जितवण पळाले- भाग 10 - (अंतीम) Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जितवण पळाले- भाग 10 - (अंतीम)

                      जितवणी पळाले-अंतीम भाग १०

 वडारांपैकी कोणीतरी  जावून सरपंच पोलिस पाटिल  याना वर्दी दिली......    तासाभरात गावभर बातमी  पसरली. जेवण खाण टाकून गावातले बापये,  बायका , पोरं   सगळी फरड  जितवण्याकडे धावली.   पुरुष माणसानी  डमरूची शीळा चाळवून मुळ स्थितीत  केली.  झऱ्याच्या भोवारी  काळवत्री कपच्यांचा  ढिगारा पडलेला होता . लोकानी  वडारांची आयदणं  आणून पाण्याच्या  पाटात पडलेला  राडा उपसून बाजुला केला. तासाभरात  मूळ झऱ्याचं मुख दिसायला  लागलं . उजव्या अंगाला   उभाच्या उभा   उंच तडा गेलेला  दिसत होता . राडाबाजुला ओढून  झऱ्याचं मुख मोकळ  केल्यावर मूळ खबदाडीच्या  जागी  पाषाणाचा प्रचंड  मोठा ढलपा  सरकून खब  झाकून गेलेली होती  आणि झरा  बंद झालेला  होता. ‘मायझयां धकल्यान   अकेर शेवटी   नुको थय घाण घतलानच......  आता तो गावात येवने  तेका वडीत  हानून  हय जितो गाडुया..... नी त्ये मायझये वडार...... गावाचा खावन  गावावर उलटून पडले.  आमच्या तोंडातली  गंगा बंद केल्यानी.....  साल्यांक पिटाळून काडा. कोपलेले गावकरी वडारांच्या पालांकडे धावले.

                       वडार हे ओळखूनच होते.म्हातारे कोतारे वडार नी बाया बापड्या पुढे येवून त्यानी  हात जोडीत  धुळीत बसकण मारली. गाववाल्यांचे    पाय धरून  वडार तोंडात माती घालून घ्यायला लागले.  आमी  लय समजावलं  गा  पर त्ये तुमचं  धकलोजी आयकंना गा...... आम्ही सांगितल्या  कामाचे......  आमास्नी जीवं मारु नगासा गा.....”  सगळी जमात गयावया करीत पाया पडून तोंड फोडून घेत असलेली बघून लोकांचा राग जरा निवळला. नाहीतरी कितीही  झालं तरी  कोकणातली माणसं कधीच  कोणाच्या जीवावर उठत नाहीत. जाणते  बापये म्हणाले, “झाला त्येतू तुमची चूक म्हणशा तर धकलो अतिरेक पण करताहा  ह्या तुमी आमका  शब्दान पण बोललास नाय.... आमका समाजला आसतातर  आमी  जितवण्याच्या जवळसार पण सुरुंग घालूक दिले नसते. होव नये तां झालां.....आता तुमका मारून गावाक तरी काय मिळणार हा.....? आमच्या तोंडातली गंगा बंद  झाली ती काय तुमका मारून सुरू व्हणार नाय ....... आता होवचा ता झाला...... पनतुमी ताबडतोब गाव सोडून भायर पडा. पुनारुपी कोन वडार  खोल कोंडाच्या  सीमेत दिसलो तर  तो जीवंत  ऱ्हवणार  नाय .......  ”

         लोक माघारी वळले.  वडाऱ्यानी ताबडतोब काचकी बोचकी गुंडाळून  तासा दीड  तासात  गाव खाली केला.  जनसमुदाय तसाच  निघून रावाच्या वाडीत धकलोजीच्या वाड्यावर गेला.  गेली दोन वर्षं  धकलोजी तालुक्याच्या गावी बिऱ्हाड करून रहायचा. त्याचे दोन भाऊ गावात रहायचे.  गाववाल्यानी झाली गोष्ट  त्यांचा कानी घाऊन  बजावलं “ ह्येच्या अचागणी  वागण्यान जितवणी  पळाला...... गावातली गंगा  ग्येली..... ह्या उपरांत त्यो गावाक म्येलो....पुनारुपी कोंड खोलाचा शिवेत  त्येना पाय टाकलान तर त्येका जित्तो जाळू...... गावाच्या जीवार ह्यो सबापती झालो. चार दिवसात राजीनामो द्येवन् खुर्ची खाली करून सांगा. जर नाय खाली केल्यान तर  तालुक्याच्या गावात जावन् त्येका वडूनकाडून  मारू, तुका पद मिळाला   गावाच्या जीवार्.....”  भावानी  दुसरे दिवशी त्याची भेत घेवून जनक्षोभाची  त्याला कल्पना दिली. त्याने लगेच  आपल्या पदाचा राजीनामा दिला.

                     जितवणी बंद झालं  त्याची पहिली झळ लागली ती पाळेकर वाडीला. पुढच्या वर्षभरात  पाळेकर वाडीतल्या एकूण एक कुटुंबानी  तरवडा पासून ते पठार- दांड्यापर्यंत  मिळेल तशी दहा वीस गुंठे  जमीन जागा घेतली नी  तिथे घरं बांधली . सर्वात आधी पाळेकरवाडी  खाली  झाली. वडारानी  तरवड जवळ घसारीवर बावडीतोडलेनी   त्या भागात सोगमवाडीतल्या बऱ्याच लोकांच्या जमिनी होत्या. तिथे सोगमवाडकर नी गाबतांपैकी काही  कुटुंब  निर्वाहापुरती जमीन घेवून स्थलांतरीत झाली. हळूहळू गाव खाली व्हायला लागला.  ८०च्या दशकात  पुरा  गाव उठला. चाकरमानी बहुसंख्येने  मुंबईत स्थायिक  झाले . त्यावेळी सडावळीला  बाताबेतात जमिनी मिळत.  लोकानी  रस्त्यालगत जागा थारा घेवून तिथे घरं बांधली. 

           गावातल्या बऱ्याचशा जमिनी मुसलमान आणि केरळ्यानी पडत्या भावात  विकत घेतल्या. केरळी बडे हुषार, त्यानी संपूर्ण गावात फिरून तिथल्या परिस्थितीची  काटेकोर पहाणी केली. घसारीवर नाऊ धनगराने  वडारानापाणी खरं करून दिलं त्या  विहीरीचं खोदकाम निरखून बघितलं . त्यानी  गावदरी पर्यंत गेलेल्या  रस्त्याच्या कडेला  वरच्या बाजूला दरडी धरून  कड्याच्या पोटात  वीस – पंचवीस फूट  चर खोदला. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. ठराविक अंतर लांबीचा चर  पुरा झाल्यावर पाणी लागलं. मग मुखाजवळ  साठवण्यासाठी  डबरे मारले.घसारीवरअशा सात आठ ठिकाणी   खोदलेल्या सगळ्या चरात बारमाही पाणी लागलं.   तिथून  पाईप टाकून मळ्यात  पाणी नेवून केळी  नी उन्हाळी भाजीपाला  करायची सुरुवात केली. पाळेकर वाडीत  बोअर वेल मारल्या तिथेही पन्नास फुटावर गोडं पाणी  मिळालं. केरळ्यानी केळीच्या  आणि   अननसाच्या बागाच्या  बागा उठवून  तालुक्यापर्यंतच्या भागात  ज्यूस सेंटर आणि केळी- भाजीपाला  विक्रीचे स्टॉल सुरू केले .  खाडीच्या कडेला  चिंगूळ पॉण्ड बांधले. कोणी  कोणी  मशिनच्या होड्या नी  लॉन्ची  बांधून मच्छिमारी सुरू केली. कोणी कोणी  मशिनच्या  होड्या नी लॉन्ची  बांधून  मच्छिमारी सुरू केली. उन्हाळी   सीझनमध्ये रोज  किमान चार कंटेनर भरून  मच्छी जाते. गावकरी  टाकून गेले  त्या गावात  परप्रांतीय स्थाईक होवून  परिस्थितीवर मात करून गबरगंड  पैसा मिळवीत आहेत.  आज महसुली नोंदीप्रमाणे गावात   ६७घरं आहेत आणि गावाची लोकसंख्या ३७८ आहे. (समाप्त)