साधिकाने केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसतो तर, सुरज चकित होतो आणि एक विचार त्याच्या मनात चमकतो. तो साधिका काय सांगते आहे हे शांतपणे ऐकू लागतो.
साधिका : सुरज मी जे बोलले ते खरं आहे ना?
सुरज : हो ताई...
माधव : म्हणजे तुला हा येणार आहे हे आधीच माहिती होतं...
साधिका : हो आज सकाळी मी नेहमीप्रमाणे ध्यानाला बसले होते. अशातच मला सुदामा काका जे गीत म्हणायचे ते ऐकू आलं. मला तेव्हा असं वाटलं की त्यांच्याशी संबंधित असं काहीतरी घडणार आहे... आणि माझ्या गुरुंना याविषयी मी सांगितलं. त्यांनी आज एक मुलगा येणार आहे त्याला तुमच्यासोबत काम करायची परवानगी द्यायची असं सांगितलं...आणि जेव्हा मी याला पाहिलं तेव्हा मला ते गीत आठवलं आणि काय योगायोग म्हणावा की हा यायच्या वेळेस सुदामाकाकांचं मदतीचं पत्र आलं...जेवताना मी याचा चेहेरा न्याहाळत होते... तेव्हा त्याच्या चेहऱ्याची ठेवण पाहता हा काकांशी संबंधित व्यक्ती असेल असा अंदाज मी बांधला...
माधव : माझ्या माहितीप्रमाणे सुदामाचं लग्न आमच्या गावातील एका मुलगी, मालतीशी ठरलं होतं. लग्न होण्याआधी तो एका कामगिरीवर गेला आणि तिथून परत आल्यावर त्यांचं लग्न होणार होतं. मात्र तो तिथून आलाच नाही... मी आणि माझ्या साथीदारांनी त्याचा खूप शोध घेतला.
अभिमन्यू : सर मग पुढे काय झालं...
माधव : मग एके दिवशी माझे गुरू म्हणाले की त्याचा शोध थांबवा.. आणि मी गावी निघून आलो तर तिथे मालतीसुधा नव्हती. मालती आणि सुदामाचं एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यांचे लग्न ठरले. सुदामा माझ्या वडिलांचा शिष्य होता.
अरविंद : मालती कुठे गेली हे कधी आम्हाला समजलं नाहीच...आम्ही तिलाही खूप शोधलं..पण ती काही सापडली नाही..
माधव : माझे वडील, खूप मोठे साधक होते. खूप शिष्य यायचे त्यांच्याकडे... त्यांच्या प्रत्येक शिष्यात एक प्रकारचे विशेषत्व होते. म्हणजे काही तरी दैवी देणगी त्यांना लाभली होती.
अभिमन्यू : सर मग तुमच्या वडिलांनी काकांना सोडवायला मदत केली नाही का ?
माधव : माझे वडील शेवटपर्यंत त्याला शोधत होते. सुदामा जिवंत आहे हे त्यांना समजलं होतं. पण एका कामगिरीदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मीही संसारात गुंतलो आणि मला दिलेल्या कार्यात लक्ष घातलं. या सगळ्यातही सुदामा कधीही डोक्यातून बाहेर गेला नाही...आमचे प्रयत्न सुरू होतेच.
साधिका : सुरज आता जे आम्हाला माहिती नाही ते तू सांग.
सुरज : सगळ्यात आधी मी हे सांगतो की माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं.
माधव : कधी आणि आम्हाला कसं माहिती नाही.
साधिका : बाबा शांत रहा...तो सांगतोय ना पुढचं.. ते ऐका..सुरज तू सांग पुढे...
सुरज : तुमचे वडील, पर्शुराम शिंदे यांनीच त्यांचे लग्न लावून दिले होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आईही त्यांची शिष्या होती. आता त्यांनी कोणालाही न सांगता त्या दोघांचं लग्न का लावून दिलं हे मला माहिती नाही. याचं उत्तर तुम्हाला आईचं देऊ शकेल. मी जसा मोठा होत होतो तशा या गोष्टी मला आईने मला सांगितल्या. माझे वडील जिवंत आहेत हे आईला गुरूंनी कळवल होतं. मात्र ते कुठे आहेत हे त्यांनी सांगितलं नाही. माझी आई सध्या कोल्हापूरमध्ये आहे. मीही गेल्याच वर्षी इथे आलो आहे. आईने मला तुमच्याविषयी सांगितलं होतं. पण कधी इथे आलो नाही मात्र गेल्या सोमवारी मी जप करत असताना डोळ्यांसमोर बाबांचा चेहरा आला. मी आधी ते गांभीर्याने घेतलं नाही पण गेला आठवडाभर हेच चालू होतं. ते स्वप्नातही आले मग आईला याविषयी सांगितलं. आईने तुमच्याशी संपर्क साधायला सांगितलं. मी तुम्हाला ओळखत नव्हतो आणि माझा लगेच तुमच्यावर विश्वास बसणार नाही म्हणून अभिमन्यू सरांची मदत घेऊन इथे आलो. म्हणजे शिकायच्या नावाखाली मला तुम्हाला ओळखता आलं असतं. पण इथे मलाच धक्का बसला आणि म्हणाली ते पटलं पण...
साधिका : काय म्हणाली मालती आत्या... ?
सुरज : हेच की साधिका ताईला दैवी देणगी आहे...ती नक्कीच तुला ओळखेल...
माधव : मालती कधी इथे येणार आहे?
सुरज : ती येईल दोन ते तीन दिवसांत...
साधिका : तुला आणि मला मिळालेला संकेत आणि हे पत्र यातूनच आपल्याला काही तरी मार्ग काढावा लागेल. ठीके आत्या आली की पुढे काय योजना करता येईल ते पाहू.
माधव : म्हणजे तुला आता हीच कामगिरी आहे का?
साधिका : हो...
अभिमन्यू : मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे...
माधव : इथेच सगळ्यांसमोर बोल...
अभिमन्यू : ठीके सर...काल कारंडे सरांनी त्यांच्या आगामी स्मशान विद्या या पुस्तकाच्या लेखन आणि या शोधकार्यात माझी मदत मागितली आहे. खरं तर हा विषय ऐकूनच मला भीती वाटली आणि मुळात असा विषय कोण घेतो हा विचारही माझ्या मनात आला. मी त्यावेळेस त्यांना काही बोललो नाही... विचार करायला वेळ मागून घेतला.
माधव : कारंडे कधीच सुधारणार नाही... तू त्याला नकार कळव. त्याच्या नादाला लागू नकोस, महापापी मनुष्य आहे तो.
अभिमन्यू : म्हणजे सर...
साधिका : अभिमन्यू त्यांनी तुझीच निवड या कार्यासाठी का केली हे विचारलंस त्यांना? किंवा ते तस काही बोलले का ?
अभिमन्यू : मला शोधकार्य आणि इतिहास असे विषय जास्त आवडतात म्हणून त्यांनी माझी मदत मागितली असं ते म्हणाले.
साधिका : बर...त्यांचं घर कसं होतं? म्हणजे तुला काही विचित्र जाणवलं का ?
अभिमन्यू : विचित्र म्हणजे त्यांच्या घरात एकही देवाचा फोटो नव्हता आणि तिथे असताना माझा जीव गुदमरतोय की काय असं वाटू लागलं होतं. तिथून आल्यापासून मला अस्वस्थ तर वाटत आहे पण मी एका वेगळ्या सावटाखाली आहे असंही जाणवतंय.
माधव : हे तर होणारच होतं...
अभिमन्यू : सर पण ते देवीची पूजा करतात असं मी ऐकलं होतं... असं असताना पण त्यांच्या घरी एकही देवीचा फोटो न दिसल्याने मी चकित झालो.
माधव : हो कारण... त्याने गेल्या सहा वर्षांपासून देवीची पूजा करणे बंद केलं आहे...आधी असा नव्हता तो..त्याला भेटलं की त्याच्या ऊर्जेनेच समोरचा माणूस प्रभावित व्हायचा. मीही तुमच्या कॉलेजला गेस्ट लेक्चरर म्हणून आलो होतो. तेव्हाचा त्याची माझी पहिली भेट झाली होती पण आता तो असा का वागतो आहे तेच कळत नाही.
साधिका : पण तू किती दिवसांचा वेळ मागितला आहेस? म्हणजे तस काही बोलून आला आहेस का?
अभिमन्यू : हो मी आई-वडिलांशी बोलून परवा सांगतो असं बोललो त्यांना...
साधिका : मग तू काय ठरवलं आहेस?
माधव : अग वेडी आहेस का तू? हे असलं काही तो करणार नाही आणि असले विषय कोण घेत? त्याला लिहायचं आहे ना पुस्तक तर लिहू दे...पण याने तिथे जायला नकोय..
साधिका : बाबा, हे तुम्ही का ठरवत आहात? त्याला निर्णय घेऊ दे त्याचा...
अभिमन्यू : साधिका, सर बोलत आहेत ते योग्य आहे. मी असाही सरांना विचारूनच त्यांना निर्णय कळवणार होतो.
साधिका : ठीके..आणि आता मी तुला महत्त्वाचा प्रश्न विचारते आहे. त्यांनी तुला त्यांच्या घरी काही खाण्यापिण्याचा आग्रह केला का ?
अभिमन्यू : हो म्हणजे मी आधी पाणी प्यायलो. मी चहा नको म्हणत असतानाच त्यांनी चहा प्यायचा आग्रहच केला.
साधिका : आता जर त्यांनी काहीही खाण्यापिण्याचा आग्रह केला तर ते कटाक्षाने टाळायचं. त्यांनी तुला चहामधून एक विभूती खायला घातली होती जेणेकरून तू त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम ऐकशील आणि कदाचित तुझ्या या नकारानंतरही ते तुझा होकार मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करतील. तू जी स्वामींची नित्य सेवा करतोस त्यात खंड पडू देऊ नकोस. तुझ्या स्वामींवरच्या श्रद्धमुळेच तुझ्यावर त्या विभूतीचा काही परिणाम झाला नाही. फक्त तुला अस्वस्थ वाटलं असेल. सध्या तू काही दिवस सात्विक जेवण घे.
अभिमन्यू : हो...ठीक आहे..
माधव : एक काम अभिमन्यू तू उद्यापासून माझ्याकडे सकाळी ४.३०च्या दरम्यान ये. मी तुला ध्यान कसं करायचं आणि काही मंत्र शिकवतो. सध्या तू ज्याच्या संपर्कात आला आहेस तो काही साधारण व्यक्ती नाही.
अभिमन्यू : हो चालेल सर...
सुरज : आणि मी काय करू?
साधिका : तू आजपासून इथेच रहा आणि तुझं प्रशिक्षण माझ्याकडे सुरू राहील..उद्या सकाळी ३ला उठायचं..आवरून माझ्या खोलीत ये...अजिबात उशीर करायचा नाही..
सुरज : ठीके ताई...मी आता हॉस्टेलवर जाऊन माझं सामान घेऊन येतो.
साधिका : हो.. अभिमन्यू तूही घरी जा आणि इथे घडलेल्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नाहीत..हे मात्र लक्षात असू दे.
अभिमन्यू : हो.. सर येतो मी...
माधव : नीट जा आणि पोहोचालास की मेसेज कर.
अभिमन्यू : हो सर...
अरविंद : मीपण निघतो आता...मीही माझ्यापरीने काही शोध लागतोय का याचा प्रयत्न करतो.
साधिका : काका...एक पाच मिनिटे थांबाल...ही विभूती ठेवा तुमच्याजवळ... गाणगापुरची आहे...तेव्हा जपून वापरा...
अरविंद : हो बाळा...येतो काळजी घ्या सर्वांनी एकमेकांची...
-----------------------------------------------------------
अचानक घरी आलेल्या एका व्यक्तीला पाहून कारंडे घामाघूम होतो.
कारंडे : सरकार तुम्ही...या ना आत या...
तो : कारंडे मी तुमच्याकडे पाहुणचार झोडायला आलो नाही. तिने आपल्या मार्गात अडथळे आणायला सुरूवात केली आहे हे सांगायला आलो आहे. कोणत्याही परिस्थितीत मला तो मुलगा हवा आहे. आणि जर त्याचा होकार मला मिळाला नाही तर कारंडे तुलाही एक मुलगा आहे हे तू विसरू नकोस समजलं...
कारंडे : सरकार मी प्रयत्न करतो आहे...मी उद्या पुन्हा त्याच्याशी बोलून घेतो..
तो : तू काहीही कर मला तो मुलगा हवा आहे...आणि ती कुठे आहे याचा शोध घे...त्या साधकांच्या गटाने नक्कीच तिला गुप्त ठेवलं असणार...
कारंडे : हो सरकार...मी त्याची सुरुवात केली आहे...शिंदेही त्याच गटातला आहे...
तो : शिंदे ? नाव कुठे तरी ऐकल्यासारखं वाटत आहे...असो तू तुला दिलेली काम पूर्ण कर...नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही...
कारंडे : हो सरकार...
----------------------------------------------------------
साधिकाला गहन विचारात पाहून माधव थोडे अस्वस्थ होतात. अभिमन्यूला भेटल्यापासून त्यांना त्याच्यासोबत काहीतरी जवळचे नाते आहे असे वाटत होते. त्याच्याविषयी वाटणारा आपलेपणा त्यांना त्याच्या काळजीने अस्वस्थ करत होता.
माधव : साधिका...अभिमन्यूची काळजी वाटू लागली आहे...त्याने नकार दिल्यानंतर तो कारंडे स्वस्थ बसणार नाही...त्या राजवाडेच्या नादाला लागून कारंडेने स्वतःची वाट लावून घेतली आहे..
साधिका : बाबा, राजवाडे फक्त निमित्त आहे... कारंडेच्या मागे कुणी तरी वेगळाच कर्ता करविता आहे...त्याला शोधून काढायचं आहे आपल्याला...
माधव : म्हणजे कारंडे कुणाच्या तरी सांगण्यावरुन असं वागतो आहे...
साधिका : हो...गेल्या काही वर्षांत असं काही घडून गेलं आहे जे आपल्याला माहिती नाही किंवा आपण त्याकडे जास्त लक्ष दिलेले नाही. तुम्ही त्या कारंडेची जमेल तितकी माहिती काढा आणि मी सुदामा काकांचा शोध लावण्याचा प्रयत्न करते. आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलं...मला मंदिरात एक आजी भेटल्या होत्या..त्यांना मदत तारिणीची मदत हवी आहे.
माधव : बर...ठीके... जे काही करशील ते विचारपूर्वक कर...
साधिका : चला आता आत जाऊ...दिवेलागणीची वेळही झाली आहे...
--------------------------------------------------------------
स्वामींची नित्यसेवा आणि जप वैगरे करून अभिमन्यू गच्चीवर जातो. साधक कोण असतील आणि त्यांचे कार्य काय असेल, कसल्या कामगिरीवर पाठवत असतील त्यांना? आणि मला का ध्यान आणि मंत्र वैगेरे सर शिकायला सांगत आहेत हे असे सगळे विचार त्याच्या डोक्यात फेर धरतात. त्याचा अस्वस्थपणा त्याच्या पालकांच्या लक्षात येतो आणि ते दोघेही त्याच्याशी बोलायचे ठरवतात.
अजित : अभी, बाळा इथे गच्चीवर एकटाच काय करतो आहेस?
अभिमन्यू : काही नाही बाबा, असच विचार करत होती काही गोष्टींचा ?
आरती : मग विचार करण्यापेक्षा आमच्याशी बोल.
अजित : हो म्हणजे तुझी इच्छा असेल तर...
अभिमन्यू : असं का बोलताय बाबा...मी कायम तुमच्या दोघांजवळ मन मोकळं करत आलो आहे....
आरती : मग आताही सांग कसला विचार करतो आहेस?
अभिमन्यू कारंडे सरांच्या प्रस्तावापासून ते आज जे काही घडलं ते सगळं अजित आणि आरतीला सांगतो.
आरती : तुझे शिंदे सर साधक आहेत हे खूप चांगली आणि सकरमत्मक बाब आहे तुझ्यासाठी...तुला त्यांच्याकडून जितकं शिकून घेता येईल तेवढं घे...
अभिमन्यू : पण मला एक कळत नाहीयेय की त्यांनी मला का मंत्र शिकून घेण्यास सांगितले...तुम्ही काही साधक वर्गातले नाही आहात मग...
अजित : अरे, असा काही नियम नसतो रे...त्यांनी तुला या गोष्टी शिकण्यास सांगितलं म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेल ना...
अभिमन्यू : पण बाबा मी एका पुस्तकात वाचलं आहे साधकाची मुलेच साधक होऊ शकतात...
आरती : कदाचित हा नियम सगळ्यांसाठी काही लोकांसाठी लागू असेल...हे बघ तू सध्या ते जे काही शिकवणार आहेत ते मनात शंका न ठेवता शिकून घे... असं समज स्वामींनी आपल्याला हे सुचवल आहे...
अभिमन्यू : एक मिनिटं, तुम्हा दोघांना साधक वर्गाबद्दल कसं माहिती? कारण त्यांची माहिती अतिशय गुप्त ठेवली जाते. फक्त गरजवंतालाच त्यांचा मार्ग सापडू शकतो असंही माहिती आहे.
अजित : कारण फार वर्षांपूर्वीच एका साधकाने आम्हाला अडचणीच्या वेळी मदत केली होती...
अभिमन्यू : नेमकं काय झालं होतं?
आरती : आधी जेवून घेऊ या...मग सांगते तुला...
अभिमन्यू : हो ठीके...
आरती : तू हातपाय धुवून ये...मी तोवर वाढायला घेते..
तो खाली गेल्याची आरती खात्री करते.
आरती : काय हो? याला सगळं आताच सांगायचं का?
अजित : अग आपण किती दिवस त्याच्यापासून लपवून ठेवणार?
आरती : कदाचित हीच ती वेळ पण असू शकते...
अजित : ही हीच ती वेळ आहे... चल जाऊ...
--------------------------------------
- प्रणाली प्रदीप