जितवण पळाले- भाग 4 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जितवण पळाले- भाग 4

     जितवणीपळाले- भाग ०४

                   जीतवण्याच्या  सभोवताली जांभ्या दगडाचे कातळ असले  तरी  उभ्या कड्यात काळवत्र  भरलेले होते.  कड्याची उंची  दहाबारा पुरुष सहज भरली असती.पाणवठ्याचा शंभरेक  फूट  भाग सोडून  त्यापलिकडे   कड्याचा भाग खोदून  काळवत्री खडी  मिळू  शकेल. या  भागातून   अगदी अल्प खर्चात  कच्चा रस्ता करून खडीची वाहातुक करता येईल  असाअंदाज  सर्व्हेअर  सायबाला आला त्याप्रमाणे त्याने  आपला अहवाल तयार केला.  पंधरा दिवसानी  रस्त्याचा सर्वे करून  त्या प्रमाणे मार्किंग करून झाल्यावर  साहेबाचा तळ उठला. सर्वे रिपोर्ट गेला आणि महिनाभरातच मंजुरी आली. अनंतरावाचे साड भाऊ शंभूराव  दळवी जिल्हा परिषदेची लहान मोठी कंत्राट घेत. रस्त्याचं  काम  मोठं होतं. त्यानी अनंतरावांशी टाळी मारून टेंडर भरलं. एवढं मोठं काम करायची हिंमत असणारा कंत्राटदार  जिल्ह्यात कोणीचनव्हता. शंभूरावानी  सगळ्या  गोष्टी पद्धतशीर  मॅनेज केल्या होत्या.रस्त्याच्या कामासाठी चार टेंडर्स आली. त्यातली तीन शंभूरावानीच  नामधारी भरलेली होती. चौथं टेंडर त्यावेळी मुंबई  गोवा रस्त्याची  कामं करणारा कोल्हापूरचा शामराव पाटील ह्याच्याशी संधान बांधून शंभूरावानीच  भरायला लावलेलं  होत. त्याचा  काळवत्री खडीचा मोठा धंदा होता.  कोंड सखलात रस्त्याचं टेंडर  मिळालं काळवत्राचा    की शंभूरावांच्या   आडून  क्रशर सुरू करायचा शामरावाचा बेत होता.

                         शंभूरावानी  योजल्या प्रमाणे त्यांच टेंडर मंजूर झालं.रस्त्यासाठी  जितवण्या जवळ  रस्त्याच्या कामासाठी लागणारी खडी  काधायचा परवाना शंभूरावाना  मिळाला.आठवडाभरातच  जत कडचे सटवाजी  आणि भरमू वडार  आपली  फैलं घेवून कोंड सखलात आले. दोघांच्या फैलात मिळून चाळीसेक  गाढवं होती. दोन्ही फैलानी सुरुवातीला  तरवडच्या  वेशी जवळ पालं टाकली.  पंधरा दिवस घसारीच्या भागात  असलेल्या गाडी रस्त्याची चालचलावू  बेणणावळ आणि  रुंदीकरण करून  ट्रॅक्टर  घालता येण्या इतपत  रस्ता बनवला. तालुक्याच्या गावातून दोन ट्रॅक्टर आले नी  कोंडसखलात  उतरले. इंजिनचा आवाज  ऐकून   गावातली झाडून सगळी    माणसे   कामधंदा सोडून   बघायला धावली. गावदरीतून  पाळेकर वाडी पर्यंत जावून ट्रॅक्टर थांबले.  सटवाजी आणि भरमू  वडार सरपंचाना  भेटून त्याना घेवून  कामगारांची पालं टाकायचा जागा ठरवायलागेले.  जितवण्यावरच्या  ढोरांसाठी असलेल्या टाक्यापासून बक्कळ  लांबवरच्या  अंगाला  मर्गजांच्या काट्याजवळची  जागा   त्याना देण्यात आली. तसेच  बेलदारांच्या माणसानी  पाणी भरायला मरडावर जितवण्या  जवळच्या टाकीवर न जाता  ढोरांसाठीच्या  टाक्यांपैकी वरच्या अंगाची टाकी  आहे  तिथेच जावे अशी सक्त ताकीद देण्यात आली. तसेच मासिक अडचण असताना बायका माणसानी जितवण्यावर जायला बंदी आहे, ही अटही   पाळायची आहे  याची स्पष्ट कल्पना दिली.जितवण्यावरचे देवस्थान  कडक असून  तिथे काही भ्रष्टाकार  झाला तर  बाधिकार  होतो , ही सुचनाही  देण्यात आली.

                     वडारांची पालं पडलीआणि  चार रोजानी   जितवण्याच्या वरच्या  अंगाला  दरडीमध्ये  काळवत्र  फोडण्यासाठी  सुरुंग  घालायचे काम सुरू झाले.  गाववाल्याना डिझेल इंजिनावर चालणाऱ्या कॉम्प्रेसरने  काळवत्री    पाषाणात  ड्रिल करणाऱ्या  पहारी  ही मोठे अतर्क्य  बाब वाटली. सड्या माळावर  गडग्यासाठी दगड फोडायला   हात पहारीने  भोके पाडून त्यात   सुरुंग भरणे    माहिती होते.  जांभ्या  दगडात हाती   छिद्र पाडायला  ताकदवान गड्याला विरड लागे.  इथे ट्रॅक्टर च्या  इंजिन वर  फिरणारी पहार तासाभरात  हात दीड हात  खोल  भोक पाडीत असे. साधारण चार पाच वाव लांबीच्या  भागात एकावेळी   दहा- बारा भोके पाडून  त्यात खेपेने सुरुंग घातले जात.  सुरुंग पेटवण्या पूर्वी   हाकारे मारून मुला माणसाना  सुरुंगाच्या टप्प्याबाहेर  सुरक्षित अंतरा पर्यंत  पिटाळल्यावर  दोघे वडार सुरुंगाच्या वाती  पेटवून  माघारी येवून थांबत. ते आले की  पाच सहा मिनिटानंतर  धडाधड बार  व्हायचे.  सुरूंग घालणारे  जाणते बाप्ये लक्ष देवून असत. सगळे सुरुंग फुटले याची खात्री झाली  की  मगच  कामगार सुरुंग घातल्या जागी  खडी   एकठवायला जात. काहीवेळा घातलेल्या सुरुंगा पैकी  एखाद दुसरा सुरुंग उडत नसे. तो बहुधा   बाद  गेलेला आहे हे जाणत्याना  कळायचं . ठराविक  वेळे पर्यंत स्फ़ोटाचा  धडाका झाला नाही तर सुरुंगा वाया गेला  हे  जवळ जवळ निश्चित असे. पण  न पेटलेला सुरुंग वेळा- उशिराने   होण्याचीही शक्यता असे. म्हणून घातलेले सगळे सुरुंग  झाले  नाही तर तो दिवस उलटे पर्यंत   काम  बंद ठेवले जायचे. पण शहानिशा करायला कोणी पुढे जाऊ धजावत नसे.

         सुरुंग झाले  सगळी जमात कामाला लाग़े. यात बायकानी   लहान पोरे पोरी सुद्धा असत. सगळी माणसे  टोळ्या टोळ्यानी  खडी फोडायच्या कामाला लागे. फोड काम  मोजण्यासाठी जुन्या लाकडी  फळकटांचे  फरे ठोकून त्यात  फोडलेली खडी   तोंडोतोंड भरून  ब्रासाच्या मापाचे डेपो मारले   जात. त्यात लाल , हिरव्या , निळ्या   चिंध्यांचे  बावटे  खोचले जात. त्यामुळे  प्रत्येक टोळीने  केलेल्या कामाचा वेगवेगळा हिशेब ठेवणे सोपे जाते/ ही माहिती आम्हाला महिनाभराने कळली. दर गुरूवारी हप्त्याची सुटी व्हायची .बुधवारी  कंत्राटदाराचा  माणूस येवून आपल्या डायरीत  टोळ्यानी केलेल्याकामाची नोंद करी, मग खडीच्या ढिग़ात लावलेले बावटे काढले जात. टोळ्याना   बोली प्रमाणे हप्त्याच्या  कामाचा  हिशोब होईल त्या प्रमाणात  रक्कम दिली जाई.  (क्रमश: )