दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 6 Pranali Salunke द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 6

जंगलाच्या दिशेने चालत आलेली साधिका एक क्षण डोळे मिटून एक मंत्र पुटपुटते. क्षणात एक सोनेरी रंगाचा दरवाजा प्रकट होताच ती त्यात प्रवेश करते. समोर दिमाखात उभा असलेला टोलेजंग वाडा पाहून तिच्या चेहऱ्यावर एक हासू पसरते. वाड्यात प्रवेश करताच दत्तात्रेयांचे नामस्मरण करणारा एक तिच्या कानावर आवाज पडतो आणि ती त्या आवाजाच्या दिशेने जाते. नामस्मरणात गुंग असलेला तो तेजपुंज चेहरा पाहून तिला प्रसन्नता जाणवते. तिची चाहूल लागताच तो तेजपुंज चेहरा तिच्याकडे वळतो आणि साधिका त्या व्यक्तीला मिठी मारते. 
साधिका : आजोबा, कसे आहात तुम्ही? 
आजोबा : नेहमीच तर भेटतेस साधनेच्या मार्फत... आणि भेटलीस का हा प्रश्न विचारतेस... काय बोलावं...तुला यायला उशीर का झाला? 
साधिका : अहो, एक व्यक्ती माझा पाठलाग करत होता. तर त्यात वेळ गेला माझा... 
आजोबा : हम्म मी तुला याविषयी कल्पना देणार होतो पण त्याआधीच त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. 
साधिका : कोण आहेत ते आजोबा?
आजोबा : ते कोण आहेत मी तुला आजच सांगेन पण त्याआधी तू तुझे कार्य पूर्ण करून ये... . 
साधिका : हो आजोबा, तुमचा आशीर्वाद घ्यायला आले मी... 
आजोबा : शुभम भवतू, यशस्वी भव! कार्य पूर्ण झालं की सरळ इथेच ये...मग बोलू... निघ आता... 
साधिका : हो आजोबा येते मी... 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजाध्यक्षला म्हणजेच स्वतःच्या वडिलांना घरी सोडून सत्येश त्याच्या घराच्या दिशेने गाडी घेतो. त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्यामागचे कारण त्याला माहिती नव्हतं. वडिलांच्या घरी यायला त्याला नकोसे वाटायचे. त्यांच्या घरातलं नकारात्मक वातावरण, जीव गुदमरल्याची भावना निर्माण  व्हायची. त्यामुळे तो वडिलांकडे जाणे टाळायचा आणि त्याची आईसुद्धा त्याला तिथे जा असा आग्रह करायची नाही. आज आईशी वडिलांबाबत बोलायचे असे त्याने मनोमन ठरवले. त्याच्या मनात गोंधळ उडालेला आणि तो गोंधळ आईच दूर करू शकेल याची त्याला खात्री वाटत होती.
सत्येशची आई : बाळा, आलास तू...हातपाय धुवून घे आणि देवघरात ये... 
सत्येश : आई मला त्याआधी बोलायचंय तुझ्याशी... 
सत्येशची आई : हो बोलूया पण आता तू बाहेरून आला आहेस ना... मग आधी हातपाय धू आणि देवघरात ये...मी आजीला पण तिथेच बोलावते... जा पटकन... 
सत्येश खोलीत गेल्याचे पाहून त्याची आई तिच्या सासूच्या खोलीत येते. 
सत्येशची आई : आई, आज त्याच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागतील... आज तो ऐकणार नाही... तुम्ही देवघरात या... 
सत्येशची आजी : हो.. आज काय तो सोक्षमोक्ष लावूया... आपल्या मनातही ती भीती नकोच.. तू हो पुढे... मी आलेच हातपाय धुवून... 
सत्येश देवघरात आल्यावर त्याची आई त्याला एका ग्लासातील पाणी प्यायला देते व देवाची विभूती त्याच्या डोक्याला लावते. वडिलांकडून आल्यावर आईची ही कृती त्याला नेहमीच गोंधळात टाकायची. मात्र आईसाठी तो हे सारं करायचा. आताही त्याच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून त्याची आजी बोलायला  सुरुवात करते.
आजी : बाळा, सत्येश इथे बस आणि वैशाली तूही बस... सत्येश मी तुझ्या आईची आई नाही तर, तुझ्या वडिलांची आई आहे. 
सत्येश : काययय? पण हे का लपवलंत तुम्ही माझ्यापासून... हे तर सांगू शकत होतात ना? 
आजी : कारण तुझ्या बापाला मी जिवंत आहे हे कळू द्यायचं नव्हतं... 
सत्येश  : का? 
आजी : आज तुला सगळं सत्य सांगणार आहे... रेणुका सत्यजित राजाध्यक्ष हे माझं खरं नाव आहे आणि तुझ्या आजोबांच्या नावावरून तुझं नाव ठेवलं गेलं आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले होती. तुझे आजोबा आणि मी साधक वर्गातले होतो. खूप वर्षांपूर्वी लोकांना वाईट शक्ती, भूता-खेतांपासून वाचवण्यासाठी दत्त संप्रदायातील व दैवी गुण लाभलेल्या एका गुरूने साधक वर्ग बनवला आणि त्या साधकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन तयार केले. असं म्हटलं जातं की त्या गुरूंच्या कार्यावर व भक्तीवर प्रसन्न होऊन दत्तात्रेयांनी त्याला वरदान दिले होते. त्या वरदानामुळे त्या गुरूंच्या प्रत्येक  पिढीतील एकाकडे जन्मजात दैवीगुण असतील आणि तेच साधकवर्गाचे प्रमुख राहतील. माझे वडीलही साधक वर्गातले होते पण त्यांचा ओढा मंत्र साधनेकडे जास्त होता. मात्र मला तारक आणि मारक असे साधकांचे दोन्ही प्रकार यायला हवेत म्हणून त्यांनी मला केसरी नावाच्या गुरूंकडे प्रशिक्षणासाठी पाठवलं मला आजही माझं प्रशिक्षण केंद्राचे स्थान निश्चित असे सांगता येणार नाही. तिथेच माझी ओळख तुझ्या आजोबांशी झाली. ते तिथे मंत्र साधना शिकायला आले होते. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आम्ही दोघेही साधक वर्गातील असल्याने दोघांच्या घरातून काही विरोध झाला नाही.  अगदी थाटामाटात आमचे लग्न झाले. लग्नानंतर मी कोल्हापूरला आले आणि कपिंद्र नावाच्या साधकाने आम्हाला संपर्क केला. तिथून मग मी किंवा तुझे आजोबा त्यांनी सांगितलेल्या कामगिरीवर जात होतो. वर्षांमागून वर्षे गेली तरी आमचे कार्य सुरूच होते. आम्ही दोघांनीही मुलांना साधक वर्गात शिकवायला पाठवले. तुझ्या आत्येने, रुपालीने मंत्र साधना आणि तारक मंत्रांवर भर दिला तर, तुझ्या वडिलांनी, रुपेशने मारक मंत्रांवर जास्त भर दिला. सगळं सुरळीत सुरु होतं पण त्या राजवाडेच्या नादाला लागून तुझा बाप वाम मार्गाला लागला. तू आणि राजेश खूप लहान होतात. आम्ही चौघांनी त्याला प्रखर विरोध केला होता. नंतर मात्र तो त्याचा विचार बदलल्याचे नाटक करून राजेशला घेऊन इथून पळून गेला. तेव्हा तू आमच्या खोलीत होतास म्हणून आमच्याकडे राहिलास. त्याच्यापासून तुला लांब ठेवणं गरजेचे आहे हे लक्षात येताच ह्यांनी वैशालीला रुपेशकडून घटस्फोट घेण्यास सांगितले. त्याला घटस्फोट द्यायचा नव्हता मग त्याने मारक मंत्रांचा वापर आमच्यावर सुरु केला. त्याला लढा देता देता तुझे आजोबा गेले पण मी आणि तुझी आत्या मात्र खंबीर होतो. तुझ्या आत्याचे हाल होऊ नये म्हणून तिला एका साधकाच्या मदतीने आंजनेयांकडे पाठवून दिले. आंजनेय हे त्या काळाचे प्रभावशाली आणि ताकदवर साधक होते. मग वैशाली आणि तुला घेऊन मी माझ्या माहेरी गेले आणि तिथे काही दिवस राहिलो. मी मेल्याचं दिखावा उभा केला आणि मग वैशालीला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले. त्याचा विश्वास बसला की मेले आहे मग तो इथे येऊन तिला धमकावयाचा. राजेशप्रमाणे तुलाही वाम मार्गात तुला ओढायचं होतं त्याला.. पण आम्ही दोघींनी तुझ्यात देवभक्ती इतकी रुजवली होती की तुझ्यावर त्या नकारत्मकतेचा प्रभाव जास्त काळ टिकू शकला नाही आणि तिथून तू आल्यावर आम्ही तुला पवित्र नद्यांचा पाणी प्यायला देतो. मला जितकं ज्ञान माझ्या गुरूंकडून मिळालं आहे ते मी तुमच्या संरक्षणासाठी वापरतेय आणि हे मला रुपेशपासून लपूनच करावं लागणार आहे. 

सत्येश : आजी, बाबा अशा मार्गाला गेलेच का? 
आजी : कारण त्याला आंजनेयपेक्षा बलशाली व्हायचे होते आणि दैवी शक्ती हव्या होत्या.. त्याला त्या शक्तींची हाव सुटली होती. 
सत्येश : आता आंजनेय कुठे आहेत? 
आजी : ते आता हयात नाहीत. 
सत्येश : पण बाबांना संशय आहे की ते जिवंत आहेत... 
आजी : त्याला असं का वाटतंय? 
सत्येश : कोणता तरी साधक बाबांच्या कैदेत आहेत...तो कैदेत असूनही त्याला मदत हवी असल्याचे साधक वर्गाला कळले... असं काहीतरी ते बोलत होते आणि सुरेश नावाच्या एका व्यक्तीला तारिणी आणि आंजनेयची माहिती काढायला सांगितली आहे...आणि दादाला सुद्धा त्यांनी त्यात घेतलं आहे.. 
आजी : अस्सं...
सत्येश : आजी ही तारिणी कोण? 
आजी : सध्याची प्रभावशाली आणि ताकदवर साधक... तिला तारक या नावानेही ओळखलं जातं.. 
सत्येश : आजी मी सहभागी होऊ शकतो का? यात..
आजी : आपण विचार करू यावर.. आता रात्र बरीच झाली आहे तर आता आपण झोपूया...वैशाली चल... 
आजीने विषय टाळला असल्याचे सत्येशच्या लक्षात येते व तो उद्या या विषयावर आजीशी बोलण्याचे ठरवत खोलीत जातो. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भगवा कुर्ता, कपाळावरील मळवट आणि हातात-गळ्यात रुद्राक्ष घातलेल्या साधिकाला पाहून आजी अचंबित होते. 
आजी : अग साधिका तू? तारिणी येणार होती ना मदतीला... मग... 
साधिका : आजी मीच साधिका आणि मीच तारिणी.... 
आजी : म्हणजे... या दोघी एकच आहेत.. 
साधिका : हो... दोन्ही एकच मनुष्य लोकांत साधिका आणि साधक वर्गात तारिणी... 
आजी : मी आता खिडकीतून तुला येताना पाहिलं तेव्हा तुझे कपडे वेगळे होते आणि घरात येताच तू या वेशात आलीस.. कसं शक्य आहे... मी स्वप्न तर पाहत नाही ना? 
साधिका : आजी हेच वास्तव आहे... बर मी माझ्या कामाला लागू? 
आजी : हो...चल...  
साधिका :  आजी तुम्ही देवघरात थांबा आणि नामस्मरण करत रहा... अजिबात घाबरू नका... 
आजी : बर... मी जाते... 
साधिका उर्फ तारिणी खोली येताच श्रेया तिच्या अंगावर धावून येते. मात्र तिच्या गळ्यातील रुद्राक्षामुळे श्रेयाच्या शरीरात असलेल्या आत्म्याला त्रास होतो. 
साधिका : झाला प्रयत्न करून... त्रास कुणाला तुलाच झाला ना...बऱ्या बोलाने हीच शरीर सोड... हिने काय बिघडवलं आहे तुझं... 
श्रेया : मी हीच शरीर सोडणार नाही... हिनेच मला तिच्या शरीरात येण्याचं आवाहन केलं होते... त्यामुळे मी तिचे शरीर सोडणार नाही... 
साधिका : हिने तुला आवाहन केलं... शक्यच नाही...तुला मुक्तता मिळवून देईन मी... पण हीच शरीर सोड... 
श्रेया : तू मला मुक्ती मिळवून देणार... तुझ्याकडे ती ताकद आहे का? 
साधिका : प्रयत्न तर करू शकते ना... बोल काय ठरलं तुझं... 
श्रेयाला बोलण्यात अडकवून साधिका एक विशिष्ठ प्रकारच्या धुपाची तयारी करते. त्या धुपाच्या धुराने श्रेयाच्या शरीरातील आत्म्याला त्रास होऊन ती मोठ मोठ्याने विचित्र आवाजात किंचाळू लागते. हे पाहून साधिका लागलीच मोठ्याने दत्तबावनी म्हणायला सुरुवात करते आणि श्रेयाचे दोन्ही हात एक रुद्राक्षच्या माळेत अडकवून तिच्या कपाळावर देवीचे कुंकू व दत्तात्रेयांची विभूती असे मिश्रण असलेले भस्म लावते. त्या पवित्र भस्माचा आणि माळेची दैविक ऊर्जा सहन न होऊन ती आत्मा श्रेयाचे शरीर सोडते. ती आत्मा बाहेर येताच साधिका एका सोनेरी चक्रात तिला कैद करते. श्रेयाला पलंगावर नीट झोपवून साधिका तिच्या आजूबाजूला भस्म फुंकते व तिच्या हातात एक लाल धागा बांधते. खोलीबाहेर येताच ती आपल्या नेहमीच्या जीन्स, सफेद शर्ट आणि कंबरेला एक छोटी बॅग अशा वेशात येते. देवघरात घाबरून एका कोपऱ्यात बसलेल्या आजीला ती पाहते. 
साधिका : आजी आता घाबरण्याचं कारण नाही... श्रेया सुखरूप आहे.. ती शुद्धीवर आली कि तिला हे पाणी प्यायला द्या आणि सात्विक अन्न तिला खाऊ घाला. सगळ्यात महत्त्वाचं तिच्या हातातील लाल धागा अजिबात काढू नका. हे तिलाही बजावून सांगा... शलाका आणि तिच्या मैत्रिणींना श्रेयापासून लांब ठेवा. मी उद्या येते तिला भेटायला... 
आजी : तुझे खूप खूप आभार मुली...
साधिका : येते मी... आणि तारिणी कोण आहे हे बाहेर कुणाला कळू देऊ नका... नाहीतर त्याचा त्रास आधी तुम्हालाच होईल... 
श्रेयाने त्या आत्म्याला का आवाहन दिले हा प्रश्न साधिकाला सतावतो. याचा छडा लावण्याचे मनोमन ठरवून ती गुरूंकडे जायला निघते. 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

- प्रणाली प्रदीप