कर्मयोगी साम्यबुद्धीचा उपयोग करून लोकसंग्रहासाठी कर्म करतो. म्हणूनच तपस्वी किंवा ज्ञानमार्गी यांच्यापेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ आहे.
भगवंत सांगतात की कल्याणकारी कर्म करणाऱ्या मनुष्याला वाईट गती मिळत नाही.
पुण्यकर्म करणाऱ्यांना पुढील जन्मात चांगल्या घरात जन्म मिळतो, आणि पूर्वजन्मातील संस्कारांमुळे परमेश्वरप्राप्तीकडे ओढ होऊन अखेरीस मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच अर्जुनाला भगवंत सांगतात,
"तू कर्मयोगी हो."
गीतेच्या पहिल्या सहा अध्यायात कर्माचा आणि नंतरच्या सहा अध्यायात भक्तीचा विचार केला आहे. तिसऱ्या सहा अध्यायात ज्ञानाचा विचार केला आहे.
तथापि, दुसऱ्या दोहोंचा विचार कर्मयोगाची अंगे म्हणूनच केला आहे.
भगवंत सर्वकाही करणारे आणि सर्व फल देणारे आहेत, पण ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फल देतात.
आणि ज्या पुण्यकर्मी लोकांचे पाप संपते ते सुखदुःख इत्यादी द्वंद्वाच्या मोहातून सुटून श्रीकृष्णाची दृढ भक्ती करतात.
मनुष्याच्या देहात, सर्व भूतात, सर्व देवतात एकचं परमेश्वर आहे.
गीतेत सांगितले आहे की, जो देह सोडताना भगवंतांचे स्मरण करतो, तो परमेश्वराला प्राप्त होतो.
पण एखादा मनुष्य जन्मभर ज्या भावनेत रंगून जातो तीच भावना अंत्यसमयी होणार असल्याने सर्व काळी माझे स्मरण कर असे भगवान सांगतात.
योग म्हणजे "न मिळालेली वस्तू मिळणे" आणि क्षेम म्हणजे "मिळवलेली वस्तू टिकवणे." म्हणजे थोडक्यात संसारातील नित्य निर्वाह. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होणे.
भगवंत म्हणतात, "तू जे काही करतोस, खातोस, देणगी देतोस, ते मला अर्पण कर. अशा प्रकारे, कर्माच्या शुभ-अशुभ फलांचे बंधन तुला लागणार नाही."
भक्तीने प्रथम ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर परमेश्वराच्या साक्षात्काराची प्राप्ती होते. जे भक्त प्रेमाने सर्वकाही परमेश्वराला अर्पण करतात, तेच परमेश्वराचे खरे भक्त आहेत.
गीतेचा मुख्य संदेश असा आहे की सर्व कर्मे करताना फलाशा संन्यास करून, जे कार्य मी करतो आहे ते परमेश्वर करवीत आहे असे समजून करणे.
भक्ताने हे लक्षात ठेवले पाहिजे की कर्मे न सोडता ती इश्वराला अर्पण म्हणून करणे, हीच खरी भक्ती आहे.
परमेश्वर सर्वव्यापी असून, त्याची भक्ती हीच श्रेष्ठ उपासना आहे. भक्तीमार्गातील साधकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, परमेश्वराला अर्पण केलेले कर्म हेच श्रेष्ठ मानले जाते.
अभ्यासापेक्षा ज्ञान चांगले, ज्ञानापेक्षा ध्यान चांगले आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ असून त्यानेच शान्ति प्राप्त होते.
निरपेक्ष भावनेने, दक्षतेने आळस झटकून फलाशा न ठेवता कामे करणारा, संतुष्ट राहणारा, जो लोकांना कंटाळत नाही व लोकही त्याला कंटाळत नाहीत असा, हर्ष, क्रोध व भय यापासून अलिप्त राहणारा भक्त मला प्रिय आहे असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. यावरून सगुण उपासनेचे महत्व स्पष्ट होते.