कर्म -गीतारहस्य
अहंकार, दंभ सुटणे ,अनासक्ती, सम बुद्धि (इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झाले तरी शांत राहणे), बाष्कळ बडबड न करणे , अध्यात्मज्ञान नित्य आहे हे लक्षात ठेवणे, तत्वाप्रमाणे वागणे, मनोनिग्रह, गुरु सेवा, इत्यादी गुण मनुष्यामध्ये दिसू लागणे यालाच ज्ञान म्हणावे.
कार्य म्हणजे शरीर कारण म्हणजे इंद्रिये आणि प्रकृती.
गुण हे करवून घेणारे आणि हे करणारा जो, तो सुखदुःखाचा उपभोग घेणारा पुरुष म्हणजेच क्षेत्रज्ञ.
कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडूनच केली जातात. आत्मा अकर्ता आहे हे जाणणे व विविधतेमध्ये एकता दिसणे व या एकापासूनच सर्व विस्तार झाला आहे असे समजू लागणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती.
चांगले कर्म करणे हे सत्वगुणाचे लक्षण आहे पण हे करण्याची प्रवृत्ती होणे हा रजोगुणाचा धर्म आहे . तमोगुणामुळे कर्तव्याचा विसर पडतो, मोह होतो, त्यामुळे तमोगुणावर विजय मिळवून कर्म करणे आवश्यक आहे .
गीतेमध्ये भक्ती मार्ग हा सुलभ मार्ग आहे असे सांगितले असले तरी कर्मयोग ही श्रेष्ठ असल्याचा उपदेश गीतेमध्ये दिला आहे . परमेश्वर हा मूळ असून वृक्षाच्या पसाऱ्याप्रमाणे सर्व जगाचा विस्तार आहे. सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी गुण सांगितले आहेत दैवी गुण म्हणजे मोक्षदायक , आसुरी गुण हे बंधनकारक असतात.
यामध्ये पुढे असे सांगितले आहे की आसुरी गुणाच्या लोकांना काय करावे व काय करू नये हे कळत नाही ते ईश्वर मानत नाहीत आणि कामवासनेतून हे जग निर्माण झाले आहे असे मानतात. आणि त्यामुळे चुकीची व कृती करण्यात ते मग्न राहतात.
सामान्य माणसे थोरांच्या अनुकरण करत असतात .
थोर लोकांनी आपल्या आचरणाने आदर्श घालून दिलेला असतो व त्यामुळे इतर लोक त्याप्रमाणे वागत असतात परंतु आताच्या काळात नेते मंडळी ,अभिनेते इत्यादी कलाकार यांनाही आदर्श समजले जाते आणि या सर्वांचे आपल्या क्षेत्रातील महत्त्व कितीही असले तरी सामान्य माणसाने त्यांचे अनुकरण करताना सारासार विचार करणे आवश्यक आहे . आर्थिक प्रगती म्हणजे सर्व काही नाही हे समजून योग्य त्या व्यक्तींना आदर्श मानणे आवश्यक आहे.
या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात की काम, क्रोध,लोभ हे नरकाचे द्वार असून त्याचा त्याग करावा. शास्त्रानुसार कर्म करणे योग्य आहे असे सांगतात.
आता सत्व रज व तमोगुणाबद्दल तसेच आहार, यज्ञ याबाबत सांगितले आहे.
माणूस हा श्रद्धावान असतो. सात्विक माणूस देवाचे ,राजस माणूस यक्ष राक्षसांचे, तर तामसी माणूस हा भूतगणांचे भजन करतो . परंतु मनुष्यास सात्विक, राजस, तामस ही विशेषणे एक एकटी लागू पडत नाहीत मनुष्याच्या श्रद्धे प्रमाणे त्याच्या कर्मात फरक पडतो व कर्मा प्रमाणे गती मिळते.
आपल्या आत्मस्वातंत्र्याचा उपयोग करून आणि शास्त्राप्रमाणे वागून स्वतःला सुधारणे शक्य आहे व तसाच प्रयत्न केला गेला पाहिजे. आहाराबाबत सांगितले आहे की राजस लोक तिखट आंबट अति उष्ण असा आहार करतात तो रोगकारक असतो.
तामस प्रवृत्तीची माणसे शिळे अन्न खातात ते अपवित्र असते. तसेच सात्विक माणूस हा रसयुक्त व शरीराचे योग्य पोषण करेल असा आहार घेतो.
तसेच यज्ञा बद्दल सांगितले आहे की शांतचित्ताने फलाशा न ठेवता जो यज्ञ करतो तो सात्विक माणूस.
शास्त्र विधी सोडून श्रद्धा नसताना, दक्षिणा न देता जे यज्ञ करतात ते तामस , तर फळाची इच्छा ठेवून ऐश्वर्या प्रदर्शनासाठी यज्ञ करतात ते राजस.
कायिक तप म्हणजे देव, गुरु यांचे पूजन , अहिंसा, ब्रह्मचर्य.
मनाला त्रास न देणारे सत्यप्रिय व हितकारक भाषण आणि त्याप्रमाणे अभ्यास याला वाचिक तप म्हणतात.
मन प्रसन्न ठेवणे सौम्यता, मौन संतांप्रमाणे वृत्ती असणे, मनोनिग्रह व शुद्ध भावना यास मानसिक तप म्हणतात.
तिन्ही प्रकारचे तप फलाशा न ठेवता श्रद्धेनी करणारा सात्विक.
ढोंगीपणे आपल्याला मान मिळावा म्हणून वागणारे राजस तर स्वतःलाच त्रास होईल,किंवा दुसऱ्याना त्रास होईल असे वागणारे तामस.
दान हे कर्तव्य बुद्धीने योग्य व्यक्तीस केलेले सात्विक असते. उपकाराचा मोबदला म्हणून किंवा फलाशा ठेवून जे दान दिले जाते ते राजस आणि अयोग्य माणसाला अयोग्य वेळी अपमानपूर्वक केले जाणारे दान हे तामस समजावे.
आणि म्हणूनच फलाशारहीत कर्म सात्विक किंवा फलाशेने पण शास्त्रा प्रमाणे केलेले शुद्ध कर्म राजस,आणि श्रद्धा नसताना केलेले हवन तामस असते. अशी तामस कर्मे करणाऱ्याला परलोकी, किंवा या लोकांतही सुख लाभत नाही.
अशा रीतीने कर्मयोग अधिक श्रेयस्कर हा सिद्धांत स्पष्ट होतो. फलाशा सोडून कर्म करणे परमेश्वराची उपासना करणे आणि परमेश्वराला कर्मे अर्पण करून आपला जो व्यवसाय असेल तो फलाशा संन्यास करून कर्तव्य म्हणून जीवनाच्या अंतापर्यंत करीत राहणे हा आयुष्यक्रमणाचा उत्तम मार्ग आहे .
भगवान म्हणतात माझी भक्ती करून सर्व कर्मे मला अर्पण करून वाटयाला आलेली कर्मे करीत जा म्हणजे इहलोकी, व परलोकी तुमचे कल्याण होईल.
या सर्व विवेचनावरून कर्मयोग हा गीतेचा महत्त्वाचा उपदेश आहे असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो.
समाप्त.