चाळीतले दिवस - भाग 12 Pralhad K Dudhal द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चाळीतले दिवस - भाग 12

चाळीतले दिवस - भाग 12

  मला आता सरकारी नोकरी मिळाली होती.त्याकाळी टेल्को बजाज सारख्या मोठ्या कंपन्यात काम करणाऱ्या कामगारांना सरकारी नोकरापेक्षा समाजात जास्त प्रतिष्ठा होती.

  मॅट्रिक झाल्यावर डिप्लोमा करू न शकल्याने मी सुद्धा टेल्को कंपनीत ट्रेड अप्रॅंटीस म्हणून  जाहिरात बघून अर्ज केला होता आणि त्यांच्या लेखी परीक्षेत चांगल्या मार्काने पास झालो होतो.

  चिंचवड भोसरी रस्त्यावरच्या टेल्कोच्या ऑफिसमधे मुलाखतीसाठी बोलावणे आल्यावर ठरलेल्या वेळी नागपूर चाळ ते चिंचवड भर उन्हात सायकल दामटत मी गेलो होतो.

 त्यावेळच्या फॅशनप्रमाणे कॉटनची बेलबॉटम,शर्ट अशा पेहरावात  मी मुलाखतीला गेलो होतो.त्यावेळी मी तब्बेतीने एकदम अशक्त होतो.त्तरुणांत कानावर केस ठेवायची पद्धत( हिप्पी कट) होती तसेच माझे केस होते.

  सायकल चालवत गेल्याने माझा हिप्पी कट पार विस्कटून गेला होता.घामेघूम होऊन मी कसाबसा मुलाखतीला पोहोचलो होतो.मला लगेच मुलाखतीसाठी आत बोलावले गेले.ती माझी नोकरीसाठीची आयुष्यातली पहिली मुलाखत होती.

  आत जाण्यापूर्वी तोंडावर निदान पाणी मारावे,केस नीट करावेत हे सुचलेच नाही आणि मी जसा होतो त्या अवतारात मुलाखतीसाठी केबिनमधे गेलो.एकूण चार व्यक्ती मुलाखत घ्यायला बसल्या होत्या. साधारणपणे जनरल नॉलेजवर प्रश्न विचारले जातील असे मला वाटले होते,पण माझे एकंदरीत व्यक्तीमत्व आणि अवतार बघून त्यातील एकाने विचारले..

“ तुम्ही मुलाखतीसाठी कुठून आलात?”

“येरवडा.” माझे उत्तर.

“ तुम्ही सिनेमा बघता का?” दुसऱ्या एकाने विचारले.

“ क्वचितच बघितला आहे” मी.

“ तुझा आवडता हिरो कोण आहे?” तिसऱ्या व्यक्तीने विचारले 

“......” खूप कमी हिंदी सिनेमे मी बघितले होते त्यामुळे मी शांत बसलो.

“ तुझी हेअर स्टाईल कोणत्या हिरोसारखी आहे?”

चौथ्या व्यक्तीचा प्रश्न! 

माझी नोकरीची मुलाखत चालू आहे की मस्करी करत आहेत असा प्रश्न मला पडला होता.

“ या गोष्टींचा माझ्या नोकरीशी काय संबंध आहे? ”

नाईलाजाने शेवटी मीच त्या चौथ्या व्यक्तीला उलट प्रश्न विचारला. तो  गालातल्या गालात हसला आणि 

“ तुझी निवड झाली की नाही ते आम्ही कळवू , तू जाऊ शकतोस...”

अशा प्रकारची मुलाखत झाली म्हटल्यावर आपली निवड होणे शक्य नाही हे लक्षात आले होते.पुढे दर वर्षी टेल्कोची तशी जाहिरात वाचली तरी मी कधी अर्ज केला नाही.

खाजगी कंपन्यात त्या काळी चांगला पगार मिळायचा.दिवाळीला घसघशीत बोनस मिळायचा त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारालाही बाजारपेठेत जास्त मान मिळायचा! असो.

 नोकरीतला माझा पहिला पगार झाला.

 रुपये पाचशे पाच हा माझ्या पहिल्या पगाराचा आकडा आजही चांगला लक्षात आहे. माझ्या त्या पहिल्या पगारातून सायकलचा हप्ता आणि माझ्यासाठी खर्चायला आणि नवे कपडे घ्यायला असे एकशे पस्तीस रुपये माझ्याकडे ठेऊन बाकी पैसे मी माझ्या भावाकडे-आण्णाकडे देऊन टाकले कारण त्याला नोकरी नव्हती. आर्थिक अडचणीत असलेल्या माझ्या या कुटुंबाची जबाबदारी घेणे मी माझे कर्तव्य समजत होतो. 

 पुढच्या महिन्यात महागाई भत्ता एकदम वाढला आणि आता माझा पगार पाचशे पासष्ट रुपये झाला.

माझी नोकरी चिंचवड दूरध्वनी केंद्रात असल्याने शिवाय दर आठवड्याला शिफ्ट बदलणार असल्याने  माझे कॉलेजकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले.परीक्षेला तर दोन तीन पेपर्सला अभ्यास न करताच हजेरी लावली. आपले हे सेमिस्टर रहाणार पुन्हा परीक्षा द्यावी लागणार हे लक्षात आले होते,पण त्याला नाईलाज होता.आपल्याला जीवनात अशा तडजोडी करतच मार्गक्रमन करावे लागणार आहे याची एव्हाना जाणीव व्हायला लागली होती. 

  एखादे स्वप्न बघणे आणि ते प्रत्यक्षात सकारले जाणे या मधला खडतर प्रवास किती कठीण असू शकतो हे मी प्रत्यक्षात अनुभवत होतो.नोकरी मिळाल्याने आपले पुढे कसे होणार याबद्दल जी अनिश्चितता होती ती काही प्रमाणात का होईना,पण कमी झाली होती.आण्णा नोकरी करत असता तर कदाचित माझा पुढचा मार्ग खूप सोपा झाला असता,पण माझ्यासाठी दैवाने अनेक आव्हाने समोर ठेवायचा जणू चंग बांधला होता.समोर असलेल्या आव्हानाला तोंड देणे जमेल का नाही याबद्दल मला अजिबात आत्मविश्वास नव्हता,पण जसे जमेल तसे आयुष्याला सामोरे जायचे हे मात्र मनाशी ठरवले होते.

  माझा नोकरीसाठी होणारा चाळीस किलोमीटरचा दररोजचा प्रवास कमी व्हावा,माझे शिक्षण चालू रहावे यासाठी माझ्या नकळत माझी नियती वेगळे काहीतरी नियोजन करत होती याचा प्रत्यय मला लवकरच यायला लागला.

(क्रमश:)

प्रल्हाद दुधाळ 

9423012020