इतिहासाचे एक पान. मच्छिंद्र माळी द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इतिहासाचे एक पान.

                       "  इतिहासाचे एक पान "

       

 इतिहासातील एक घटना ज्या घटनेने या हिंदुभुमीचे प्राक्तनच बदलून टाकले, आई जिजाऊंच्या डोळ्यात ज्वाला पेटविल्या, मोगली सत्ता उलथवून स्वराज्य स्थापनेची जिद्द, स्फुल्लिंग, प्रेरणा, ठाम निश्चय त्या माऊलीच्या खदखदणाऱ्या हृदयात निर्माण केला. ती घटना घडली २५ जुलै १६२९ रोजी देवगिरी किल्ल्यावर… 

 १६२४ च्या भातवडी युद्धानंतर शहाजीराज्यांच्या पराक्रमाची कीर्ती हिंदुस्थानच्या दाही दिशांना पसरली. जरी या युद्धात निजामाची सरशी झाली असली तरी लखुजीराजे भातवडीच्या युद्धानंतर शहाजीराज्यांच्या प्रभावात आल्याने त्याची चिंता जास्तच वाढली. एकतर शहाजी राज्यांचे सासरे लखुजीराजे आणि त्यांची सेना अदिलशाहकडून लढले असूनही सुरक्षित राहिली. 

 निजामाने लखुजीराजेचा बिमोड करण्याच्या दृष्टीने कारस्थान रचले. जुन १६२९ मध्ये त्याने लाखुजीराजेंना निरोप पाठवला की बोलणीसाठी देवगिरीवर यावे. लखुजी जाधवरावांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी तळ ठोकला होता. ही छावणी तुघलक तलावाजवळ होती.  त्यांचे भाऊ जगदेवराव, पत्नी गिरिजाबाई जिजाबाईंच्या आई तिथे होत्या.  

 सुलतान निजामशाह दौलताबाद किल्ल्यावर होता. पौर्णिमेच्या दिवशी २५  जुलै १६२९ रोजी लखुजीराजे आपल्या दोन मुलांसह अचलोजी, राघोजी आणि नातू यशवंतरावांसह किल्ल्यावरील सुलतान दरबारासाठी छावणीतून निघाले. लखुजींचा एक मुलगा बहादूरजी आपल्या आईसोबत छावणीत राहिला होता. छावणीत त्यांचे काका जगदेवराव जाधवही मागे राहिले होते.

 लखुजीराजे गडावर पोहोचले. सुलतान त्याच्या आम दरबारात बसला होता. अनेक सरदार आजूबाजूला उभे होते. कोणी काही बोलत नव्हते.  लखुजीराजे आपल्या मुलांसह राजदरबारात दाखल झाले. त्याच क्षणी, सुलतान उठला आणि अचानक दरबारातून निघून गेला. जाधवरावांसारख्या पराक्रमी सरदाराचा त्यांनी हेतुपुरस्सर अपमान केला होता. एक शब्दही न बोलता आपल्या मुलांसह ते परत फिरले आणि त्याच क्षणी…!  भयानक आवाजाने सर्व तलवारी म्यानातून बाहेर काढल्या गेल्या! हमीद खान, मुकर्रब खान, सफदर खान, फराद खान, मोती खान आदी सरदारांनी दरबारात उभ्या असलेल्या निःशस्त्र जाधवराव कुटुंबावर अचानक हल्ला केला. सुलतान आत वाट पाहत होता. परिणाम साध्य झाला होता! लखुजी, अचलोजी, राघोजी आणि यशवंतरावांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तुकडे पडले! हीं घटना कुणाचे ही  अंतःकरण पिळवटून टाकील अशी च आहे. पुढे राजे शिवाजी महाराजांनी स्थापना केली. अन इतिहासात स्वराज्य स्थापनेच्या अगोदर घडलेल्या या घटनेचे रक्तरंजित पृष्ठ जोडले गेले आहे.

 जिजाबाईंचे माहेरचे कुटुंब एका क्षणात संपले होते! सुलतान निजामशहा चा पूर्वनियोजित हल्ला यशस्वी झाला होता. खाली छावणीमध्ये ही बातमी येऊन धडकली तेव्हा जिजाऊंच्या आई गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई यांना प्रचंड धक्का बसला. लाखुजीराजांचे बंधू जगदेवराव आणि धाकले पुत्र बहादूरराव यांनी कसेबसे प्रेतांचे तुकडे गोळा करून छावणीत आणले आणि ही प्रेते सिंदखेड राजा येथे आणली गेली. 

 दुसऱ्या दिवशी माँ जिजाऊ यांच्या वडिलांना, दोन भावांना आणि एका भाच्याला एकाच वेळी चिताग्नी दिला गेला. अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना म्हणजे माँ जिजाऊंच्या आई गिरिजाई आणि दोन भावजई या चितेसोबत सती गेल्या. एकाच दिवशी माँ जिजाऊंच्या माहेरी सात चिता भडकल्या.

 ही बातमी शिवनेरीवर धडकली तेव्हा माँ जिजाऊ दोन महिन्यांच्या गरोदर होत्या आणि त्यांच्या गर्भातील बाळराजे शिवाजी यांच्या मुठी या प्रचंड त्वेषाच्या, दुःखाच्या, निजामाच्या आणि मोगलांच्या निःपाताच्या निर्धाराने, गर्भ संस्काराने आवळल्या जात होत्या. उगाचच नाही एखाद्या वीराला वयाच्या चौदाव्या वर्षी संपूर्ण स्वराज्याच्या निर्धाराने रायरेश्वरावर रक्ताभिषेकाच्या साक्षीने शपथ घेण्याची बुद्धी होत. जिजाऊंचा तो आक्रोश, त्वेष, चीड, हृदयात भडकलेली आग पूर्णतः गर्भात उतरली होती. स्वराज्य निर्मिती चे ते स्फुल्लिंग होते, निर्धार होता, प्रेरणा होती.

   इतिहासातील या घटना हेच सांगते की अशी धोकेबाजी व गद्दारी, खोटारडेपणा फक्त सुलतान आदिलशाही सुलतानाच्या रक्तातच असू शकतो. परंतु धोकेबाजी व खोटारडे पनाच्या साम्राज्य उभे केले तरी ते दीर्घकाळ टिकू च शकत नाही. सत्याच्या व धर्माच्या मजबूत पायावरील राजकीय  कारकिर्दीला उज्वल भवितव्य असते.

                  🌹🌹🌹🌹       🌹🌹🌹🌹

                    मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.