सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 8 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 8


             शामराव  दुसऱ्या ट्रीप च्या वेळी पन्नास पोती  कांदा घेवून आला. दर खूप कमी होता भरताड  करणाऱ्या फैलातल्या गड्यानी हातोहात सगळी पोती  संपवली.  त्यानंतर  दर   तीन चार दिवसाआड  दोन दोन लोड भरायचं काम शिस्तीत सुरू  होतं.  पुढचा सीझन भर कामाचा असाच   धुमेपलास सुरू रहायचा होता. म्हणून कामगाराना अधून मधून देता यावं याबेताने पाच सहा  काथोटल्या  लोणचं घालून ठेवायची वर्दी भाऊनी दिली. येसू   मिराशाचा लोणच्याचा आंबा घडानी ओथंबलेला होता. त्याचे तीन फाटी आंबे  आणून पैरी करून भाऊंच्या  मागारणीने लोणच्याची बेगमी करून ठेवली. तसेच  दोन मोठ्या मातीच्या घड्यांमध्ये खारातले आंबे घातले. दहा लोड घातल्यावर पुढच्या ट्रीपला बाबूरावाने दहा लोडचा हिशोब शामरावा बरोबर धाडून दिला.  भाऊनी  लोणाऱ्यासाठी बरणीभर लोणचं आणि खारातले आंबे धाडून दिले.  भाऊंचं काम सुरू असताना  त्याना  शह देण्यासाठी  भंडारी नी इद्रूस यानी गड्याना जादा दराची लालूच दाखवून  अडचण  करायचे शिकस्तीचे प्रयत्न केके. पण किरकोळ  अपवाद वगळता गडी फुटले नाहीत. जे थोडेफार  मध्येच डपली मारीत त्यानी भंडाऱ्याकडून  उचल घेतलेली असे त्यामूळे त्याना घाटे भाऊंकडे वर्दी असली तरी  बळी भंडाऱ्याचा निरोप आल्यावर रोखीचं काम टाकून कमी मजूरीवर नाईलाजाने जावं लागे. इद्रूसकडे  जाणारे  होते त्यांची मागची मजूरी इद्रूस कडून यायची असे. त्याच्याकडे नाही गेलं तर मागचा हिशोब  मिळणार नाही  असंतो सरळ सरळ धमकावीत असे. त्यामूळे  त्याच्याकडेही घाट्यांपेक्षा कमी पैशावर काम करावं लागत असूनही झक् मारीत जावच लागे. 

                       जुलै अखेर भाऊंचे खुटवळाचे डेपो  भरून झाले. शेवटच्या ट्रीपला बाबुराव लोणाऱ्याने शामरावसोबत भाऊंचा संपूर्ण हिशोब चुकता केला. डेपो सरस असल्यामुळे  एकूण हिशोबात सहा लोड जादा झाले. कामगाराना भाऊंच्या कामावर बिनखोट  मजूरी मिळाली म्हणून गदी खुश होते. झालेल्या कामात इमारती लाकडाचा सिलीपाट आणि सालाबाद प्रमाणे भाऊंकडच्या काठ्या बाबुराव  देसायानी उचलल्या. भाऊंचा खुटवळ कोणी उचलला? कीती  दर दिला ? पुरा हिशोब मिळाला की नाही ? कशाचाच थांगपत्ता बळी भंडाऱ्याला आणि इद्रूस कोळशेकराला जंग जंग पछाडूनही लागेना.   या धंद्यात बरीच वर्ष  घटवलेल्या माणसाच्या ठिकाणी  रांड कमाईचा  मुबलक पैसा आला की  त्यांना आपल्या कार्यकर्तृत्वाचा एवढा  अहंगंड होतो की  आजूबाजूच्या  सरळ साध्या माणसाना ते मोजीतच नाहीत. एकतर लांड्यालबाड्या, फसवणूक, पिळवणूक केल्याशिवाय धंद्यात वर यायला होत नाही अशीच त्यांची पक्की धारणा  झालेली असते.

                सचोटीने, प्रामाणिक्पणे वागणाऱ्या  माणसाना  आणि  सामधाम  परिस्थितीत असलेल्याना  ते कर्तृत्वशून्य आणि मूर्ख समजतात.  गोरगरीबाना तर आपल्या सारख्यानी  पायाखाली घालण्यासाठीच देवाने जन्म दिला आहे  एवढा  त्याना माज असतो.  सामान्य  लोक गबरगंड  पैसेवाल्यांच्या  खिजगणतीतही  नसतात. भाऊ  साधे , जेमतेम  चार यत्ता शिकलेले,भटांचा  पिढीजात  भिक्षुकीचा धंदा , पण भाऊकडे  त्यातलेही कसबनव्हते. मात्र  मळे जमीन भरपूर असल्यामुळे खंडाचे भात यायचे. मधली रास (धान्य/शेती उत्पन्न)  पुरेशी असली तरी घाट्यांचं घराणं  पैसेवाल्यात गणलं जात नसे. त्यानी जे रस्त्याचं कंत्राट  घेतलं तेही   फारसा  फायदा होणारं मुळीच नव्हतं कारण आठ  दहा वर्षात राजापूर पासून एतढे मोठे कॉन्ट्रॅक्टर असूनही  एकही   माईचा लाल  ते काम घ्यायचं  धाडस करू धजावला नाही याचा अर्थ  त्यात मिळकत होणारी नव्हती  असा एक सार्वत्रिक समज पसरलेला होता.   त्यामूळे भाऊ अक्कल हुषारीने  चार पैसे मिळवतील , त्यांच्याकडेही हुषारी, कर्तबगारी आहे यावरच  बळी आणि इद्रूस यांचा विश्वास नव्हता. भाऊ कोणाच्या तरी  कच्छपी लागून हे धंदे करतो आहे आणि यात त्याला मोठी  खोट  आज ना उद्या बसणार हेच त्यानी  पक्कं गृहीत धरलेलं होतं. जर अंदरकी बात त्याना कळली असती तर त्यानी  येन केन प्रकारेण  भाऊना त्राही  भगवान म्हणायला लावलं असतं एवढी त्यांची वट आणि ताकदही  होती.              

                    रस्त्याचा  बानघाटीतला टप्पा  भराव घाऊन लेव्हल करायचा असल्यामुळे दिवाळी पूर्वी  भरावासाठी  वळीवे (एक ते दीड हात लांब- रुंद नी जाड  दगड)  आणि  तोडे ( लांबट आकाराचे जडशीळ दगड ) यांची  अगोदर जम करायला हवी  असं बाबल्या नी धाकू  यांच मत पडलं. ते भाऊनाही  पटलं. काम मुदतीत पुरं करायचं बंधन होतं. सुरुवातीच्या टप्प्यात  फक्त कडेला सिंगल दगड मांडायचा होता. पण बान घाटी पर्यंत  चा  भाग सखलवटीचा असल्याने भर घालून उठवायचा होता. एकाच वेळी  सुरुंग घालून दगडाची जम करायची नी  भर घालून लेव्हल  करायची ही दोन्ही कामं  करणं सध्याच्या  कामगारांची  संख्या पहाता आहाराबाहेर होतं. जादा  कामगार जमवून एवढ्यांवर कंट्रोल ठेवणंही  जिकीरीचं होतं . म्हणून वहिवाटलेले  कामदार आहेत त्यातच  काम  भागवून  घ्यायच्या दृष्टिने दोन महिने पाऊसकाळात धोंडे फोडायच काम सुरू झालं. आता पाऊस असला तरी  काढता ओढता असल्यामूळे एकमार्गी काम सुरू होतं.  

               डाव्या अंगाला  दरडीच्या भाग़ात मोठाल्या धोंडी  भोवतालची माती खणून सुट्या करून गरजे प्रमाणे सुरूंग घालून  नाहीतर छिन्नी  घणाने  फोडून  वळीवं नी  कमजास्त लांबीची  तोडं  भरून ती  शिस्तीत  रचायचं काम सुरू होतं. धडाधडा सुरुंग उडत होते. निम्मे मकण झाल्यावर गुडेकराच्या  गोठणी  पासून  तीस चाळीश वाव लांब रुंद  भागात  कांदळाची राई  होती. त्यात गोडे कांदळ,  सारिवले , ओवळदोड्या(बकुळी)  आणि  नाटकनारीच्या  मोठमोठ्या झाडांची  गचवड होती.  राईच्या  कडेला  दोन दोन पुरुष उंच  अनगळ धोंडी होत्या.  राईत डुकराची बसल  असायची. गड्यानी  सोबत आलेल्या कुत्र्यानी घुशी केली असती म्हणून    धोंडीना सुरूंग घालून होईतो त्याना  सुरक्षित अंतरावर झाळीत बांधून ठेवलेलं  होतं. सुरुंगाना बत्ती  दिल्यावर  खेपेने  पाच सहा बारांचा धडाका  झाला नी  कांदळाच्या  गचवणात बसलेली डुकरं  उठून बाहेर पडली.             

                   सुरुंग  फुटल्यावर   डुकर  उठणार  याचा अंदाज होता. गडी  दांडे  कुऱ्हाडी घेवून तयारीतच होते. सगळे सुरुंग झाल्यावर कुत्र्याना मोकळे  केलेले होते.  दहा बारा डुकरांच्या दोन जांगळी उठल्यावर कुत्रे  भिडले. दहा पंधरा मिनीटं  कुत्र्यांचं भुंकणं नी  गड्यांचे आवाज यांचा कालवा सुरू होता. दोन ओझ्याचे तीन डुकर आणि  पाच पिली   सपाट्याला गावली  होती. कुत्रे अजूनही  मावळत बाजूला घुशी करीत  भुंकत होते . थोड्या वेळाने  दोन एकांडे  डुकर  बाहेर आले. जनावरं  दांडगी , कुत्र्याना आटोपणारी नव्हती.    (क्रमश:)