एक निरोप असाही... - 2 Ashish Devrukhkar द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक निरोप असाही... - 2

इतक्यात भारतीय आर्मीचा तो भलामोठा ट्रक हॉलच्या गेटवर येऊन थांबला. काळया गडद हिरव्या रंगाचा ती टाटा एलपीटीए 715/4x4 ट्रक पाहिल्यावर धडकी भरावी असा होता. आर्मीचा ट्रक असल्याने त्याच्यासाठी गेट लगेच उघडला गेला. जिथून त्याच्या बहिणीची डोली आता आलेली अगदी तिथेच येऊन तो ट्रक थांबला. ह्याचे लक्ष नव्हते पण जान्हवीने तो ट्रक पाहताच त्याचा हात धरला. तो मात्र विधीत गुंग होता. बहिणीने सुद्धा ट्रक पाहिला होता. त्यातून २ आर्मी ऑफिसर्स उतरून हातात एक कागद घेऊन स्टेजच्या दिशेने येऊ लागले. बहीण समजून गेली की हा आपला भाऊ युनिफॉर्म का घेऊन आलाय. तिने पटकन त्याचा हात पकडला आणि बोलली.

"दादा."

"काय झालं?"

तिने फक्त डोळ्याने खुणवून सांगितले. त्याने खुणावलेल्या दिशेला पाहिले आणि तो समजून गेला की आपल्या कर्तव्याने आपल्याला साद घातली आहे. आता आपल्याला जायला हवे. त्याने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. एका बाजूला बायकोने हात पकडला होता आणि दुसऱ्या बाजूने बहिणीने. त्याने श्वास सोडून डोळे उघडले आणि आपण आता जायला तयार आहे असे दाखवत त्याने आपल्या बहिणीकडे आणि बायकोकडे पाहिले.

जसे आर्मी ऑफिसर्स हॉलमध्ये शिरले तसा पूर्ण हॉल एकदम शांत झाला. वाजंत्री सुद्धा वाजवायचे बंद झाले. ऑफिसर्सना बघून त्याच्या शरीरात वेगळेच स्फुरण चढले. तो जागेवरून उठला. तोपर्यंत दोन्ही ऑफिसर्स स्टेजवर पोहचले होते.

सॅल्युटची देवाणघेवाण झाली. आर्मीवाल्यांनी त्यांच्या टिपिकल स्टाईलने सॅल्युट केला. आर्मीवाले सॅल्युट करताना आपला तळहात समोरच्या व्यक्तीकडे करून करतात आणि ह्याने केलेला सॅल्युट थोडा वेगळा होता. ह्याने केलेला सॅल्युटमध्ये तळहात जमिनीशी ४५ अंशाचा कोन करून होता.

"Hello, Wing Commander D. Ashu. I'm Lieutenant colonel Shekhar with Lieutenant colonel Sudhir."

"Most welcome Lieutenant."

"तुम्हाला माहीतच आहे सीमेवर काय वातावरण आहे, त्यामुळे तुमच्या सुट्ट्या रद्द करून तुम्हाला तातडीने रुजू होण्याचे आदेश निघाले आहेत. ही त्याची कॉपी."

"मला कल्पना होतीच."

"थोडं लवकर निघालात तर बर होईल, आपल्याला रत्नागिरी एअर बेसवर पोहचायचे आहे."

"फक्त १० मिनिटे द्या."

तो तडक आतल्या खोलीत निघून गेला आणि पाठोपाठ त्याची बायको जान्हवी. सगळ्या हॉलमध्ये सन्नाटा झाला होता. सगळे जण उभे होते, नवरा मुलगा आणि त्याचे आई पप्पा सुद्धा स्टेजवर आले होते.

लेफ्टनंट कर्नल सुधीर म्हणाले, "भटजी बुवा तुमच चालू दे, मुहूर्ताची वेळ घालवू नका. आमचं कर्तव्य आहे देशसेवेचे ते आम्हाला पार पाडावेच लागेल. विंग कमांडरच्या मातोश्री डी. आशूला हसत निरोप द्या. त्याचे धैर्य वाढवा."

उरलेला विधी सुरू झाला आणि इकडे आतमध्ये त्याने शेरवानी काढली. आपला पोशाख त्याने चढवला. इतका वेळ उभ्या असलेल्या जान्हवीने त्याला घट्ट मिठी मारली.

"अग रडते काय."

"नाही रडत, पण....."

"पण काय जान्हवी?"

"युद्ध म्हणलं की अंगावर काटा येतो."

"युद्ध नकोय आम्हालाही. पण आपले भाऊ हरवले आहेत त्यांच्यासाठी तर जावेच लागेल."

"तरीही."

"तू एका विंग कामांडरची पत्नी आहेस. तू सुद्धा नवऱ्यासारखे निडर राहिले पाहिजे."

"हो."

तिने मिठीतुन बाहेर येत डोळे पुसले आणि बाहेर आली. हा इकडे युनिफॉर्म घालून तयार झाला. शूज चढवले. कॅप घातली. खांद्यावरचे भारतीय वायुसेनेचे रँक फ्लॅप आणि छातीवरचे नाव मात्र झाकलेलेच ठेवले. बरोबर अकराव्या मिनिटाला तो बाहेर आला.

बाहेर आता थोडी कुजबुज सुरू होती आणि तो बाहेर येताच वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये बाहेर येणाऱ्या त्याला पाहून हॉलमधले सगळे उभे राहिले. वातावरण एकदम बदलून गेले होते. आपल्या भावाला अशा युनिफॉर्ममध्ये पाहून बहीण एकदम खुलून गेली होती.

आई वडिलांच्या जवळ येताच आई आणि वडिलांनी त्याच्या खांद्यावर असलेला बॅजचे कव्हर बाजूला केले. तीन ठळक ओळी असणारा आणि भारतीय वायू दलाचा विंग कमांडर असल्याची ओळख तो बॅज देत होता. बहिणीने त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला भारतीय वायुसेनेत फायटर प्लेन पायलट असल्याचा बॅज लावला आणि बायकोने त्याच्या डाव्या छातीवरच्या नावावर असलेले कव्हर बाजूला केले. खाली लिहिलेले होते.

'डी. आशू'

हॉलमधले वातावरण एकदम पालटून गेले होते. भटजी बुवांनी त्याला विजयी टिळक लावला आणि विजयी होऊन परत ये असा आशीर्वाद दिला. ते म्हणाले, "नभः स्पृशं दीप्तम् म्हणजेच वैभवाने आकाशाला स्पर्श करा. Touch the Sky with Glory. हे तुमचे ब्रीदवाक्यच आहे."

 त्याने आईला आणि नंतर वडिलांना मिठी मारली. आईच्या डोळ्यातले पाणी पाहून तो बोलला.

"आई तुझ्या डोळ्यातले पाणी मला कमजोर करत आहे. जशी तू माझी आई आहेस तशी ही भारत भूमीसुद्धा माझी आईच आहे. तिच्या रक्षणासाठी मला जावेच लागेल."

आईने डोळे पुसले, वडील मात्र खंबीरपणे उभे होते. मग तो बहिणीकडे वळला. बहिणीने त्याला मिठी मारली.

"सासरी नीट राहा, भांडू नकोस उगाच कोणाशी."

"तू शत्रूला अजिबात सोडू नकोस, अख्ख्या भारताचं लक्ष आहे तुझ्यावर. आपल्या साथीदारांच्या हत्येचा बदला घे तू दादा."

"म्हणजे तुला माहितेय काय झालंय ते."

"हो दादा, काल रात्रीच समजले होते, तू बदला घ्यायचा आहेस."

"हो नक्कीच."

"जय हिंद दादा."

"जय हिंद. आता माझी बहिण शोभतेस."

    आता समोर त्याची बायको जान्हवी उभी होती. ती धाडसाने ह्या प्रसंगाला सामोरी गेली. तिने त्याला मिठी मारली पण काहीच बोलली नाही. पाच महिन्यांची ती गरोदर, थोडेसे पोटही दिसत होते तीच. त्यावरून त्याने हात फिरवला.

"काळजी घे." त्याने भावना दाबल्या आणि तो आता आई वडिलांसमोर येऊन उभा राहिला.

"मी इंडियन एअर फोर्सचा विंग कमांडर डी. आशू तुमचा निरोप घेतोय."

"तू आणि पर्यायाने आपण जिंकणार हे युद्ध, तरीही जिंकूनच ये." वडिलांनी मौन सोडलं.

"पप्पा, युद्ध कोणालाच नको असत. जेवढी प्राणहानी आणि वित्तहानी होते त्याहून जास्त देशाचे नुकसान होते. देश काही वर्षे मागे जातो."

     आई शांतच होती, भरलेल्या डोळ्याने ती बोलली.

"लवकर परत ये."

"परत तर मी येणारच ते ही जिंकूनच. एकतर स्वतःच्या पायावर तरी येईन किंवा तिरंग्यात गुंडाळून येईन, पण नक्की परत येईन."

ह्या शब्दांनी कित्येक जणांचा अश्रूंचा बांध फुटला.

"Sir, we have to go now." लेफ्टनंट कर्नल सुधीर बोलले.

    त्याने आई, वडिलांना सॅल्युट केला आणि आपले भरलेले डोळे कोणाला दिसू नयेत म्हणून डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल चढवला. शेवटचं आई, वडील, बहीण आणि बायकोकडे पाहिले आणि तडक स्टेजवरून खाली उतरला. जसा तो फिरला तसा हॉल 'भारत माता की जय' च्या घोषणेने दणदणून गेला. सकाळी वाटलेल्या गुलाबांच्या पाकळ्या ह्या तिघांवर उधळल्या जात होत्या. (क्रमशः)