खरं प्रेम Akash द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खरं प्रेम

खरं प्रेम

आपल्या आयुष्यात खरं प्रेम असं काही खरंच असतं का? की ते फक्त पुस्तकांमध्ये आणि गोष्टींमध्येच असतं? खरं प्रेम मिळालं, तरी ते आपलं होऊ शकतं का? आणि ते मिळालं, तरी शेवटपर्यंत टिकतं का?

प्रेम करताना माणसाला असे अनेक प्रश्न पडतात. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतंच असं नाही. प्रेम करणं हे आपल्या हातात असतं, पण ते प्रेम आपल्याला मिळणं हा नशिबाचा भाग असतो.

ही गोष्ट आहे माझी आणि श्रुतीची.

मी आणि श्रुती 2017 पासून रिलेशनशिपमध्ये होतो. आमचं नातं एक वर्ष टिकलं... पण काही कारणांमुळे आमचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आमचं बोलणंही बंद झालं. मी तिला पाहिलं नाही, पण तिचा विचार मात्र रोज यायचा – कशी असेल? काय करत असेल? लग्न झालं असेल का? तीही माझ्या विषयी असंच विचार करत असेल का?

तीन वर्षं उलटून गेली. त्या काळात आमच्यात कोणताही संपर्क नव्हता.


---

आणि एक दिवस…

सर्व मित्र मिळून लोणावळ्याला फिरायला गेलो. खरंतर मला जायचं नव्हतं, पण मित्रांच्या आग्रहामुळे गेलो.

“हे जग खूप लहान आहे,” असं म्हणतात, आणि ते खरंच आहे… कारण तिथेच मला ती दिसली.

मला क्षणभर वाटलं की भास होतोय, पण नाही — ती खरंच होती. मी तिला पाहून, न पाहिल्यासारखं केलं. तरी काय बोलणार होतो मी? आमचं नातं संपलं होतं. उरलं होतं फक्त आठवणीतलं प्रेम… आणि म्हणूनच मी काहीही बोललो नाही.

आम्ही विसापूर फोर्ट फिरून सायंकाळी ५:३० च्या सुमारास लॉजमध्ये आलो. योगायोग म्हणावा की काय, पण तीही त्याच लॉजमध्ये थांबली होती.

काउंटरजवळ ती पुन्हा दिसली. आमची नजरानजर झाली. आमच्या डोळ्यांत अजूनही प्रेम होतं – शब्द नव्हते, पण भावना होत्या.

मी सगळी ताकद एकवटून विचारलं, "कशी आहेस?"

कदाचित ती याच क्षणाची वाट पाहत होती. बाहेर पाऊस सुरू होता. तिचे ओले केस, डोळ्यातून ओघळणारं पाणी आणि त्यामागे लपलेलं प्रेम – सगळं काही त्या एका क्षणात स्पष्ट होतं.

"मी ठीक आहे रे, तू कसा आहेस ते सांग ना?" तिचा आवाज, तोच स्वर, तोच अॅटिट्यूड – जसा पूर्वी होता.

"तू जशी आहेस, तसाच मी." मी म्हणालो.

"दिसतंय डोळ्यांत तुझ्या," ती हसून म्हणाली, "कोणासोबत फिरायला आला आहेस? गर्लफ्रेंडसोबत?"
मी काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिलो. इतक्यात तिचा मित्र तिच्या रूमची चावी घेऊन आला, "श्रुती, चल, आपली चावी मिळालीये."

ती वळून म्हणाली, "ठीक आहे, मग मी चेंज करून येते, भेटू नंतर."


---

रात्री...

आम्हाला रूमची चावी मिळाली आणि आम्ही आमच्या खोलीत गेलो. मित्रांनी आधीच पार्टीचं सगळं ठरवलेलं. कपडे बदलून त्यांनी दोन बाटल्या काढल्या आणि मेहफिल जमवायला सुरुवात केली.

मला माहित होतं, मी जास्त प्यायलो तर भावनांमध्ये वाहून जाईन आणि श्रुतीला काहीतरी बोलून बसेन. म्हणून एकच पेग घेतला आणि टेरेसवर जाऊन बसलो.

दारूचा ग्लास बाजूला ठेवून त्या काळ्या ढगांमागे लपणाऱ्या चंद्राकडे पाहत होतो. इतक्यात मागून आवाज आला…

"इथे आहेस तर तू? काय करतोयस इथे?"
तिने माझा ग्लास पाहिला आणि म्हणाली, "हे कधीपासून प्यायला लागलास?"

"२ वर्ष ८ महिने झाले... तू इथे का आलीस?"

"आपण एकत्र जेवण करायला जाऊया म्हणून तुला बोलवायला आले होते."
ती दारूचा ग्लास फेकून दिला आणि माझ्या शेजारी येऊन बसली.

"अरे, मला प्यायचं होतं!"
"२ वर्ष ८ महिने पितोसच ना, आज नाही प्यायला तर काही होणार नाही!"

मी काहीच बोललो नाही. मला माहित होतं, तिच्यासमोर बोलून मी कधीच जिंकू शकत नाही.

तिने माझा हात हातात घेतला, डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि म्हणाली, "तुला आठवतं का? तू म्हणाला होतास – लग्न झालं की असंच फिरायला जाऊ, आणि एकमेकांचा हात हातात घेऊन चंद्राकडे बघू."

"हो आठवतं... आणि तू म्हणाली होतीस – किती फिल्मी आहे ते!"

ती हसत होती, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आम्ही दोघं काही क्षण तसेच शांत बसून चंद्राकडे पाहत होतो.

"एक ना... आकाश झालं ते जाऊ दे. स्वतःला त्रास देऊ नकोस. सोडून दे ती दारू."

ती निघाली... दरवाज्याजवळ थांबून वळून म्हणाली, "Next month माझं लग्न आहे... येशील ना लग्नाला...?"

मी काय बोलावं, हेच कळेना. ती निघून गेली. पावसाची रिमझिम सुरू झाली आणि माझे डोळे भरून आले. अश्रू त्या पावसाच्या थेंबांमध्ये मिसळले.


---

आज मी दोघांनाही गमावलं – श्रुतीला आणि स्वतःलाही.
आज माझ्याकडे ना दारू होती... ना श्रुती.